सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग १

सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग १

आज तंत्रज्ञानात्मक क्रांतीमुळे सगळ्या जगाशी थेट संवाद साधण्यासाठी उपयोगी पडू शकतील अशी व्यासपीठे प्रसार माध्यमे आणि सामाजिक माध्यमांच्या रूपाने उपलब्ध झाली आहेत. या व्यासपीठांवर अतिशय मुक्तपणे मतमतांतरे प्रकटही होत आहेत. या माध्यमातून होणाऱ्या संवादात सत्यसाधनेच्या शक्यता दिसत आहेत का?

सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग २
‘मी अजून जिवंत आहे याची मला लाज वाटते…’
गाव आणि गांधी

सत्य म्हणजे काय हा एक गहन प्रश्न आहे आणि त्यावर भली मोठी तात्त्विक चर्चा उपलब्ध आहे. दुसरीकडे सत्याविषयीच्या काही बाळबोध कल्पना जनमानसात प्रचलित आहेत. ‘नेहमी खरे बोलावे’, ‘खऱ्याची दुनिया नाही’, ‘यात सत्य काय आहे ते शोधून सोडल्याशिवाय रहाणार नाही’, अशाप्रकारच्या वाक्यातून आपल्या दैंनदिन जगण्यात सत्याचा व्यवहार आणि अनुभूती काय असावी याविषयीचे काही प्रचलित समज पाहायला मिळतात. सत्याविषयीच्या तात्विक चर्चा आणि त्याचा दैनंदिन व्यवहार याविषयी महात्मा गांधींनी अतिशय बारकाईने चिंतन केले होते आणि ते जगण्यात आणण्यासाठी ‘सत्याचे प्रयोग’ही केले होते हे आपण जाणतो.

गांधींची सत्याची कल्पना ही निव्वळ खरे बोलण्याने साकार होत नाही. त्यात जीवनाविषयीचा एक विशिष्ठ दृष्टीकोन आहे. सत्य म्हणजे काय, या गहन प्रश्नाला गांधीजींनी भारतीय तत्वज्ञान परंपरेच्या सहाय्याने दिलेले उत्तर या दृष्टीकोनात आहे. प्रत्येकाचे अनुभवविश्व भिन्न असते. आशा-आकांक्षा वेगवेगळ्या असतात. त्यातून जगाचे आकलनही भिन्न होते त्यामुळे प्रत्येकाचे सत्यही वेगळे असू शकते, असे गांधी मानत. मात्र कोणात्याही व्यक्तीचा अनुभव हा काही परिपूर्ण नाही. वस्तुस्थिती नेमकी कशी आहे याचे समग्र आकलन करून द्यायला तो अपुरा आहे. महात्मा गांधींची सत्याविषयीची जाणीव या अपूर्णत्वाचीही आठवण करून देते. याचा अर्थ आपले अनुभव नाकारायला गांधी सांगत नाहीत. आपल्याला गवसलेल्या सत्याबद्दल ठाम विश्वास बाळगणे आणि त्याचबरोबर आपण सत्याचा केवळ एक अंश आहोत, संपूर्ण सत्य नाही याचे भान ठेवणे, या दोन बाबी महात्मा गांधींच्या सत्याच्या कल्पनेचा आत्मा आहे. महात्मा गांधी सत्याचा आग्रह धरत, याचा अर्थ ते आपल्या आकलनाच्या या दुहेरी पैलूचे भान ठेवण्याचा आग्रह धरत. सत्य अंगीकारणे म्हणजे आपल्याला गवसलेल्या सत्याची विशिष्ठता स्वीकारणे. दुसऱ्याला गवसलेल्या आपल्यापेक्षा भिन्न अशा सत्याविषयी सहिष्णुता बाळगणे. भिन्नता आणि विविधता याविषयी आदर राखणे. आपले आकलन आणि दुसऱ्याचे आकलन यांना एकमेकाच्या प्रकाशात तपासून अधिक व्यापक आकलनाकडे प्रवास करणे. एकमेकाशी अविरत प्रामाणिक संवाद हा गांधी विचारातील सत्याच्या साधनेचा पाया आहे. हा संवाद पूर्ण सचोटीने, अभिनिवेश बाजूला ठेवून, भावनाविवश न होता, शब्दच्छल किंवा वाक्चातुर्याद्वारे भाषिक व्यूह न आखता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या व दुसऱ्याच्या उत्क्रांत होण्याच्या शक्यतेवर दृढ विश्वास ठेवून व्हावा ही अपेक्षा आहे. अशा प्रकारची सत्य साधना कठीण असेल पण अशक्य नाही. आज तंत्रज्ञानात्मक क्रांतीमुळे सगळ्या जगाशी थेट संवाद साधण्यासाठी उपयोगी पडू शकतील अशी व्यासपीठे प्रसार माध्यमे आणि सामाजिक माध्यमांच्या रूपाने उपलब्ध झाली आहेत. या व्यासपीठांवर अतिशय मुक्तपणे मतमतांतरे प्रकटही होत आहेत. या माध्यमातून होणाऱ्या संवादात सत्यसाधनेच्या शक्यता दिसत आहेत का?

