हिंदी-उर्दूः भाषेचे असेही राजकारण

हिंदी-उर्दूः भाषेचे असेही राजकारण

अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांकवादी राजकारण्यांनी धर्माचं राजकारण साधताना, उर्दू भाषेवर विशिष्ट समूदायाची भाषा म्हणून शिक्का मारला. तिच्या मूळ ओळखीचं अपहरण झालं. त्याचाच एका ख्यातीप्राप्त अभ्यासकाने घेतलेला हा रंजक वेध.

अभिनंदन वर्धमान वीर चक्र पुरस्काराने सन्मानित
शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठींबा
हाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका

‘हिन्दी’ – हे मूळ नाव असलेली भाषा आज ‘उर्दू’ या नावाने ओळखली जाते. वस्तुतः मूळ हिंदी आणि आधुनिक हिन्दी या दोन भिन्न भाषा आहेत. इतर भाषांच्या तुलनेत उर्दू ही नवी आणि तरुण भाषा असली, तरीही तिचा उगम व तिचा इतिहास हा जनसामान्यांपासून ते भाषातज्ज्ञांपर्यंत सर्वांसाठीच वादाचा विषय ठरला आहे.

मूळ हिंदीचे पतन

खरं तर उर्दू हे नाव १८५७ च्या आसपास प्रचलित होऊ लागलं. याच दरम्यान मुघल साम्राज्याचा लौकिकार्थाने अंत झाला. ‘हिन्दी’ हा शब्द विसाव्या शतकातील दुसऱ्या दशकात प्रचलित झाला. या शब्दाचा वापर नि प्रचार कवी इक्बाल यांनी केला. ज्यांच्या कविता उघडपणे इस्लामिक होत्या. उर्दू ही मुसलमानांची भाषा आधुनिक हिन्दी ही हिंदूंची भाषा आहे, हा १९०३ या वर्षी ‘मुस्लिम लीग’च्या स्थापनेनंतर केला गेलेला दावा या उदाहरणामुळे खोटा ठरतो. परंतु तेव्हापासून उर्दू भाषेचा वापर मुस्लिम समाजाला एकत्रित करायला व कालांतराने एका स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी केला गेला.

शमशुर रहमान फारुकी (दुर्दैवी योग असा, या लेखाचा अनुवाद पूर्ण झाला, त्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर २०२० रोजी अलाहाबाद येथे फारुकी यांचे निधन झाले. उर्दू साहित्य विश्वातला मार्गदर्शक तारा निखळला.) यांच्या ‘उर्दू का इब्तेदाई जमाना’ (१९९९) या प्रकाशनाने व त्या नंतर प्रकाशित झालेल्या मूळ इंग्रजी आवृत्ती ‘Early Urdu Literary Culture and History’ (2001) ने  उर्दू भाषा व संबंधित साहित्यिक संस्कृतीबद्दलच्या अनेक कल्पनांची सुधारित उजळणी केली. उर्दू ही १७व्या शतकाच्या सुमारास दिल्ली आणि भोवतीच्या परिसरात विकसित झाली, या मान्यतेला संबंधित ग्रंथाने छेद दिला. या ग्रंथाने ‘उर्दू’ नावाच्या भाषेचा इतिहास आणि तिच्या साहित्यिक इतिहासासंबंधित नवी माहिती सादर केली. या माहितीला अजून तरी कुणीही आव्हान दिलेले नाही.

