हनोई – व्हिएतनाम भाग २

हनोई – व्हिएतनाम भाग २

हनोई ही राजधानी आणि व्हिएतनाममधील उत्तरेचे महत्वाचे शहर, या शहराला पूर्वेकडील पॅरिस असेही म्हणले जाते. कारण फ्रेंच वसाहतवाद इथे दीर्घकाळ टिकून होता. पर्यटनासाठी पहिल्या दहा शहरांमध्ये या शहराचाचा समावेश होतो.

अयोध्या प्रकरण : ‘मशिदीसाठी मंदिर पाडले’
भारतीय जीवनाशी सतत व्यवहार
तळकोकणातले दशावतारी

इथले लोक गंमतीने असे म्हणतात, की हनोई हे शहर ‘हो ची मिन्ह’ शहराची लाडकी बायको आहे. कारण देशाचे सर्व अर्थकारण ‘हो ची मिन्ह’मध्ये चालते आणि पैसा खर्च करण्यासाठी लोक ‘हनोई’ला प्राधान्य देतात. हे शहर अतिशय उत्साही आहे. इथले लोक, इथल्या जुन्या इमारती, छोट्या छोट्या गल्ल्या, ठिकठिकाणी असणारे बुद्ध विहार, रस्त्यावर वस्तू विकणारे विक्रेते, निरनिराळे रेस्टॉरंट्स आणि बार, कपड्यांची दुकाने, विविध वस्तू, कॉफी ची दुकाने या सर्व गोष्टी शहराच्या जिवंतपणा मध्ये भर घालताना दिसतात. थोडक्यात या शहरात तुम्ही न थकता तासनतास चालून परिसर पाहू शकता.

हे शहर चिनी आणि फ्रेंच संस्कृतीने बहरलेले आहे. सांस्कृतिकदृष्ट्या हे शहर खूप समृध्द आहे. या शहरातील ओल्ड क्वार्टर हा भाग तर पर्यटकांसाठी मेजवानीच आहे. अतिशय रुंद रस्ते, वेगवेगळी देवळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्ट्रीट फूड शौकिनांसाठी तर स्वर्गच. १९४० ते १९४५ या कालावधीत जपानी लोकांनी हे शहर ताब्यात घेतले होते. १९४५ मध्ये ते गेले आणि पुन्हा १९४६ मध्ये फ्रेंच लोकांनी पुनरागमन केले आणि जवळ जवळ नऊ वर्षे त्यांनी हे शहर सोडले नाही. जागतिकीकरणामुळे आता या शहरात परदेशी गुंतवणूक वाढली आहे.  के एफ सी, पिझ्झा हट्ट, जॉलिबी यांसारखे फास्ट फूड सेंटर्सही ठिकठीकाणी दिसतात.

‘हनोई’मध्ये पश्चिमेकडील तळ्याकाठी असणाऱ्या एका बुद्ध विहाराला आम्ही भेट दिली. त्याचे ‘Tran Quoc Pagoda’ असे नाव होते. हा विहार पुरातत्व विभागांतर्गत येतो. पंधराशे वर्षे जुना असलेल्या या विहारात अनेक राजे महाराजे या विहारात येत असत. इथे एक अकरा मजली स्तूप आहे. पगोड्याचे बांधकाम अतिशय प्राचीन आहे. सकाळच्या कोवळ्या सोनेरी उन्हामुळे हा पॅगोडा अतिशय नयनरम्य दिसत होता. या विहारामध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी १९५९ साली बोधी वृक्षाचे रोप लावले. तेंव्हा राष्ट्रपिता हो ची मिन्ह हे देखील उपस्थित होते. वृक्षारोपणाचा उद्देश भारत आणि व्हिएतनाम यांच्यामधील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध दृढ करणे हा होता. नुकतेच या वृक्षाच्या रोपणाला साठ वर्षे पूर्ण झाली.

