मी आणि गांधीजी – ७

मी आणि गांधीजी – ७

गांधी समजून घेताना - महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. काळाचा मोठा फरक असला तरी गांधीमुल्य कायम आहेत का? काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कसे उतरतात? एका तरुणाचा महात्मा गांधी यांच्याशी निरंतर संवाद सुरु आहे. खरेतर गांधींच्या बरोबर, हा संवाद कोणाचाही होऊ शकतो.

पुण्यात गोली मारो गँग – तुषार गांधी
‘मोदींचे वर्तन पंतप्रधानपदाला साजेसे नाही’
गांधी कुटुंबांशी संबंधित ट्रस्टच्या चौकशीसाठी समिती

३६

गांधीजी : कबीर सिंग पाहिलास काय ?

मी : नाही.

गांधीजी : बरं मग अर्जुन रेड्डी?

मी : पाहिलाय. पण मी काही बोलणार नाहीये त्याच्यावर.

गांधीजी : अरे! का बरं?

मी : कंटाळा आला आहे.

गांधीजी : तुला समीक्षेचा कंटाळा आलाय चक्क? मत द्यायचा कंटाळा? तेही सिनेमावर मत द्यायचा कंटाळा? तुला काहीच कसं वाटत नाही? ये मैं क्या सुन रहा हूँ? कुछ लेते क्यूँ नहीं? मुंग्यांनी मेरूपर्वत तर नाही ना…

मी : अहो…

गांधीजी : काय?

मी : थंड घ्या जरा…मी देतो मत. पण भंकस आवरा…

गांधीजी : जाऊ दे रे. तुला नाही द्यायचं ना मत, नको देऊस. मी उगाच गंमत करत होतो.

मी : हं…

गांधीजी : पण काय रे, ही अशी ब्रोकन कॅरॅक्टर्स बरीच असतात ना अलीकडे? मागे तू काय ते बघत होतास… ती ब्रिटिश मुलगी आणि तिचे एकूण उपद्व्याप…

मी : फ्लीबॅग.

गांधीजी : हां…बरोबर. आता मी तुला खरं सांगू का, मला कधीकधी झेपत नाहीत रे अशी कॅरॅक्टर्स.

मी : हं

गांधीजी : म्हणजे मला जरा गोंधळायला होतं.

मी : हं

गांधीजी : म्हणजे बघ हं, तू चिडू-बिडू नकोस हां, मी आपलं मला काय वाटतं ते सांगतो. तुला त्यातलं जास्त कळतं हे मला माहीत आहे.

मी : अहो ठीक आहे. बोला की. एवढं काय…

गांधीजी : म्हणजे माझं काय म्हणणं आहे की बाबा हो, तुझं कायतरी सॉलिड गंडलंय हे आपल्याला कबूलच आहे. आणि तुला ते खूप पेनफुल होतंय. पण आपण ज्याला संपूर्ण जीवन म्हणू ते फक्त तेवढंच आहे का? जीवनाला काही एक दिशा असावी की नाही? काहीतरी रचनात्मक दिशा? आणि असं रचनात्मक काही करत असताना तू तुझ्या इश्यूजशी, इनर डेमन्सशी झगडतो आहेस तर ते कौतुकास्पद आहे. पण असं पूर्णपणे ब्रोकन असणं….मला हा प्रश्न त्या देवदासबाबतही पडला होता बरं.

मी : या स्टोरीज आहेत. आणि ही त्यातली पात्रं आहेत. आता पात्र कसं उभं राहतं? तर प्रत्यक्षातली माणसं जशी असतात, असू शकतात त्या गुणधर्मांच्या आधारे. आणि मग त्यात कल्पनाविस्तार आहेच. पण पात्राने आदर्श असावं असा अट्टाहास कशासाठी?

गांधीजी : म्हणजे मग अशा चित्रणांना इतकं महत्त्व द्यायचं कारण नाही असं तुझं म्हणणं…?

मी : महत्त्व द्यावं की नाही…चांगला प्रश्न आहे.

गांधीजी : त्याचा परिणाम होतो मला वाटतं लोकांवर. म्हणजे ते बघून लोक काहीतरी वेड्यासारखं वागतात, वागू शकतात. बरोबर?

मी : पण तो दोष कथा सांगणाऱ्याचा नाही. कथा हे एक स्वतंत्र विश्व आहे.  मानवी जीवन कशी वळणं घेऊ शकतं याचं ते एक चित्रण आहे. आर्टिस्टिक इंप्रेशन आहे. आता त्या कथेतल्या पात्रांच्या गुणदोषांमुळे तुम्ही अतिप्रभावित होऊन गंडत असाल तर तो तुमचा दोष नाही का?

गांधीजी : असं म्हणतोस…पटतंय तसं मला.

मी : आणि हे गंडणं तसं जुनंच आहे. आज जय श्रीराम म्हणत काही लोक इतरांचा जीव घेतायत. कारण मुळात त्यांच्यावर एका कथेचा, एका नॅरेटिव्हचा अतिप्रभाव आहे. त्यांच्यातला हैवान बाहेर आला तो कुणामुळे? थेट रामामुळे नाही. तर रामाभोवती उभ्या केल्या गेलेल्या नॅरेटिव्हमुळे. आता प्रश्न हा की यासाठी रामकथेला दोष द्यायचा का?

