नवी दिल्ली : गुजरातमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना भाजपकडून पदावरून हटवण्याची शक्यता आहे, असे
नवी दिल्ली : गुजरातमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना भाजपकडून पदावरून हटवण्याची शक्यता आहे, असे वृत्त दिल्या प्रकरणी अहमदाबादमधील ‘फेस ऑफ द नेशन’ या न्यूज पोर्टलचे संपादक धवल पटेल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा अहमदाबाद पोलिसांनी दाखल केला आहे. धवल पटेल यांच्यावर इंडियन पीनल कोडमधील १२४ अ व डिझास्टर मॅनेजमेंट अक्ट अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची पोलिस चौकशीही सुरू करण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की, ‘७ मे रोजी पटेल यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची उचलबांगडी करून तेथे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या वृत्तात मांडविया यांनी भाजपच्या नेत्यांची नेतृत्वबदलाबाबत चर्चाही सुरू केल्याचे म्हणण्यात आले होते. हे वृत्त बिनबुडाचे असून महासाथीच्या काळात या वृत्ताने राज्यात भय व अस्थिरता पसरली आहे.’
‘फेस ऑफ द नेशन’मध्ये विजय रुपाणी यांच्या संभाव्य उचलबांगडीबद्दल वृत्त आल्यानंतर ही बातमी गुजरातमधल्या अनेक वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्याने मनसुख मांडविय यांना हे वृत्त बिनबुडाचे आहे असा खुलासा करावा लागला होता.
दरम्यान ११ मे रोजी पटेल यांना क्राइम ब्रँचने ताब्यात घेतले.
अहमदाबादचे पोलिसउपायुक्त बी. व्ही. गोहिल यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, या वेब पोर्टलने असे वृत्त देऊन राज्यात भय व अस्थिरता निर्माण केली असून याची प्राथमिक चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. धवल पटेल यांना कोविड-१९ चाचणीसाठी एसव्हीपीमध्ये पाठवल्याचेही गोहिल यांनी सांगितले.
द हिंदूने असे म्हटले आहे की, रुपाणी यांच्या संदर्भात अन्य वर्तमानपत्रांनीही हेच वृत्त दिले होते पण त्यांच्याविरोधात गुजरात पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही.
देशात महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मंगळवार सकाळपर्यंत या राज्यात कोरोनाचे ८,५०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
मूळ बातमी
COMMENTS