फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही

फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही

सौंदर्याबाबत चुकीच्या कल्पना तयार होण्यामध्ये फेअरनेस क्रीम कसे कारणीभूत ठरते याबाबत सार्वजनिकरित्या प्रश्न विचारणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या गटात पल्लवीही सामील झाली आहे. अभय देओल, कंगना राणावत, कल्की कोचलिन आणि नंदिता दास या तारेतारकांनी यापूर्वी गोऱ्या रंगाला अवास्तव महत्त्व देणाऱ्या उत्पादनांवर उघड टीका केली आहे.

यातनांची शेती
नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान ताबडतोब द्याः उपमुख्यमंत्री
शामुआजोचा रॉबिन्सन क्रुजो – भाग ३

दक्षिण भारतीय अभिनेत्री साई पल्लवीने फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्याची ऑफर नाकारली असे अनेक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर नुकतेच तिने स्वतःही Behindwoods या तेलगू वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट खरी असल्याचे सांगितले. एका फेअरनेस क्रीमच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी २ कोटी रुपयांचा कराराचा प्रस्ताव तिने नाकारला.

‘अथिरन’  आणि ‘मारी २’  या चित्रपटांमध्ये काम करणारी साई पल्लवी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री  आहे.

बिहाइंडवुड्स’ला  दिलेल्या मुलाखतीत तिने अशा जाहिरातींचा तरुण मुलामुलींवर कसा परिणाम होतो याबाबत आपले मत व्यक्त केले. ‘हफपोस्ट इंडियातील बातमीनुसार पल्लवी म्हणाली,  “आपला भारतीय रंग आहे. आपण परदेशी लोकांकडे जाऊन त्यांना तुम्ही गोरे का, आणि अशा गोऱ्या रंगामुळे कर्करोग होतो हे तुम्हाला माहीत आहे का असे विचारता कामा नये. आपण त्यांच्याकडे पाहून असा रंग आपल्यालाही हवा असेही म्हणता कामा नये. तो त्यांचा रंग आहे आणि हा आपला आहे! आफ्रिकन लोकांचा स्वतःचा वेगळा रंग आहे आणि तो रंगही सुंदर दिसतो.”

जाहिरातीसाठी मिळणारा पैसा हा तिच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मुद्दा नव्हता. “अशा जाहिरातीतून मिळालेल्या पैशाचे मी काय करणार? मी घरी जाणार, तीन चपात्या नाही तर भात खाणार, कारमधून इकडे तिकडे फिरणार. माझ्या यापेक्षा जास्त मोठ्या गरजा नाहीत. मला माझ्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देता येतो का एवढेच मी पाहते. आपण या ज्या आनंद उपभोगण्याच्या फूटपट्ट्या तयार केल्या आहेत त्या चुकीच्या आहेत असे म्हणता येणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे ती म्हणाली.

या मुलाखतीत पल्लवीने तिच्या बहिणीवर गोरेपणाच्या संकल्पनांमुळे कसा परिणाम झाला आणि ‘गोरी होशील’ असे सांगून ती तिच्या बहिणीला कशी फळे आणि भाज्या खायला लावत असे अशी लहानपणची आठवणही सांगितली.

सौंदर्याबाबत चुकीच्या कल्पना तयार होण्यामध्ये फेअरनेस क्रीम कसे कारणीभूत ठरते याबाबत सार्वजनिकरित्या प्रश्न विचारणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या गटात पल्लवीही सामील झाली आहे. अभय देओल, कंगना राणावत, कल्की कोचलिन आणि नंदिता दास या तारेतारकांनी यापूर्वी गोऱ्या रंगाला अवास्तव महत्त्व देणाऱ्या उत्पादनांवर उघड टीका केली आहे.

अलिकडेच मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेतील अंतिम फेरीतील स्पर्धकांचे एक कोलाज समाजमाध्यमांवर फिरत होते. या सौंदर्यस्पर्धेतील स्पर्धकांच्या त्वचेच्या रंगांमध्ये काहीही विविधता दिसत नाही. भारतामध्ये गोरेपणा आणि सौंदर्याबाबतच्या पारंपरिक कल्पना किती पठडीतल्या आहेत त्याचेच हे द्योतक आहे अशी अनेकांनी त्यावर टीकाही केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0