हातातलं कांकण न पाहता शेजारी दाखवत असलेल्या आरश्यात पहात स्वतःविषयीची कल्पना करणे, हीच रास्व संघाची मूलभूत विचारधारा आहे. आणि हेच विजयादशमीच्या आपल्या भाषणानं सरसंघचालक श्री. रा. रा. मोहन भागवतांनी पुन्हा एकदा ठासून मांडलं आहे.
Lynch: a group of people killing someone for an alleged offence without a legal trial
मराठी भाषांतर: लोकांच्या झुंडीने एखाद्यावर गुन्ह्याचा आरोप करून कायदेशीर खटला न चालवता ठार करणे (ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरी)
“झुंड हा अनेक हातांचा बिनडोक पशु असतो” – अमेरिकेचे एक संस्थापक बेंजामिन फ्रॅंकलिन
हातातलं कांकण न पाहता शेजारी दाखवत असलेल्या आरश्यात पहात स्वतःविषयीची कल्पना करणे, हीच रास्व संघाची मूलभूत विचारधारा आहे. आणि हेच विजयादशमीच्या आपल्या भाषणानं सरसंघचालक श्री. रा. रा. मोहन भागवतांनी पुन्हा एकदा ठासून मांडलं आहे. या भाषणात त्यांनी ‘लिंचिंग’ या शब्दाविषयी आणि त्यामागील संकल्पनेविषयी तो विदेशी असल्यानं या गोष्टी आपल्या परंपरेतील नाहीत असा युक्तिवाद केला. तो शब्द इंग्रजी आहे. त्यामुळे तो भारतीय भाषांच्या परंपरातील नाही हे सांगायला विजयादशमीचा मुहूर्त निवडायची काय गरज आहे? खरे तर विदेशी गोष्टी आपल्याला मान्य नाहीत, असा भागवतांचा अजिबात दावा नाही. त्या आपण आपल्या ताकदीवर आत्मसात केल्या पाहिजेत, इतकंच त्यांचं सांगणं आहे. हिंसा हे अस्सल भारतीय मूल्य आहे, याविषयी त्यांच्या मनात बिलकूल संदेह नाही. ते ठसवण्यासाठीच दसऱ्याला रास्व संघ ही ‘सांस्कृतिक’ संघटना शस्त्रपूजा करते.
आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी संस्कृतीचा आशय आत्मिक उन्नतीशी जोडलेला असतो. पण रास्व संघासाठी संस्कृती ही मुळात राजकीय हेतू साध्य करण्यासाठी असते. भारतीय परंपरेत सर्वच लोक शस्त्र बाळगण्यात गर्व मानतात असे नाही. किंबहुना सर्वच लोकांनी शस्त्र बाळगू नये, असं स्वीकारणं हा हे सांस्कृतिक प्रगल्भपाणाचं लक्षण आहे. ती जबाबदारी पोलीस, लष्कर आदी विशिष्ट व्यावसायिक संस्थांना बहाल केलेली असते. पण रास्व संघाला लष्करी विकृतीचं कोण आकर्षण! म्हणून स्वयंसेवक, वेगवेगळ्या देवांच्या नावानं चालणाऱ्या सेना आणि दलांचे शिपाई तथाकथित नैतिक पोलीसगिरी करत सामान्य लोकांवर दहशत बसवत फिरत असतात.
आपण फारच बदनाम होऊ लागल्याचं पहाताच सरसंघचालकांनी ‘आम्ही त्या गावचे नाहीच’, असा पवित्रा घेतला व ते लिंचिंग या शब्दावर घसरले. त्यांनी लिंचिंगला विदेशी ठरवून त्याविषयी विश्वामित्री पवित्रा घेतला. संघाच्या हातात त्याच्या जन्मापासून बांधलेलं हिंसेचं काकण पहायचंच नाही, असा त्यांनी पण केल्यानं त्यांना अस्सल स्वदेशी, स्वधर्मी लिंचिंग दिसत नाही. अनेकांनी त्यांना त्या निर्घृण घटनांचं स्मरण करून दिलं आहे.
