‘फॉर समा’- आशावादाचा रक्तरंजित माहितीपट

‘फॉर समा’- आशावादाचा रक्तरंजित माहितीपट

‘समा’ म्हणजे आकाश. ‘फॉर समा’ हा छोट्या छोट्या कारणांनी निराश होणाऱ्या आपल्या आधुनिक समाजमनासाठी खूप मोठी शिकवण देऊन जातो. युद्धभूमीवर जगतांना मृत्यू अटळ आहे हे समजल्यावर क्षण क्षण जगणारी, मरणारी आणि लढणारी माणसं कायम लक्षात राहतात.

लता मंगेशकर यांचे निधन
लढवय्या पँथर
सार्वजनिक क्षेत्र, कार्यक्षमता व डाव्यांची युनियन वगैरे

प्रत्येक मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र आणि समान असल्यामुळे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचे आरोग्य, स्वातंत्र्य किंवा मालकी वस्तू हिरावून घेण्याचा नैतिक अधिकार नसतो.


१७ व्या शतकातील विचारवंत आणि उदारमतवादाचे जनक जॉन लॉक यांचा हा क्रांतिकारी विचार. क्रांतिकारकच म्हणावं लागेल कारण प्रत्येक व्यक्तीला धार्मिक आणि संपत्तीचं स्वातंत्र्य असायलाच हवं, हे त्यांनी प्रथमतः प्रतिपादित केलं. मानवाच्या नैसर्गिक अधिकाराचे ते पुरस्कर्ते. अमेरिकेच्या मूलभूत हक्कांच्या जाहीरनाम्यावर त्यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. पण जॉन लॉक पुढं जाऊन सांगतात की “स्वातंत्र्याच्या अंगभूत गुणांसोबतच मानवाचं स्वार्थी असणं हे सुद्धा नैसर्गिकचं आहे ,ज्यामुळं तो इतरांच्या स्वातंत्र्य आणि संपत्तीवर गदा आणतो’. याच स्वार्थातून हुकूमशहा निर्माण होतात आणि आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी ते सुंदर शहरं आणि संवेदनशील माणसं उध्वस्त करतात.

अलेप्पो हे सीरियातील असंच सुंदर शहर या दशकात बशर-अल-असाद नावाच्या हुकुमशहाच्या स्वार्थानं बेचिराख केलं. तिथल्या हजारो कोवळ्या जीवांचा बळी घेतला गेला आणि लाखो लोकांना बेघर करण्यात आलं. ‘फॉर समा’ (For Sama) या बाफ्ता पुरस्कार विजेत्या माहितीपटाची हिच पार्श्वभूमी आहे. पण हा माहितीपट फक्त तेवढ्यावर न थांबता मानवाच्या स्वातंत्र्य लालसेच्या परिणामांचा वेध घेतो आणि अनेक ठिकाणी अंतर्मुख होण्यास भाग पाडतो.

‘फॉर समा’ हा अरेबिक भाषेत असूनही इंग्रजीतील सबटायटल अत्यंत प्रभावी आहेत. पण हा डॉक्युड्रामा नसून पक्का माहितीपट आहे (Hard Core Documentary) तरीही हा माहितीपट एखाद्या चित्रपटाप्रमाणेच वाटतो. कारण चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे वाद-अल-कतीब (अभिनेत्री प्रमाणेच)आणि डॉ. हमझा अल कतीब(अभिनेत्या प्रमाणे), कारण आहे त्यांची मुलगी समा जी काही महिन्यांचीच आहे आणि उद्देश आहे जुलमी राजसत्तेचा पाडाव. फक्त इथं कुणीही अभिनय करत नाही सगळं खरं घडतंय. त्यामुळेच या चित्रपटातील मुलांचे, पालकांचे, आप्तांचे मृतदेह मन हादरवून टाकतात. या महितीपटाला चित्रपटाप्रमाणे तयार करण्याचं कौशल्य जातं ते दिग्दर्शक एडवर्ड वॅट्स आणि अर्थातच वाद-अल-कतीब हिला, कारण ही तिचीच कथा आहे, तिच्याच शब्दांत.