‘टेम्पल ऑफ लिटरेचर’

‘टेम्पल ऑफ लिटरेचर’

स्थानिक लोकांशी गप्पा मारताना असे कळले, की इथले लोक टेम्पल म्हणजे देऊळ ही संकल्पना साहित्य, कला यांच्यासाठी वापरतात. म्हणजे इथे देवळे आहेत ती देवाची नव्हे, तर साहित्याची, कलेची, शिक्षणाची. असेच एक टेम्पल जे अतिप्राचीन आहे त्याला ‘टेम्पल ऑफ लिटरेचर’, असे म्हणतात. हे देऊळ १०७० मध्ये बांधले गेलेले आहे. विचारवंत आणि विद्वान महर्षि तसेच चायनीज तत्वज्ञ कन्फ्युशियस यांना हे देऊळ समर्पित केले आहे. या देवळाची युद्ध काळात दुरावस्था झाली होती. परंतु आता हे देऊळ दुरुस्ती नंतर दिमाखात उभे आहे. हे देऊळ म्हणजे व्हिएतनाम मधील सर्वात पहिले विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. आपल्याकडे जशी एक गुरुकुल परंपरा होती तशी इथेही होती.  या टेम्पलमध्ये शिकलेले किंवा ज्यांनी हे बांधले होते, ते अस्सल सरंजामशाही लोक होते. इथे चार ऋतुंप्रमाणे शिक्षण घेतले जायचे. या टेम्पलमध्ये उच्चभ्रू लोक उच्चशिक्षण घेत असत, मात्र स्त्रियांना प्रवेश नव्हता. या टेम्पलचा परिसर अतिशय विलोभनीय आहे. सर्व खोल्या, तेथील जीने हे लाकडी आहेत. अतिशय शांत परिसर विविध झाडे, कमालीची स्वच्छता. कन्फ्युशियसचा पुतळा तसेच त्याचे अनुयायी यांचेही पुतळे तिथे पाहायला मिळतात. या विद्यापीठात प्राविण्य मिळवलेले विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्राचे शिलालेख तेथे उभे केलेले दिसतात.

हो ची मिन्ह म्हणजे व्हिएतनामचा राष्ट्रपिता. प्रत्येक चलनावर हो ची मिन्हचे छाया चित्र आपल्याला पाहायला मिळते. मार्क्स आणि लेनिनचा अनुयायी असणाऱ्या हो ची मिन्ह यांनी भूमिगत असताना किमान दोनशे वेळा आपली नावे अणि ओळख बदलली. त्याचे माझोलियम या शहरात आहे. लेनिनच्या देह दर्शनासाठी मॉस्को मध्ये ज्याप्रमाणे माझोलियम उभारलेले आहे. त्याच धर्तीवर ही इमारत आहे. जिथे त्याचा देह येणाऱ्या पर्यटकांसाठी दर्शनासाठी ठेवला आहे. ही इमारत १९७५ साली बांधली गेली. सुमारे दोनशे चाळीस एकरावर ही इमारत असून, अनेक झाडे या परिसरात लावली आहेत. जगभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. काळया ग्रॅनाईटमध्ये याचे बांधकाम आहे.. जेव्हा हो ची मिन्ह जिवंत होते तेव्हा त्यांना अनेक ठिकाणी भूमिगत होत फिरावे लागले, लपावे लागले. संपूर्ण आयुष्य हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात घालवलेले हो ची मिन्ह यांचा देह पाहण्यासाठी आम्ही कॉम्प्लेक्समध्ये गेलो. तेव्हा भयाण शांतता आणि कडक शिस्त जाणवली. देह मध्यवर्ती ठिकाणी ठेवला होता आणि त्याभोवती चार सैनिक बंदूक घेऊन उभे होते. हो ची मिन्ह चा देह आता समोर दिसत होता. हाच तो माणूस ज्याच्या पायाला शरीराला कधीच आराम मिळाला नसेल, परंतु आज मात्र या कॉम्प्लेक्समध्ये तो शांत पहुडलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज दिसत होते, केशरी रंगाच्या दिव्याने पूर्ण खोली उजळली होती. त्याच्या हनुवटीवर असणारी दाढी लक्ष वेधून घेत होती.

