इस्लाम ज्ञात आणि अज्ञात  – अब्दुल कादर मुकदम

इस्लाम ज्ञात आणि अज्ञात – अब्दुल कादर मुकदम

प्रस्तावना - संजीवनी खेर आपल्याला इस्लाम म्हणजे नखशिखांत बुरखा, चार बायका, तोंडी तलाक, कुटुंबनियोजनाला विरोध इत्यादी स्त्रीविरोधी चित्र दिसते. मूळ धर्मातही ते तसेच आहे असे वाटते. खरंच कुराणात असे आदेश असतील? याचा विचार आपण करीत नाही. किंवा या प्रश्नांची उकल करणारे ग्रंथ वा माहिती आपल्यापर्यंत येत नाही. त्यामुळे समाजातले गैरसमज वाढत जातात. आज या साऱ्यांची उत्तरं ‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञात’ या अब्दुल कादर मुकादम लिखित पुस्तकाच्या रुपाने आपल्या समोर आली आहेत.

आशांसाठी दाही दिशा…
‘इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग’
कापुस्किनस्की यांचं नवं पुस्तक

आजच्या काळातच नव्हे तर नेहमीच अशा पुस्तकाची गरज होती. केवळ इस्लामबद्दलचे गैरसमज दूर करायला नाही तर इस्लाम समजून घ्यायला या पुस्तकाचा फार मोठा हातभार लागणार आहे. ज्यांनी या धर्माबद्दल बरी वाईट अशी काहीही मतं तयार केलेली नाहीत अशांनी त्या पूर्वी हे पुस्तक वाचणे अत्यावश्यक आहे. या पुस्तकातील विचार समजून घेण्याअगोदर वाचकाला आकर्षित करते ती लेखकाची मराठी भाषेवरील हुकूमत आणि त्याचा वापर.

श्लोक, अध्याय असे शब्द वापरून त्यांनी भिन्‍नधर्मी वाचक आणि मुस्लिम लेखक यांच्यातील अंतर केले आहे. त्यामुळे शब्दाशब्दाला न अडखळता आपण सरळ वाचत जातो. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी तत्वज्ञान आणि इतिहास यांचे सुलभीकरण केलंय. पण संज्ञा समजावून सांगतांना त्यांचा आविर्भाव हा समोरच्याला यातले कळत नाही, संकल्पना फार अवघड आहेत बाबा, असे न वाटता सुरस भाषेत मध्यपूर्वेतील लोक, संस्कृती यांचा परिचय करून दिला आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचक पुढे जात राहतो मध्येच सोडून देत नाही ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे.

खरं सांगते, पुस्तक वाचल्यावर खेद वाटला नि प्रश्न पडला की इतक्या उदात्त विचारांबाबत जी प्रतिमा नि सत्याची गफलत आहे त्याला आपण सर्वच जबाबदार आहोत की काय? आपणही फारसे जाणून न घेता या धर्मातील विचार, आचाराबद्दल समजूत करून घेतो की मूळ विचारातच कट्टरता आहे. पण जसजसे वाचक वाचत जातो, लेखक त्याला आपल्या विश्वासात घेत त्याच्या धर्मातील रूढींची वाढत गेलेली गुंतागुंत स्पष्ट करतो.

जसं हिंदू म्हटला की एकेकाळी सतीची चाल, विधवांचे केशवपन नि घुसमट समोर यायची पण प्रबोधन काळातील धार्मिक सुधारणांनी या समाजाने कात टाकली. आधुनिकता म्हणजे स्वैर वागणे नव्हे तर नीतीमानता होय. हे समाजाला पटवू न देणारे लोक आतूनच तयार व्हावे लागतात. त्या त्या धर्मावर आलेली रूढींची गच्च काजळी, जी मुठभरांच्या हितसंबंधांना जपते, ती स्वच्छ करणे अत्यावश्यक ठरते. या गोष्टी खरं तर त्या त्या समाजाने स्वत:च कायद्याचा आधार घेत करायला हव्यात.

