शेतकरी संघटनांकडून ‘काळा दिवस’ साजरा

शेतकरी संघटनांकडून ‘काळा दिवस’ साजरा

नवी दिल्ली/चंदीगडः केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांनी बुधवारी काळा दिवस साजरा केला. गेले ६ महिने देशभरातील शेतकरी आंदोलनाला बसले असून त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नसल्याचा निषेध म्हणून काळा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी अनेक ठिकाणी सरकारविरोधात काळे झेंडे फडकवण्यात आले. घोषणाबाजी करण्यात आली. तर काही ठिकाणी पंतप्रधान मोदी, कृषीमंत्र्यांचे पुतळे जाळण्यात आले.

दिल्लीतल्या गाजीपूर सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले होते. त्याच बरोबर सिंघू बॉर्डर व टिकरी बॉर्डरवरही शेतकर्यांची संख्या लक्षणीय होती. गाजीपूरवर भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलकांच्या हाती काळे झेंडे होते, निषेधाचे फलक होते. काही आंदोलकांनी मोदींचे पुतळेही जाळले. घटनास्थळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नव्हते.

कोरोना महासाथीची परिस्थिती पाहता दिल्ली पोलिसांनी शेतकर्यांनी आंदोलन करू नये, गर्दी टाळावी असे आवाहन केले होते तसेच दिल्लीच्या सर्व सीमांवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते.

२६ मे हा दिवस काळा दिवस साजरा करण्याचे आवाहन गेल्या आठवड्यात करण्यात आले होते. देशातल्या १२ प्रमुख विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पुन्हा पाठिंबा दिला होता. शेतकरी संघटनांनी सरकारला पुन्हा चर्चेस येण्याचे आवाहन केले होते. पण सरकारने अद्याप त्याला प्रतिसाद दिलेला नाही.

बुधवारी पंजाब व हरियाणामध्ये आंदोलन अधिक उग्र झालेले दिसून आले. पंजाबमध्ये अमृतसर, मुक्तसर, मोगा, तरणतारण, संगरूर व बठिंडा येथे मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनी आंदोलन केले. तरुण शेतकर्यांनी ट्रॅक्टर, ट्रक, कार, दुचाकी रॅली काढली.

मुक्तसरमध्ये शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख नेते सुखबीर सिंह बादल यांनी निदर्शनाचे नेतृत्व केले.

हरियाणात अंबाला, हिस्सार, सिरसा, कर्नाल, रोहतक, जिंद, भिवानी, सोनीपत व झज्जर येथे शेतकर्यांनी आंदोलन केले.

मूळ बातमी

COMMENTS