२०१० मध्ये थोड्याशा ट्युनिशियात सुरू झालेली अरब क्रांती २०११मध्ये सीरियात पोचली आणि अलेप्पो विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सीरियाचा जुलमी राष्ट्राध्यक्ष असाद विरुद्ध एल्गार पुकारला. अल्लेप्पो विद्यापीठातील विद्यार्थी शांततेच्या मार्गानं मोर्चे काढायला लागले. पण सरकारनं दडपशाही सुरू केली. तेव्हा काही फुटीरवाद्यांनी सशस्त्र लढा सुरू केला आणि पूर्व अलेप्पो सीरियन शासनापासून मुक्त केलं. त्यावेळी वाद-अल-कतीब ही याच विद्यापीठात शिकत होती आणि ‘चॅनेल 4’ या वाहिनीने तिला या यादवी युद्धाचं रिपोर्टिंग करण्याचं काम दिलं होतं. पुढं जाऊन शासनाने रशियाच्या मदतीनं पूर्व अलेप्पोवर विमानांतून बॉम्ब हल्ले सुरू केले. त्यामुळे मनुष्य आणि संपत्तीची हानी अधिकच वाढली.

अलेप्पो हे प्राचीन रेशीम व्यापाराच्या मार्गावरील (सिल्क रूट) महत्त्वाचं शहर. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील आणि सीरियातील सर्वात मोठं शहर. पण रशियन बॉम्ब हल्ल्यांमुळं अर्ध्यापेक्षा अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या वा खचल्या. ऐतिहासिक इमारतींनी नटलेलं हे शहर ४ वर्ष तेथील नागरिकांच्या रक्तात न्हालं आणि ‘आझादी’ मागणाऱ्या शहरावर मृत्यूची सावली पडली.

पण जॉन लॉक म्हणतात त्याप्रमाणे, “शासनाला सत्ता गाजवण्याची परवानगी नागरिक देत असतात. त्यामुळे त्यांच्या मताचा अनादर झाला तर, कधीतरी लोक भावनेचा उद्रेक होतोच.(Governing needs an accent from governed)’ पण या उद्रेकाला दडपण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातो, तेव्हा बहुतांश लोक पळ काढतात. पण याच लोकांतून काही मोजके लढवय्ये सुद्धा तयार होतात जे जुलमी शासनाला आव्हान देतात (The Challenger). ‘फॉर समा’ ही अशाच लढवय्या आणि निडर(?) लोकांची कहाणी आहे.
या यादवी युद्धादरम्यान वाद डॉ. हमझा अल कतीबला भेटते. त्यावेळी हमझाचं लग्न झालेलं असतं. पण त्याची बायको त्याला अलेप्पो सोडायला सांगते. त्यावेळी तिच्यासोबत न जाता हमझा जखमींची शुश्रूषा करण्यासाठी मागेच थांबतो. रशियन बॉम्ब हल्ल्यांत सगळं शहर जीव मुठीत घेऊन जगत असतं. आज कोणत्या इमारतीवर बॉम्ब पडला हीच फक्त बातमी असते आणि हमझा व इतर लोक लागलीच तिथं वैद्यकीय मदत पोचवण्यासाठी पळत राहतात. या माहितीपटात दाखविलेल्या मृतांमध्ये बालकांची संख्या अधिक आहे. प्रसंगी इमारतींचे काँक्रीट फोडून आत दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी संपूर्ण शहर शर्थीचे प्रयत्न करत असतं पण हाती फार काही लागत नाही. शहराचं स्मशान बनत राहतं आणि मासाचा, रक्ताचा वास शहरभर पसरत राहतो.

पण मनुष्यप्राण्याच्या आशावादाला आणि आसक्तीला काही तोड नाही. या अशा पार्श्वभूमीवर सुद्धा प्रेम आणि आनंद या मूलभूत गोष्टींचा आनंद अलेप्पोचे रहिवाशी घेतंच असतात. लहान मुलं बॉम्बहल्ल्यात मरत असतांना सुद्धा अनेक कुटुंब अलेप्पो सोडून जात नाहीत कारण त्यांच्या मते असं केल्यास मुलांना ‘स्वार्थासाठी लढाई सोडून जाणं चांगलं असतं’, असा संदेश जाईल.(It’s ok to be selfish). वाद सुद्धा हमझासोबत बाहेर एअर स्ट्राईक सुरू असतांनाच लग्न करते, पार्टी करते कारण तिच्या मते ‘त्या क्षणांपुरता तरी त्यांच्या जल्लोषाचा आवाज बॉम्ब हल्ल्यांच्या आवाजपेक्षा मोठा असतो’.

पुढं ती प्रेग्नंट राहते. ओसाड पडलेल्या शहरांतून एक राहण्यायोग्य घर ते निवडतात आणि त्यांचं रोमँटिक आयुष्य सुरू होतं जे काही दिवसच टिकतं. जेव्हा वाद, समाला जन्म देते तेव्हा तिला गहिवरून येतं. ती म्हणते, “तुला पाहून मला मेलेल्यांची आठवण येते. तू आमची आशा आहेस.’ हमझा सुद्धा नवनवी झाडं लावतो पण तेव्हा तोही म्हणतो, “आपण बीज टाकतो, पाणी घालतो, रोपं वाढवतो, एक दिवस बॉम्ब हल्ल्यांत मरण्यासाठी. मी आशा करतो यातली काही रोपं तरी जिवंत राहतील.’ (जिंदगीके दो पलोंमेसें एक उमर चुराणी हैं…एक प्यार का नगमा हैं.. हे गाणं मनात कुठंतरी घुटमळत राहतं)आणि खरंच ही खुशी काही क्षणांचीच असते.

फेब्रुवारी २०१६ नंतर हवाई हल्ले अधिक तीव्र होतात, मृतांची संख्या वाढत राहते आणि वाद कुटुंब आता पूर्णवेळ हॉस्पिटलमध्येच राहायला लागतं. या काळात आपल्या २-३ महिन्याच्या पोरीला खोलीत सोडून हमझा रुग्णांची शुश्रूषा करत असतो तर वाद शूटिंगमधून डॉक्युमेंटेशन करत असते. हा काळ वादसाठी मानसिकदृष्ट्या कठीण असतो. एका आईला मेलेली पाहून ती म्हणते, “मला या बाईची असूया वाटते, निदान तिला आपल्या अपत्यांचं मरण तरी पाहावं लागलं नाही.. समा, मी तुला या जगात आणून काही चूक तर केली नाही ना??’… या हल्ल्यांच्या निशाणावर अधिकतर रुग्णालये असतात कारण अशी रुग्णालये नष्ट करून उठावकऱ्यांच्या धैर्याचं खच्चीकरण करता येतं. त्यामुळेच पूर्व अल्लेप्पोमधील ९ पैकी ८ रुग्णालये बॉम्ब हल्ल्यात उध्वस्त केली जातात. त्यात वादचे कुटुंब वाचते….

तरीही ‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा’, हे मानवी स्वभावाचं वैशिष्ट्यच. वाद समाला म्हणते, “मी तुला तुझ्या जन्मापासून काहीच चांगलं दाखवलं नाही, चल आज विमानांची भीती न बाळगता शहरात फिरुया, जिवंत माणसं पाहूया’. या वाक्यातून मनुष्यहानी किती भयानक झाली असेल याची कल्पना येत राहते. हमझा लगेच दुसऱ्या एका इमारतीत पुन्हा हॉस्पिटल सुरू करतो. पूर्व अलेप्पोमधील हे एकमेव हॉस्पिटल असतं. पण २० दिवसांतच ते सुद्धा नेस्तनाबूत केलं जातं आणि आपल्या हक्काच्या शहरात स्वतंत्र राहण्यासाठी लढत असलेल्या या लढवय्यांना शेवटी शहरासोबत देशसुद्धा सोडावा लागतो. या २० दिवसांत ६ हजार रुग्ण इथं येतात आणि ८९० शस्त्रक्रिया केल्या जातात. आपली निरंकुश सत्ता कायम ठेवण्यासाठी बशर अल असादनं नागरिकांच्या सर्व मानवी अधिकारांची पायमल्ली केलेली दिसते. युद्धकाळात वैद्यकीय सेवांसारख्या गोष्टींवर हल्ले न करण्याचे आंतरराष्ट्रीय नियम असताना सुद्धा ते कुठंही पाळलेले दिसत नाही. उलट क्लोरीन हल्ला करून नागरिकांच्या श्वास घेण्याच्या अधिकाराला सुद्धा संपवण्यात येतं. सत्तेसाठी मानवी स्वभाव किती राक्षसी बनू शकतो हे यानिमित्ताने दर्शकासमोर येत राहतं.

‘समा’ म्हणजे आकाश. वादला हवं असलेलं विमानाशिवायचं आकाश. यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर मनुष्याचा आशावाद जिवंत ठेवणारं, माणसाला लढायला भाग पडणारं, एकाचवेळी अमर्याद आसक्ती आणि अनासक्तीचं आकाश. पालक आपल्या मुलांसाठी काय ठेऊन जातात?? जमीन, जुमला आणि राहिलेच तर संस्कार. पण वाद तिच्या मुलीसाठी एक लढा ठेवून जाऊ इच्छिते. एक असा लढा जो जनतेला लुबाडणाऱ्या अमानुष सत्तेविरोधात आहे, जो मानवी हक्कांसाठी आहे, स्वातंत्र्यासाठी आहे. यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर वादने समाला जन्म का दिला? असा प्रश्न जर समाला पडला तर उत्तर असलं पाहिजे. तिचे आईवडील, आप्त, आणि एका शहरांनं केलेली क्रांती तिला समजली पाहिजे, या कळवळीतून ‘फॉर समा’ हा माहितीपट जन्मास आला.

समा मोठी होऊन हे समजेलचं कारण युद्धभूमीवर जन्मलेली मुलं ही त्या शहराची संरक्षक असतात आणि जिथं असतील तिथं ती लढाई जिवंत ठेवतात असं मानलं जातं. पण ‘फॉर समा’ हा छोट्या छोट्या कारणांनी निराश होणाऱ्या आपल्या आधुनिक समाजमनासाठी खूप मोठी शिकवण देऊन जातो. युद्धभूमीवर जगतांना मृत्यू अटळ आहे हे समजल्यावर क्षण क्षण जगणारी, मरणारी आणि लढणारी माणसं कायम लक्षात राहतात. तरीही आपण मनुष्य किती स्वार्थी आहोत हेही प्रकर्षानं जाणवत राहतं. वादचं सीरियामधील मानवी अधिकारांच्या पायमल्लीबद्दलचं रिपोर्टिंग  जगानं पाहिलं, तिचं कौतुक केलं. पण व्यक्तिगत राजकारणामुळं कुणीही सीरियाच्या लोकांसाठी धावून आलं नाही. उलट स्वार्थी राजकारणापायी मुंग्यांप्रमाणे माणसं मारली गेली. आणि आपण टीव्ही समोर बसून ‘चाय पे चर्चा’ करत राहिलो. त्यामुळेच सीरियातील यादवी युद्धात ४ लाखांवर लोक मारले गेले आणि कांगो नंतरचं २१व्या शतकातील हे दुसरे महासंहारक युद्ध ठरलं .

‘फॉर समा’ या माहितीपटानं ऑस्कर नामांकनासोबतच ‘बाफ्ता’चे चार नामांकन मिळून सारेच रेकॉर्ड तोडले. तरीही ‘फॉर समा’ पाहणं माझ्यासाठी चांगला अनुभव नव्हता. प्रेतांची डॉक्युमेंटरी पाहायला कुणाला आवडेल? इवल्याशा निरागस मुलांची प्रेतं असो वा मृतप्राय गर्भवतीच्या पोटातून पोराला जिवंत काढणं असो, इमारतींत फसलेली वा रक्ताच्या धारांत दवाखान्यात येऊन धडकणारी माणसं असो, सर्वच काही निराशाजनक. तरीही यातील मानवी मनाचा आशावाद थक्क करणारा आहे. ही डॉक्युमेंटरी नक्की पाहावी; मोठं झाल्यावर आर्किटेक्ट बनून अलेप्पो पूर्ववत करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलांसाठी, बॉम्बने नष्ट केलेल्या परिवहन बसला रंगवणाऱ्या बालकांसाठी, बाहेर बाँब हल्ले सुरू असताना काळोखात समाला हसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापासाठी आणि अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या मानवी मनासाठी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0