मुकादमांनी इस्लामचा उदय ज्या भूमीवर झाला त्याची पार्श्वभूमी देतांना तेथील इस्लाम पूर्व विविध टोळ्यांतील रक्‍तरंजित संघर्ष, धर्माच्या नावाखाली सामान्यांच्या जगण्यावर आवळलेले रीतीरिवाजांचे पाश, गरीब श्रीमंतांतील भयावह दरी, त्यामुळ होत गेलेला अन्याय याचे एक वास्तव चित्र उभे केले आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर गरीबांना, स्त्रियांना न्याय देणाऱ्या विचारांचा जन्म झाला. मूळ इस्लामची तत्वे पाहिली की जाणवते की की मुळातला विचार न्याय्य आचारविचारावर बेतलेला होता. नंतरच्या काळात धर्ममार्तंडांनी आपल्या सत्तेसाठी त्याची किती मोडतोड केली याचे विदारक वर्णन लेखकाने केले आहे. आजतर हा धर्म म्हणजे केवळ वृत्तीतील कट्टरता नि स्त्रियांवर अन्याय असाच समज सर्वत्र पसरलेला आहे. त्याला त्या धर्मात आलेले गोठलेपण, सुधारणावादी आणि काळाप्रमाणे बदलाचे वारे न पचवलेले लोक कारणीभूत आहेत. धर्माच्या नावाने निरपराधांच्या हत्येची कृत्यं करणारे उच्च शिक्षित (?) तरुण कसे निपजतात? हे न उलगडणारे कोडे बनून राहिले आहे. या धर्माच्या शिकवणीतच असे काही तरी असले पाहिजे, असा समज अपुऱ्या माहितीतून नि सोयीस्कर गैरसमजातून सर्वांनीच करून घेतला आहे.

सारे दहशतवादी मुस्लिम असतात पण सारे मुस्लिम दहशतवादी नसतात हे सत्य आज ध्यानात ठेवणे गरजेचं आहे. द्वेषाच्या, धर्मांधांच्या, गैरसमजाच्या काळात आपल्यासारख्या हजारं वर्षांच्या संमिश्र सहजीवन जगणाऱ्या संस्कृतीचे तलम वस्त्र विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वच धर्मातील कट्टरतावाद्यांनी इतरांचा धर्म, त्याची तत्वं थोडी समजून घेतली पाहिजेत. कदाचित त्यांच्या विचारांत बदल होईल. ज्या लोकांनी आपली मते बनवलेली नाहीत वा ज्यांना जिज्ञासा आहे, मन खुले आहे त्यांना हे पुस्तक नक्‍कीच मार्गदर्शन करील.

हजरत पैगंबरांच्या जमान्यात सातव्या शतकात, अरबस्थानातील लोकांची काय स्थिती होती? हे जाणून घेतले आणि त्यांनी जे क्रांतीकारक बदल घडवून आणले ते पाहिले की त्यांच्या द्रष्टपणाची दाद द्यावीशी वाटते. त्यांच्या काळात गरीब श्रीमंतातील दरी कमालीची वाढलेली होती. टोळ्यांच्या राजकारणात तर्काला विवेकाला स्थान नव्हते. श्रीमंतांना व्यापारासाठी कमी दरात मजूर हवेच असत. ऐशोआराम हे बड्यांचे जीवन तर दारिद्ऱ्यात पोटभर अन्न न मिळणं गरीबाचे नशीब झाले होते. एखाद्याच्या चुकीसाठी अख्ख्या कबिल्याला जबाबदार धरले जाई. न्याय्य समाजाची निर्मिती आणि त्यातून गरीबाला, शक्‍तीहीनाला न्याय हा हजरत पैगंबरांचा (जन्म ६१०) उद्देश होता. साहजिकच ज्यांचे हितसंबंध त्यामुळे दुखावले गेले होते, त्यांचा विरोध या विचारांना होता. परंतु ठोस अध्यात्म आणि क्रांतीकारक विचारसरणीला आरंभिक संघर्षानंतर हळूहळू मान्यता मिळत गेली. न्याय हा त्यांच्या आध्यात्मिक दर्शनाचा गाभा होता. कुराण, हदीस, इज्मा, कयास ही या न्यायशास्त्राची चार साधनं होती. त्यातील कुराण हे परमेश्वरी शब्द आणि हदीस ही पैगंबरांची वचनांचे संकलन असल्याने विद्वानांनी आणि सामान्यजनांनी सहज मान्य केली. बदलत्या काळात ही साधने अपुरी वाटल्याने चर्चा संवाद यातून मार्ग काढावा लागत होता. आध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक पाया तोच ठेवून बदल असल्याने इज्माला आरंभी विरोध झाला. पण विरोध मोडून काढून प्रागतिक विचार सामावले गेले. हे सारे संपूर्णत: विस्काळित टोळी- कायद्याला आव्हान देत करावे लागले हे आपल्याला ध्यानात घ्यावे लागेल.

