कोरोनावर गंगाजलाचा औषधी उपचार; प्रस्ताव फेटाळला

कोरोनावर गंगाजलाचा औषधी उपचार; प्रस्ताव फेटाळला

कोरोना विषाणू संसर्गावर गंगा नदीचे पाणी उपचारी ठरू शकेल वापरण्याबाबत विचार करावा हा केंद्रीय जल संसाधन खात्याचा प्रस्ताव इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) फेटाळून लावला आहे. गंगा नदीचे पाणी वापरण्याबाबत कोणतीही वैज्ञानिक आकडेवारी, संशोधन उपलब्ध नसल्याने ते क्लिनिकल ट्रायल म्हणून वापरता येणार नाही असे आयसीएमआरने स्पष्ट केले.

कोरोनावर गंगेचे पाणी वापरण्याबाबत अनेक प्रस्ताव जल संसाधन खात्याकडे आले होते. हे प्रस्ताव प्रामुख्याने केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन योजनेसोबत काम करणार्या अनेक व्यक्ती व बिगर सरकारी संस्थांकडून आले होते. या प्रस्तावात कोरोनाबाधित रुग्णावर गंगा नदीचे पाणी औषधी उपचार म्हणून वापरावे अशा सूचना, विनंती होत्या. त्या सूचना जल संसाधन खात्याकडे  आल्या आणि त्यांनी त्या आयसीएमआरकडे विचाराधीन पाठवल्या.

महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमधील (नीरी) वैज्ञानिकांशी चर्चा करून हे प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आले होते. याच नीरीने मध्यंतरी गंगा नदीच्या पाण्यातील औषधी गुण तपासण्यासाठी संशोधन केले होते. या संशोधनात गंगेच्या पाण्यातून ज्या आजारांचा प्रादुर्भाव होतो त्यात जीवाणूंपेक्षा विषाणूंची संख्या असल्याचे नमूद करण्यात आले होते. तरीही या संस्थेने प्रस्ताव सरकारकडे पुढे पाठवला.

गंगा मिशन या योजनेवर काम करणार्या एका अधिकार्याने सांगितले की जसा आम्हाला प्रस्ताव मिळाला तसा तो पुढे आयसीएमआरकडे पाठवण्यात आला. याच गंगा मिशनला एक प्रस्ताव मिळाला होता, त्यात गंगेच्या पाण्यात निंजा विषाणू असल्याचे नमूद करण्यात आले होते. हे विषाणू जीवाणूला मारत असतात अशी माहिती बाहेर आली होती. तर दुसर्या एका प्रस्तावात गंगेचे पाणी मानवी शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तिसर्या प्रस्तावात गंगेचे पाणी विषाणू विरोधी व प्रतिकारक क्षमता वाढवणारे असून त्यावर संशोधन करणे गरजेचे आहे, असे नमूद करण्यात आले होते.

पण या एकाही प्रस्तावावर आयसीएमआरचे उत्तर आले नसल्याचे गंगा मिशनच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.

‘अतुल्य गंगा’ या एनजीओने पाठवलेल्या प्रस्तावात गंगा नदीच्या पाण्यात निंजा विषाणू हा जीवाणूंवर हल्ला करत असतो असे नमूद करण्यात आले होते. गेल्या ३ एप्रिलला या एनजीओने जलसंधारण मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र पाठवून कोरोना रोखण्यासाठी गंगा नदीच्या पाण्याचा अभ्यास करावा अशी विनंती केली होती.

त्यानंतर ३० एप्रिलला नमामि गंगे या योजनेवर काम करणार्या एनएमसीजीने आयसीएमआरला पत्र पाठवून गंगेच्या पाण्यावर संशोधन करावे अशी विनंती केली होती. पण आयसीएमआरने याला नकार दिला.

आयआयटी रुरकी, आयआयटी कानपूर, लखनौतील सीएआयआर या संस्थांनीही गंगा नदीच्या पाण्यात निंजा विषाणू असल्याचे आपले अहवाल या एनजीओला पाठवले होते. या अहवालात जेथे गंगेला भागीरथी म्हणून ओळखले जाते तेथे हे विषाणू आढळत असल्याचे सांगण्यात आले होते.

असे काही प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे आल्यानंतर त्यांनी  जलसंसाधन खात्याला या प्रस्तावावर विचार करावा असे सांगितले. तर नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा या संस्थेने आयसीएमआरला गंगा नदीच्या पाण्याचे क्लिनिकल ट्रायल करण्याची विनंती केली.

अखेर २४ एप्रिलला सीएसआयआर, नीरी व काही एनजीओमधील वैज्ञानिकांमध्ये एक चर्चा होऊन त्यांनी आयसीएमआरला आपले प्रस्ताव पाठवले.

अतुल्य गंगा या एनजीओमध्ये देशातले प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ व गंगा विशेषज्ञ अनिल गौतम, ए. के. गुप्ता, भरत झुनझुनवाला व नरेंद्र मेहरोत्रा यांच्यासारख्या व्यक्ती आहेत.

मूळ बातमी

COMMENTS