एचके आर्ट्स कॉलेजच्या प्राचार्यांनी राजीनामा का दिला?

एचके आर्ट्स कॉलेजच्या प्राचार्यांनी राजीनामा का दिला?

“विचारांची दडपणूक, विशेषतः एका आर्ट्स कॉलेजमध्ये, ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. आम्ही पूर्वीही अशा प्रकारे दिलेली आमंत्रणे परत घेण्याचा प्रकार काही वक्त्यांच्या बाबतीत झालेला पाहिला आहे. किंवा आणखी वाईट म्हणजे, मुलांनी हिंसेचा वापर केलेलाही पाहिला आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. माझा राजीनामा ही साहसी कृती नव्हती तर तीच एकमेव योग्य कृती होती.”

तो एचके आर्ट्स कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिवस होता. काही दिवसांपूर्वीच जिग्नेश मेवाणी यांना कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले होते. ते या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. तरीही भाजपशी संलग्न असणाऱ्या काही तरुण नेत्यांनी मला, उपप्राचार्यांना (मोहनभाई परमार) आणि विश्वस्तमंडळाला धमक्या देण्यास सुरुवात केली.

उपप्राचार्य आणि मी, आम्ही दोघांनीही स्नेहसंमेलनाच्या दिवशी राजीनामे दिले. विश्वस्तमंडळाने मात्र गुजरात विद्यापीठाच्या या भाजपसंलग्न विद्यार्थी नेत्यांच्या मागण्यांपुढे शरणागती पत्करली. या विद्यार्थी नेत्यांनी अशी धमकी दिली होती की जिग्नेश मेवाणी उपस्थित राहिले तर कार्यक्रम होऊ देणार नाही. ते म्हणाले पोलिस संरक्षण असले तरी आम्ही धुडगूस घालू! म्हणून मग आमच्या विश्वस्तसंस्थेने ७५० लोकांची बसण्याची सोय असलेल्या आमच्या हॉलमध्ये कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नाकारली. आम्हाला कार्यक्रम रद्द करावा लागला. हे निमूटपणे सहन करणे अशक्य होते.

माझा राजीनामा म्हणजे अती-साहसी बनण्याचा किंवा काही विधान करण्याचा प्रयत्न नाही. पण त्या प्रसंगी, त्या पदावर असणाऱ्या कुणीही तेच करायला हवे होते असे मला वाटले. या राज्यामध्ये अगोदरच शिक्षणक्षेत्रातील विद्वानांच्या क्षमता, सरकार, विद्यापीठे आणि अगदी विद्यार्थ्यांनीही दडपून टाकलेल्या आहेत. आता विश्वस्त संस्थेचा हा निर्णय म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा थेट हल्ला होता.

आज, व्हॉट्सॅप आणि फेसबुकवर मला पाठिंबा व्यक्त करणारे अनेक संदेश मिळत आहेत, ‘ठामपणे भूमिका घेऊन तुम्ही मोठे काम केले आहे!’ असे ते म्हणतात. पण माझ्याकरिता हे काही फारसे मोठे काम नाही. या पदावरच्या प्रत्येकाने हेच केले पाहिजे. हे केवळ एका व्यक्तीच्या, जिग्नेश मेवाणींच्या स्वातंत्र्याबद्दल नाही, इथे तुमचे वेगळा विचार करण्याचे स्वातंत्र्यच संकुचित केले जात आहे. इथे मुद्दा अधिक व्यापक आहे ज्यात माझ्याही स्वातंत्र्याचा प्रश्न समवलेला आहे.

उद्या मी सुरत येथे गांधीवादी विचारांबाबत एक भाषण देण्यास जाणार आहे. आज मात्र मी केवळ आशा करू शकतो की या घटनेमुळे गुजरातमध्ये वातावरण बदलून वैचारिक क्षमतांचा अधिक विकास होईल. काही महिन्यांपूर्वी, अहमदाबादमधील कर्णावती विद्यापीठानेअमित शाह, सॅम पित्रोदा, सुब्रमण्यन स्वामी आणि अनेक राजकीय व्यक्तींना युवा संसदेच्या कार्यक्रमाकरिता आमंत्रित केले. अमित शाह यांना आमच्या कॉलेजमध्ये आमंत्रित केले तर माझी त्याला हरकत नसेल. पण जर अमित शाह यांना विद्यापीठात बोलायला मनाई नसेल, तर मग वडगाम येथून आमदार म्हणून निवडून गेलेल्या व्यक्तीला, जिग्नेश मेवाणींना हे व्यासपीठ देणे लोकांना का नको आहे?

मागे एकदा, एचके आर्ट्स कॉलेज आणि भारतीय महाविद्यालयीन प्राचार्यांच्या संघटनेच्या वतीने झालेल्या एका संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे होते. आम्ही राज्यातीलही अनेक मंत्र्यांना – अगदी माया कोडनानी यांनाही – यापूर्वी अनेक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केले आहे. मग आत्ता अशी काय समस्या होती?

अशा प्रकारची विचारांची दडपणूक, विशेषतः एका आर्ट्स कॉलेजमध्ये, ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. आम्ही पूर्वीही अशा प्रकारे दिलेली आमंत्रणे परत घेण्याचा प्रकार काही वक्त्यांच्या बाबतीत झालेला पाहिला आहे. किंवा आणखी वाईट म्हणजे, मुलांनी हिंसेचा वापर केलेलाही पाहिला आहे. (राजमासमध्ये, त्यांनी एका प्राध्यापकांवर हल्ला केला आणि गुजरातमध्ये, राम गुहांसारख्या प्रतिष्ठित विद्वानाचे आमंत्रणही रद्द केले गेले. या फेब्रुवारीमध्ये, ते अहमदाबाद विद्यापीठात रुजू होणार होते. पण अभाविपमधून केवळ काही विरोधी सूर उमटले आणि त्यांची नियुक्ती रद्द केली गेली. काही आठवड्यांपूर्वी नयनतारा सहगलसारख्या लेखिकेचे साहित्यसंमेलनातील आमंत्रण रद्द केले गेले.) या वातावरणात मानव्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आणि निरोगी संवादासाठी अवकाश उरलेला नाही.

ही लोकशाहीची हत्या आहे, आणि राजीनामा देणे ही केवळ एक योग्य गोष्ट नव्हती तर एक प्राचार्य म्हणून करता येण्यासारखी तीच एकमेव कृती होती.

हेमंतकुमार शाह हे एचके आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य होते.

हा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद – अनघा लेले

छायाचित्र ओळी  – जिग्नेश मेवाणी यांचा फाईल फोटो. सौजन्य: पीटीआय

COMMENTS