‘उर्दू’ हे नाव कसे प्रचलित झाले याचे मूळ शोधण्याच्या फारुकी यांच्या भूमिकेचा अभ्यास करण्याची किंवा आज अस्तित्वात असलेल्या अध्ययनात सुधारणा करण्याची तसदी कोणत्याही उर्दू भाषा तज्ज्ञाने घेतली नाही, ही आश्चर्याची तसंच दुर्दैवाची बाब आहे. उर्दू एका विशिष्ट प्रकारे विकसित का झाली, ज्या भाषेचे आधीचे नाव ‘रेख्ता’ हे होते, नंतर ते आपसूक ‘हिन्दी’ असे झाले, तिला अचानक ‘उर्दू’ हे बनावटी नाव कसे काय दिले गेले, यासंबंधातली कारणं धक्कादायक आहेत. काही प्रमाणात क्रांतिकारीदेखील आहेत. किंबहुना, ‘उर्दू’ हे नाव आधुनिक हिन्दीच्या पुरस्कर्त्यांनीच प्रचलित केले असावे, असे दिसते. त्यांचा उद्देश ‘हिन्दी’ ही एक नवी भाषा स्थापित करणे हा होता, जी भाषा एक विशिष्ट भाषिक-सांस्कृतिक-धार्मिक ओळख निर्माण करते. ‘हिन्दी – हिंदू – हिंदुस्थान’ या घोषणेद्वारे याची प्रचिती येते. या घोषणेद्वारे धर्म व राष्ट्राचा आधार घेऊन प्रदेश आखले गेले. त्यामुळे ‘आधुनिक हिन्दी’ हे थोडा अपराधीभाव असणारे नाव मागे टाकले गेले आणि हिन्दी हेच नाव प्रचलित झाले.

फारुकी यांनी मांडलेल्या मताच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणासंबंधित प्रचलित असलेले मुद्दे हे उर्दू भाषा, तिची उत्क्रांती व भाषिक संस्कृती यांच्याबद्दल अस्तित्वात असलेल्या गैरसमजांना अधोरेखित करतात. तरीही या विद्वानांच्या कल्पना या सत्य असल्यासारख्या मांडल्या जातात, असं फारुकी यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे.

गैरसमजांचा गुंता

थोडक्यात सांगायचं, तर फारुकी यांची काही विधानं अशी आहेत:

  • उर्दू या नावाचा ‘लष्कर’ किंवा ‘फौज’ किंवा ‘लष्कर छावणी’ या शब्दांशी काहीही संबंध नाही. एरवी अनेक लोक अशी मान्यता बाळगून आहेत. बरेच लोक असे ही मानतात, की उर्दू ही अनेक भाषांचा आणि बोलींचा समूह आहे व भारतावर स्वारी करणाऱ्या मुस्लिम सैन्याने स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी ही भाषा विकसित केली. परंतु हे खरं नाही. भाषातज्ज्ञ जॉर्ज अब्राहम गिअर्सन, जे इंडियन सिव्हिल सर्व्हिसचे सदस्य होते, ज्यांनी ‘भारतीय भाषिक सर्वेक्षण’ याचे लेखन केले, त्या गिअर्सन यांचादेखील असा गैरसमज करून देण्यात आला होता. नंतर मात्र त्यांनी आपली भूमिका बदलली.
  • ‘उर्दू’ हा शब्द ‘शहाजहानाबाद’ (चार भिंतींत वसलेलं शहर) या शहराला संबोधण्यासाठी वापरला जात असे. या उल्लेखाला मान्यता मिळाली, ती १७व्या शतकाच्या मध्यात. ही मान्यता १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत कायम होती.
  • ‘उर्दू’ हे भाषेचे नाव म्हणून १८व्या शतकाच्या अखेरीस सर्वप्रथम वापरलं गेलं.
  • आज ज्या भाषेला उर्दू म्हणून ओळखलं जातं, तिला अनेक नावांनी संबोधलं जात होतं. परंतु या सर्व नावांमधील सगळ्यात नवीन आणि सर्वात संशय निर्माण करणारे नाव म्हणजे, उर्दू ! यात संशय अशासाठी, की या नावाचा भाषेच्या उगमाशी काहीही संबंध जोडता येत नाही. हिंदी/हिंदवी/देहलवी ही आधी संबोधली गेलेली नावं. किंबहुना, ‘हिन्दी’ आणि ‘रेख्ता’ ही नावं १८व्या १९व्या शतकात प्रचलित होती. आज ज्या भाषेला आपण ‘उर्दू’ म्हणून ओळखतो, तिला ‘हिन्दी’ असं संबोधलं जात होतं. याची उदाहरणं अगदी २० व्या शतकातील सुरुवातीलाही सापडतात.
  • ‘हिन्दी’ हा शब्द भारताबाहेरच्या लोकांनी स्थानिक लोकांचा उल्लेख करण्यासाठी वापरला होता. त्यामुळे इथल्या सर्वात लोकप्रिय भाषेला ‘हिन्दी’ असं संबोधलं जाऊ लागलं. त्याच भाषेला आज ‘उर्दू’ असं म्हणतात.
  • हिन्दी – अर्थात ज्या भाषेला आज उर्दू म्हणून संबोधलं जातं – आणि आधुनिक हिन्दी या दोन भिन्न भाषा आहेत. आधुनिक हिन्दीचा उगम राजकीय हेतूसाठी १९व्या शतकाच्या सुरुवातीला झाला.
  • आधुनिक हिन्दी ही हिंदू अभिजनांचीच नाही, तर हिंदू मध्यमवर्गाच्या व्यवहाराचीदेखील भाषा नव्हती, हा एक मोठा विरोधाभास आहे. जी लोकं तिला स्वतःची ओळख सांगावी म्हणून किंवा राजकीय कारणांसाठी स्वतःची भाषा संबोधतात अशा लोकांसाठीदेखील या भाषेची कोणतीही सांस्कृतिक राजधानी अस्तित्वात नाही. हा एक विलक्षण विरोधाभास आहे. स्पष्ट सांगायचं तर आधुनिक हिन्दी ही पर्शियन आणि अरेबिक या शब्दाविना असलेली ‘खडी बोली’ आहे. तिला आता नागरी लिपीमध्ये लिहिले जाते.
  • जेव्हा फारुकी यांनी ‘हिन्दी’ या शब्दाचा पारंपरिक संदर्भात उपयोग केला, तेव्हा त्यांनी त्या भाषेचा उल्लेख केला आहे, जिला आज राजकीय कारणांकरिता ‘उर्दू’ असे संबोधले जाते.

