सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचे आज दुपारी दीड वाजता निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणात स्टेन स्वामी यांच्यावर
सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचे आज दुपारी दीड वाजता निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणात स्टेन स्वामी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले असून त्यांना ९ ऑक्टोबर २०२० रोजी रांची येथून अटक करण्यात आली होती.
मुंबई ऊच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर २ मे रोजी स्वामींना तळोजा मध्यवर्ती कारागृहातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. कोरोनामधून बरे झालेल्या स्वामींची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना मुंबईच्या होली फॅमिली रूग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले होते.
स्टेन स्वामी यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील खासगी रुग्णालयात दोन आठवड्यांसाठी उपचाराकरिता दाखल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले होते.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज फादर यांच्या जामिनावर दुपारी सुनावणी सुरू असतानाच फादर यांच्या मृत्यूचे वृत्त आले. होली फॅमिली रूग्णालयाचे डॉ. इयान डिसूझा यांनी न्यायमूर्ती संभाजी शिदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाला फादर यांच्या मृत्यूची माहिती दिली.
फादर स्टेन स्वामी यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर आम्ही आवश्यक ते सर्व उपचार केले, अशी माहिती डॉ. डिसूझा यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर स्वामी यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत खंडपीठाने म्हटले, “आम्हाला या बातमीने अत्यंत दु:ख झाले आहे. सांत्वन करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत.”
तळोजा रुग्णालयात असताना स्वामी यांना तीनदा रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. तळोजा तुरुंग प्रशासन, राज्य सरकार आणि एनआयएने त्यांच्या बाबतीत अक्षम्य हलगर्जीपणा केला, असा आरोप स्वामी यांचे वकील अॅड. मिहिर देसाई यांनी न्यायालयात केला आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली.
‘फादर स्टेन स्वामी हे ख्रिस्ती धर्मगुरू होते. त्यांचे कुटुंब नाही. त्यामुळे सेंट झेवियर्स कॉलेजचे निवृत्त प्राचार्य फादर फ्रेझर मस्कारन्हस यांच्याकडे त्यांचा पार्थिव देह देण्यात यावा,’ अशी विनंती अॅड. देसाई यांनी केली.
फादर यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत असताना झाल्याने शवविच्छेदन अहवाल आणि फौजदारी दंड संहितेच्या कलम १७६ प्रमाणे न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी आवश्यक ठरेल,’ अशी भूमिका देसाई व मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी मांडली.
“शवविच्छेदन आजच करण्यात यावे. त्यानंतर मुंबईत कोरोना आपत्ती काळातील कार्यप्रणालीप्रमाणे फादर स्वामी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे. त्यादृष्टीने पार्थिव देह फादर फ्रेझर यांच्या ताब्यात देण्यात यावा,” असे निर्देश खंडपीठाने तुरुंग प्रशासन व राज्य सरकारला दिले. तसेच पुढील मंगळवारी सुनावणीच्या वेळी तळोजा तुरुंग प्रशासनाने स्वामी यांच्यावरील वैद्यकीय उपचारांविषयीचे सर्व वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करावेत, असे आदेश खंडपीठाने दिले.
COMMENTS