मंटो..उर्दू भाषेचं कलंदर, कंगाल, उनाड पोर…

मंटो..उर्दू भाषेचं कलंदर, कंगाल, उनाड पोर…

११ मे १९१२ रोजी मंटोचा जन्म झाला. पण याही ‘नाकाबिले-बर्दाश्त’ जमान्यात तो असता तर मरेपर्यंत आपल्या लिखाणाबाबत ठाम राहिला असता.

न्यायाधीशच सरकार पाडण्याच्या कटातः जगन मोहन रेड्डी
विधीमंडळ अधिकाराचा संकोच; राष्ट्रपतींना पत्र
राज्यात फिफा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार

जेव्हा बाकीचे साहित्यिक उर्दू भाषेशी अदबीने पेश होतं असतं, तिला सजवत-फुलवत, मिरवत असे, तिला एका जादुई नगरीची सैर करत असे..
तेव्हा हे महाशय तिला वास्तविकतेचे चटके देत  सुटायचे….
संसाराच्या वडावर। स्वप्नांची वटवाघूळे!
वास्तवतेला उलटे टांगून त्यांना स्वप्नांचे आकार देतात. त्यांना लोकं साहित्यिक समजतात. खोट्या स्वप्नरंजनाला कला समजतात..
त्यामुळे मंटो पडला उपरा, आउटसाडर…
तो कळवळून सांगत असे,
“या गुल- ए -गुलज़ार जगात एक उकिरडा आहे, ज्याचा उग्र दर्प जगातले उत्तमोत्तम अत्तर घालवू, मिटवू शकणार नाही.” पण त्याचा हा टाहो त्याला रोमॅटिसिझमच्या जादूगारांपासून दूरदूर फेकत गेला.

‘फेसाळ शैलीवर उठतात
बुडबुडे पश्मिनी शब्दांचे
आणि मिरवतात साबणाचे व्यापारी
सरस्वतीच्या दरबारात’.
(विं. दा.करंदीकर)

काही जाणकार साहित्यिकांना त्यांची काबिलियत समजत होती, ते त्याला जवळ करण्याचा प्रयत्न ही करत असे, पुढे जाऊन या हमदर्दीचं ओझं होऊ शकत, याचा अंदाज मंटोला आधीच आलेला असायचा..

मैं फ़रिश्तोंकी सोहबत का लायक नही
हमसफ़र कोई होता गुनहगारसा…

(बशीर बद्र)

तो एकटं राहणं पसंद करायचा..

ते एका ठिकाणी लिहितात –

पहले तरक़्क़ी पसंद मेरी तहरीरों को उछालते थे कि मंटो हममें से है. अब यह कहते हैं कि मंटो हम में नहीं है. मुझे ना उनकी पहली बात का यक़ीन था, ना मौजूदा पर है. अगर कोई मुझसे पूछे कि मंटो किस जमायत में है तो अर्ज़ करूंगा कि मैं अकेला हूं…

