नवी दिल्ली : दिल्लीतील भाजपचे नेते कपिल मिश्रा यांचे दंगल भडकवणार्या वक्तव्याचा संदर्भ फेसबुकचे संस्थापक व सीईओ मार्क झकरबर्ग यांनी आपल्या कंपनीच्या ब
नवी दिल्ली : दिल्लीतील भाजपचे नेते कपिल मिश्रा यांचे दंगल भडकवणार्या वक्तव्याचा संदर्भ फेसबुकचे संस्थापक व सीईओ मार्क झकरबर्ग यांनी आपल्या कंपनीच्या बैठकीत घेतलेला असूनही दिल्ली पोलिसांनी मात्र कपिल मिश्रा यांच्याविरोधात काहीच पावले उचललेली नाहीत.
फेसबुकच्या माध्यमातून समाजात हिंसाचार फैलावला जातो अशी टीका होत आहे आणि हिंसाचार करणारे सोशल मीडियाच्या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत, यावरही अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. पण कपिल शर्मा यांच्या वादग्रस्त विधानावर अद्याप दिल्ली पोलिसांनी मौन बाळगणे पसंत केलेले आहे.
डोनाल्ड ट्रम्प भारतभेटीवर आले असताना मिश्रा यांनी सोशल मीडियात व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत दिल्ली पोलिसांनी ट्रम्प यांचा भारतदौरा आटोपल्यानंतर एनआरसी, सीएएविरोधात आंदोलन करणार्यांना हुसकावून लावावे मात्र त्यांनी अडवलेले रस्ते मोकळे केले नाहीतर पोलिसांचेही आम्ही ऐकणार नाही असा इशारा दिला होता. तसेच शर्मा यांनी ट्विटरवर दिल्लीत शाहीनबागची पुनरावृत्ती होऊ देऊ नका असेही एक विधान आपल्या समर्थकांना उद्देशून केले होते. त्यांचा निर्देश जाफराबाद येथे सुरू असलेल्या सीएएविरोधी आंदोलनाकडे होता.
फेसबुकने हा विषय हाती घेण्यामागचे एक कारण असे होते की, गेल्या मे महिन्याच्या अखेरीस अमेरिकेतल्या जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या पोलिस मारहाणीतील मृत्यूनंतर फेसबुकवर जे वादळ उठले होते व अमेरिकेत वेगाने हिंसाचार पसरला त्यावरून फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. अमेरिकेतल्या हिंसाचाराच्या घटनांवर व अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी #BlackLivesMatter या नागरिकांच्या आंदोलनावर केलेल्या असभ्य भाषेतील टीकेवर फेसबुक सेन्सॉर आणू शकले नसल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणातल्या टीका झाली होती. या टीकेनंतर आपल्या कंपनीतल्या कर्मचार्यांची झकरबर्ग यांनी २ जूनला बैठक घेतली होती.
या बैठकीत झकरबर्ग म्हणाले, की जगभरात कुठेही हिंसेच्या समर्थनात किंवा हिंसा भडकवणारा मजकूर येत असेल तर वेळीच रोखला जाणे हे प्रत्येकाचे काम आहे. हिंसेच्या मजकुरासंदर्भात कंपनीची अनेक धोरणे आहे. समाजात हिंसा पसरवणारा मजकूर असेल तर त्याविरोधात तक्रारी आल्या तर त्यावर उपाय योजना पूर्वी अनेक वेळा केल्या गेल्या आहेत. नुकतेच हाँग काँगमध्ये नागरी आंदोलन झाले त्यावेळेही हिंसा उफाळून आली होती. हा मजकूर फेसबुकने परिस्थितीचे गांभीर्य पाहून लगेच हटवला होता. मध्यंतरी भारतात अशीच घटना घडली होती. एका व्यक्तीने आंदोलनाविरोधात पोलिस जर काही पावले उचलणार नसतील तर आमचे समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलकांना त्यांचे धरणे मागे घ्यायला लावू अशी धमकी दिली होती. ही धमकी आम्हाला हिंसेला प्रवृत्त वाटल्याने ती फेसबुकवरून हटवण्यात आली होती. अशा अनेक घटना लक्षात आल्यानंतर त्या लगेचच हटवण्यात आल्या होत्या, असे झकरबर्ग म्हणाले.
या बैठकीत, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी हिंसाचार, दगडफेक व लुटालूट करणार्यांविरोधात कडक उपाय योजायले हवेत असे आदेश देत लुटालूट सुरू झाल्यास गोळीबार करा असे प्रक्षोभक विधान केले होते त्यावरही चर्चा झाली. या चर्चेत दिल्लीतल्या घटनांचा पण कोणाचेही नाव व ठिकाणाचा उल्लेख न करता झकरबर्ग यांनी उल्लेख केला होता. हा उल्लेखही दिल्ली पोलिसांना कपिल मिश्रा यांच्याविरोधात काही पावले उचलावी एवढा ग्राह्य वाटलेला नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष २४-२५ फेब्रुवारीला भारत दौर्यावर आले होते. या काळात जाफराबाद मेट्रो स्टेशनजवळ एनआरसी, सीएएविरोधात आंदोलन सुरू होते. हे आंदोलन मागे घेतले जात नसल्याच्या कारणावरून अस्वस्थ झालेले भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी जाफराबादमध्ये जमलेले कार्यकर्ते दोन दिवसात आपले आंदोलन मागे घेत नसतील तर आमचे समर्थक तुमचे ऐकणार नाहीत, असा दिल्ली पोलिसांना इशारा दिला होता. या इशार्याकडे दुर्लक्ष केल्याने दिल्लीमध्ये मोठी दंगल होऊन ५० हून अधिक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दंगलीप्रकरणात दिल्ली पोलिसांनी अनेक जणांना केवळ संशयावरून ताब्यात घेतले आहे पण कपिल मिश्रा यांनी जाहीर धमकी दिली असूनही त्यांना पोलिसांनी साध्या चौकशीसाठीही बोलावलेले नाही.
मूळ बातमी
COMMENTS