'वन पिलर पॅगोडा'

‘वन पिलर पॅगोडा’

या कॉम्प्लेक्स पासून काही अंतरावर ‘वन पिलर पॅगोडा’ आहे. हा ऐतिहासिक पॅगोडा १०४९ साली बांधला गेला. वैशाख पौर्णिमेला बुद्ध जयंतीच्या दिवशी येथे उत्सव असतो. १९५४ साली हा पॅगोडा फ्रेंच लोकांनी परत जाताना उध्वस्त केला होता. काही काळाने त्याची परत दुरुस्ती करण्यात आली. हा केवळ एका दगडाच्या खांबावर उभारलेला आहे.

व्हिएतनाम हा स्ट्रीट फूडसाठी अतिशय प्रसिद्ध देश आहे. देश-विदेशातील पर्यटक इथल्या विविध पदार्थांची चव घेतल्याशिवाय मायदेशी परतत नाही. व्हिएतनाममधील बहुतांशी पदार्थ हे उकडलेले असतात. टेबलाच्या मध्यभागी एक मोठे मातीचे भांडे (क्ले पॉट) छोट्या गॅसवर ठेऊन त्यात पाणी उकळत असते. या पाण्यामध्ये चिकनचे तुकडे, विविध मासे, हिरवा भाजीपाला टाकून उकळले जाते. नंतर ते विविध पारंपरिक सॉसला लावून ते खाल्ले जाते. बरोबर प्यायला एखादे पेय. अशी पद्धत येथे दिसत होती. जेवण झाले, की कलिंगड, टरबूज, अननस, ड्रॅगन फ्रूटच्या फोडी डेझर्ट म्हणून दिल्या जातात. अजून एक विशिष्ट प्रकार होता. तो म्हणजे अंडे टाकून केलेली कॉफी. कॉफीचे शौकीन असणाऱ्यांनी ही जरूर प्यायली पाहिजे. फ्रेंच लोकांनी येथे कॉफीची शेती सुरू केली होती. सतत आठवडाभर उकडलेले खाऊन खाऊन कंटाळा आल्याने आम्ही आमच्या हॉटेलजवळच असणाऱ्या एका भारतीय रेस्टॉरंट मध्ये शिरलो. चिकन बिर्याणी आणि खमंग रोटीची ऑर्डर दिली. तेवढ्यात एक आवाज आला. “तुम्ही मुंबईहुन आलात का”. आम्ही उडालोच. आम्हाला आश्चर्य वाटले! मराठी भाषेतून अचानक आकाशवाणी कुठून आली? यशोदिप नावाच्या महाराष्ट्रातील युवकाने आम्हाला हाय केले होते. हा मुंबईचा तरुण व्हिएतनाममध्ये एका फार्मास्युटिकल कंपनीत, गेली सहा महिने नोकरी करतो आहे. मग आपला मराठमोळा मित्र भेटल्यावर आम्ही त्याच्याबरोबर थोडीफार शॉपिंग केली. या मित्राने आम्हाला शहराबद्दल आणखी थोडी माहिती दिली आणि तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाल्याने आम्ही निवासस्थानी परतलो. यशोदिपने सांगितले, की इथे मराठी माणूस पाहणे, अगदीच विरळ!

‘हनोई’पासून दोन तासांच्या अंतरावर दक्षिणेला ‘निन्ह बिनह’ नावाचे तालुका वजा शहर आहे. तिथेच ‘होआ लु (Hoa Lu) ‘ ही व्हिएतनामची प्राचीन राजधानी आहे. तिथेच तिथल्या दोन प्राचीन (Đinh Tiên Hoàng (Đinh Bộ Lĩnh) and Lê Đại Hành (Lê Hoàn) राजांची येथे देवळे आहेत. एकेकाळी राजकीय आणि सांस्कृतिक घडामोंडीचे केंद्र असणारे, हे ठिकाण अतिशय रम्य आहे. या राजधानीचे काही अवशेष अजूनही शिल्लक आहेत. मोठ्या जीर्ण झालेल्या दगडी कमानी आणि त्यावर लावलेला जुना झेंडा लक्ष वेधून घेतो. या दोन राजांचा सन ९६८ आणि १०१० हा काळ होता. आज येथील गावकरी या ऐतिहासिक घटनांवर दरवर्षी एक नाटक बसवतात आणि उत्सव साजरा करतात.