लोकायतिक असोत की बौद्ध, त्यांचं शिरकाण कुणा यवनांनी नव्हे तर भागवतांच्या सनातन धर्माचा ठेका घेतलेल्यांनीच केलं होतं. ज्यांचं चित्र विकृत करण्यात यांची हयात गेली त्या विवेकानंदांनीच शंकराचार्यांच्या अनुयायांनी कितीक बौद्ध श्रमणांना जाळून मारलं, याची आपल्याला याद करून दिली आहे. जातीभेदाचं उच्चाटन करू पहाणाऱ्या लिंगायतांना नष्ट करायला काही कुठले ख्रिश्चनधर्मीय शस्त्रे उगारून त्यांच्यावर धावून गेले नाहीत. आपल्या महानुभावांचा छळही कुणा भारताबाहेर पुण्यभू असलेल्यांनी केला नाही. आजवर सनातन धर्माभिमान्यांनी किती पूर्वास्पृश्यांची कत्तल केली, याची संघाच्या कुख्यालयात नोंद असल्यास त्याचा भागवतांनी अभ्यास करण्याची गरज आहे. आणि ज्या धर्माचा ते गर्व असल्याचं सांगतात त्या सनातन धर्मानं सती या लिंचिंगच्या पद्धतीला एका पुण्यप्रथेचा दर्जा बहाल करून देत त्यांची देवालयं उभी केली आहेत. तेव्हा लिंचिंग ही भागवतांचीदेखील अस्सल भारतीय हिंदु परंपरा अाहे. आणि तिला अाता राजकीय साज चढवला जात आहे. दिल्लीत शिखांचं लिंचिंग झालं; खैरलांजीत दलित मायलेकरांचं झालं; अहमदाबाद – मुंबईत मुसलमानांचं झालं आणि उत्तर प्रदेशात माणसांसोबतच बाबरी मशिदीचंही झालं. तेव्हा ही परंपरा आपली अाहे, जशी ती ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म मानणाऱ्या समाजांचीही आहे.
इतिहासात लिंचिंग बहुधा धर्माच्या नावानंच होत आलं आहे. आज म्यानमारमध्ये तेथील बौद्धधर्मीयदेखील इस्लामी रोहिंग्यांचं लिंचिंग करत आहेत. आपण त्याला सनातन प्रथा मानत अाल्यानं त्यासाठी वेगळा शब्द नव्हता. पण आता तो शब्द रास्व संघाच्या राजाश्रयाखाली भक्तांनी आपल्या कृतीनं रूढ केला आहे. त्याला ‘झुंडबळी’ हे नाव पडलं आहे.
प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग द्यायच्या अट्टाहासामुळे भागवतांनी लिंचिंग शब्दाचं मूळ बायबलमध्ये शोधून जणू झुंडबळीला बायबलची मान्यता असल्याचा आभास निर्माण केला. वस्तुतः या घडामोडीविषयी एक अतिशय मानुष, नैतिक दृष्टी येशू ख्रिस्तानं दिली आहे. ज्यांनी आपल्या आख्ख्या आयुष्यात एकही पाप केलेले नाही त्यांनाच फक्त समाजाने पापीण ठरवलेल्या स्त्रीला दगड मारता येइल असे त्याने बजावले व त्या दुर्दैवी स्त्रीचा जीव त्याने वाचविला. ती नैतिक दृष्टी स्वीकारून भागवतांनी पुण्यात मोहसिन शेखचा, राजस्तानात पेहलू खानचा, हरयाणात जुनेदचा, उत्तर प्रदेशात महंमद अखलाख, सुबोध सिंग, झारखंडमधील तबरेज अन्सारी यांचा झुंडबळी घेणाऱ्यांविषयी आणि झुंडनरपशूंचा सत्कार करणाऱ्या हार्वर्डशिक्षित जयंत सिन्हा या केंद्रीय मंत्र्यांचा खरपूस समाचार घ्यायला हवा होता. पण त्यांना हा प्रश्न नैतिकतेचा वाटत नसून हे खुनी लोक त्यांना त्यांच्या कल्पनेतील राष्ट्रवादाचे योद्धे वाटतात हे उघड आहे.
संविधानावर चालणारा कायदा रास्व संघाला फारसा प्रिय नाही, हे अापल्याला चांगलं ठाऊक आहे. भाजपच्या मुख्यमंत्री कल्याणसिंगांनी उच्च न्यायालयाची जाणूनबुजून फसवणूक केली, तेव्हा काही त्यांना राजधर्माची आठवण तत्कालीन सरसंघचालकांनी करून दिली नाही. मोदींनी वाजपेयींचा राजधर्म पाळण्याचा सल्ला कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिल्याची बक्षिसी म्हणून त्यांना पंतप्रधानपद देण्यात आलं. त्यामुळे कायद्याची, नीतीमूल्याची पायमल्ली करत केलेल्या देहदंडाला संघानं दिलेलं नाव आहे: वध. श्रीरामानं शंबुकाचा वध केला होता. त्यानं वालीचाही वधच केला होता. वामनानं बळीराजाला पाताळात गाडून त्याचाही वध केला होता. दाभोलकर-पानसरेंचाही वध केल्याची फुशारकी सनातन साधक करत असतात. आणि त्यांच्या मते गांधीजींचाही वधच करण्यात अाला होता. ते जाहीरपणे म्हणायचं त्यांचं धाडस होत नाही, इतकंच.