जसं आपले वेद हे अपौरुषेय मानले जातात तसेच इस्लाममधील आयाती-श्लोक हे प्रकट झाले असे समजले जाते. ६२३० श्लोक हा या धर्माचा गाभा होय. पवित्र कुराण म्हणजे हेच श्लोक होत. यात इस्लामचे न्याय शास्त्र अंतर्भूत आहे. बदलत्या समाजाच्या गरजांप्रमाणे त्यात बदल होत गेले. इज्मा- कायदे पंडित –संशोधक विचारवंत यांच्यातील विचारमंथन होत असे.

इस्लाममधील अनेक खलिफांनी सुरूवातीच्या काळात ज्ञानसंपादनाचे मौलिक काम केले आहे. ग्रीक भाषेतील अनेक अलौकिक तत्वज्ञानविषयक ग्रंथ त्यांनी अनुवादित केले आहेत. अरिस्टॉटल, प्लेटो, हिपोक्रेट्स इ.चे तत्वचिंतन त्यांनी त्यांच्या भाषेत नेले. खगोलशास्त्र, वैद्यक, भूगोल, अंकगणित यांचा शिस्तशीर अभ्यास करून ग्रंथ सिद्ध आहेत. त्यांच्या धर्मातील अनेक तत्वांचे शुद्ध रुप समोर यावे म्हणून त्यातील श्लोकांचा (आयतीचा) अन्वय जुन्या हस्तलिखितांच्या अभ्यासाने प्रमाणित प्रती तयार केल्या गेल्या. हे लोक ज्ञानसाधनेत बुडून गेलेले असत. या तत्वज्ञांची माहितीही मुकादम यांनी सविस्तर दिली आहे. या धर्मातील अनेक पंथ त्याचे आचारविचार, प्रथा, मतभेद यांचाही उहापोह त्यांनी केलाय.

भूमी आणि पार्श्वभूमी, जन्म इस्लामचा आणि पैगंबरांचा, दिशा आणि वाटचाल, कुराण आणि आध्यात्मिक तत्वज्ञान, सामाजिक आणि आर्थिक क्रांती, शरियत, फिक, उगम, विकास, उत्त्क्रांतीचे सातत्य, इस्लामी संस्कृतीची वाटचाल, सनातनी परंपरा, इस्लाम युद्धपरंपरा आणि जिहाद, इस्लाममधील स्त्रियांचे स्थान व अधिकार, इस्लामचा अर्थविचार अशा प्रकरणांतून लेखकाने ज्ञात-अज्ञात इस्लाम वाचकांपुढे मांडला आहे.