उर्दूचे अर्थ

तुर्की भाषेत उर्दू या शब्दाचा अर्थ ‘जमाव’ असा आहे. किंबहुना, इंग्रजीतील ‘horde’ हा शब्द तुर्की भाषेतील उर्दू या शब्दापासून निर्माण झाला आहे. Horde चा अर्थ जमाव. परंतु या शब्दाचा अर्थ ‘जमाव’ जरी असला तरीही उर्दू भाषेत या शब्दाचा तसा उपयोग झालेला नाही. मुघल काळात उर्दू याचा अर्थ, जिथे बादशाहचे वास्तव्य होते – अर्थात अशी जागा भव्य, असा होता. जिथे बाजारपेठ होती. अनेक लोकांचं वास्तव्यही होतं. जेव्हा शहाजहान बादशाहने १७व्या शतकात (१६३८ – १६४८) शहाजहानाबाद हे शहर बांधले, तेव्हा हे आधुनिक तटबंदी असलेलं शहर कायमचं ‘उर्दू-ए-शाही’ म्हणून स्थापन झालं. हा शब्द अशा जागांसाठी वापरला जाऊ लागला, ज्या शाही छावणीने व्यापून टाकल्या होत्या. फारुकी यांच्या म्हणण्यानुसार हा शब्द ‘उर्दू-ए-मुआला-ए-शहाजहानाबाद’ असा होता आणि तिथली भाषा मुख्यतः पर्शियन ही होती, ज्याला ‘जबान-ए-उर्दू-ए-मुआला-ए-शहाजहानाबाद.’ छावणी व शाही छावणी यात फरक आहे. हा फरक मुद्दाम पुसून टाकला गेल्यामुळे अनेक ऐतिहासिक तथ्थ्यांची विकृत स्वरुपात मोडतोड केली गेली.

अशी शक्यता आहे की शाही छावणीसाठी उर्दू हे संबोधन अकबर बादशहाच्या काळात लोकप्रिय झाले. फतेहपूर सिक्री सोडल्यानंतर अकबर हा एके ठिकाणी कधीच स्थयिक झाला नाही. त्याच्या छावणीत बहुतांश सर्व गोष्टी होत्या – लाकडी सामान, गालिचे, कागद इत्यादी. साऱ्या सामानाचे दोन संच होते, जेणेकरून ज्या जागी प्रवास करायचा असेल, तिथे आधीच तयारी करून ठेवता यावी. त्यामुळे पर्शियन वाक्प्रचार ‘उर्दू-ए-शाही’ हा अकबरच्या या छावणीच्या हालचालीतून निर्माण झाला असावा.

