‘आयआयटी ड्रीम’चा पुनर्विचार करण्याची गरज

‘आयआयटी ड्रीम’चा पुनर्विचार करण्याची गरज

आपण प्रेमळपणा आणि सहानुभूती यासारख्या गुणांना किंमत देत नाही तोपर्यंत पुढच्या पिढ्या अहंकारीच घडतील.

“मन एखाद्या अस्वस्थ पक्ष्यासारखे असते; त्याला जितके मिळेल त्यापेक्षा अधिक हवे असते, आणि तरीही ते असमाधानीच राहते.”

– महात्मा गांधी

“सॉरी, मी अगदीच टाकाऊ निपजलो,” मार्क अँड्र्यू चार्ल्सने लिहिले.

आयआयटी हैद्राबादमध्ये डिझाइनिंग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या या मुलाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राने मला बेचैन केले आहे. मध्यम वर्गाच्या चिंतातुर महत्त्वाकांक्षांसाठी आयआयटीचा काय अर्थ होतो या गोष्टीवरच हल्ला करण्याची मला इच्छा होते. लोकांच्या दृष्टीने हा अर्थ आहे गुणवत्ता, यश, प्रगती आणि कर्तृत्व!

पण या आयआयटी ड्रीमकरिता आपण जी मानसिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक किंमत चुकवत आहोत त्याचा विचार करण्याची प्रगल्भता आपल्यामध्ये केव्हा येणार?

बेभान वेग, अती-स्पर्धात्मकता आणि स्वतःच्या कामगिरीबद्दलची प्रचंड चिंता यांच्या या जगात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेदना, दुःख आणि एकटेपणा ऐकून घेण्याइतके पुरेसे संवेदनशील आपण केव्हा होणार?

आपण मार्कची आत्महत्या लवकरच विसरू. आणि शर्यत चालूच राहील. आणि मग आणखी एखादी आत्महत्या, मानसिक विफलता, आणखी हानी. दरम्यान कोचिंग केंद्रे आपला व्यवसाय करत राहतील. व्यापारी, बँकर, विभागीय अधिकारी त्यांच्या मुलांना कोटाला, राजस्थानमधल्या त्या कुप्रसिद्ध शहरात पाठवत राहतील, जे भारतीय शिक्षणक्षेत्रातील सर्वात काळ्या गोष्टींचे प्रतीक आहे.

लहान शहरांमधल्या जाहिरातींवर आयआयटी टॉपर्सचे चेहरे झळकतील. ‘नशीबवान’ मुलांचे पालक त्यांच्या मुलांच्या ‘प्लेसमेंट आणि पॅकेज’बद्दल छाती फुगवून सांगतील. आणि आपल्या कुटुंबांमध्ये मुलांची त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरून तुलना, स्तुती, निंदा, प्रेम, तिरस्कार करणे चालू राहील.

आयुष्यातल्या ध्येयांचे असे एकसाचीकरण झाल्यामुळे, ज्यांना आयुष्यात काही वेगळे करायचे होते, किंवा निरेंद्रनाथ चक्रवर्ती यांचे काव्यात्मक रूपक वापरायचे तर ज्यांना जीवन एखाद्या ‘प्रकाशकिरणा’सारखे असेल असे वाटत होते, अशांचे मृत्युलेख लिहिण्याची आपल्यावर वेळ येईल.

आजाराची मुळे

हे शिक्षणाच्या नावाखाली आजारपण आहे. या आजारात शिकणारी व्यक्ती अमानवी आणि एकमितीय होते. एक शिक्षक म्हणून मला याची प्राथमिक दोन कारणे दिसतात.

सुरुवातीला, आयआयटी प्रवेश परीक्षेच्या तयारीची जी पद्धत आहे ती बारकाईने तपासली पाहिजे. एखादा सर्वसाधारण विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतच थकून जातो. या थकवणाऱ्या प्रवासाचा अविभाज्य भाग असलेले कोचिंग क्लास मुलांना शिकवण्यासाठी ज्या पद्धतींचा उपयोग करतात त्या पाहिल्या तर लक्षात येते की ते मुलांना निष्ठुरपणे शिस्त लावलेल्या यंत्रांमध्ये रुपांतरित करत असतात.

पुन्हा पुन्हा अविरतपणे मॉक टेस्ट सोडवत राहण्याने विचार आणि कुतूहल संपून जाते. त्याऐवजी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित म्हणजे संख्यात्मक प्रश्न बनतात, जे शक्य तितक्या झटपट सोडवायचे असतात.

परीक्षाच सर्वात महत्त्वाच्या बनल्यामुळे ही मुले आयुष्यातल्या ‘हळुवार’ गोष्टींपासून स्वतःला दूर करतात. त्यांना आता सूर्यास्त, झाडावरून हलकेच खाली येणारे पान, रस्त्यावरून आपल्या नातवाचा हात धरून सावकाश चालणारी आजी अशा गोष्टींमधले सौंदर्य लक्षात येईनासे होते.

कोचिंग क्लासमध्ये मुलांवर ज्या प्रकारचे वेळापत्रक लादले जाते त्यामुळे सामाजिकीकरणाचा एक संवादात्मक मार्ग असलेल्या शाळाही निरर्थक बनतात. विशेषतः वरच्या वर्गांमध्ये.

ही व्यवस्था तुमच्या बुद्धिमत्तेचे रुपांतर एका हिंसक अशा कुठल्याशा गोष्टीत करते. त्यामध्ये आश्चर्याला, कवितेला, संगीताला स्थान नसते. ते युद्ध असते. विल्यम वर्ड्सवर्थच्या भावना त्याला कळत नाहीत:

Sweet is the lore that Nature brings,
Our meddling intellect
Mis-shapes the beauteous forms of things;
We murder to dissect.