याच प्रदेशात ताम कॉक ( Tam Coc) हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक ठिकाण आहे. भाताची शेती, विविध तलाव, डोंगर माथ्यावरून वाहणारे वारे! या परिसरात सायकलवरून फेरफटका मारता येतो आणि तलावातून होडीने, आजूबाजूचा आल्हाददायक निसर्ग अनुभवत फिरता येते. इथेही बायका होड्या चालवतात. तीन मोठ्या गुफांमधून होडीने प्रवास करताना काळजाचा ठोका चुकतो. याच गुंफांजवळ दुसऱ्या होडीमध्ये एक स्त्री पोर्टेबल माईक आणि स्पीकर घेऊन व्हिएतनामी गाणं गात होती आणि स्नॅक्स शीतपेये विकत होती. जणू पाण्यावर म्युझिकल कॉन्सर्ट सुरु होती.

राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी १९५९ साली लावलेले बोधी वृक्षाचे रोप.

राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी १९५९ साली लावलेले
बोधी वृक्षाचे रोप.

व्हिएतनामच्या सौंदर्यामध्ये मानाचे पान म्हणजे, ‘हा लॉंग बे (Ha Long Bay) हा भौगोलिक प्रदेश. ‘हनोई’पासून साधारण तीन तासाच्या अंतरावर हा प्रदेश आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये हा प्रदेश येतो. शहरातून काही टूर कंपन्या पर्यटकांना या प्रदेशात नेतात. साधारणतः एक रात्र किंवा दोन रात्रीचा मुक्काम इथे करता येतो. निळ्याशार समुद्रामध्ये पंधरा ते सोळा खोल्या असलेल्या एका छोट्या क्रुझमध्ये तिथे राहण्याची व्यवस्था केली जाते. या प्रदेशाकडे बसमधून जाताना बसमध्ये एका  वृद्ध स्त्रीची ओळख झाली. ती अमेरिकेहून आली होती. ती गेले दोन महिने प्रवास करीत होती. सर्व आशिया पिंजून काढणार होती. ती म्हणाली, की पुढील तीन महिने ती अजून प्रवास करणार होती.  तिचे पुढचे ठिकाण थायलंड असणार होते. इतकी वयस्कर असूनही जग पाहण्याची विविध संस्कृती अभ्यासण्याची तिची धडपड आणि उत्सुकता वाखाणण्याजोगी होती. ती आनंदी दिसत होती. तिने तिचे मोठे घर विकले आणि प्रवास सुरु केला.

गप्पा मारता मारता आमची गाडी एका ठिकाणी थोड्या वेळासाठी थांबली. तिथे एक कलादालन होते. अनेक अपंग वृद्ध, काही मध्यमवयीन लोक काही तरी कलाकुसर करत एका ओळीत बसले होते. विविध पेंटिंग्ज, काही दगडापासून, लाकडापासून बनवलेल्या वस्तू, कापडावर विणलेली चित्रे विकण्यासाठी ठेवलेली होती. व्हिएतनाममध्ये अमेरिकन सैन्याने युद्धात जे रसायन हल्ले केले होते, त्यात जखमी झालेले किंवा त्या हल्ल्यातून अनुवांशिक अपंगत्व आलेले होते. आम्हीही काही वस्तू खरेदी केल्या.

