न्यूयॉर्कमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

न्यूयॉर्कमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

मंगळवारी काही लोकांनी न्यूयॉर्क शहरातील क्वीन्स येथील एका मंदिराबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हातोडा मारला. पोलिस या प्रकरणाचा 'हेट क्राइम' म्हणून तपास करत आहेत. त्याचवेळी भारतीय दूतावासाने हे प्रकरण अमेरिकन प्रशासनाकडे नेले आहे.

केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात उतरतील का?
ईडीचे अधिकार योग्यचः सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
नरसिंहानंदकडून ‘हर घर तिरंगा’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

न्यूयॉर्क: अज्ञात व्यक्तींनी येथील मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची हातोड्याने तोडफोड केली. शुक्रवारी हे वृत्त पसरले.

‘सीबीएसईन्यूज’नुसार, सीसीटीव्हीमध्ये मंगळवारी (१६ ऑगस्ट) एक व्यक्ती गांधींच्या पुतळ्याला हातोड्याने मारताना आणि पुतळ्याचे डोके फोडताना दिसत आहे. काही मिनिटांनंतर, सहा लोकांचा एक गट हातोड्याने पुतळा खाली पाडण्यासाठी आलेलाही दिसत आहे. साऊथ रिचमंड हिल येथील श्री तुळशी मंदिराचे संस्थापक लखराम महाराज म्हणाले, “त्यांचे (हल्लेखोर) हे कृत्य पाहून खूप वाईट वाटते.”

बुधवारी सकाळी महाराजांना घटनेची माहिती मिळाली तोपर्यंत गांधी पुतळ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या होत्या. मंदिरासमोर आणि इतर काही ठिकाणी स्प्रे पेंटनेही ‘कुत्रा’ असेही लिहिलेले आढळले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी याच गांधींच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार म्हणाल्या, “गांधींचा पुतळा पाडणे हे खरोखरच आपल्या सर्व श्रद्धांच्या विरोधात आहे आणि हे समाजासाठी अत्यंत त्रासदायक कृत्य आहे.”

माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे की न्यूयॉर्क पोलिस विभाग हेट क्राईम म्हणून दोन्ही घटनांचा तपास करत आहे. महाराज म्हणाले की, समाजातील अनेक लोक आता मंदिरात जायला घाबरत आहेत.

वृत्तात महाराजांचे म्हणणे मांडले आहे, ‘मंदिरात येणाऱ्या लोकांसमोर मला काळजी वाटते हे मी व्यक्त करू शकत नाही कारण मी माझी चिंता त्यांच्यासमोर मांडली तर तेही घाबरतील.”

वृत्तात असे म्हटले आहे की मंदिर आता या जागी गांधींची दुसरी प्रतिमा लावू शकत नाही. कारण मूळ पुतळा हाताने तयार केलेला सुमारे ४ हजार डॉलर किंमतीचा होता.

महाराज म्हणाले, ‘मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की त्यांनी असे का केले?’

अमेरिकेत गांधी पुतळ्याची तोडफोड किंवा विद्रुप करण्याची ही पहिलीच घटना नाही. यावर्षी फेब्रुवारीमध्ये मॅनहॅटनच्या युनियन स्क्वेअरमधील गांधींच्या आठ फूट उंचीच्या पुतळ्याची काही लोकांनी विटंबना केली होती. त्याच वेळी, खलिस्तानच्या समर्थकांनी डिसेंबर २०२० मध्ये वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासासमोरील गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली होती.

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, भारताने शुक्रवारी या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध केला आणि या कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल याची खात्री करण्यासाठी हा मुद्दा अमेरिकन अधिकाऱ्यांकडे मांडला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0