प्रसार माध्यमे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सामाजिक माध्यमे पुरवत असलेल्या व्यासपीठावरील संवादातून आपण सत्याच्या अधिक जवळ जात आहोत असे म्हणणे ही क्रूर थट्टा ठरेल. उलटपक्षी आज आपण ज्या काळात जगत आहोत त्याचे वर्णन पोस्ट-ट्रुथचा कालखंड केले जाते. सत्यानंतरचा किंवा सत्य संपलेला कालखंड! सत्य संपते म्हणजे नेमके काय होते? अचानकपणे एकजात सगळेजण खोटे बोलू लागतात का? की या काळात असत्याला प्रतिष्ठा प्राप्त होते? आज हे दोन्ही होताना दिसते आहे. जाणूनबुजून खोट्या, बातम्या, पोस्ट्स पसरवणाऱ्यांची पैदास फोफावते आहे. प्रसार माध्यमातील बातम्या आणि सोशल मिडीयावरील पोस्ट्स यातील सत्यासत्यतेवरून सतत वाद चालू आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारिता, सामाजिक माध्यमातील अभिव्यक्ती आणि त्यातून जनमत म्हणून जे प्रकट होते, ते सर्व अधिकाधिक वादग्रस्त होताना दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील ब्रेकिंग न्यूज आणि प्राईम टाईमला लावलेल्या कोंबड्यांच्या झुंजी, डिजिटल व्यासपीठावरचे  ट्रेंड्स आणि ट्रोलिंग या जमान्यात सत्य म्हणजे नेमके काय हा प्रश्न पुन्हा एकदा विचारायची आज गरज निर्माण झाली आहे. सत्योत्तर जगात सत्याचा शोध घेताना  हे सत्योत्तर जग आपल्या अंगवळणी कसे पडले, याचा मागोवा घेणे उद्बोधक ठरेल.

सत्योत्तर जगाकडील वाटचालीला सुरुवात सत्याच्या एकाच कवडशाबद्दलच्या आग्रही भूमिकेतून झाली. विविध माध्यमातून आपापली भूमिका मांडताना वादात उतरलेले सगळेच काही सुरुवातीला खोटे बोलत नव्हते. काहीजण तरी जे मत मांडत होते, ते त्यांना प्रामाणिकपणे उमगलेले सत्य होते. असे असले तरीही त्यातून असत्याला बळ मिळत गेले. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपल्याला उमगलेली बाब हेच एकमेव सत्य आहे आणि दुसऱ्याने मांडलेले खोटेच आहे असा कधी सुप्त कधी खुला हट्ट बाळगण्याचे प्रमाण सर्वच विचारांच्या समर्थकात कमालीचे वाढत गेले. अशा दुराग्रहाच्या मुळाशी परक्या अस्तित्वाविषयीच्या काही ठाम धारणा असतात.

  • आपल्यापेक्षा परके अस्तित्व (वैचारिक किंवा शारीरिक) मुलतः धोकादायक असते.
  • हा धोका कमी करायचा असेल, तर परक्या विचार आणि व्यक्तींना काबूत ठेवायला हवे.
  • ते काबूत रहात नसतील तर नष्ट झाले पाहिजेत कारण आपण त्यांना नष्ट केले नाही तर ते आपल्याला नष्ट करेल.
  • परक्या विचार आणि माणसांना नष्ट करण्यासाठी कोणत्याही थराला जाणे रास्तच आहे