वस्तुतः लिंचिंग हा शब्द बायबलमध्ये नाहीच. तो झुंडबळी या अर्थानं रूढ झाला अमेरिकेत १७८० च्या सुमारास. झुंडीनं न्यायनिवाडा करण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या विल्यम लिंचच्या नावे तिथं ‘लिंच कायदा’ झाला होता. तेव्हापासून झुंडशाहीनं बळी घेण्याच्या प्रकारांना हे नाव रूढ झालं. लिंचिंग हे नेहमीच बहुसंख्याक करत आले आहेत. अमेरिकेत कृष्णवंशियांना लक्ष्य करण्यात आलं, येत असतं. भारतातही बहुसंख्याक हिंदु समाजाच्या, हिंदु प्रतिकांच्या नावानं अल्पसंख्य, दलितांना झुंडशाहीचं लक्ष्य केलं जात आहे. या गर्हणीय प्रकाराचा आपल्या स्यूडो राष्ट्रवादाला बळ देण्यासाठी भागवतांनी त्याची नाळ बायबलशी जोडली. शब्दांचं विदेशी मूळ शोधायच्या प्रयत्नात आपल्या धर्माच्या नावाचं मूळही विदेशी आहे, हे त्यांच्या स्मरणातून बेमालुम आणि सोयीस्करपणे गायब झालं. ‘हिंदु’ आपल्या धर्माला दिलेलं नाव स्वतः वैदिकांनी ठेवलेलं नाहीच. ते ठेवलं आहे इराणी भाषकांनी. स्वदेशी परंपरांचा अभिमानच असेल तर त्यांनी स्वतःला सनातनी म्हणवून घ्यावं. या ठिकाणी बेंजामिन फ्रॅंकलिनचं दुसरं विधान चपखल बसतं. तो म्हणाला होता, “आपण सारेच जन्मतः अडाणी असतो, पण अडाणीपणा कायम ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.” त्यासाठी तर रास्व संघाला वार्षिक बौद्धिकं आयोजित करावी लागतात.
या वार्षिक बौध्दिकात मोदी-शहांच्या राजवटीला बौद्धिक मार्गदर्शन करणाऱ्या सरसंघचालकांनी देशातील शेतकऱ्यांची दारूण अवस्था, शेतीमालाची होत असलेली दुरवस्था, बंद पडत असलेले कारखाने, वाढत असलेली बेरोजगारी, वरचेवर दिशाहीन होत असलेला तरूणवर्ग, बंद पडत असलेल्या बॅंका, राज्यकर्त्या पक्षांचे नेते मायबहिणींचे करत असलेले लैंगिक शोषण याविषयी काही मोलाचे शब्द सांगणं अपेक्षित होतं. पण त्याविषयी चकार शब्दही न बोलता त्यांनी भलामण केली केंद्र सरकार करत असलेल्या भांडवलदारांच्या लांगूलचालनाची. आर्थिक वाढीचा शून्य दर म्हणजे मंदी असा अचाट अर्थशास्त्रीय शोध लावत त्यांनी देशाला आर्थिक मंदीत ढकलणाऱ्या मोदी सरकारच्या सुमार कामगिरीवर पांघरूण घालण्याचा करूण प्रयत्न केला.