१७९४ किंवा १७९५ या वर्षी सुरू झालेले ‘दरिया-ए-लताफत’च्या लेखनाचे काम १८०७ मध्ये पूर्ण झाले. त्याचे लेख इन्शाल्लाह खान आणि मुहम्मद हसन कातिल यांनी उर्दू हा शब्द दिल्लीचा उल्लेख करायला वापरला. कदाचित पर्शियन भाषेत लिहिले असल्यामुळे या ग्रंथाकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नाही. हा ग्रंथ १८५० या वर्षी सर्वात आधी प्रकाशित झाला. परंतु तो पुनःप्रकाशित नाही झाला. आणि काहीशा सदोष आवृत्तीद्वारे पंडित ब्रजमोहन दत्तात्रेय कैफी यांनी त्याचे उर्दू भाषांतर केले. परंतु प्रकाशनाच्या वेळेस असलेल्या त्यातील चुका कधीच सुधारल्या नाही गेल्या. ज्या लोकांनी हा ग्रंथ वाचला आहे, त्यांना हे लक्षात येतं की उर्दू हा शब्द शहाजहानाबाद या शहराचा उल्लेख करण्यासाठी वापरला गेला आहे.

उर्दूचे दिशाभूल करणारे अर्थ

मीर अम्मान यांनी १८०२ ते १८०४ च्या दरम्यान ‘बाग – ओ – बहार’ हे पुस्तक लिहिलं, (ज्याची निर्मिती ‘कॉलेज ऑफ फोर्ट विल्यम’ने केली) ते १८५०च्या दरम्यान खूप लोकप्रिय झालं. या पुस्तकात तीन ते चार ठिकाणी थेट लिहिलं आहे की, हे पुस्तक ‘उर्दू की जबान’ मध्ये लिहिले आहे. अर्थात, इथे उर्दू याचा अर्थ शहाजहानाबाद असा होतो. भाषेचे नाव असा अर्थ होत नाही. आश्चर्याची गोष्ट ही आहे की उर्दू भाषा व साहित्य शिकवणाऱ्या शिक्षकांना ‘उर्दू की जबान’ म्हणजे उर्दू या ठिकाणची भाषा हा अर्थच समजू शकला नाही.

उर्दूचा वापर आणि त्या व्याकरणात ‘… की जबान’ म्हणजे ‘ त्या भाषेचं नाव’ अशा वाक्यप्रचाराला काही आधार नाही. पर्शियन भाषेत त्याला आधार आहे. उदाहरणार्थ, ‘जबान – ए – फारसी’ चा अर्थ फारसी नावाची भाषा असा होतो. त्याचप्रमाणे ‘जबान -ए – इंग्लिसी’ म्हणजे इंग्लिश या नावाची भाषा. अशा वाक्यरचना उर्दू भाषेत ही आहेत, परंतु त्या भाषेसाठी नाहीत जर जागेसाठी आहेत. हा गैरसमज १९व्या शतकात वाढू लागला आणि ‘उर्दू म्हणजे शहाजहानाबाद हे शहर’ असे संबोधन कमी होऊ लागलं. उदाहरणार्थ, उर्दू भाषेत ‘बंगाली नावाची भाषा’ असं लिहिताना ‘बंगाली की जबान’ असं लिहिलं जात नाही. तर, ‘बंगाल की जबान’ असं लिहिलं जातं. सुरुवातीला पर्शियन भाषेला ‘जबान – ए -उर्दू -ए मुआला-ए शहाजहानाबाद’ असं संबोधलं जायचं. फारुकी म्हणतात की जेव्हा शाह आलम –दुसरे, हे १७७१ या वर्षी दिल्लीत परतले, तेव्हा हिन्दी हे संबोधन (म्हणजे आता उर्दू) प्रचलित होऊ लागले. याचे कारण की त्यांनी ‘हिन्दी भाषेत’ कविता रचल्या आणि लिखाणदेखील केले. त्याच परिणाम असा की हिन्दीने पर्शियनला बाजूला सारले. तीच ‘जबान – ए -उर्दू -ए मुआला-ए शहाजहानाबाद’ म्हणून पुढे आली. हे संबोधन पुढे ‘उर्दू-ए- मुआला’ एवढेच झाले. नंतर केवळ उर्दू एवढेच राहिले.

