‘लोकसत्ता’च्या संपादकांवर संमेलनात शाईफेक

‘लोकसत्ता’च्या संपादकांवर संमेलनात शाईफेक

मुंबईः नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अखेरच्या दिवशी रविवारी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला

“…..चे तत्त्वज्ञान”
ट्रम्प अहमदाबाद भेट : ४५ कुटुंबांना झोपड्या खाली करण्याचे आदेश
मोदींनी खिल्ली उडवलेली मनरेगा आता कामी आली

मुंबईः नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अखेरच्या दिवशी रविवारी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छ. संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल आमच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली असे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या सतीश काळे व राजेश बुंदला या दोघांना ताब्यात घेतले असून ते दोघेही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचे माहिती लोकसत्ता व एबीपी माझाने दिली आहे.

गिरीश कुबेर संमेलन स्थळी येत होते. त्यांना पोलिसांचा बंदोबस्त असतानाही त्यांच्यावर शाईहल्ला करण्यात आला. हा हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कुबेर यांना सुरक्षितपणे सभागृहात पोहोचवण्यात आले. नंतर त्यांचे भाषण झाले.

कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकाराचा समाजाच्या सर्वच थरातून निषेध व्यक्त होऊ लागला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्वीकारले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने एखादी गोष्ट लिहिली तर त्या लेखकावर व्यक्तिगत हल्ला करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आम्ही त्याचा पुरस्कार कधीही करणार नाही. ही घटना नींदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. विशेषतः तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावाने ज्या परिसरामध्ये साहित्य संमेलनाचा सोहळा इतक्या उत्साहाने आणि उत्तम रीतीने सुरू आहे, अशा परिसराजवळ हा प्रकार घडला. कुठेही घडणं चुकीचं आहे. पण इथे घडणं आणखी चुकीचं आहे.”

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, “आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध करतो. गिरीश कुबेर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, लोकसत्तासारख्या दैनिकाचे संपादक आहेत. त्यांनी जे काही लिखाण केलं असेल किंवा करत आहेत त्यावर मतभेद असू शकतात. पण मुळात त्यांनी काय लिहिलंय, हे किती लोकांनी वाचलंय? न वाचता अशा पद्धतीने मराठी साहित्य संमेलन सुरू असताना त्यांच्यावर अशा प्रकारे शाईफेक करणं हे कुणालाही मान्य होणार नाही. ”

(छायाचित्र – लोकसत्ता साभार )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0