ग्रीक पुराणकथा, इतिहास, मानवी संवेदनांना कवटाळणारा कवाफी

ग्रीक पुराणकथा, इतिहास, मानवी संवेदनांना कवटाळणारा कवाफी

महत्त्वाच्या युरोपियन भाषांसोबतच जगभरच्या अनेक भाषेत कवाफीच्या कविता पोहोचल्या आहेत.

कॉन्स्टन्टाईन पी. कवाफी या कवीला आज २०व्या शतकातील सर्वोत्तम ग्रीक कवी म्हणून ओळखले जाते. आधुनिक कवितेला वळण देणाऱ्या थोर कवींमध्ये वॉल्ट व्हिटमन या श्रेष्ठ अमेरिकन कवीसोबत कवाफीचे नाव आदराने घेतले जाते. केवळ इंग्रजी भाषेतच त्याच्या समग्र कवितांची डझनाहून अधिक भाषांतरं उपलब्ध आहेत आणि पुन्हा नव्याने होत आहेत. महत्त्वाच्या युरोपियन भाषांसोबतच जगभरच्या अनेक भाषेत कवाफीच्या कविता पोहोचल्या आहेत. कवाफीच्या मृत्यूला आता आठ दशके होऊन गेली आहेत. मात्र जी अमाप प्रसिद्धी कवाफीच्या वाट्याला आली ती कवाफी हयात असताना नव्हे तर त्याच्या मृत्यूनंतर त्याला प्राप्त झाली.

कवाफी हयात असताना त्याच्या केवळ मोजक्याच कविता प्रकाशित झाल्या होत्या. त्याच्या निवडक कवितांचा एक संग्रह २०व्या शतकाच्या सुरुवातीला खाजगी वितरणासाठी प्रकाशित केला गेला होता. याचा अर्थ कवाफीच्या कवितेची ताकद त्याच्या समकालीनांनी जाणून घेतली नव्हती असा नव्हे. खुद्द कवाफीच त्याच्या कविता प्रकाशित करण्यास नाखूष होता. त्याचं एक कारण होतं त्याची समलैंगिकता. आणि खासगी जीवनात असो की कविता कवाफीने त्याच्या लैंगिक भावना नेहमी उघडपणे मांडल्या. त्याच्या आत्मीय आणि नैसर्गिक संवेदना तथाकथित सभ्यतेच्या सुरम्य वस्त्रात लपेटून सादर करणे त्याला मंजूर नव्हते. त्यामुळेच त्याच्या गर्हनीय समलैंगिक प्रेमकवितेतही अपराधभाव नाही तर सहजता आहे. एक प्रकारचे इमान आहे. त्यामुळेच त्याची कविता अस्सल आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

स्मृती

मला या स्मृतीविषयी
बोलायचं आहे….
पण फार पुसट झालीय
आता ती स्मृती,
जणू काहीच उरलेलं नाही
आठवणीत आता-
ही तेंव्हाची गोष्ट आहे,
जेंव्हा मी अजून युवक होतो.

जाईच्या फुलासारखी त्वचा
ऑगस्ट महिन्यातली सायंकाळ
खरंच ऑगस्टमधली?
आता मुश्किलीनं आठवतात
मला ते डोळे
निळे होते, बहुधा
ओह खरंच…. निळे
सॅफायर सारखे निळे….

