हिरवी मिरची ते लॅपटॉप; चार्जर, माउस व्हाया पांगुळगाडा

हिरवी मिरची ते लॅपटॉप; चार्जर, माउस व्हाया पांगुळगाडा

लॅपटॉप, मोबाइल चार्जर, माउस, संगणक ते ढोबळी मिरची, फुलकोबी, अननस, हिरवी मिरची, आले, अशा मजेशीर आणि थोड्या वेगळ्या असलेल्या चिन्हांनी २०२१ मधील पहिली-वहिली होत असलेली ग्रामपंचायत निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे.

लॅपटॉप, मोबाइल चार्जर, माउस, संगणक ते ढोबळी मिरची, फुलकोबी, अननस, हिरवी मिरची, आले, अशा मजेशीर आणि थोड्या वेगळ्या असलेल्या चिन्हांनी २०२१ मधील पहिली-वहिली होत असलेली ग्रामपंचायत निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे.

येत्या १५ जानेवारीला राज्यातील ३५ जिल्ह्यातील एकूण १४,२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायतींची मुदत १७ मार्च २०२० रोजी संपली होती. पण कोविड – 19 या विषाणू मुळे त्यावेळी संपूर्ण निवडणूक कार्यक्रमात स्थगित करण्यात आला होता. लॉक डॉउनमुळे तो संपूर्ण रद्द करण्यात आला. आता नव्याने अधिसूचना जारी करत ही निवडणूक होत आहे.

या वेळी निवडणूक आयोगाने १०९ चिन्हांची यादी जाहीर केली आहे. कोणतीही निवडणूक मग ती ग्रामपंचायत असो की लोकसभा चिन्हांचे महत्त्व खूप असते. लक्षात राहणारे चिन्ह मिळावे म्हणून अनेक जण प्रयत्न करत असतात. निवडणूक प्रचारात मोठ्या खुबीने या चिन्हांचा वापर केला जातो.

साधारणपणे ग्रामपंचायत निवडणूक ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. येथील स्थानिक गट, आघाडी यामधून पॅनल तयार होते. त्यामध्ये विविध पक्षीय लोकांची सरमिसळ असते. त्यामुळे अन्य चिन्हे निवडणुकीत वापरली जातात.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या १०९ चिन्हांची यादी पाहिली तर ती गमतीदार वाटते. या चिन्हामध्ये पाव, ब्रेड, नेलकटर, कंगवा, याबरोबरच भाज्या , सफरचंद, अननस, फ़ुलकोबी, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, मका, आक्रोड अशी संपूर्ण भाजी मंडई चिन्हातून आणण्यात आली आहे. याचबरोबर संगणक, पेन ड्राइव्ह, मोबाईल चार्जर, माऊस, स्विच बोर्ड, लॅपटॉप ही विकासात्मक चिन्हे पहिल्यांदा देण्यात आली आहेत. रिक्षा, फुगा, बादली, केक, कपबशी, चष्मा, हॉकी, किटली, टोपली, पांगुळ गाडा, विहीर, शिट्टी, चमचा, टूथ ब्रश, टूथ पेस्ट कॅरम बोर्ड आदी १०९ विविध चिन्हांचा समावेश आहे.

कोणत्याही उमेदवाराला चिन्ह निवडताना पाच चिन्हे प्राधान्य क्रमाने द्यायची असून त्यातील एक चिन्ह निवडावे लागणार आहे.

दरम्यान या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लाखो रुपयांच्या ऑफर्स देण्यात येत असून त्या विरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पद्धतीने धनदांडगे लोक ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव करतील आणि हे धोकादायक असल्याचे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS