कीर्तनाचा ‘जात पॅटर्न’

कीर्तनाचा ‘जात पॅटर्न’

वारकरी शिक्षण घेऊन कीर्तनकार झालेली नवीन मुलं पाटील आडनाव लावताना दिसत आहेत. ज्या गावात, वस्तीत ज्या जातीची जास्त लोकसंख्या आहे, त्या गावात एखादा महोत्सव, सप्ताह आयोजित करून आपल्या जातींच्या कीर्तनकार मंडळींना, कलावंतांना आमंत्रणे द्यायची. जातींच्याच संतांची अभंग, ओव्या घेऊन कीर्तन सांगायची. कीर्तनाचा असा हा ‘जात पॅटर्न' नव्याने अस्तित्वात आला आहे आणि तो दुःखद आहे.

जातप्रथा आणि स्त्रीमुक्ती – डॉ. आंबेडकरांचे विचार
कर्नाटकात ब्राह्मणांना जातीचे व उत्पन्नाचे प्रमाणपत्र
बौद्ध की महार वाद : स्वाभिमान हवा की सवलती ?

इंदूरीकर महाराजांनी जे वक्तव्य केलंय. त्यावर खूप चर्चा झाली. त्या चर्चेच्या माध्यमातून आशा बऱ्याच गोष्टींचीही चर्चा झाली ज्यामुळे वारकरी संप्रदाय आणि त्याचं बदलतं स्वरूप या विषयी काही आणखी गोष्टी जाणवतात. त्याही सांगितल्या पाहिजेत.

संतांच्या वाङमयात, संतांच्या चरित्रात, त्यांच्या भूमिकेतून त्यांनी वारंवार भेदावर प्रहार केलाय हे दिसून येते. परंतु आज त्यांच्या विचारांचा रथ पुढे नेणाऱ्या काही लोकांनी या रथावर भेदांचे विचार चढवले आहेत. जसं की ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असं संत म्हणतात परंतु या विचारांना आता जाती भेदाची, काहीशी ‘जातीभिमानाची’ वाळवी लागली आहे. ज्यानी भेदभावावर प्रहार केला, त्याच संतांच्या जाती उकरून काढल्या जात आहेत. त्यांना विशिष्ट जातीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न होत आहेत. एव्हड्यावर न थांबता त्यांना वाटून घेतलं आहे. त्यावरून आपल्या जातीच्या कीर्तनकारांचे संघ तयार केले आहेत. आपल्या आडनावापुढे ‘विशिष्ट’ जातीचे विशेषणे लावली जातायेत. एखादा महाराज मराठा असेल तर त्याने त्याचं आडनाव वगळून नावापुढे पाटील लावायला सुरुवातीला केली आहे. उदा. ह.भ.प. अमूक तमुक पाटील महाराज असं लावतात. यात आळंदीत तर वारकरी शिक्षण घेऊन कीर्तनकार झालेली नवीन मुलं पाटील आडनाव लावताना दिसतायेत. ज्या गावात, वस्तीत ज्या जातीची जास्त लोकसंख्या आहे, त्या गावात एखादा महोत्सव, सप्ताह आयोजित करून आपल्या जातींच्या कीर्तनकार मंडळींना, कलावंतांना आमंत्रणे द्यायची. जातींच्याच संतांची अभंग, ओव्या घेऊन कीर्तन सांगायची. कीर्तनाचा असा हा ‘जात पँटर्न’ नव्याने अस्तित्वात आला आहे. आणि तो दुःखद आहे. चुकीचा आहे.

जालना जिल्ह्यातल्या एका तालुक्यात एक माळ्याचे गाव आहे. तिथे सात दिवसांच्या सप्ताह होतो. माझ्या मित्राचे गाव असल्याने मी एकदा गेलो होतो, तेंव्हा मला सगळा प्रकार कळला. हे वारकरी संप्रदायाचे विचार आणि शिकवण असूच शकत नाही. निवृत्ती इंदूरीकर हे तर देशमुख मराठा. सगळीकडे ओरड होऊनही स्वतःची चूक न मान्य करता आपल्या बोलण्यावर ठाम राहिले. धार्मिक ग्रंथांचे प्रमाण पुढे करायला लागले. महिलांबाबत अतिशय तुच्छ दृष्टिकोन आणि भेदभावपूरक बोलणं त्यांनी आजपर्यंत केलंय. शेवटी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला म्हणत बंद लिफ़ाफ्यात माफीनामा दिला. जाहीर सांगायचं ना चुकलं माझं म्हणून. पण कसला अहंकार? ज्या वारकरी संप्रदायाचे विचार संतांनी सांगितले ते इतरांना सांगताना तर एव्हढा अहंकार कसला? माऊली, तुकाराम, एकनाथ, नामदेव हे अहंकारी होते का? मग तुमच्यात कुठून आला?  याला हे लोक परमार्थ म्हणत असतील तर ते हातात मशाल घेऊन अंधार शोधणारे लोक आहेत. सगळीच कीर्तनकार महाराज मंडळी अशी नाहीत. काही कीर्तनकार भेदावर प्रहार करणारे आहेत, जातीभेद मानणारे नाहीत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जातीचे शिष्य कीर्तन शिकत आहेत.

आता कीर्तनाला काही राजकीय रंग देखील चढले आहेत. अनेक महाराज राजकारणात सक्रिय आहेत. पुढाऱ्यांच्या मांडीला- मांडी लावून बसणारेही आहेत. पूर्वी राजकीय पुढाऱ्यांकडून माणसांना आकर्षित करण्यासाठी, गर्दी खेचवण्यासाठी एखाद्या नटाला बोलवत असत. गाण्यांचे कार्यक्रम किंवा प्रसंगी तमाशा, लावणी आयोजित केल्या जाई. थोडक्यात करमणुकीचे साधने जमवली जायची. आता त्यात कीर्तनाचा समावेश झालाय, असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. राजकीय पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला, प्रचाराला कीर्तनाचे आयोजन केलं जातं. यात निवृत्ती महाराज इंदूरीकर पुढे आहेत. रामराव ढोक, बाबासाहेब इंगळे आणि स्वतःला प्रति इंदूरीकर म्हणवणारी भरपूर पैसे घेऊन कीर्तन करणारी धंदेवाईक माणसं आहेत. ठीक आहे. या आयोजनालाही विरोध नाही. परंतु ज्याने कीर्तन आयोजित केलंय तो पुढारी कोणत्या विचारांचा आहे? भ्रष्ट आहे की नाही? समाजासाठी निकृष्ट, बिनकाम्या असेल आणि त्याने कीर्तनाचे आयोजन केलले असेल, तर तो कीर्तनाचा वापर करतो आहे. संतांच्या विचारांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतो आहे. मुळात कीर्तन या व्यासपीठावर राजकारणाचे काय काम? हे व्यासपीठ न वापरू देण्यासाठी आता कीर्तनकार मंडळीनी याला विरोध करायला हवा. पुढारी या कीर्तनाच्या माध्यमातून स्वतः वर आणि इतरांवर पवित्र वर्षाव करून घेतोय. स्वतःची प्रतिमा बनवतो आहे. राजकारण आणि सत्ता हे फार अलीकडचे आहे. वारकरी संप्रदाय आणि विचार हे त्या पूर्वीचे आहे. त्या काळातही संतांना सनातन विचारांचा आणि सत्ताधाऱ्यांचा त्रास झाला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांना त्रास झालाय हे सर्वश्रुत आहे. परंतु त्यांनी त्याला न जुमानता आपल्या लेखणीतून भ्रष्ट विचारांवर प्रहार केला. दांभिकांना फटकारले. अगदी तसेच संतांचे विचार घेऊन जाणाऱ्या कीर्तनकार महाराज मंडळींनीही सत्ताधाऱ्याना प्रश्न विचारावेत. अन्यायाविरुद्ध आसूड ओढावेत. अंधश्रद्धा आणि अज्ञानावर हल्ला चढ़वावा. आपण जागरूक होऊन लोकांना जागरूक करावे. तरच संतांच्या विचारांची ती सेवा ठरेल, अनुग्रह ठरेल.