मात्र कवाफीला केवळ उत्कट प्रेमकविता लिहिणारा कवी समजणे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. मूळचा ग्रीक वंशाचा असलेल्या कवाफीच्या कवितेत ग्रीक पुराणकथा, इतिहास आणि मानवी संवेदन यांचे विलक्षण मिश्रण आहे. त्याच्या अनेक कविता ग्रीक पुराणकथेतल्या कथा आणि वीर यांच्याभोवती गुंफलेल्या आहेत. कवाफीने त्याच्या कवितेतून प्राचीन मिथकांचा पुरेपूर वापर केला असला तरी ती मिथकं त्याने रूढ अर्थाने वापरली नाहीत. तर त्यांच्याकडे एका आधुनिक आणि समांतर दृष्टीने पाहिले. त्यातून जीवनाचा अर्थ शोधण्याचा यत्न केला. जीवनाला त्याने पुरेपूर पारखून पाहिले. त्यात काही सत्व आहे किंवा कसे याचा धांडोळा घेतला. त्याला जे भावले त्याच्या सौंदर्याचे मुक्तकंठाने गायन केले आणि त्याची क्षणभंगुरता आणि अटळताही उघडी केली. त्याच्या कवितेत प्रेम, विस्मय, आणि करुणा आहे, तसेच वैफल्य, हतबलता आणि  नियतीच्या हातातले आपण केवळ बाहुले असल्याची भावनाही आहे. कवाफीच्या कवितेची थोरवी कुणा एकाच पठडीत बसवता येत नाही. वानगीदाखल त्याची ‘शहर’ नावाची अप्रतिम कविता पाहा.

शहर

तू म्हणालास’ “ मी दुसऱ्या प्रदेशात जाईन, दुसऱ्या
किनाऱ्यावर उतरेन
शोधीन याहून चांगलं शहर.
जे म्हणून मी करतो, त्याची नियती भ्रष्ट व्हायची
आणि माझं हृदय मृतासारखं गाडून पडतं.
किती काळ याच जागी मी थिजवू माझं मन?
जिथं म्हणून मी पाहतो
मला दिसतात भग्न अवशेष
माझ्याच आयुष्याचे, इथे,
जिथे मी काढली इतकी वर्षें; वाया घालवली
नासून टाकली सारी.”

तुला सापडणार नाही दुसरा देश, नाही गवसणार दुसरा किनारा
शहर तुझ्या मागावर येईल.
याच रस्त्यावरून तू चालत राहशील
याच भवतालात होशील म्हातारा,
याच वस्तीत पिकतील केस
याच शहरात कायम राहशील,
दूरच्या गोष्टींची तुला आशा नको.
कुठलंही जहाज नाही तुझ्यासाठी,
कुठला रस्ता नाही
इथं या छोट्या कोपऱ्यात वाया गेलं
आयुष्य तुझं
तसंच गेलं असतं इतरत्र कुठेही.

समोर आहे ते जीवन मागे टाकून अधिक चांगले, अर्थपूर्ण जीवन जगण्याचे संकल्प कोण मनुष्य करत नाही? मानवी स्वभावाचा तो सहजभावच आहे. प्रत्येक नव्या वर्षाच्या आरंभी अधिक चांगले आयुष्य जगण्याचा संकल्प करणाऱ्या २१ व्या शतकातील माणसाच्या तर ही भावना निकटची आहे. गतआयुष्यातील चुका, लाजिरवाणे प्रसंग, अपुरी स्वप्नं आणि सांभाळता न आलेली नाती, हे सारे मागे टाकून पुन्हा नव्याने जीवन सुरवात करण्याची मानवी प्रबळ इच्छा कवाफीने नेमकी टिपली आहे. पण कवाफी नियतीपुढे आपण हतबल असण्याचे स्मरण करून देण्यासही विसरत नाही. भौतिक, सांपत्तिक, भौगोलिक, सामाजिक अशा अनेकविध परिस्थितीत जगणाऱ्या माणसे खरेतर एकाच प्रकारचे जीवन जगत असतात. केवळ वरवर दिसणाऱ्या तपशीलांचा काय तो फरक असतो. जीवनाच्या गाभ्याशी आपण सारे एकच एक प्रकारचे वर्तमान भोगून काढत असतो. एकच नियती आपल्या वाट्याला आलेली असते. आणि कितीही उरफोड केली तरी तिच्या कचाट्यातून आपली सुटका होत नसते हे सार्वत्रिक सत्य केवळ कवाफीसारखा कवीच इतक्या उत्कटपणे मांडू शकतो.