यात परके कोण याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. कोण आपल्या / परक्यांची विभागणी सामाजिक ओळखीच्या (म्हणजे धर्म, भाषा, जात, वर्ग, राष्ट्रीयता इत्यादीच्या) आधारे करेल. कोणी ही विभागणी मूल्यात्मक निष्ठांच्या आधारे (म्हणजे प्रतिगामी/पुरोगामी, प्रति-क्रांतीकारी/क्रांतीकारी, ब्राह्मणी/अब्राह्मणी, अँटीनॅशनल/नॅशनलीस्ट)  करेल;  तर कोणी ही विभागणी राजकीय संघटनांशी असलेल्या बांधीलकीतून निर्माण होणाऱ्या राजकीय संस्कृतीच्याआधारे (संघिष्ट/डावे/कॉंग्रेसी) करेल. विभागणीचा आधार वेगवेगळा असला, तरी आपल्या/परक्याच्या वाटणीच्या मुळाशी असलेल्या सत्यविषयक धारणा मात्र सारख्या आहेत. आपले आकलन व आपली भूमिका हा सत्याचा एक कवडसा नाही तर एकमेव सत्य आहे. ते बहुआयामी नाही तर सरळ सपाट आहे. ते सापेक्ष नाही, सर्वंकष आहे. आपल्या व्यतिरिक्त इतर हे असत्याचे उपासक आहेत, ते सत्याला घातक आहेत. सत्याची मक्तेदारी फक्त आमच्याकडेच आहे असा दावा हा सत्योत्तर जगाच्या उदयाचा पूर्वसंकेत होता. त्यातून दुसऱ्याच्या सत्याची खिल्ली उडवणे, त्याला मुर्खात काढणे, त्याच्या बकुबाविषयी शंका उपस्थित करणे आणि शेवटी तो केवळ वेगळा विचार मांडत आहे म्हणून त्याचे वैचारिक आणि राजकीय अस्तित्व नष्ट करणे ही स्वाभाविक निकड बनली. आपल्याला उमगलेली गोष्ट अधिकाधिक स्पष्ट करण्यापेक्षा दुसऱ्याला अयोग्य ठरवण्यावर अधिक मेहनत आणि वेळ खर्च होऊ लागला. स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा दुसऱ्याच्या कथित मर्यादांची उजळणी होऊ लागली. जेव्हा दुसऱ्याच्या मर्यादांची आठवणही अपेक्षित परिणाम साधत नाही, तेव्हा स्वतःच्या क्षमता व कर्तृत्वाविषयी अवाजवी आणि अमानवी दावे व्हायला लागले. आता या टप्प्यावर धादांत खोट्या गोष्टी या खऱ्या म्हणून पेश करण्यात यत्किंचितही संकोच वाटेनासा झाला. फक्त आणि फक्त स्वतःचेच अनिभिषिक्त अस्तित्व हवे. दुसऱ्याविषयी आदर तर सोडा आणि इतरांच्या बरोबर सहअस्तित्वही नको झाले. यातून आपल्याला कधीकाळी गवसलेले आपल्या दृष्टीकोनातील उरलेसुरले सत्यही विझून गेले आणि ढळढळीत असत्य जन्माला आले. इतरांची सत्ये मोठ्या चतुराईने आणि अहमहमिकेने पायदळी तुडवली गेली. वृत्तवाहिन्यांवर प्राईम टाईममध्ये झालेले अनेक विवाद युट्यूबवर उपलब्ध आहेत. गेल्या सात-आठ वर्षांतल्या चर्चांचा बारकाईने आढावा घेतला, तर हे स्थित्यंतर अधिक स्पष्ट  होईल. विशिष्ट राजकीय मताच्या लोकांना कशाप्रकारे खलनायक म्हणून उभे करणे, त्यांना गवसलेल्या सत्याला निरर्थक ठरवणे कसे घडले याचा ऐतिहासिक दस्तावेज या चर्चांमध्ये सापडतो. यातील अनेक चर्चांमध्ये  एक नेता, एक विचार, एक संघटना हीच केवळ तारणहार बाकीचे सर्व भ्रष्ट, खोटारडे, चारित्र्यहीन, कुचकामी आणि ‘परके’ आहेत हे ‘सत्य’ जनमानसावर बिंबवण्यासाठी पूरक धारणांची निर्मिती कशी झाली ते पाहायला मिळेल.

डॉ. चैत्रा रेडकर, गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या अभ्यासक असून, ‘आयसर’ पुणे येथे मानव्य व सामाजिक शास्त्रांच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत.

(लेखाचे चित्र – मिथिला जोशी)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0