अज्ञात पूर्वज : आफ्रिकन डीएनए अभ्यासातून रहस्यमय शोध

अज्ञात पूर्वज : आफ्रिकन डीएनए अभ्यासातून रहस्यमय शोध

या शोधातून मानवजातीच्या गुंतागुंतीच्या जनुकीय वारशाचा नवीन पुरावा हाती लागला आहे.

वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील लोकांच्या जनुक-समूहांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना एका अशा रहस्यमय नष्ट झालेल्या मानवी प्रजातीची चिन्हे आढळली जिचा आफ्रिकेमध्ये हजारो वर्षांपूर्वी आपल्या प्रजातीशी संकर झाला होता. मानवजातीच्या गुंतागुंतीच्या जनुकीय वारशाचा हा नवीन पुरावा आहे.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की सध्याच्या पश्चिम आफ्रिकी लोकांमधील एका मोठ्या भागाचा – २% ते १९% – जनुकीय वारशाचा मागएका नष्ट झालेल्या मानवी प्रजातीपर्यंत जाऊन पोहोचतो. या प्रजातीला संशोधकांनी “घोस्ट पॉप्युलेशन” म्हटले आहे.

“आमच्या अंदाजानुसार सुमारे ४३,००० वर्षांपूर्वी हा संकर झाला असावा,” असे  कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस (UCLA) येथील मानवी जनुकशास्त्र आणि संगणकशास्त्राचे प्राध्यापक श्रीराम शंकररमण यांनी सांगितले. सायन्स ऍडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला हा अभ्यास शंकररमण यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे.

होमो सेपियन्स हे साधारण ३ लाखांहून जास्त वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात निर्माण झाले आणि नंतर जगभर पसरले. युरेशियामध्ये विविध मानवी प्रजातींशी त्यांचा संपर्क आला, जसे की निअँडरथल आणि फारसे माहीत नसलेले डेनिसोवन. या बाकी प्रजाती आता नष्ट झाल्या आहेत.

पूर्वीच्या जनुकीय संशोधनातून हे दिसून आले आहे, की आपल्या प्रजातीचा निअँडरथल आणि डेनिसोवन या दोन्ही प्रजातींशी संकर झाला. आफ्रिकेबाहेरील आधुनिक मानवी लोकसंख्येमध्ये अजूनही या दोन्हींचे डीएनए आढळतात. पणनिअँडरथल प्रजातीचे अनेक आणि डेनिसोवन प्रजातीचे काही जीवाश्म आजवर सापडले असले तरी नव्याने शोध लागलेली ही “घोस्ट पॉप्युलेशन” अधिक रहस्यमय आहे.

या प्रजातीबद्दल आणखी काय तपशील ज्ञात आहेत असे विचारले असता शंकररमण म्हणाले, “आत्ता तरी फारसे काही नाहीत. हे लोक कुठे राहत असावेत, ज्ञात जीवाश्मांशी त्यांचा संबंध होता का, आणि शेवटी त्यांचे काय झाले याबद्दल आपल्याला अजूनही काहीही माहिती नाही.”

शंकररमण म्हणाले, उत्क्रांतीच्या रेषेमधल्या ज्या प्रजातीपासून होमो सेपियन तयार झाले त्या प्रजातीपासून ही नष्ट झालेली प्रजाती सुमारे ६५०,००० वर्षांपूर्वी वेगळी झाली असावी. उत्क्रांतीच्या ओघात आपली प्रजाती आणि निअँडरथल जेव्हा वेगवेगळे झाले त्या काळाच्या आधीच हे घडले असावे.

संशोधकांनी शेकडो पश्चिम आफ्रिकी लोकांच्या जनुकीय समूहांचे संशोधन केले. यामध्ये नायजेरियातील योरुबा लोक तसेच सिएरा लिओनीचे बेनिन आणि मेंडी लोक यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी त्यांची तुलना निअँडरथल आणि डेनिसोवन जनुकीय समूहांशी केली. त्यांना असे आढळले की मानवी वंशवृक्षातील अज्ञात सदस्याशी झालेला संकर हेच पश्चिम आफ्रिकी लोकांच्या डीएनए घटकांचे सर्वोत्तम स्पष्टीकरण असू शकते. या संकरामुळे जनुकीय माहितीची देवाणघेवाण झाली असावी.

या प्राचीन जनुकाच्या प्रवाहामुळे पश्चिम आफ्रिकी लोकांना कोणते जनुकीय लाभ झाले का हे अद्याप स्पष्ट नाही.

“आर्केक होमिनिनकडून आलेल्या डीएनएमुळे मानवी जीवशास्त्रावर काय परिणाम झाले त्याबद्दल आपल्याला आत्ता थोडेफार समजू लागले आहे,” शंकररमण म्हणाले. आर्केक होमिनिन म्हणजे नष्ट झालेल्या मानवी प्रजाती. “आपल्याला आता माहीत आहे की निअँडरथल आणि डेनिसोवन या दोन्हींचा डीएनए सर्वसाधारणपणे घातक होता, पण काही जनुके अशी होती जिथे या डीएनएचा अनुकूल परिणाम होता. उदाहरणार्थ तिबेटमधील लोकांनी उंचीला जुळवून घेणे हे बहुधा डेनिसोवनकडून आलेल्या जनुकामुळे सोपे झाले असावे.”

मूळ लेख

COMMENTS