कडाक्याच्या हिवाळ्यामुळे पँगॉगजवळील सैन्याची माघारी?

कडाक्याच्या हिवाळ्यामुळे पँगॉगजवळील सैन्याची माघारी?

वजनदार भूराजकीय आणि धोरणात्मक मुद्दयांसोबत जनरल विंटर यांच्या आदेशानुसार अर्थात हिमालयातील कडाक्याच्या हिवाळ्यामुळे लदाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेलगत (एलएसी) अत्यंत वादग्रस्त अशा पँगाँग त्सो भागातील तब्बल नऊ महिने एकमेकांपुढे उभे ठाकलेले सैन्य भारत व चीन या दोन्ही देशांनी मागे घेतले आहे.

चीनने १० फेब्रुवारी रोजी आणि भारताने एक दिवस नंतर जाहीर केलेल्या विच्छेदन करारामागे ऑक्टोबरनंतर हिवाळ्याच्या कडाक्यामुळे एलएसीवर तैनात सैन्यांची होत असलेली हानी (अॅट्रिशन) हेही एक फारसे माहीत नसलेले कारण आहे, असे भारतीय लष्करातील आजी-माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. मे २०२० नंतर सैन्य तसेच शस्त्रास्त्रे तैनात करण्या त आलेल्या अनेक ठिकाणांवरील तापमान उणे ३० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. त्यात त्याहून घातक असे हिवाळी वारे सुटल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झाली. सैनिकांची व त्यांच्या साधनांची कार्यक्षमता यामुळे लक्षणीयरित्या कमी झाली होती.

निवृत्त ब्रिगेडियर राहुल भोसले म्हणाले, “या भीषण हवामानाचा निर्दय प्रहार दोन्ही लष्करांवर झाला आहे. कोंडी फोडण्यासाठी दोन्ही लष्करांच्या कमांडर्समध्ये झालेल्या चर्चेच्या नऊ फेऱ्यांमध्ये हानीचा मुद्दा आला नाही हे पटण्याजोगे नाही.” यातील अखेरची फेरी २४ जानेवारी रोजी चीनच्या हद्दीत झाली.

भारतीय लष्कराचा वाढलेला पर्वतीय संग्रामाचा अनुभव तसेच चीनच्या लष्कराकडे असलेली अधिक सुसज्ज संरचना निष्प्रभ ठरावीत एवढे तीव्र हवामान येथे आहे, असे अनेक लष्करी अधिकारी व विश्लेषकांचे म्हणणे आहे. भारत आणि चीन ही दोन्ही राष्ट्रे याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. हा जीवनमरणाचा प्रश्न आहे, असे एका लष्करी अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. भारतीय लष्करात अतिउंची किंवा तीव्र हिवाळ्यामुळे झालेल्या मृत्यूंचे किंवा आजारांचे तपशील उपलब्ध नाहीत आणि ते नंतर प्रसिद्ध केले जाण्याची शक्यताही नाही. प्रत्यक्ष ताबारेषेवरील भारतीय लष्करापासून रायफलच्या कक्षेत असलेल्या पीएलएलाही  (पीपल्स लिबरेशन आर्मी), विशेषत: पँगाँग सरोवराच्या दोन्ही काठावरील सैनिकांना, हिवाळ्याचा त्रास होत आहे यात वाद नाही. प्रत्यक्ष ताबारेषेनजीक हिवाळ्यामुळे मृत्यू होत आहेत अशा बातम्या गेले काही आठवडे येत आहेत. मात्र, चीनमधील अन्य बातम्यांप्रमाणेच या बातम्यांची पुष्टीही होऊ शकलेली नाही. मात्र, एमबीटी, हॉवित्झर्स आणि आयसीव्हींसारख्या साहित्यावरील हवामानाच्या परिणामाच्या प्राथमिक मूल्यांकनातून असे दिसून येते की, ही हानी मापनीय आहे. हे साहित्य खडतर हवामानात तग धरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले असले, तरी त्यावर हिवाळ्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो हे नक्की.

२०११-१३ या काळात एक्सआयव्ही कॉर्प्समध्ये लॉजिस्टिकल ऑपरेशन्सचे नेतृत्व करणारे निवृत्त मेजर जनरल ए. पी. सिंग यांच्या मते, भारतीय व चिनी लष्करांकडील एमबीटीज आणि आयसीव्हीज सारख्याच प्रमाणात गोठतात, त्यामुळे त्यांतून डिझेल किंवा वंगणाचा प्रवाह नीट वाहू शकत नाही. एमबीटींच्या लढाऊ क्षमतांवरील प्रतिकूल परिणाम अधिक तीव्र होऊ शकतो, असे जनरल सिंग म्हणाले. भारताने टीसेव्हनटूएमवन अजेय आणि टीनाइंटीएस भीष्म एमबीटीज तैनात केले आहेत. यांमध्ये रशियाकडून घेतलेली ७८० एचपी व्ही ४६-४ आणि व्हीनाइनटूएसटू इंजिने बसवण्यात आलेली आहेत. भारतीय लष्करातील १३०-१४० एमबीटी बेसकॅम्पला परत आले की त्यातील इंजिने बदलावी लागतील, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. याउलट पीएलएने टाइप फिफ्टीन लाइट टँक्स तैनात केले आहेत. १,००० अश्वशक्तीच्या स्थानिकरित्या विकसित इलेक्ट्रॉनिक नियंत्रित डिझेल इंजिनने युक्त अशा ३३ टनांच्या टँकमध्ये १०५ मिमी रायफल्ड गन बसवण्यात आली आहे. या सर्व साधनांची कार्यक्षमता थंडीमुळे कमी झाली आहे, असे समजते.

