चुकीच्या ट्विटमुळे सरदेसाई यांच्यावर कारवाई

चुकीच्या ट्विटमुळे सरदेसाई यांच्यावर कारवाई

नवी दिल्ली: ज्या भारतीय टीव्ही पत्रकारितेत सूत्रसंचालक आणि वार्ताहरांनी घाईघाईने दिलेल्या बातम्या खोट्या ठरण्याचे प्रकार वारंवार घडत असतात, त्याच अतिस्पर्धात्मक टीव्ही पत्रकारितेत प्रथमच वरिष्ठ सूत्रसंचालक व सल्लागार संपादकाला त्याच्या ऑन-एअर दाव्यांबद्दल व ट्विट्सबद्दल दोन आठवड्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे. ‘इंडिया टूडे’ने वरिष्ठ अँकर व सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्यावर, २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान दिल्ली पोलिसांनी एका शेतकऱ्यावर गोळीबार केल्याप्रकरणी केलेल्या ट्विटवरून, ही कारवाई केली आहे. वाहिनीने सरदेसाई यांचे एक महिन्याचे वेतन कापून घेतले आहे.

सरदेसाई यांनी या मुद्दयावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही पण उच्चपदस्थ सूत्रांनी या घटनेची पुष्टी केली आहे.

तीन कृषीकायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. राकेश टिकैत, दर्शन पाल आणि गुरनाम सिंग हे या मोर्चाचे नेतृत्व करत होते. या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला आणि यात ३००हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी त्यानंतर ट्रॅक्टर मोर्च्यादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी किमान ३७ शेतकरी नेत्यांवर फिर्यादी नोंदवल्या आहेत.

सरदेसाई यांनी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते: “४५ वर्षीय नवनीत यांचा आयटीओवर पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला असे समजते. शेतकरी मला म्हणाले- त्याचा ‘त्याग’ व्यर्थ जाणार नाही.” ‘द वायर’नेही या प्रकरणाचे वार्तांकन आधीच केले होते आणि संबंधित शेतकऱ्याचा मृत्यू पोलिस गोळीबारात झाल्याचे नमूद केले होते. पोलिस मात्र नवनीत यांचा मृत्यू हा अपघात आहे असा दावा करत होते. अन्य आंदोलकांचा दावा शेतकऱ्याचा मृत्यू गोळीबारात झाला असा होता.

ट्रॅक्टर उलटल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर जाऊन उलटल्याचे दिसत होते. पोलिसांनी फोडलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्यांतील धूर डोळ्यात जाऊन शेतकऱ्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे असे काहींचे म्हणणे आहे.

पोलिसांचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर काही मिनिटांतच सरदेसाई यांनी त्यांचे विधान मागे घेतले आणि ते म्हणाले, “नवनीत सिंग यांचा मृत्यू दिल्ली पोलिसांच्या गोळीबारात झाल्याचा आंदोलकांचा दावा आहे पण पोलिसांनी लावलेले अडथळे तोडण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर उलटल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. आता आंदोलकांचा आरोप टिकणार नाही. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आलेला नाही.”

पोलिसांनी लालकिल्ला व आयटीओ या स्थळांवर ”प्रचंड संयम” दाखवल्याचे कौतुक करणारे ट्विटही त्यांनी केले.

शिवाय २६ जानेवारी रोजी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास (ट्विट केल्यानंतर लगेच) केलेल्या लाइव्ह कव्हरेजमध्ये ते म्हणाले- “नवनीत सिंग नावाच्या शेतकऱ्याचा पोलिस गोळीबारात मृत्यू झाला असा दावा आम्ही ज्यांना भेटलो ते शेतकरी आंदोलक करत होते पण पोलिसांनी आम्हाला दाखवलेल्या व्हिडिओत ट्रॅक्टर उलटल्याचे स्पष्ट दिसत आहे.”

मात्र, “खोटी बातमी” पसरवल्याप्रकरणी सरदेसाई यांच्याविरोधात फिर्याद दाखल करावी किंवा त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी भाजपचे अनेक नेते करत होते.

दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारीच्या मोर्च्यासंदर्भात २२ फिर्यादी दाखल केल्या आहेत आणि आत्तापर्यंत सुमारे २०० जणांना ताब्यात घेतले आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्यांना शोधण्यासाठी अनेक व्हिडिओ तसेच सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे दिल्ली पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS