चंदीगडः मोदी सरकारने संमत केलेल्या तीन शेती कायद्यांच्या विरोधात एकीकडे शेतकर्यांचे सुरू असलेले आंदोलन अधिक चिघळत असताना त्यात विरोधी पक्षांनीही सरकार
चंदीगडः मोदी सरकारने संमत केलेल्या तीन शेती कायद्यांच्या विरोधात एकीकडे शेतकर्यांचे सुरू असलेले आंदोलन अधिक चिघळत असताना त्यात विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका सुरू केली आहे. मंगळवारी केंद्रात सत्तेत असलेला भाजपचा एक जुना मित्र पक्ष व पण शेती कायद्यावरून एनडीएतून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने भाजप पक्षच खरी ‘टुकडे-टुकडे गँग’ आहे, असा टोला दिला आहे. हा पक्ष पंजाबमध्ये हिंदू-शीख अशी फूट पाडत असल्याचा आरोप अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी केला आहे. भाजपने पहिल्यांदा हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात उभे केले आता ते हिंदु-शीख अशी फूट पाडत असून हा पक्ष देशातला सर्वात शक्तीशाली फुटीरतावादी पक्ष झाला आहे व तो पंजाबमध्ये आपल्या फुटीरतावादी राजकारणाचा अवलंब करत असल्याचा आरोप बादल यांनी केला आहे. पंजाबमध्ये शांतीप्रिय हिंदूना शीखांच्या विरोधात उभे करण्याचा कटकारस्थान शिजत असून ज्यांच्यासोबत अनेक पिढ्यांचे सलोख्याचे संबंध आहे, रक्ताचीही नाती झाली आहेत, तेथे भाजपला रक्त सांडायचे आहे, असे आरोप त्यांनी केला.
बादल म्हणाले, सरकारच्या बाजूने बोलल्यास त्याला देशभक्त म्हटले जाते व त्यांच्या विरोधात बोलल्यास टुकडे-टुकडे गँग संबोधले जाते. हाच पक्ष खरा टुकडे-टुकडे गँग असून त्याने देशाच्या एकतेचे तुकडे केले आहेत, अत्यंत निर्लज्जपणे त्यांनी हिंदुना मुस्लिमांच्या विरोधात उकसवले आहे व आता हताश झाल्याने त्यांनी शीखांच्या विरोधात हिंदूंना फूस लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. हा पक्ष पंजाबला धर्मांधतेच्या राजकारणात ढकलत असल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केला.
शेती कायद्यावरून अकाली दलाने भाजपशी युती तोडली होती
वाचकांच्या माहितीसाठी गेल्या सप्टेंबर महिन्यात मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या तीन शेतीविषयक विधेयकांचा निषेध म्हणून शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या व केंद्रीय खाद्यप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिमंडळ पदाचा राजीनामा दिला. अकाली दल हा एनडीएतील घटक पक्ष होता, ज्यांच्याकडे एक कॅबिनेट खाते होते. पण सरकारच्या शेतीविषयक धोरणांना विरोध म्हणून कौर यांना पक्षाने राजीनामा देण्यास भाग पाडले.
सप्टेंबरमध्ये लोकसभेत शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२०, शेतमाल हमी भाव करार आणि शेती सेवा (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, २०२० ही दोन विधेयके मांडली गेल्यानंतर त्याला एनडीएतील घटक पक्ष अकाली दलासह अन्य सर्व विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला होता आणि हे विधेयक संमत होताच या पक्षांनी सभात्याग केला होता.
लोकसभेत दोन कृषी विधेयक संमत होणार असल्याचे लक्षात आल्यामुळे अकाली दलाने या विधेयकाला आपली संमती नसल्याचे सांगण्यास सुरूवात केली होती. त्या अनुषंगाने पक्षाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल या मंत्रीपदाचा राजीनामा देतील, हे स्पष्ट झाले होते. पक्षाचे प्रमुख नेते सुखबीरसिंग बादल यांनी आमच्या पक्षाचा या विधेयकाला विरोध असून त्याचा परिणाम पंजाबमधील २० लाख शेतकर्यांवर होणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बादल यांनी आपल्या खासदारांना व्हीप काढून विधेयकाच्या विरोधात मतदान करण्यास सांगितले होते.
या कायद्याबाबत पंजाबमधील शेतकरी, अडते व व्यापार्यांमध्ये अनेक शंका असून त्या दूर करण्याची गरज आहे, असे अकाली दलाचे म्हणणे होते. आमचा पक्ष शेतकर्यांचे हित पाहणारा पक्ष असल्याने तो असल्या धोरणांच्या विरोधात उभे राहण्यास मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही अकाली दलाने सरकारला दिला होता. शेतकर्यांच्या हितासाठी पक्षाला कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी ती द्यायला तयार असल्याचे पक्षाचे म्हणणे होते.
पंजाब सरकारने गेली ५० वर्षे शेती क्षेत्रासंबंधी अनेक कामे केली आहेत. पंजाबमधील शेतकरी शेतीला आपल्या मुलाप्रमाणे जपतो, असे सुखबीरसिंग बादल यांचे म्हणणे होते.
मूळ बातमी
COMMENTS