प्रत्यक्ष ताबारेषेजवळील आयसीव्ही, हावित्झर्स आणि छोट्या शस्त्रांतील दारूगोळाही थंडीमुळे पुरेशा क्षमतेने काम करत नाही. तापमानाचा पारा घसरल्यास लष्करी साधने कशी निरुपयोगी ठरतात, वंगणे गोठतात आणि तोफखान्यातील बॅरल्सना तडे जातात, असे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या अहवालात म्हटले आहे. परिणामी तोफखान्यातील बॅटऱ्या बदलाव्या लागतात. शिवाय, अतिउंचीवर सैनिकांच्या दृष्टीतही फरक पडतो, असेही एमआयटीच्या अहवालात म्हटले आहे.

भारतीय लष्कर हिवाळ्यात तैनात असणार हे नक्की झाल्यानंतर गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या काळात प्रत्यक्ष ताबारेषेनजीक हीटेड शेल्टर्स तयार करण्याचे प्रयत्नही करण्यात आले होते आणि जेव्हा सिमेंटचे बांधकाम शक्य झाले तेव्हा सैनिकांसाठी निवास बांधण्यास प्राधान्य दिले गेले. विशेष प्लॅटफॉर्म शेड्सच्या बांधकामाला प्राधान्य मिळाले नाही. याशिवाय एमबीटी, आयसीव्ही आदी साधनांसाठी आवश्यक शेड्स आकाराने खूप मोठ्या असतात. प्रत्यक्ष ताबारेषेपासून २३ किलोमीटर अंतरावरील न्योमामध्ये शांतता असताना हे काम करण्यासाठी लष्कराला दोन वर्षे लागली होती. ताबारेषनजीकची स्थळे न्योमाच्या तुलनेत अधिक दुर्गम आहेत.

“पँगाँग सरोवराजवळून सैन्य मागे घेण्याच्या करारामागे हवामानाचे कारण नि:संशय असले तरी यामध्ये दोन्ही लष्करांनी दाखवलेला कार्यात्मक व्यवहार्य विचारही आहे,” असे जनरल सिंग म्हणाले.

दरम्यान, पँगाँग सरोवर परिसरातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाचे भारतीय लष्करातील अधिकारी स्वागत करत आहेत. दिल्लीत याचे सविस्तर कारण दिले जाते. ते म्हणजे चीनच्या विस्तारवादी व वर्चस्ववादी धोरणाला आव्हान देत भारताने घेतलेली ठाम भूमिका हे सैन्य मागे घेतले जाण्यामागील प्रमुख कारण आहे.

सुरुवातीला कच्चे दुवे राहिल्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्यक्ष ताबारेषेलगत सैन्य तैनात करण्यात दाखवलेली दृढनिश्चयी चपळता आणि गेल्या ऑगस्टमध्ये लष्कराने दाखवलेली कार्यात्मक हातोटी यामुळे पीएलएच्या पँगाँग सरोवराजवळील युक्त्या निष्प्रभ ठरल्या, हेही कारण सैन्ये मागे घेतली जाण्यामागे आहे, असे म्हटले जात आहे.

याशिवाय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने वाटाघाटींमध्ये दाखवलेल्या कौशल्यांमुळे लष्कराला लाभ झाला, असे म्हटले जात आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमधील सर्वव्यापी चर्चा आणि भारत सरकारने उचललेली आर्थिक व राजनैतिक पावले यांचेही हे यश समजले जात आहे. भारतीय नौदलाने क्वाड म्हणून ओळखला जाणारा चतुष्कोनीय सुरक्षा संवाद शक्य केला. यात ऑस्ट्रेलिया, जपान व अमेरिकेच्या नौदलांनाही समाविष्ट करून घेण्यात आले. क्वाडकडे चीन सरकारने धोक्याच्या इशाऱ्यासारखे बघितले.

डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून झालेली गच्छंती तसेच कोविड-१९ प्रसारामुळे जगभरात निर्माण झालेली चीनविरोधी भावना यांचाही भारत व चीनची लष्करे लदाखमधून मागे घेतली जाण्यामध्ये वाटा आहे, असे म्हटले जात आहे.

विच्छेदन करारानुसार, पीएलए सिरजॅप पठारावर फिंगर-एट पर्वतांच्या पूर्वकडे जाईल आणि भारतीय लष्कर फिंगर-थ्रीवरील धानसिंग थापा ठाण्यावर परत येईल. त्यानंतर या दोन्ही लष्करांदरम्यानच्या भागाला ‘बफर’ किंवा नो-गो (निषिद्ध) क्षेत्र समजले जाईल. नंतरच्या काळात दोन्ही देशांच्या संमतीने गस्त घालण्याबद्दल नियम निश्चित केले जातील. गोग्रा हॉट स्प्रिंग्ज क्षेत्र तसेच दाप्सांग पठारावरून सैन्य मागे घेतले जाण्याबद्दलही चर्चा सुरू आहे आणि लष्करी व राजनैतिक चर्चांद्वारे यावर निर्णय केले जातील.

तात्पर्य, १९व्या शतकाच्या सुरुवातीला नेपोलियन बोनापार्टच्या भक्कम फ्रेंच लष्कराचा पाडाव करण्यात जनरल विंटर यांनी रशियाला मदत केली होती आणि १२९ वर्षांनंतर पुन्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या जर्मन लष्कराला जनरल विंटर यांनी धूळ चारली होती.

भारतीय लष्कर आणि पीएलए यांना सैन्य मागे घेण्यास भाग पाडून या जनरल विंटर यांनी न फुटणारी कोंडीही फोडली आहे आणि संभाव्य संघर्षही टाळला आहे की काय?

बहुतेक असेच घडले आहे.

मूळ लेख: 

COMMENTS