मात्र कवाफीची जीवनदृष्टी निराशावादी नाही. त्याच्या दुसऱ्या कवितेत तो  मनासारखं आयुष्य जगता येत नसेल तर किमान तिची पत खालावू न देण्याचा सल्ला देण्यास विसरत नाही. तर ‘इथाका’ या त्याच्या सर्वात महत्त्वाच्या कवितेत कवाफीने इच्छित स्थळी जाऊन पोहोचण्यापेक्षा चालत राहाणे (जगत राहाणे) कसे महत्त्वाचे आहे ते ओडिसीयसच्या घरपरतीच्या रुपकातून मांडले आहे.

मात्र कवाफीच्या कवितांचे वाचन अजिबात सोपे नाही. त्याच्या कवितेत ग्रीक पुराणकथा आणि व्यक्तिमत्वांच्या संदर्भांची विपुलता आहे. कवाफीच्या ‘इथाका’, ‘ट्रॉयचे रहिवाशी’, ‘पेट्रोक्लोसचे अश्व’, ‘स्पार्टा’ अशा अनेक कवितांचे आकलन ग्रीक पुराणाकथांचे संदर्भ ठाऊक नसतील तर होणे शक्य नाही. होमर आणि ओव्हिड यांची महाकाव्ये व ग्रीक शोकांतिका यांची पुरेशी माहिती असणारा वाचकच कवाफीच्या कवितांचे रसग्रहण करू शकतो. या संदर्भांशिवाय कवाफीच्या कवितांचे वाचन करणे म्हणजे जुजबी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या व्यक्तीने खगोलशास्त्रातील मूलभूत संशोधन वाचण्यासारखे आहे.

मात्र कवाफीचे दुर्दैव असे की, तो आधुनिक काळातील सर्वोत्तम ग्रीक कवी मानला जात असला आणि ग्रीक पुराणकथा आणि संस्कृती त्याच्या कवितेतून ओसंडून वाहत असली तरी ग्रीसमध्ये अगदी अल्पकाळाचे वास्तव्य करण्याचे भाग्यही त्याच्या नशिबी नव्हते. त्याचे सारे आयुष्य ग्रीसबाहेरच्या देशात गेले. तेही फारसे सुखासीन नाही. आयुष्यातला मोठा काळ त्याला उदासीन आणि एकटेपणाचा सामना करत कंठावा लागला. त्याच्या मृत्यूपर्यंत तो आपली वृद्ध आई आणि अविवाहित भावासोबत उपेक्षित जीवन जगत राहिला. केवळ आयुष्याच्या अखेरच्या काळातच त्याची आर्थिक स्थिती मध्यमवर्गीय आयुष्य जगण्याइतपत झाली. त्याच्या लैंगिक जीवनाबाबतही फारशी माहिती उपलब्ध नसली तरी ती सुखावह होती असे समजण्यास काहीच मार्ग नाही. आज २१व्या शतकातही गर्हनीय समजल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना त्याच्या काळात कितीसे स्वातंत्र्य कवाफीला मिळाले असेल त्याची कल्पना करणे फारसे कठीण नाही.

कवाफीने आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक प्रसिद्ध साहित्यिकांसोबत मैत्री केली. इ. एम. फॉर्स्टर, टी. इ. लॉरेन्स, अर्नोल्ड टॉयबी इत्यादी साहित्यिकांशी दृढ झालेल्या मैत्रीमुळे त्याच्या अखेरच्या काळात त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कवी म्हणून मान्यता मिळाली. त्याची ‘इथाका’ ही कविता टी. एस. इलियटच्या ‘क्रायटेरियन’मध्ये छापली गेली. असे असले तरी एकंदरीत पाहता कवाफीचे कौटुंबिक, सामाजिक आणि लैंगिक जीवन एखाद्या शोकात्म महाकाव्यातील सर्ग शोभावे असेच आहे. मात्र त्याही परिस्थितीत केवळ दीडशे कवितांच्या बळावर कवाफीने विश्वसाहित्यात अजरामर होण्याचा चमत्कार करून दाखविला आहे.

COMMENTS