उर्दू हे भाषेचे नाव नाही

आपल्या ‘हिन्दी’ व्याकरणासंबंधित रचनेत (१७८५), जॉन गिलख्रिस्ट यांनी ‘रेख्ता/हिन्दी’ या नावाने प्रचलित असलेल्या भाषेला ‘उर्दू’ देखील संबोधलं जातं असं मत नोंदवलं आहे. त्याचा अर्थ ‘उन्नत/उदार दरबाराची भाषा’ असा सांगितला आहे. फारुकी तर म्हणतात, की मीर आणि सौदा यांच्या रचनेत उर्दू हे भाषेचे नाव असा उल्लेख नाही. आपला दावा सिद्ध करण्यासाठी ते मुशाफी यांच्या काही ओळींचा दाखला देतात. मुशाफी हे ‘उर्दू’ आणि ‘रेख्ता’ हे दोन वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत असं मानतात आणि ठामपणे म्हणतात, की उर्दू हा शब्द दिल्लीकडे आणि रेख्ता हा शब्द भाषेकडे खुणावतो:

یٰوعد ںیم ےتخیر ےہ وک یفحصم ہتبلا

اک ںابز ہو یک ودرا ںاد ںابز ےہ ہک ینعی

अल्बता मुशाफी को हैं  रेख्ते में दावा

यानी के हैं जबादान उर्दू की वो जबान का

याचा अर्थ,

निःसंशय, रेख्ताच्या प्रभुत्वावर दावा करायला मुशाफीला अधिकार आहे

कारण तो उर्दूची भाषा प्रभावीपणे बोलू शकतो

इथे ‘रेख्ता’ म्हणजे, अशी भाषा ज्यात मुशाफीने लिखाण केले आणि ‘उर्दू’ म्हणजे ती जागा जिथे ‘रेख्ता’ बोलली जाते. या ओळी १७८५ च्या सुमारास रचल्या गेल्या, असा अंदाज आहे.

सौदा आणि मीर यांच्या कोणत्याही काव्य संग्रहात हा शब्द भाषेचे नाव म्हणून आढळत नाही. उर्दू हे भाषेचे नाव म्हणून पहिल्यांदा मुशाफी यांच्या कवितेत समोर आले. ते १७९४ च्या आधी असणे संभव नाही. कारण ते तिसऱ्या दिवाण (काव्य संग्रह) मध्ये समाविष्ट आहे, ज्याची तारीख १२०९/१७९४ अशी मानली जाते.

‘उर्दू’चा उल्लेख मुशाफी यांच्या अन्य काही कवितांमध्ये देखील आढळतो, पण भाषेचे नाव म्हणून त्याचा उपयोग केलेला आढळत नाही.

ںیم سا یفحصم ےہ ودرا وج اک ےتخیر ہی

وت ےن مہ رازہ ںیتاب ںیہ یلاکن یئن

ये रेख्ते का जो उर्दू है मुशाफी इस में

नई निकाली हैं बातें हजार हमने तो

यात ‘रेख्ते का उर्दू’ चा अर्थ ‘रेख्ते चे शहर’ ज्याचे नाव उर्दू आहे, म्हणजेच दिल्ली किंवा शहाजहानाबाद असा अर्थ होतो. किंवा ‘रेख्ते का’ याचा अर्थ बाजारदेखील असू शकतो. मुशाफी यांचे १८२४ या वर्षी निधन झाले. शाह आलमी -दुसरे हे १८०६ या वर्षी मरण पावले (१७५९ – १८०६, दिल्लीत १७७१ पासून). कदाचित त्या वेळेस उर्दू चा अर्थ ‘उर्दू भाषा’ (हिन्दी/रेख्ताच्या अनुषंगाने) असा ही असू शकेल. परंतु हा केवळ एक अंदाज आहे आणि तो जरी खरा असला तरीही हा शब्द जनसामान्यात प्रचलित झाला नव्हता.