जिथे प्रस्थापितांशी फटकून वागणारा मंटो, रमायचा तो एका अस्पर्शीत दुनियेत..
बकाल, हिणकस, अंधारलेल्या-गल्ल्यां-वस्त्यां म्हणजे मंटोची अजीज दुनिया..
दिखाऊगिरी दुनियेच्या फुगवट्याखाली एक असा वर्ग जो उध्वस्त, भकास, तुटलेलं, असुरक्षित, अस्थिर जीवन कुंठित होता. तो वर्ग मंटोचा आपला होता. तिथलं आयुष्य त्याला सच्चं वाटायचं.. मंटो अशा अवलिया माणसांच्यात रमायचा, ज्यांना सहन करणं, स्वीकारणं निव्वळ अशक्य आहे, अशा लोकांना तो समजून घ्यायचा. त्यांच्या सुख-दुःखाचा, ताणलेल्या- मनोवृत्तीचं आरसा होणं एकमेव मंटोलाच जमायचं..
त्यांच्या तगमगीशी, त्यांच्या धडपडीशी, तो समरस व्हायचा. जगण्यातले, भोगण्यातील तपशील आपल्या कडू जहर लेखणीने मांडायचा. साऱ्या मानवी भावनांचे असंख्य विरळ-तरल पापुद्रे, पदर मंटो हळूवार हातांनी डायसेक्शन करून, जगाच्या प्रयोगवहीत त्या एकेएका सूक्ष्म धाग्याबद्दल मोठ्या आत्मीयतेने लिहायचा. त्याचं साहित्य वाचून मेंदूला झिणझिण्या येणं, पोटात तुटणं, ढवळणे, शिशारी येणं, अंगावरील जाड गेंड्याच्या कातडीचा भार सहन न होणे आणि आपण ज्या सुशोभित जगात जगत आहोत, त्याखाली कबर, स्मशान आहे, असे साक्षात्काराचे दर्शन हे सद्गृहस्थ कुठलाही मुलाहिजा न बाळगत देत असे (नव्हे अजूनही देत आहे.)

त्यामुळे साहित्यक्षेत्रात, समाजात भूकंप व्हायचा, प्रलय यायचा..
मग काय!!
तौबा तौबा..
शिव..शिव..
सांस्कृतिक दाखवेगिरीचा अपमान व्हायचा..
संस्कृतिरक्षक लाल, हिरवे, पिवळे, निळे व्हायचे..
खटले, निंदानालस्तीची खैरात व्हायची..
“दुनियाने तर्जुबाते-हवादिस की शल्क में
जो कुछ दिया है वो लौटा रहा हूं मैं”.
– साहिर
पण या ही परिस्थितीत त्यांची मार्मिक बुद्धी उफाळून यायची. नैतिकतेच्या ठेकेदारांच्यावतीने ‘The background’ या निबंधात लिहितात –
“ऊपरवाले मंटो को इस दुनिया से उठा लो, ये इस दुनिया के लायक नहीं है। ये तुम्हारी खुशबू को नकार चुका है। जब उजाला सामने होता है तो ये चेहरा फेर कर अँधेरे कोनों की तलाश में चला जाता है। इसे मिठास नहीं कड़वाहट में स्वाद मिलता है। ये गंदगी से सरोबार है। जब हम रोते हैं तो ये खुशियां मनाता है, जब हम खुश होते हैं तो ये मातम करता है। हे ईश्वर ये तुम्हे भुलाकर शैतान की इबादत करता है।”

मुखवट्याच्या साहित्य जगात मंटोच्या कथेला नक्कीच एक स्वतःच ठोस व्यक्तिमत्त्व होत, भले त्यांचा चेहेरा विद्रुप, भेसूर असला तरी नटवा, फसवा कधीच नव्हता.. मंटोने कधी आपल्या लिखाणातून समाजातील समस्यांवर उत्तरं, संदेश, उपदेश दिला नाही. अगम्य, दुर्बोध, प्रतिकात्मक लिखाण केलं नाही. जे लिहिलं ते थेट, सुस्पष्ट.. जे म्हणायचं तेच धीटपणे मांडलं. मला असं म्हणायचं नव्हतं.. वगैरे, वगैरे अशा पळवाटा मंटोच्या राज्यात नव्हत्या. आहे हे असे आहे..ते तुमच्या पुढ्यात आहे..