‘हा लॉंगमध्ये एका क्रुझमध्ये आमचे बुकिंग केले होते. एका छोट्या बोटीने आम्ही क्रुझवर गेलो. प्रत्येकाला आपापल्या खोलीची किल्ली मिळाल्यावर क्रुझचा प्रवास सुरू झाला. संध्याकाळी चार वाजता आम्ही बाहेर पाहिले असता क्रुझ संथ गतीने पुढे जात होती. आजूबाजूला अनेक छोटे छोटे डोंगर दिसत होते. कधी कधी क्रुझ दोन छोट्या, कधी मोठ्या उंच खडकांच्या मधून समुद्रात वाट काढत पुढे चालली होती. असे छोटे मोठे एकूण २००० खडक डोंगर या समुद्रात आहेत, अशी माहिती मिळाली. या खडकांची दंतकथा अशी सांगितली जाते, की हे खडक किंवा डोंगर म्हणजे रेड ड्रॅगनच्या तोंडातून बाहेर पडलेले निखारे आणि अग्निज्वाला कालांतराने थंड होऊन, त्याचे हे डोंगर किंवा खडक झाले आहेत. या परिसरात त्याचदिवशी सायंकाळी क्रुझ एका ठिकाणी येऊन थांबली. पुन्हा आम्हाला छोट्या बोटीतून एका छोट्याश्या किनाऱ्यावर नेण्यात आले आणि समुद्रात पोहणे, खेळणे या साठी वेळ देण्यात आला होता. विविध देशातून जवळ जवळ वीस लोक तिथे आलो होतो. कायकिनमधून चक्कर मारल्यावर पुन्हा क्रुझ आलो. क्रुझच्या छतावर मस्त वारा, व्हिएतनामी संगीत, चहा आणि फळांचा आस्वाद घेताघेता विविध देशातील लोकांशी ओळखी आणि गप्पा झाल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी क्रुझ थेन कान्ह सन केव्ह (Thien Canh Son Cave) येथे पोहचली. निसर्ग निर्मित गुहा पाहण्यासाठी आम्ही पुन्हा उतरलो. आमच्या प्लास्टिकच्या बाटल्या आमच्या हातून पहिल्याच दिवशी काढून प्रत्येकाला काचेची छोटी बाटली देण्यात आली होती. बाटल्या भरण्याची तिथे सोय होती. क्रुझवर व्हिएतनामी पद्धतीचे स्प्रिंग रोल्स तयार करण्याची संधी प्रत्येकाला देण्यात आली. तोच आपणच तयार केलेला नाश्ता खाऊन आम्ही पुन्हा बंदरावर आलो आणि ‘हनोई’कडे परतलो.

हनोई शहरात वॉटर पपेट शो असतो. तो अगदी न चुकता पाहणे आवश्यक आहे. इथे कळसूत्री बाहुल्या पाण्यात खेळवल्या जातात. व्हिएतनामचे ग्रामीण जीवन, उत्सव, थोडाफार इतिहास, गाण्याच्या आणि काही संवादाच्या माध्यमातून दाखवला जातो. दोन गायिका, तीन वादक, संवाद म्हणणारे एक दोन जण असा हा पूर्ण संच असतो. अतिशय सुमधुर लोक गीते विविध व्हिएतनामी वाद्ये याचा मिलाफ करून दिमाखदार थिएटरमध्ये हा शो होतो.

व्हिएतनाम भौगोलिकरित्या उत्तर, मध्य आणि दक्षिण असा विभागला गेला असला, तरी येथे एकीचा सुर दिसतो. हिरवीगार शेती, हसरी, बोलकी, मायाळू माणसे आणि रक्तरंजित काळया इतिहासाला साक्ष ठेवून एका उज्वल भविष्यासाठी झटणारी जनता, ठीठीकानी तुमचे स्वागत करते. हो ची मिन्ह यांनी घातलेल्या समाजवादाच्या तत्त्वांकडून व्हिएतनाम आता इतर आशियातील देशांप्रमाणे भांडवली वाटचालीवर पुढे जात आहे. मोठे मॉल्स, पंचतारांकित हॉटेल्स, जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड, नवनवीन मोठे ब्रीज. जागतिकीकरण आत्मसात करणारा हा देश मात्र स्वत्व आणि संस्कृती म्हणजे शेती, मासेमारी, सिरॅमिक उद्योग, सिल्क उद्योग, लांब लचक बोळकांडातील लपलेली छोटी घरे आणि त्यांचा साधेपणा टिकवून आहे.

धनंजय भावलेकर, हे सिने-नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

सावनी विनिता, माध्यमविषयक अभ्यासक असून, सेंट मीरा महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या व्याख्यात्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0