गालिबचे नाते

आणखी एक उदाहरण म्हणजे असादुल्लाह खान गालिब (१७९७ – १८६९), ज्याने ‘उर्दू’ हे भाषेचे नाव केवळ दोन वेळेस वापरले. एकदा, एका पर्शियन रचनेत आणि दुसरं, एका उर्दू भाषेत लिहिलेल्या पत्रात. पर्शियन रचनेची तारीख माहिती नाही, पण ती १८५४ च्या आधीची असावी. परंतु ती इतकी आधीचीही नव्हती जितक्या आधी गालिब उर्दूमध्ये रचना करू लागला (१८०७ च्या आसपास, १८११ च्या आसपास तर निश्चित). १८५० च्या सुमारास गालिब उर्दूमध्ये पत्र लिहू लागला. परंतु त्याच्या पत्रव्यवहारात त्याने ‘उर्दू’ हा शब्द भाषा म्हणून एकदाच लिहिला आहे आणि तोही पुल्लिंगीत आहे – ‘माझा उर्दू (मेरा उर्दू) इतरांपेक्षा जास्त भावपूर्ण आहे.’ इथे हे स्पष्ट आहे की उर्दू हे भाषेला संबोधताना गालिब हा थोडासा अस्वस्थ झाला असणार आणि त्यामुळे जागेसाठी वापरला जाणारा लिंगप्रयोग त्याने भाषेसाठी देखील वापरला. याचाच अर्थ ‘उर्दू’ हे भाषेचे नाव म्हणून तेव्हा प्रचलित नव्हते. किंबहुना, १९००च्या आधी कोणत्याही लेखकाने किंवा कवीने उर्दू हे भाषेचे नाव म्हणून वापरले नाही. अमीर मीनाई याने ‘हिन्दी’ला पर्शियन म्हणून न संबोधता भारतीय शब्द म्हणून संबोधलं. परंतु याच्याकडे भाषा-विषयक विधान म्हणून पाहणे, तसंच आधुनिक हिन्दी एक वेगळी त्यातही उर्दूपेक्षा वेगळी भाषा मानणे टाळायला हवे.

हिन्दी-देवनागरीचे आगमन

‘हिन्दी’ हा शब्द दोन गोष्टींसाठी वापरला गेला. त्याचा वापर भाषा, लोकं आणि हिंदुस्थानातील पदार्थ, पेहरावादी गोष्टींसाठी केला गेला. जेव्हा ही भाषा दख्खन प्रांतात पोचली, तेव्हा तिला दख्खनी हिन्दी, गुजरी, देहलवी, दकनी असं संबोधलं जाऊ लागलं. ‘रेख्ता’ हा शब्ददेखील १८व्या शतकाच्या अखेरीस लोकप्रिय झाला. हिन्दी/हिंदवी/देहलवी यांच्या आधी आणि त्यांच्या बरोबरीने उत्तरेतील ब्रज भाषा, अवधी, भोजपुरी, मगधी, बुंदेलखंडी आणि राजस्थानी/हरयाणवी आदी अनेक भाषांमध्ये साहित्य (बहुतेक मौखिक) निर्मिती होत होती. जर या साहित्याचे लेखन झालेच तर ते पर्शियन भाषेत होत असे. परंतु, जेव्हा देवनागरी (किंवा नागरी) लिपीतील आधुनिक हिन्दी एक स्वतंत्र भाषा म्हणून विकसित झाली, तेव्हा स्थानिक भाषांमधील साहित्य पर्शियन किंवा नागरी लिपीत लिहिलं जाऊ लागलं. काही साहित्य मात्र मौखिक स्वरूपात राहिलं. हे सर्व स्थानिक भाषांमधील साहित्य आधुनिक हिन्दीत लिहिलं गेलं जेणेकरून आधुनिक हिन्दी बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढेल.

विजय दन देठा या दिग्गज आधुनिक राजस्थानी साहित्यिकाची अशी तक्रार होती की राजकारणामुळे त्यांना हिन्दी या भाषेत लिहायला लावले गेले. त्यामुळेच त्यांना स्वतःला राजस्थानी भाषेतील लेखक अशी ओळख मिळाली नाही. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांची ही खंत टिकून होती.