फाळणी जितकी मंटोच्या जिव्हारी लागली, तितकी कोणाला लागली नसावी. फाळणी नंतर तो आठचं वर्ष जगला पण फाळणीचा निखारा तळहातावर घेऊन जगला. फाळणीच्या काळातील झालेल्या मानवी जीवनाची ससेहोलपट त्याने दाहकतेने मांडली. मंटोच्या कथा या फाळणीचा धगधगता दस्तावेज आहे. त्या कथा कोणा एका समुदायाच्या, कोणा एका धर्माच्या नव्हत्या.. त्या होत्या माणसाच्या आतल्या हिंस्त्र श्वापदाच्या, द्वेषाच्या, धार्मिक माथेफिरू लोकांच्या..जे लोक मारले गेले त्याबद्दल तो म्हणाला, “असं नका म्हणू की हजारो हिंदू मारले गेले किंवा हजारो मुसलमान मारले गेले. हजारो निष्पाप लोकं निष्कारण मारले गेले, याचं दुःख व्हायला हवं. हजारो हिंदूंना मारून मुसलमान समजत असतील की हिंदू धर्म संपेल पण तो अजूनही जिवंत आहे, आणि पुढे असाच राहील त्याच प्रमाणे हजारो मुसलमानांना मारून हिंदू या गोष्टीचा उत्सव करत असतील की इस्लाम संपला जाईल तर धर्माला बंदुकीने मारता येत असा विचार केवळ मूर्खचं करू शकतात.

तो ना भारताचा होता, ना पाकिस्तानचा..

तो फक्त मानवतावादी होता.. कायमस्वरूपी ही मानवतावादी भूमिका बाळगून जगण्यासाठी लागणारी जिगर, धाडस दाखवणं सोपं नव्हतं. खास करून स्त्रियांबद्दलची त्याची कळकळ ही प्रचारकी कधीच नव्हती. मंटोच्या कथेतील स्त्री व्यक्तिरेखा हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मंटोने कथेतून स्त्रियांना ‘माणूस’ म्हणून वागणूक दिली. समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा हीन दृष्टिकोन, त्यांना मिळत असलेली ‘घिनौनी’ वागणुकीचा कडकडून समाचार घेतला. सभ्य समाजाने मंटोच्या लिखाणावर अश्लीलतेचा शिक्का मारला. त्यावर त्याने त्याच्या अंदाजात उत्तर दिलं-  “अगर आपको मेरी कहानियां अश्लील या गंदी लगती हैं, तो जिस समाज में आप रह रहे हैं, वह अश्लील और गंदा है। मेरी कहानियां तो केवल सच दर्शाती हैं।”

असा हा कलंदर..
बेछूट, बेख़ौफ़ वागण्याची किंमत वेळोवेळी त्याला चुकवावी लागली..
जगात आणि जीवनात विसंगती, विसंवादाची कमी नाहीये, हे तो पुरता ओळखून होता..
आपल्या आतील अंतर्विभाजनाला कधी नाकारलं नाही. आपल्यात असलेल्या विविध रुपांना तो धाडसाने सामोरा गेला..
हरमान हसे यांच्या ‘स्टेपेनवुल्फ’ या कादंबरीत पॅब्लो नावाच्या व्यक्तिरेखेचे एक ‘मॅजिक थेएटर’ असते, केवळ वेड्या माणसांसाठी. त्याची एंट्री फी असते ते ‘त्याचं मन’. माणसाच्या मनात वस्ती करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्व एकसंघ करण्याची किमया तिथे होत असे..
बहुदा मंटो त्या ‘मॅजिक थेटरचा’ आजीव सदस्य  असावा..
‘कुछ समझ में नहीं आता था कि होशमंदी का इलाका कहां से शुरू होता है और मैं बेहोशी की दुनिया में कब पहुंचता हूं. दोनों की सीमाएं कुछ इस तरह गड्ड-मड्ड हो गई थीं कि मैं खुद को नो मैन्स लैंड में भटकता हुआ महसूस करता था.’

