नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने भारत-चीनदरम्यान चर्चा सुरू असताना उपग्रहांकडून मिळालेल्या छायाचित्रांनुसार चीनने गलव
नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने भारत-चीनदरम्यान चर्चा सुरू असताना उपग्रहांकडून मिळालेल्या छायाचित्रांनुसार चीनने गलवान खोर्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याचे दिसून येत आहे.
स्पेस टेक्नॉलॉजी कंपनी मॅक्सरने २२ जून रोजी ही छायाचित्रे प्रसिद्ध केली असून गलवान खोर्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेच्या अगदी जवळ संरक्षणाच्यादृष्टीने चीनने बांधकाम केले असून या बांधकामामुळे चीनला भारतीय हद्दीत घुसखोरी करता आली असल्याचे संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गुलाबी रंगामध्ये दिसणारे चीनचे तळ.
प्रसिद्ध कार्टोग्राफर निवृत्त मेजर जनरल रमेख पाढी यांनी एनडीटीवीला सांगितले की, पॅट्रोल पॉइंट १४च्या जवळ चीनकडून घुसखोरी होणे शक्य आहे व तसे संकेतही मिळत आहेत. या ठिकाणावर चीनची मोठ्या प्रमाणावर लष्करी वाहने दिसत असून तेथे चीन अधिक सैन्य तैनात करेल असे दिसत आहे.
वाचकांच्या माहितीसाठी याच ठिकाणी १५ जूनला रात्री भारत-चीनच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन भारताचे २० जवान शहीद झाले होते.
उपग्रह छायाचित्रात प्रत्यक्ष ताबा रेषेपासून एक किमीपेक्षा कमी अंतरावर चीनने बांधकाम केल्याचे व रस्ता बांधल्याचे दिसत आहे. तसेच रणगाडे व शस्त्रास्त्राचा साठा केल्याचे दिसत असून भारताची या सीमाभागात कोणतीही हालचाल दिसत नाही.
लडाखमध्ये काम केलेले निवृत्त लेफ्ट. जनरल एएल चव्हाण यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की उपग्रह छायाचित्रानुसार चीनने या परिसरात १५ ते २२ जून रोजीच संरक्षणात्मक बांधकाम उभे केले असून या माध्यमातून चीन डोंगराळ भागात स्वतःचे सामरिक प्रभुत्व ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
मूळ बातमी
COMMENTS