मुंबई : देशातील अग्रणी आयटी कंपनी इन्फोसिसच्या कंपनी ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगवण्यात आल्याची तक्रार कंपनीतल्याच काही कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाला
मुंबई : देशातील अग्रणी आयटी कंपनी इन्फोसिसच्या कंपनी ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगवण्यात आल्याची तक्रार कंपनीतल्याच काही कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाला व यूएस सिक्युरिटिज अँड एक्स्चेंज कमिशनला केल्याचे वृत्त उघडकीस आल्याने मंगळवारी त्याचे पडसाद शेअर बाजारात दिसून आले. या पत्राच्या वृत्ताने इन्फोसिसच्या शेअरची १५ टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने कंपनीला ४४ हजार कोटी रु.हून अधिक रकमेचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. कंपनीची गेल्या ६ वर्षांतील ही घसरण आहे.
गेल्या आठवड्यात इन्फोसिसचा शेअर ७६७.७५ रुपये इतका होता त्याचे मंगळवारी सकाळी मूल्य ६४५ रु.वर आले. नंतर दुपारी १२ च्या सुमारास हा शेअर ६५५.५० रु.वर जाऊन स्थिरावला.
इन्फोसिसने गेल्या आठवड्यात आपले तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर केले होते. पण या निष्कर्षातील आकडे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख व सीएफओ नीलंजन रॉय यांनी फुगवून सांगितल्याचे चार पानांचे पत्र कंपनी संचालक मंडळाला रविवारी मिळाले. या पत्रावर कोणाचेही नाव लिहिण्यात आले नाही. पण आपण केलेल्या आरोपांचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा तक्रारकर्त्यांचा आहे.
दरम्यान सोमवारी कंपनीने एक प्रसिद्ध पत्र जाहीर केले असून कंपनी संचालक मंडळाकडे केलेल्या तक्रारीची चौकशी लेखापरिक्षण खात्याकडे पाठवल्याचे म्हटले आहे. लेखा परीक्षण खात्याने या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनीकडे हे प्रकरण सोपवले आहे.
कंपनीचे संचालक नंदन नीलकेणी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली असून २० सप्टेंबर व ३० सप्टेंबरला अशाच निनावी दोन पत्र संचालक मंडळाला आलेली होती. या पत्रांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले होते, असे नीलकेणी यांनी सांगितले. सलील पारेख यांच्या अमेरिका व मुंबईतील वाढत्या विमान फेऱ्या हा मुद्दाही तक्रारदारांनी मांडला आहे.
मूळ बातमी
COMMENTS