तीन-चारदा पागलखानाची सहल करून आल्यानंतर तो हसून म्हणायचा की “छोट्या पागलखान्यातून मी मोठ्या पागलखान्यात आलो”.
‘होता छिन्नविच्छिन्न अंतरी। काय बाळगावे तुकडे तरी
जेथे सर्वस्वानेच फितुरी।केली असें-’
(बा. सी. मर्ढेकर)

एक दिवस त्यांना काही सुचत नव्हतं…घरातील पैसे संपलेले…हताश परिस्थिती. घरच्यांना पोसण्यात कमी पडतोय, याचा न्यूनगंड…पोटात भुकेचा डोंब, गळ्याला दारूची प्यास..मनाची सैरभैर अवस्था..
अस्वस्थ मनाने कागद आणि पेन घेतलं. आणि एका बैठकीत आपल्या या छोट्या पागलखान्यातील अनुभवाला आणि फाळणीच्या व्रणाला आत्मपिडेची जोड देऊन लिहिलेली कथा म्हणजे ‘टोबा टेक सिंग’. पुढे या कथेला जगातील १००उत्कृष्ट कथांमध्ये मानाचं स्थान मिळालं. पण त्यावेळेस मंटोच्या असहाय्यतेला हेरून प्रकाशकाने केवळ २० रुपयांत विकत घेतली होती.
मैं लिखता क्यू हू? यावर  ते लिहितात–
‘मैं लिखता हूँ इसलिए कि मुझे कुछ कहना होता है। मैं लिखता हूँ इसलिए कि मैं कुछ कमा सकूँ ताकि मैं कुछ कहने के काबिल हो सकूँ। रोटी और कला का संबंध प्रगट रूप से अजीब-सा मालूम होता है..’
एका संवेदनशील मनाला सतत दरिद्र, अवहेलना, मानहानीकारक जीवन जगायला लावणे. कलावंताला आलेलं वैफल्य, त्यातून पोटासाठी करावी लागणारी धडपडीतून येणारी अनाकलनीय भ्रमिष्ट आणि संभ्रमावस्था…

‘नैराश्याच्या वाटेवर हरएक चेहेरा जुना आहे
खोल गर्तेतला प्रवास सारा फिरून पुन्हा पुन्हा आहे’…

कृशन चंदर यांनी समाजाने  केलेल्या या अवस्थेविषयी फार प्रखरपणे लिहिलं –
‘तिकडच्या लोकांनी गोर्कीचे संग्रहालय, वाचनालय बनवलं, मुर्त्या बनवल्या, त्यांच्या नावाचे शहर स्थापित केलं. आपण मंटोवर खटले भरले, त्याला वेड्याच्या इस्पितळात पोहचवलं, हॉस्पिटलमध्ये सडवलं, नंतर त्याला इतकं हताश केलं की तो माणसांना नाही दारूच्या बाटलीला आपला मित्र समजायला लागला..’
यावर ही मंटोच्या एका कथेमध्ये आपल्याला मंटो स्टाईलने उत्तर मिळत-: ‘मैं ऐसे समाज पर हज़ार लानत भेजता हूं जहां यह उसूल हो कि मरने के बाद हर शख़्स के किरदार को लॉन्ड्री में भेज दिया जाए जहां से वो धुल-धुलाकर आए.’
मंटो वारल्यावर इस्मात चुगताईनां खूप अपराधी वाटत होतं- ‘माझं मन मला खातंय, मंटोच्या अकल्पित मरणांमध्ये माझा पण हात आहे. माझ्या पदरावर (दामन) रक्ताचे दिसणार नाही असे डाग आहेत. ज्या जगाने त्याला मरू दिलं, ते माझं तर जग आहे’.

रगों में ज़हर-ए-ख़ामोशी
उतरने से ज़रा पहले
बहुत तड़पी कोई आवाज़
मरने से ज़रा पहले
-खुशबीर सिंह ‘शाद’

मंटो आज आशिया खंडात सर्वात जास्त वाचला जाणारा लेखक आहे. त्याचं लिखाण पचवण्याची ताकद त्यावेळच्या नैतिकतेच्या ठेकेदारकडे नव्हती. आज ही नाहीये.
‘जमाने के जिस दौर से इस वक्त हम गुजर रहे हैं, अगर आप उससे नावाकिफ हैं तो मेरे अफसाने पढ़िए। अगर आप इन अफसानों को बर्दाश्त नहीं कर सकते तो इसका मतलब यह है यह जमाना नाकाबिले-बर्दाश्त है।’

खरं आहे मंटो…
पण आज ही यह जमाना नाकाबिले-बर्दाश्त है ..