इस्लाम म्हटले की अनेक गैरसमज इतरांनी उराशी बाळगले आहेत. नि आजच्या काळात ज्या रूढी मुस्लिम समाजात रुतून बसल्या आहेत, जे गैरप्रकार धर्ममार्तंडानी चालवले आहेत. जो कौटुंबिक अन्याय होतोय वा जिहादच्या नावाने दहशतवाद पसरवला जातोय तो पाहूनच बहुतेकांनी इस्लामचा नि दडपशाहीचा संबंध जोडला आहे. याहून वेगळे जर काही आपल्या समोर आलेच नाही तर आपण तेच सत्य मानणार ना? त्यातून आपल्याला इस्लाम म्हणजे नखशिखांत बुरखा, चार बायका, तोंडी तलाक, कुटुंबनियोजनाला विरोध इत्यादी स्त्रीविरोधी चित्र दिसते. मूळ धर्मातही ते तसेच आहे असे वाटते. खरंच कुराणात असे आदेश असतील? याचा विचार आपण करीत नाही. किंवा या प्रश्नांची उकल करणारे ग्रंथ वा माहिती आपल्यापर्यंत येत नाही. त्यामुळे समाजातले गैरसमज वाढत जातात. आज या साऱ्यांची उत्तरं या पुस्तकाच्या रुपाने आपल्या समोर आली आहेत. इस्लाममध्ये स्त्रियांना किती हक्‍क आहेत हे वाचून वाचक थक्‍क होतो. आपल्याला तलाकपीडीत महिलाच फक्‍त माहित असतात. पण स्त्रीला घरच्या मालमत्तेत हिस्सा असतो, तिलाही आपल्याला नको असलेले विवाहबंधन मोडता येते ज्याला खुला म्हणतात; याची बहुतेकांना कल्पना नसते. अनेक शतके स्त्रीराजे- बेगम- असलेल्या भोपाळ राज्यातील पुरुष स्त्रियांच्या या हक्‍काने त्यांना वचकून असत. मेहेरची रक्‍कम परत करून स्त्रिया स्वतंत्र होत. या कायद्याचे पुरुषी वर्चस्वाने काय केलंय ते आपण पाहतच आहोत. तीच गोष्ट कुटुंब नियोजनाची. त्यांच्या धर्मग्रंथात सविस्तरपणे संतती नियमनाबद्दल दिलेले आहे. हे मुळातूनच वाचावे असे आहे.

हजरत पैगंबरांना जो न्याय्य समाज अपेक्षित होता त्याचे त्यांच्याच नावाने कसे धिंडवड निघालेत ते सारेच पाहत आहेत. शरीयतीचा धाक दाखवून, धर्मबाह्य गोष्टी रचून शोषणाचे सत्र सुरू ठेवलेले आहे. पण दोष मात्र मूळ विचारांवर येतोय. धर्मधुरीण पुरुषप्रधान समाजाला दृढ करीत आहेत, अन्यथा हजरतांची पत्नी ही स्वतंत्रपणे व्यवसाय करून स्वत:च्या मालकीचे धन कशी संग्रहित करू शकली असती? हे पुस्तक इतर धर्मीयांनी वाचायला हवे तसेच खुद्द मराठी भाषिक मुस्लिमांनीही त्याचे पारायण करून आपल्या सच्च्या धर्माचे पालन करण्याचा आनंद लुटायला हवा, खुला श्वास घ्यायला हवा. त्याचा अनुवाद इतर भाषांत करून तेथील लोकांनाही सजग करायला हवे. चर्चा करायला हवी. बदलाचे मोकळे वारे वाहू देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मुस्लिम धर्मातील लोक त्यांची होणारी कोंडी याचाही समंजसपणे विचार करायला हवा. या विचारातील इतरही अनेक संकल्पनांचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे.

मुकादमांचे मनापासून अभिनंदन. या अविश्वास, गैरसमज, संशय, अनास्था, अहंने (सगळ्यांचे अहं टोकेरी झालेत) ग्रासलेल्या काळात त्यांनी एक दिवा लावला आहे. इतरांनी त्यात भर घालावी.

 

संजीवनी खेर

इस्लाम ज्ञात आणि अज्ञात

अब्दुल कादर मुकादम

अक्षर प्रकाशन

किंमत : ३०० रुपये.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0