श्रीलंकेत जशी प्रजा तसा राजा!

श्रीलंकेत जशी प्रजा तसा राजा!

श्रीलंकेतल्या घटना हा साऱ्या जगाला एक धडा आहे. ।। देश धोरणहीन, केवळ सत्तापिपासू पुढाऱ्यांच्या हातात गेला की काय होतं हे श्रीलंका जगाला दाखवून दे

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा अखेर राजीनामा
श्रीलंकेत आंदोलन चिघळले
श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे विजयी

श्रीलंकेतल्या घटना हा साऱ्या जगाला एक धडा आहे.

।।

देश धोरणहीन, केवळ सत्तापिपासू पुढाऱ्यांच्या हातात गेला की काय होतं हे श्रीलंका जगाला दाखवून देतेय.

।।

देशाचा अध्यक्ष पळून गेलाय.

हंगामी अध्यक्षाला लोकांनी नाकारलंय.

देशाच्या अधिकृत टीव्ही केंद्रात लोक घुसलेत आणि त्यांनी बाकीचे सारे कार्यक्रम बंद पाडून केवळ  आंदोलनच टीव्हीवर दाखवलं जाईल असं जाहीर केलंय.

जनता कोलंबो या राजधानीवर चाल करून गेलीय.

पंतप्रधानाच्या घरासमोर हज्जारो माणसं जमली. पोलीस आणि लष्कर लोकांना रोखायचा प्रयत्न करतंय. पण पाच पन्नास पोलिस-सैनिकांचा हज्जारो लोकांसमोर कसा पाडाव लागणार.

लोक घरात घुसले. आलिशान घर. लोक आश्चर्य चकीत होऊन दालनांत फिरले. फोटो काढले. पोहण्याच्या तलावात त्यांनी उड्या घेतल्या, पोहले. भिंतीवर लटकावलेली चित्रं खाली ओढली आणि जाळून टाकली.

गांपाहा (Gampaha) या गावातून एक महिला संजायरा पिरेरा (Sanjayra Perera) या गर्दीत होत्या. या महिला विद्यापीठात ग्रंथपाल आहेत. सोबत आपल्या १२ आणि १० वर्षं वयाच्या दोन मुलांनाही घेऊन आल्या होत्या. या साऱ्या घालमेलीत आपण आणि आपली मुलं सुरक्षीत आहेत की नाहीत याचा विचारही न करता बेभान होऊन त्या ट्रेननं प्रवास करत कोलंबोत पोचल्या. त्यांना अध्यक्ष गोटाबाया आणि हंगामी अध्यक्ष व पंतप्रधान रानिल विक्रम सिंगे यांचं पतन प्रत्यक्ष अनुभवायचं होतं.

या घटना घडत असताना तिकडं गोटाबाया राजपक्षे कोलंबो विमानतळात अडकले होते. त्यांना देश सोडून जायचं होतं. तारीख होती १२ जुलै आणि वार होता मंगळवार.

गोटाबाया यांनी जाहीर केलं होतं की ते १३ जुलैला म्हणजे बुधवारी राजीनामा देतील. खरं म्हणजे त्यांच्या राजीनाम्याला काही अर्थ नव्हता कारण त्यांचं घर लोकानी जाळलं होतं, ते आता बेघर झाले होते, कोणाही माणसाच्या हातात सापडले असते तर लोक त्यांना जिवंत ठेवणार नव्हते.

ते विमानतळावर पोचले होते तेव्हां कोलंबोच्या सर्वोच्च न्यायालयात त्यांना अटक करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली होती. श्रीलंकेच्या घटनेनुसार अध्यक्षाला अटक करता येत नसल्यानं गोटाबाया वाचले होते आणि अध्यक्षपदीच असेपर्यंत त्यांना देशाबाहेर पळून जायचं होतं.

पत्नी आणि आपले दोन शरीररक्षक यांना घेऊन, हातात अनेक एयरलाईन्सची अनेक तिकीटं घेऊन गोटाबाया तयार होते.

पण जाणार कसे? आणि कुठे?