आर्थिक प्रगतीच्या खात्यावर उणे मार्क पडल्यानं त्यांचा सारा भर होता, मोदी-शहांच्या राजवटीचं लष्करी बळ वाढवण्यावर. जनतेला भेडासवणाऱ्या इतक्या तीव्र समस्यांकडे दुर्लक्ष करत त्यांनी भलामण केली दडपशाहीच्या यंत्रणेची. म्हणून तर त्यांनी काश्मीरच्या जनतेवर लादलेल्या जुलुमशाहीचं कौतुक केलं. सरकारच्या जुलुमशाहीकडे बोट दाखवणाऱ्यांना राष्ट्रविरोधी, राष्ट्राच्या प्रगतीतील अडथळा असल्याचं तर त्यांनी सांगितलंच. इतकंच नव्हे तर ते परकीयांच्या तालावर नाचत असल्याचा हास्यास्पद आरोपही त्यांनी केला. देशातील सत्ताधारी अडचणीच्या प्रसंगी नेहमीच बाह्यशक्तींकडे बोट दाखवत आले आहेत. पण आजवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न झाला नव्हता. या प्रयत्नांना तथाकथित ‘वैचारिक’ बळ देण्याचा प्रयत्न भागवतांनी केला आहे. आपल्या स्यूडो राष्ट्रवादाची धार वाढवण्यासाठी विदेशातून राफेलसारखी शस्त्रास्त्रं आणि एफडीआय या शब्दासकट येणारं विदेशी भांडवल यांना पायघड्या घालण्यासाठी ते तत्पर आहेत. प्रश्न स्वदेशी-विदेशीचा नाही. रास्व संघाच्या राजकारणाला काय फायदेशीर आहे, याचा आहे. संघाच्या अधिपत्याखालील भाजपप्रणित मोदी-शहांची राजवट कोणत्या वळणानं जाणार आहे, याच्या सावल्या भागवतांच्या भाषणातून अधिक गडद झाल्याचं दिसून येतं. झुंडींनी केलेल्या, सनातन धर्माच्या नावानं केलेल्या हत्यांचा साधा निषेधही त्यांनी केलेला नाही. कायद्यानं ते प्रश्न सोडवावेत असा संभावित सल्ला देत असताना कायदाचे पायच कापत पेहलू खान, तबरेज अन्सारी, मोहंमद अखलाख, सुबोध सिंग, इसरत जहॉं यांना न्याय मिळणार नाही याची होत असलेली तजवीज त्यांनी मानभावीपणे दुर्लक्षली आहे.
मानवता आणि धर्माची राजवट यांच्यात मुळातच वितुष्ट असतं. एका धर्माची राजवट असल्यास दुसऱ्या धर्माचे लोक आपोआप दुय्यम नागरिक ठरतात. समाजात धर्म असले तरी राष्ट्र एका धर्माचं असायला सर्वच आधुनिक विचारवंतांनी विरोध केला आहे. जगात सर्वात श्रेष्ठ रामभक्त असलेल्या म. गांधींनीही धर्माच्या नावानं राष्ट्र निर्माण करायच्या प्रयत्नांना प्राण पणाला लावून विरोद केला होता. आणि म्हणूनच नथुरामानं बापूजींचा त्यांच्या भाषेतला ‘वध’ केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी दरवर्षी वैयक्तिक चारीधाम यात्रा करायला कुणाचाच विरोध असायचं कारण नाही. पण त्यांना हा देश हिंदुराष्ट्र ठरवता येणार नाही. म्हणून लोक धर्माच्या पलिकडे पहात असतात. आपल्या सामाजिक जीवनात धर्म आडवा येऊ नये, यासाठी सजग असतात. भारताला स्वातंत्र्य मिळवत असताना हे पथ्य त्यांनी कटाक्षानं पाळलं. हे वास्तव दस्तुरखुद्द मोहन भागवत चांगलंच जाणून आहेत. म्हणून त्यांनी पुन्हा शब्दाचा अर्थ बदलण्याचा खेळ करून भारतियांना चकवण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्व धर्मियांनी मानवधर्म श्रेष्ठ मानला पाहिजे, ही नव्या युगातील माणसाची आस आहे. त्याबाबतही शब्दांचा खेळ करत ‘हिंदुधर्म हाच मानवधर्म’ असल्याची आवई त्यांनी उठवली आहे. मानवाला, मानवतेला आजवर सर्वच धर्मांनी बंदी करून ठेवलं आहे. हिंदु धर्म हाच केवळ मानव धर्म ठरवल्यास बाकीचे धर्म दानव धर्म ठरवणं सोपं जातं. हाच तर झुंडबळींचा वैचारिक आधार आहे. सर्व हिंदूंनी आपल्याला या विषाची बाधा होणार नाही, यासाठी जागरूक राहिलं पाहिजे. केशवसुतांनी वेगळ्या संदर्भात दिलेला इशारा ध्यानात ठेवला पाहिजे. सावध, ऐका पुढल्या हाका.
COMMENTS