गांधीजी : …..

मी : काय झालं?

गांधीजी : मला वाटतं, द टाइम यू आर लिव्हिंग इन इज काइंड ऑफ ब्रोकन. अँड दॅट्स व्हाय पीपल आर ब्रोकन.

मी : बरोबर आहे.

गांधीजी : बट हू ब्रोक द टाइम?

मी : काळ घडतो-बिघडतो तो आपल्यामुळेच. लोकांमुळेच.

गांधीजी : बरोबर.

मी : सो वी हॅव टू फिक्स व्हॉट वी हॅव ब्रोकन.

गांधीजी : राइट.

मी : फक्त ते कसं करावं हे कळत नाही.

गांधीजी : एक करता येईल.

मी : काय?

गांधीजी : तुला पटणार नाही.

मी : सांगा तर.

गांधीजी : रामाचंच नाव घेऊन सुरूवात करायची.

३७

गांधीजी : बातमी फारच इंटरेस्टिंग आहे रे…

मी: कुठली?

गांधीजी : कलम ३७७ संदर्भात ज्यांनी बरंच काम केलं त्या दोघी वकील मुली एकमेकींबरोबर आहेत. दे आर अ कपल…

मी : हो. पण काय हो? तुम्हांला धक्का नाही बसत का या नवीन रिलेशन्समुळे?

गांधीजी : म्हणजे?

मी : म्हणजे तुम्हांला हे सवयीचं नाही ना…

गांधीजी : हो, खरं आहे. पण तुला तरी कुठे सवयीचं होतं?

मी : हो, पण…

गांधीजी : पण तू आजच्या काळातला आहेस, मॉडर्न आहेस आणि मी जुन्या काळातला आहे वगैरे वगैरे…राइट?

मी : मला तसं नव्हतं म्हणायचं…

गांधीजी : गडबडतोस कशाला? मी गंमत केली. मी जुन्या काळातला आहे हे बरोबरच आहे. तू माझ्या खांद्यावर बसला आहेस. त्यामुळे तुला पुढचं दिसणारच.

मी : राइट…दॅट्स कूल.

गांधीजी : पण काय रे, माझ्या मनात एक विचार आला.

मी : कुठला?

गांधीजी : आता दोन पुरूष, किंवा दोन स्त्रिया एकत्र राहिल्या तर मग जेंडर बेस्ड विश्लेषण नाहीसंच होईल का?

मी : म्हणजे?

गांधीजी : म्हणजे असं बघ की स्त्री-पुरूष संबंधांचं विश्लेषण पुरूषप्रधान व्यवस्थेच्या बॅकग्राउंडवर होतं तेव्हा स्त्रीचं शोषण ती स्त्री आहे म्हणून होतं हा जेंडरचा अँगल येतो. बरोबर?

मी : बरोबर.

गांधीजी : मग दोन स्त्रिया एकत्र राहिल्या तर जेंडरच्या अँगलचं काय होईल?

मी : त्यावर लगेच तर काही सांगता येणार नाही. कारण अशा व्यवस्थेत त्या दोघींमध्ये किंवा त्या दोघांमध्ये स्त्री -पुरूषांमध्ये जे घोळ होतात तेच घोळ होतात का हे कळायला काही काळ जावा लागेल.

गांधीजी : हं…

मी : पण आता दोघी एकत्र आल्या किंवा दोघे एकत्र आले की काहीतरी घोळ व्हायची शक्यता असतेच. शेवटी दोन माणसं एकत्र आली की काही ना नाही चकमक उडणारच…

गांधीजी : बरोबर. मग मला एक बेसिक प्रश्न पडतोय…

मी : कुठला?

गांधीजी : इज इट अबाउट जेंडर ऑर इज इट अबाउट पॉवर? म्हणजे दोन स्त्रिया एकत्र राहत असतील आणि एकीने समजा दुसरीला त्रास दिला तर तिथे जेंडरचा मुद्दा येणार नाही. फक्त पॉवरचा येईल.

मी : हं…आणि दोन पुरूष एकत्र राहत असतील तरी फक्त पॉवरचा मुद्दा येईल.

गांधीजी : मग एक स्त्री आणि एक पुरूष एकत्र असतील तर पुरूषाकडे आणि स्त्रीकडे जेंडरच्या चष्म्यातून का बघायचं? पॉवरफुल आणि पॉवरलेस माणूस असं का नाही? मग ती स्त्री असो किंवा पुरूष…म्हणजे मग स्त्री स्पेसिफिक किंवा पुरूष स्पेसिफिक असं विश्लेषण कायम न होता किंवा तसे ग्रुप्स न पडता प्रॉब्लेम स्पेसिफिक विश्लेषण जास्त होईल….आणि ते कदाचित अधिक बरं होईल एकूणात.

मी : हं…

गांधीजी : गप्प झालास…

मी : प्रश्न चांगला आहे.

गांधीजी : उत्तर?

मी : अवघड आहे.

गांधीजी : बरं. विचार कर. तोवर मी आपल्यासाठी कॉफी करतो.

मी : टोटल ब्लॅक.

गांधीजी : बरं.

उत्पल व. बा., हे लेखक आणि संपादक आहेत.

क्रमशः

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 4