दुसरे कारण हे या संपूर्ण प्रक्रियेत तुमचे जे मानसिक रुपांतरण होते त्याच्याशी संबंधित आहे. तुम्ही शेवटी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला तर ते एक मोठे ओझे होऊन बसते.

तुमच्या ‘यशा’ची व्याख्या पुन्हा पुन्हा बदलत राहते. समाज तुम्हाला अधिक किंमत देतो, पण त्याबरोबर दबावही टाकतो. तुम्हाला आणखी वेगाने पळावे लागते. आणि मग तुम्हाला समजते, ‘यशा’कडे जाण्याच्या मार्गाला अंत नसतो.

८ वी ते १२ वी अशी चार-पाच वर्षे विद्यार्थ्यांना संघर्षासाठी तयार केले जाते. या प्रक्रियेमध्ये ते चांगला सिनेमा, चांगले संगीत गमावतात. त्यांचे पालक, त्यांचे कोचिंग क्लासमधले गुरू त्यांना सांगतात, एकदा का तुम्ही आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला की मग सारे काही ठीक होईल. पण तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येते, शर्यत आणखी आक्रमक झाली आहे.

वर्गातले तास, ट्यूटोरियल्स, प्रयोगशाळा, परीक्षा, प्लेसमेंटची चिंता … आयुष्य संपवणारे हे वेळापत्रक प्रत्येकाचे रुपांतर स्पर्धकामध्ये करते आणि त्याचे परिणाम अत्यंत घातक असतात. त्यात विश्रांती नसते, बर्ट्रांड रसेल ज्या ‘काहीही न करता घालवलेल्या क्षणांची’ प्रशंसा करतो असे क्षण तिथे साजरे करता येत नाहीत.

इतरांचे ऐकायला तिथे वेळ नसतो, मैत्री नसते. प्रत्येक गोष्ट उपयुक्त आणि धोरणात्मक असते. अपयश कुरूप असते. मार्कचे पत्र तेच सांगते.

आपण शिक्षण आणि महत्त्वाकांक्षांबद्दल पुनर्विचार करायला हवाय का?

मार्कने स्वतःचे जीवन संपवले. पण जे टिकून राहिले आहेत त्यांनाही त्यांचा आत्मा मारून टाकावा लागत आहे. या खेळात कोणीही विजेता नाही.

आपल्या देशासारख्या अती लोकसंख्या असलेल्या देशात राहण्यामुळे आपल्यावर काही कठोर बंधने येतात याची मला जाणीव आहे. एखाद्या मध्यमवर्गीय व्यक्तीकरिता सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हेही मला माहीत आहे.

अनेकांसाठी ‘नोकरीची चिंता’ या गोष्टीपासून सुटका नसते. त्यामुळे नोकरी मिळवून देणाऱ्या आणि तांत्रिक शिक्षणाचे आकर्षणही जास्त असते यात आश्चर्य नाही. तरीही, या टप्प्यावर, आपण शिक्षणाचा अर्थ काय याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.

पहिली गोष्ट ही की आपल्याला थोडे हळू पळायला शिकले पाहिजे. नवउदारतावादी, तंत्रज्ञांचे वर्चस्व असलेल्या या युगाचा अंगभूत गुण असलेल्या बेभान वेगामुळे आपल्याला आपले आयुष्य आपल्या स्वतःच्या लयीत शांतपणे जगणे अशक्य झाले आहे.

भयानकता लक्षात घ्या. प्ले स्कूलमध्ये, तीन वर्षांच्या चिमुकलीवरही होमवर्कचे ओझे असते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या निरर्थक प्रोजेक्टमध्ये जातात आणि शनिवार-रविवारची सुट्टी पियानो क्लासेससाठी ‘उपयोगात आणली’ जाते.

दुसरे असे, की आपल्याला ‘गुणवत्ता’ आणि ‘बुद्धिमत्ता’ यांचीही पुन्हा व्याख्या करावी लागेल. आपल्याला सहानुभूती, स्वतःच्या भावनांचे मूल्यमापन करण्याची क्षमता, ग्रहणशीलता आणि इतरांशी जोडून घेण्याची क्षमता यासारख्या गुणांची किंमत ओळखता येत नाही तोपर्यंत ‘गुणवत्ताशाही’ संप्रदाय समाजात हिंसेला उत्तेजन देतच राहील.

ही हिंसा अहंकारी व्यक्तिवाद, चंगळवाद आणि निष्ठुर बेपर्वाई यांच्यामधून अभिव्यक्त होते. अगदी शैक्षणिक संस्थांमधले ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ही अशा वेळी विद्यार्थ्यांना अधिकाधिक एकटे वाटण्यापासून वाचवू शकत नाहीत.

आपण जागे व्हायला नको का? की आपली प्रिय मुले त्या झगमगीत ट्युटोरियल्समधून बाहेर पडून अगदी आयआयटीच्या कमानीखालून जाऊनही नंतर त्यांच्या होस्टेलमधल्या खोल्यांमध्ये पत्र लिहून आत्महत्या करेपर्यंत वाट पाहणार आहोत? आणि ज्याला एरिक फ्रॉम ‘pathology of normalcy’ – इतर सर्वांसारखे बनण्याचे वेड – म्हणतो, तेच साजरे करत राहणार आहोत?

अविजित पाठक, हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

मूळ लेख येथे वाचावा.

COMMENTS