सध्याच्या काळात तू असता तर…
कोरोना नावाच्या साथीमुळे मानवी जगणं पणाला लागलं आहे..
सध्या फाळणी सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे..फाळणीसारखे विस्थापितांचे जथ्थेच्या जथ्थे घरी जाण्यासाठी उन्हातान्हात रस्ते तुडवत आहे. लोकांना खायला अन्न मिळत नाहीये.

बेकारी, आर्थिक मंदी, भूक गरिबी.. .संशय, अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय.. उध्वस्त झालंय सर्व. .मंटो तुझ्या कथेतील पात्र इथे दिसतात रे! आणि गलबलायला होतं..

राजकारणाचे तेच जातीय, प्रांतीय रंग..
यह जमाना कल भी नाकाबिले-बर्दाश्त था  और आज भी है..
मंटोसाहब ! आम्ही काय करतो?
‘Every bodys’ work is nobody’s work’  या धर्तीवर ‘बघ्याची’ भूमिका घेत राहतो..
आमचे सिनेस्टार भांडी विसळतांना, लादी पुसतांनाचे व्हायरल व्हिडीओ आम्ही चवीने बघतो..विविध डिशेस बनवून likes मिळवतो.. घरी वेळ जात नाही म्हणून ऑनलाईन गाण्याच्या भेंड्या खेळतो, डॉक्टर, पोलिसांचे थाळ्या वाजवून, दिवे,पणत्या लावून कौतुक करतो..आणि भाजीच्या, किराणांच्या, दारूच्या दुकानापुढे झुंबड उडवतो..

हे खुशालचंद बुर्झ्वा समाजाच्या हीन मानसिकतेचं दर्शन बैचेन करणारं..

तो मंटो साहब! आज भी यह जमाना नाकाबिले-बर्दाश्त है।

तू असतास तर नक्की यावर तुझ्या पद्धतीने वाभाडे काढले असते, मग तुला जातीवरून ट्रोल केलं गेलं असत..पण तू कोणाला जुमानले नसतं..लढला असतास..
अशाच ‘नाकाबिले-बर्दाश्त’ जमान्यात मंटो मरेपर्यंत आपल्या लिखाणाबाबत ठाम राहिला.
मंटोच्या साहित्यांच्या निमित्ताने, समाज म्हणून आपण प्रगल्भ झालो आहोत का? याचा विचार करायला हवा.

११मे१९१२ जन्माला आलेला हा मनस्वी माणूस..
१८ जानेवारी १९५५ ला वयाच्या ४३ व्या वर्षी ते वारला.

मंटोचे छोटेसे जीवन.
‘हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावे लागले’.
जन्म : अमृतसर,
व्यवसाय : दिल्ली, मुंबई, लाहौर
शेवट :  लाहौर.
मरणाच्या एक वर्ष आधी त्यांनी आपल्या कबरीवरच्या शिलालेखावर लिहायचा मजकूर लिहून ठेवला होता तो असा,
“यहाँ सआदत हसन मंटो को दफनाया गया है, जिनके हृदय में सभी रहस्यों और लघुकथा लेखन की कला प्रतिष्ठापित है। धरती के ढेर के नीचे दबे हुए, वह अब भी इस बात पर विचार कर रहे हैं कि क्या वह लघुकहानी के महत्तर लेखक या खुदा है !’’

सआदतचा अर्थ भलाई, well-being Good fortune .मंटो म्हणजे दीड शेराच माप..
उर्दू भाषेचं कालचं कलंदर, कंगाल, उनाड पोरं…
आज तिचा भाग्योदय बनून दीड नाही तर मैलाचा  दगड बनलाय..

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0