‘काश्मीर स्वर्ग नव्हे नरक झालाय’

‘काश्मीर स्वर्ग नव्हे नरक झालाय’

छत्तीसगडचा मंटू सिंग, पुन्हा काश्मीरमध्ये मी येणार नाही, असं दुःखाने सांगतोय. मंटू सिंगला काश्मीरमधील प्रसिद्ध क्रिकेटची बॅट भेट म्हणून मिळालेली आहे. ही बॅट काश्मीरने मला दिलेली शेवटची भेट असल्याचे तो उद्वेगाने सांगतो.

संजीव भट्ट जन्मठेप प्रकरण – कायदारक्षकांची संशयित भूमिका
अमेरिकेतला उद्रेक
कोरोना रोखण्यात महाराष्ट्र अपयशीः हर्षवर्धनांची टीका

जम्मूः छत्तीसगडचा मंटू सिंग, पुन्हा काश्मीरमध्ये मी येणार नाही, असं दुःखाने सांगतोय. मंटू सिंगला काश्मीरमधील प्रसिद्ध क्रिकेटची बॅट भेट म्हणून मिळालेली आहे. ही बॅट काश्मीरने मला दिलेली शेवटची भेट असल्याचे तो उद्वेगाने सांगतो.

मंटू सिंगसारख्या अनेक परप्रांतीय मजुरांच्या व्यथा आज काश्मीरमध्ये दिसू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसात काश्मीर खोर्यात रोजगारासाठी आलेल्या ११ परप्रांतिय मजुरांना दहशतवाद्यांनी ठार मारले आहे. दहशतवाद्यांच्या या कृत्यामुळे भयभीत झालेली परप्रांतीयांची शेकडो कुटुंबे आपला बाडबिस्तारा आवरून काश्मीरमधून पलायन करताना दिसत आहेत. अनेक कुटुंबे काश्मीरमध्ये पुन्हा येणार नाही या मतापर्यंत आलेले आहेत.

बिहारमधील बेसनगाँवमधील अजय कुमार याने पत्नी सरिता व दोन मुलांसह नुकतेच काश्मीरमधून पलायन केले. अजय कुमार पुलवामामध्ये वीटभट्टी मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या मालकाने त्याची २७ हजार रु.ची मजुरी देण्यास नकार दिला. मालकाशी वाद घालूनही त्याला काही मिळाले नाही. त्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या अजय कुमारच्या कुटुंबाने जम्मूला पलायन केले.

अजय कुमारसारखे प्रसंग अनेक मजुरांच्या बाबतीत घडू लागले आहेत.

काश्मीर खोरे आता नरक झाल्याची प्रतिक्रिया अनेकांची आहे. आम्ही तेथे रोजीरोटी कमवायला गेलो होतो पण आमच्या हातात मरण आल्याची भावना चिंटू सिंग यांनी व्यक्त केली आहे. गेल्या एक दशकाहून अधिक काळ वर्षातले चार-पाच महिने काम करण्यासाठी आम्ही येथे येतो पण आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही, असे चिंटू सिंग म्हणतात.

माझ्या मित्राच्या मुलाला भेट द्यावी म्हणून मी काश्मीरमधून एक बॅट विकत घेतली. आता काश्मीरमधील ही वस्तू अखेरची आहे, मला परत काश्मीरमध्ये यायचे नाही. येथील परिस्थिती भयावह आहे. असे चिंटू सिंग म्हणतात. चिंटू सिंग यांच्याबरोबर २० अन्य हिंदू मजूरांनी पुलवामा जिल्ह्यातून पलायन केले आहे. जम्मू व उधमपूर येथे मजुरांचे तांडे आपापल्या घराकडे जाताना दिसतात. हजारो मजुरांनी आता काश्मीरमध्ये आपण परत यायचे नाही, असा निश्चय केला आहे. अनेक मजुरांना त्यांची मजुरी मिळालेली नाही. काहींना मिळालेली आहे. पण मजुरी न मिळालेल्यांच्या अधिक तक्रारी ऐकावयास मिळतात.

बिहारचे राम शरण, संतोष कुमार, छत्तीसगडचा राकेश दास, आलोक चांद धर्मा यांना त्यांच्या मालकाने मजुरी दिलेली नाही. त्यांनी प्रशासनाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

काश्मीरविषयी जे सुंदर चित्र रंगवले जातेय, काश्मीर हा भारताचा स्वर्ग आहे, असे सांगितले जातेय तशी परिस्थिती नसल्याचे झारखंडच्या चुन्नी देवी सांगतात. चुन्नी देवी यांनी टाटा सुमोतून आपले कुटुंब जम्मूला हलवले. तेथून त्या झारखंडला आपल्या घरी जात आहेत. काश्मीरमधील परिस्थिती भीतीदायक आहे, हा स्वर्ग नाही. येथे निष्पाप हिंदू मजुरांना ठार मारतात, अशी प्रतिक्रिया त्यांची आहे.

गेले काही दिवस येथील परिस्थिती चिंताजनक आहे. आमचे झारखंडमधील कुटुंबीय आमच्या जीवाविषयी चिंता करत असतात. अखेर आम्ही काश्मीर सोडायचा निर्णय घेतला व जम्मूला आलो, असे चुन्नी देवी सांगतात. आम्ही आता पंजाब, हरियाणा, दिल्लीत जाऊन तेथे रोजीरोटी कमवू पण काश्मीरमध्ये परत पाऊल ठेवणार नाही, असे त्या म्हणतात.

अनेक मजुरांनी आपल्याला सरकारची कोणतीही मदत मिळाली नसल्याचाही दावा केला आहे. आमच्या मालकांनी आम्हाला ३० दिवसांत घर सोडण्यास सांगितले. तुम्ही पोलिसांना जाऊन भेटा असे हे मालक सांगत होते. पण आम्हाला कोणतीही मदत प्रशासनाकडून मिळाली नाही. गेले महिनाभर जो मानसिक व शारिरीक त्रास सोसावा लागला, त्यातून बाहेर पडण्यासाठी काश्मीरातून पलायन करणे एवढाच मार्ग शिल्लक असल्याचे बिहारमधील मोहम्मद जब्बार याचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0