भाषेचे राजकारण

दुर्दैवाने, १९व्या शतकाच्या अखेरीस रेख्ता/’हिन्दी’/उर्दू या भाषेला मुस्लिमांशी जोडलं गेलं. असा विचार १९व्या शतकाच्या अखेरीस फोर्ट विलियम कॉलेजकडून (College of Fort William) प्रस्तुत झाला असावा. हा कदाचित एक अपघात असावा किंवा वसाहतवादी विभाजक अजेंडा. या दोन्ही शक्यता इथे नाकारता येत नाही. स्टुअर्ट मॅक-ग्रेगर यांनी एका परिषदेत फारुकी यांना सांगितले होते, की हिंदूंची एक स्वतःची भाषा असावी अशी गरज निर्माण झाली होती. प्रसिद्ध इतिहासकार आणि सांस्कृतिक भाषातज्ज्ञ तारा चंद हे फोर्ट विलियम कॉलेजमधील घटनेतील कोणत्याही हेतूशी जोडत नाहीत, परंतु नागरी लिपीतील एका स्वतंत्र भाषेच्या निर्मितीच्या प्रयत्नांना दुजोरा देतात. या निर्मितीत पर्शियन व अरेबिक शब्दावली नसावी, असा तो प्रयत्न होता. दुर्दैवाने, उर्दूला मुसलमानांशी जोडण्याच्या, हिंदूंना हिन्दीशी जोडण्याच्या या प्रयत्नांना मुसलमान लोकदेखील बळी पडले. याचे एक कारण सत्ताकेंद्र असलेल्या दिल्लीने उर्दूबाबत वर्चस्ववादी भूमिका घेणे, हे ही होते. लखनौनेदेखील उर्दू संबंधित सत्ताकेंद्र प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. त्यामुळे दिल्ली आणि लखनौ यांच्यात हे सत्ताकेंद्र सांभाळताना एक स्पर्धा निर्माण झाली. उर्दू बोलणाऱ्या लोकांना उपेक्षा भोगावी लागली. फाळणीनंतर तर एकटेपणाच त्यांच्या वाटेला आला.

‘हिंदू -हिन्दी -हिंदुस्थान’

२०व्या शतकातील सुरुवातीला ‘हिंदू -हिन्दी -हिंदुस्थान’ ही घोषणा अस्तित्वात आली. त्यामुळे हिन्दी ही हिंदूंची भाषा आहे, मुसलमानांची भाषा ही उर्दू आहे ,अशी मान्यता अस्तित्वात आली. दुर्दैव हे की, हिंदूंनी किंवा मुसलमानांनी हिन्दी/रेख्ता या भाषेला उर्दू असं संबोधण्याला विरोध केला नाही. या नवीन नामकरणांकडे त्यांनी डोळेझाक केली. अर्थात, बहुतांश मुसलमानांनी तसंच काही हिंदूंनी, हिन्दी या नवीन भाषेच्या निर्मितीला विरोध दर्शवला. पण या प्रसंगात लगेच राजकारणाने प्रवेश केला. अपेक्षेप्रमाणे राजकारण वरचढ ठरत गेले.

सर सैय्यद अहमद खान आणि त्यांच्या अनुयायांनी याच भाषेच्या देवनागरी लिपीतील आणि संस्कृत शब्दयुक्त निर्मितीला विरोध दर्शवला. खान हे शिक्षणाच्या माध्यमाद्वारे समाजसुधारकाची भूमिका बजावत होते. परंतु ते भाषातज्ज्ञ नव्हते. त्यांची भूमिका या निर्णयाद्वारे निर्माण होणाऱ्या आर्थिक परिणामांना समोर ठेवून मांडली गेली होती. परंतु भाषा आणि भाषिक संस्कृती यांच्या मोठ्या नुकसानीकडे तेव्हा कुणाचेही लक्ष गेले नाही.

(लेखक अंजुमन तरक्की उर्दू (हिंद) या संस्थेचे सरचिटणीस आहेत. त्यांचा हा लेख ‘आयसीसी क्वार्टरली’ या मासिकात प्रकाशित झालेला आहे.)

( अनुवादः आशय गुणे)            

(मुक्त संवाद १ जानेवारी २०२१मधून साभार)

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0