आज आपण पाहतो वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून रेडिओ, टीव्ही माध्यमाद्वारे कीर्तनातून शिक्षण, स्त्री शिक्षण, अंधश्रद्ध निर्मूलन, व्यसनमुक्ती या विषयावर कीर्तनकार प्रबोधन करतात. असेच विषय कीर्तनकारांनी घ्यावेत. अर्थात काही कीर्तनकार मंडळींनी याला सुरूवातही केली आहे. परंतु तथाकथित कीर्तनाचा विनोदी पँटर्न ज्याने हा वारकरी संप्रदायात घुसडवला आहे, त्याचेच अनुकरण इतर महाराज मंडळी करतांना दिसते आहे. निवृत्ती इंदूरीकर यांची शैली अगदी एका लाफ्टर शो सारखी. त्यामुळे संतुलित आणि संयमित वाटणारं कीर्तन आज फक्त हास्याचे आणि विनोदाचे केंद्र झालंय आणि ते समाजात लोकप्रियही होते आहे. बाकी कीर्तनकारही हीच इंदूरीकरांची विनोदी शैली कॉपी करत आहेत. याला फक्त कीर्तनकारच जबाबदार नसून समाजही तितकाच दोषी आहे. संतांचे विचार कुणालाचा नको आहेत. फक्त हसायचे करमणूक करायची आणि घरी जायचे बस्स!!!

समाजालाच जर आशा कीर्तनाची आवश्यकता असेल तर कीर्तनकार काय वेगळं करेल? एका कीर्तनकाराला कीर्तनातल्या अर्थकारणाबद्दल बोललो असता, त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ज्या कीर्तनकारांनी कीर्तनात विनोद सांगितले नाहीत, श्रोत्यांना हसवले नाही. त्याऐवजी वारकरी नियमात बसेल असं अभंगांच्या आशयने निरूपण केले, संतांचे तत्वज्ञान सांगितले आशा कीर्तनकार महाराजास सप्ताहाची आमंत्रणे कमी असतात. उलट जो कीर्तनकार अभंग सोडून भलतीकडेच सांगतो, हसवतो, छोटे छोटे विनोद सांगतो. सिनेमा, राजकारण, या गोष्टीवर बोलतो असेच कीर्तनकार हवे असतात. त्यांनाच मागणी असते. तारखा बुक असतात. जर विनोदी कीर्तनकाराची तारीख मिळत नसेल तर प्रसंगी चार पैसे जास्त देण्याची तयारी सप्ताह मंडळाची असते. लवाजमा मोठा असणारा, दहा – पंधरा लाखाची गाडी घेऊन येणारा, महागडे कपडे घालणारा कीर्तनकार असेल तर गावकरी खुश होतात, तोच मोठा आणि खरा कीर्तनकार मानतात. उलट कमी फक्त येण्या- जाण्याचा खर्च घेणारे, अभंगावर कीर्तन करणारे, संतांचे चरित्र सांगणारे खरे वारकरी, कीर्तनकार गावकरी आणि व्यवस्थापकांना नको आहेत. ही वस्तुस्थिती आहे. यातच आता राज्या बाहेरची हिंदी भाषिक कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार महाराज, बुवा आयात केली जात आहेत, त्यांची वीस वीस लाखांची सुपारी. गो- रक्षणाच्या नावाने देणग्या मागणे. धान्य जमा करणे. आश्रम या नावाखाली भरमसाठ पैशांची जमवा जमव असं बरंच मोठ अर्थकारण या अध्यात्माच्या नावे चालते. हे फक्त मलाच नाही तर अनेकांना जाणवतं, दिसतं पण या विरोधात बोलणार कोण? परंतु एव्हढं असलं तरी या विरोधात बोलणारे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. ते या सगळ्या अर्थकारणा बद्दल बोलतायेत. समाजात जनजागृती करतानाही दिसत आहेत.

असो, हे सगळं लिहिण्याच्या पाठीमागे एकच हेतू आहे. अनेकांची कळकळ आहे. वारकरी संप्रदाय काही स्वार्थी लोकांच्या भक्ष्यस्थानी पडू नये. ही मोठी आणि महान चळवळ स्वच्छ आणि सतत प्रवाहित रहावी, येणाऱ्या अनेक पिढ्या संतांच्या विचारांवर, शिकवणीवर आपल्या जगण्याचा परिघ विस्तारत राहावेत. संतांचे तत्वज्ञान फक्त ग्रंथात, पुस्तकात न राहता कृतीत येऊन, सगळं जग प्रेमाने नहावं, कुणी कुणाचा द्वेष करू नये. महिलांविरोधी, पितृसत्ताक विचार न सांगता समतेचे विचार सांगावेत . इतक्या मोठ्या व्यासपीठावरून भेदभाव करणारे विचार न सांगता एकोपा आणि सौहार्द कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न व्हावेत. अगदी नामदेव ढसाळ म्हणतात तसं आभाळाला बाप आणि जमिनीला आई समजून तिच्या कुशीत सगळेच आनंदने नांदावेत!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0