कोलंबोतल्या अमेरिकन दूतावासानं त्यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारला होता. एका देशाच्या अध्यक्षाला व्हिसा नाकारला होता. तीनच वर्षांपूर्वी गोटाबाया हे अमेरिकेचे नागरीक होते. दोन देशांचं नागरीक होता येतं या घटनात्मक तरतुदीमुळं.  २०१९ साली अध्यक्ष व्हायला निघाले होते तेव्हां परदेशी नागरिकाला अध्यक्ष होता येत नाही या कायद्यामुळं त्यांना अमेरिकेचं नागरीकत्व सोडावं लागलं होतं.

असं म्हणतात की अरब अमिराती त्यांना स्वीकारायला तयार होतं. गोटाबायांकडं टनावारी पैसा होता त्यामुळं आखाती देशात त्यांना अनेक देश प्रवेश द्यायला तयार होते. पण अमिरातीत जाणारं एकही विमान कोलंबोत उपलब्ध नव्हतं.

गोटाबायांना कसंही करून लंकेबाहेर पडायचं होतं आणि नंतर ते अमिरातीत किंवा तत्सम ठिकाणी जाऊ शकले असते.

गोटाबायांच्या माणसांनी भारतीय विमानतळांची चौकशी केली. नेमकं काय घडलं माहित नाही, पण भारतीय विमानतळावर त्यांचं लष्करी विमान उतरू शकेल याची खात्री नव्हती. गोटाबायांच्या माणसांनी बोटीत बसून भारतात शिरायचा विचार केला. समुद्रात किती तरी लंकेची माणसं काहीबाही करत होती, त्यांना गोटाबाया दिसले असते की मामला खलास झाला असता.

कोलंबो विमानतळावरचे इमिग्रेशन कस्टम्स इत्यादी विभागातले कर्मचारी  काहीही करून गोटाबायांना अडवायचंच असं ठरवून बसले होते.

शेवटी बुधवारच्या सकाळी त्यांचं विमान मालदीव बेटावर जायला परवानगी मिळाली. मालदीवचा शिक्का त्यांच्या पासपोर्टवर पडला. गोटाबाया मालदीवला रवाना झाले.

त्यांचे धाकटे बंधू बेसील राजपक्षे मात्र अडकून पडले. तेही लोकांना सामोरे जायला घाबरत होते. व्हीआयपी सोयी वापरून त्यांना विमानतळावर जायचं होतं आणि तीच सोय वापरून सेक्युरिटी वगैरे टाळून त्यांना अमिरातीत जायचं होतं. विमानतळावरच्या कर्मचारी युनियननं साफ सांगून टाकलं की ते देशद्रोही मंडळीना देशाबाहेर जाऊ देणार नाहीत.

देशाचे अर्थमंत्री बेसील राजपक्षे अडकून पडलेत.

अध्यक्षांचा अधिकृत राजीनामा आलेला नाही, ते पळून गेलेत.

विक्रमसिंगे या माणसाला हंगामी अध्यक्ष नेमलंय, जनता त्याला मारायला टपलीय.

अशा स्थितीत लोकसभेच्या सभापतीनाच देशाचा कारभार हातात घ्यावा लागणार. पण तेही महिन्यापेक्षा जास्त काळ हंगामी प्रमुख राहू शकत नाहीत. नवा अध्यक्ष आणि मंत्रीमंडळ तयार करावंच लागणार.

श्रीलंकेच्या लोकसभेत २२५ खासदार आहेत, त्यात राजपक्षे यांच्या पेरुमुना पक्षाचे १०० खासदार आहेत, त्याना दोन छोट्या पक्षांच्या ३ खासदारांचा पाठिंबा आहे. बाकीचे तेरा पक्ष आणि ४५ अपक्ष मिळून विरोधी मंडळी आहेत. ५५ खासदारांच्या एसजेपीचे प्रेमदास हे विरोधी पक्ष नेते आहेत.

गोटाबाया यांना मुळातच बहुमत नाही. पण पैसा आणि दादागिरीच्या जोरावर त्यानी सरकार तयार केलंय.

आता सर्व विरोधी पक्षांचं किंवा सर्वच पक्षांचं मिळून सरकार तयार करायचं घाटतंय. ते कसं जमावं? किती पक्ष आणि किती अपक्ष. आणि त्यांची आपसातली भांडणं. तीनच वर्षांपूर्वी गोटाबाया यांच्या विरोधात एकत्र यायला विक्रमसिंगे आणि प्रेमदास यांनी तयारी दाखवली नव्हती, प्रत्येकाला एकहाती सत्ता हवी होती.

बहुमताच्या जवळपास जाण्याएव्हढही बळ नसतांना एकहाती सत्ता असावी असं वाटण्याला काय म्हणावं?

लंका राजकारणाच्या हिशोबात चिरफाळलेली आहे. देशाचं भलं कशात आहे आणि ते कसं साघ्य होणार आहे यावर देशातल्या जनतेत वीसपेक्षा जास्त मतं आहेत.

आजच्या संकटाला गोटाबाया आणि त्यांचा पक्ष कारणीभूत आहे.

देशातल्या सुखवस्तू मध्यम वर्गीय लोकाचं हित आणि मतं डोक्यात घेऊन त्यानी अर्थव्यवस्थेत बदल केले. या व्यवस्थेचा एक मुख्य भाग होता करव्यवस्था.

देशातल्या सुखवस्तू लोकाना सुख लाभावं यासाठी त्यांनी कर कमी केले. कर कमी झाले, देशाचं उत्पन्न कमी झालं. उत्पन्नवाढीच्या इतर वाटांकडं गोटाबाया यांनी दुर्लक्ष केलं. तिथून आर्थिक संकटाला सुरवात झाली. तेल आणि खतं या दोन महत्वाच्या गोष्टी लंका आयात करते. त्या खरेदीसाठी सरकारकडं पैसे नव्हते. देशावरचं कर्ज फेडण्यात अडचण असताना ही नवी गरज निर्माण झाली. आयातीसाठी पैसे कुठून आणणार?

खतांची आयातच बंद करून टाकण्याचा निर्णय गोटाबाया यांनी घेतला, फतवा काढला की शेतकऱ्यांनी जैविक शेती करावी. जैविक शेतीच्या खूपच मर्यादा असतात हे अडाणी गोटाबायांना माहित नव्हतं. पिकं कोसळळी. अन्नधान्याची टंचाई सुरु झाली. अन्न आयात करण्याची वेळ आली पण आयात करायला पैसा नव्हता.

कोसळलेल्या पिकात चहा होता. चहाची निर्यात लंका करते. निर्यात कोसळली, परदेशी चलनाचा साठा रोडावला.

दुर्दैवानं कोवीड आला आणि उत्पन्नाचं मुख्य साधन असलेलं पर्यटन थांबलं. परकीय चलनाचा साठा आणखीन रोडावला.

परिणामी तेलाची आयात थांबली, अन्नाची टंचाई सुरु झाली.

चूल बंद झाली की जे व्हायचं ते लंकेत झालं.

जनता रस्त्यावर आली.

गोटाबायांना निवडून कोणी दिलं? त्यांच्या पक्षाला १०० खासदार कोणी दिले? त्यांची गाढव धोरणं मान्य कोणी केली? त्यांची धोरणं वेळीच त्यांच्या समर्थकांनी हाणून कां नाही पाडली?

लंकेतले १०० खासदार गोटाबायांबरोबर आहेत याचा अर्थ सुमारे ४५ टक्के जनता त्यांच्या बरोबरआहे. त्यांच्या बरोबर नसलेल्या ५५ टक्के जनतेचं काय?

दुर्दैव असं आहे की आपलं आर्थिक हित कशात आहे याचा विचार जनता करत नाहीये, जनता वांशिक आणि धार्मिक कसोटीवरच विचार करतेय. बुद्ध-सिंहली संस्कृतीचं महत्व आणि प्रभुत्वच जनतेला महत्वाचं वाटतंय. म्हणून तर गोटाबाया यांचा पक्ष राज्य करतोय.

उपाशी मरू. भीक मागू. आमचं काहीही कां होईना पण आमची संस्कृती जपू असं लोकांना वाटत असेल तर काय करणार?

प्रजा. प्रजेनं निवडून दिलेला राजा.

दुःखद स्थिती आहे.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0