ग्रामपंचायत निवडणूक : सख्खा मित्र ना पक्का वैरी!

ग्रामपंचायत निवडणूक : सख्खा मित्र ना पक्का वैरी!

राज्यातील सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र असले तरी राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीत मात्र हे पक्ष परस्परविरोधी उभे ठाकले आहेत.

२७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका
ग्रामपंचायत पोटनिवडणुकाः २१ डिसें.ला मतदान
सुवेंदू अधिकारी यांना निवडणूक आयोगाची नोटीस

राजकारणात सत्तेच्या खुर्चीसाठी कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो. सत्ता हस्तगत करण्यासाठी कधी कोणाशीही रात्री, अपरात्री अगदी रामप्रहरी सुद्धा गळ्यात गळे घातले जातात. याचे वास्तव आता होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा आता राज्यात सर्वत्र उठला असून येत्या शुक्रवारी म्हणजे १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

राज्यातील सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र असले तरी राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीत मात्र हे पक्ष परस्परविरोधी उभे ठाकले आहेत. भाजप आणि या तीन पक्षात राज्य पातळीवर जरी विरोध असला तरी या निवडणुकीत सोयीनुसार स्थानिक आघाड्या करण्यात आल्या आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या ग्रामपंचायतमध्ये पहिल्यापासून मोहिते-पाटील घराण्याचे प्राबल्य आहे. सुमारे ४५ हजार लोकवस्ती असलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक ही चुरशीची असते. यावेळी भाजपवासिय विजयसिंह मोहिते-पाटील गट विरुद्ध अन्य सर्व पक्षीय अशी लढत होत आहे. या गटाचे नेतृत्व धवलसिंह मोहिते-पाटील हे करत आहेत.

काँग्रेसचेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नांदेड जिल्ह्यातील बारड येथे काँग्रेसला शिवसेनेने थेट आव्हान दिले आहे. शिवसेनेने आपले पॅनल मैदानात उतरवले आहे. त्यामुळे येथे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी चुरशीची लढत होत असून ही आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. याच जिल्ह्यातील दाभड ग्रामपंचायत निवडणुकीत सासू आणि सुनेमध्ये चुरशीची लढत होत आहे. रेखा द्वारभज यांच्या विरोधात संगीता द्वारभज ही त्यांची सून लढत देत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चक्क भाजपने हातमिळवणी करून शिवसेनेला आव्हान दिले आहे. त्यामुळे येथे झालेल्या या अनोख्या आघाडीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शिवसेनेचा बाण रोखण्यासाठी भाजपने हातावर घड्याळ बांधून घेतल्याने याचे पडसाद भविष्यात उमटू शकतात.

सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्या तयार झाल्या असल्याने एरव्ही एकमेकांची पक्षाच्या व्यासपीठावरून उणीदुणी काढणारे येथे गळ्यात गळे घालून फिरत आहेत.

आदर्श गाव म्हणून ख्यातकीर्त असलेल्या हिवरेबाजार, राळेगणसिद्धी आणि पाटोदामध्येही पहिल्यांदा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. गेली ३० वर्षे येथे बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये ९ पैकी ७ जागांवर चुरशीची लढत होत आहे. तर गेल्या २५ वर्षात औरंगाबाद येथील पाटोदा गावाला राज्यभर ओळख करून देणारे विकास पुरुष भास्कर पेरे यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेत आपले पॅनल सुद्धा जाहीर केले नाही. त्यामुळे या गावात आता सर्व पक्षीय लढत होत आहे. छोट्या गावाच्या विकास कामामुळे देश विदेशात पोचलेल्या हिवरे बाजार येथेही निवडणूक होत असून स्वतः पोपटराव पवार हेही रिंगणात उतरले आहेत.

तिकडे परळी आणि बीड जिल्ह्यातील काही प्रमुख ग्रामपंचायत निवडणुकीत अजीब समीकरणे पाहावयास मिळत आहेत. परळी येथे भाजपने चक्क राष्ट्रवादीला मदतीचा हात देऊ केल्याने शिवसेना आणि काँग्रेसची अडचण झाली आहे. हेच चित्र उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश मध्ये पाहावयास मिळत आहे. येथे एका ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातही विविध ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहावयास मिळत आहे. करमाळा ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असलेले आमदार नारायण पाटील आणि बागल गट एकत्र आले आहेत. तर आमदार संजय शिंदे व माजी आमदार नारायण जगताप हे गट एकत्र आले आहेत. एकूण ५३ ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराचा धडाका उठला आहे.

राज्यात येत्या शुक्रवारी म्हणजे १५ जानेवारीला १४,२३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत असून १७ जानेवारीला कोणाची हुकूमत ग्रामपंचायतीवर असेल ते स्पष्ट होईल.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0