‘जय भीम’: जागर संविधानाचा

‘जय भीम’: जागर संविधानाचा

मागील अनेक दिवस दक्षिणेतील एका चित्रपटाविषयी पडद्यावर यायच्या आधीच सोशल मीडिया आणि चित्रपट प्रेमींमध्ये खूप चर्चा सुरू होती. ही सर्व चर्चा सुरू असत

मला चीड आली आहे – नसिरुद्दीन शाह
गली बॉयचे संगीत स्ट्रीट रॅपिंगचे श्रेय हिरावून घेत नाही!
झायराची एक्झिट

मागील अनेक दिवस दक्षिणेतील एका चित्रपटाविषयी पडद्यावर यायच्या आधीच सोशल मीडिया आणि चित्रपट प्रेमींमध्ये खूप चर्चा सुरू होती.

ही सर्व चर्चा सुरू असताना आणि “जयभीम” चित्रपटाचे ट्रेलर बघताना हा चित्रपट आपण नक्की बघितला पाहिजे असे डोक्यात सतत सुरू होते. त्या सोबतच गेले अनेक दिवस मी संविधान संवादक म्हणून काम करण्यासाठी संविधानाचा अभ्यास करत आहे आणि ते जगण्याचा प्रयत्नही करत आहे. हा प्रवास सुरू असताना ‘जय भीम’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि आज तो पूर्ण एका बैठकीत अनुभवला.

दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल यांनी चित्रपटाची सुरुवात ही कारागृहाबाहेरील एका दृश्याने केली आहे, ज्यात जात निहाय कैद्यांना विभागून एका विशिष्ट जातीच्या लोकांना योग्य सुनावणी शिवायच पुन्हा तुरुंगात टाकले जाते. अजून एका दृश्यात शेतातील उंदीर पकडणे हे काम दाखवून, हे काम एका विशिष्ट उपेक्षित जातीतील लोक नाईलाजास्तव करत आहेत हे दिसते. ते काम जरी समाजाच्या रांगेत मागे उभा असणारा माणूस करत असला, तरी ते रांगेत उभे असलेल्या पहिल्या माणसासाठी तो करत आहे हे दिसते. असे अनेक प्रसंग सुरवातीला दिसत जातात ज्यात प्राणी पकडणे, त्यांची विल्हेवाट लावणे, सापाने चावलेल्याचे विष काढणे यांसारख्या अनेक कामांसाठी गावातील उच्च जातीच्या माणसांना या उपेक्षित लोकांची गरज भासते, पण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान दिलं जात नाही. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर देखील या उपेक्षित लोकांना दैनंदिन मुलभूत गोष्टींपासून वंचित ठेवले गेले आहे.

चित्रपटाच्या विविध छटांमध्ये हे दिसून येतं की प्रेम, माया, जिव्हाळा, मानवी गरजा या सर्वांच्या सारख्याच आहेत, पण एक विशिष्ट वर्ग, जात, पैसा, हुद्दा यांच्या जोरावर आपल्या पेक्षा कमकुवत वर्गावर अन्याय करून ती सुबत्ता मिळवू पहात आहे.

गोष्ट तशी जुनीच आहे पूर्वापार चालत आलेली आणि आजही समाजातील उपेक्षित स्तरातील लोक जे प्रामाणिक आहेत, जे या क्रूर अ-मानवी व्यवस्थेत होरपळून निघत आहेत. तेच वेगवेगळ्या पद्धतीने या अन्यायाचे आणि असमानतेचे बळीही होत आहेत.

कहाणीत समाजाच्या पटलावर हरवलेली व्यक्ती आणि अन्याय सहन करून देखील शेवटपर्यंत ताठ उभे असलेले पात्र म्हणजे ‘राजकन्नू’. हे पात्र ‘के मणीकंदन’ या कलाकाराने थोडक्यात पण सुंदर साकारले आहे. त्याचे ‘सत्य किती ताकदीचे असते आणि त्याच्या सोबत आपण राहिलो तर थोडा त्रास सहन करावा लागेल पण जातीच्या उपेक्षितपणा सोबत बेईमान असण्याचा बट्टा तरी लागणार नाही’, हे बोल व्यवस्थेविरुद्ध लढण्याची उमेद देऊन जातात.

‘जय भीम’ चित्रपटात पावलो-पावली हे जाणवतं, की प्रत्येक दुसऱ्या क्षणाला मानवी मूल्यं आणि संविधान वेशीला टांगले जात आहे, पण तेच संविधान पुन्हा ढाल होऊन माणसासाठी उभंही राहत आहे.

‘राजकन्नू’ ची बायको ‘सेंगानी’ हे पात्र चहू बाजूने वेढलेले दिसते. ती त्याच उपेक्षित समाजाची शेवटची माणूस आहे. तिच्या सर्व प्रकारच्या हतबलतेमुळे, तिने स्वतःच्या पीडित नवऱ्यासाठी न्याय मागू नये नाहीतर तिची आहे त्याहुन ही समाजात वाईट अवस्था होईल ही गोष्ट व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्ती तिला बजावून सांगत असतो. पण तिला जेव्हा बळ देणाऱ्या तिच्या शिक्षिकेचा, वकिलाचा पाठिंबा मिळतो, तेव्हा ती देखील अन्यायाविरुद्ध विवेकाने ठाम उभी राहते आणि न्यायाची कास सोडत नाही. तिची आणि तिच्या मुलीची होणारी फरफट हे सतत दाखवून देते की शिक्षण आणि त्याहीपेक्षा जास्त विवेकी शिक्षण या समाजात उभं राहण्यासाठी किती गरजेचे आहे आणि त्यावर समाजातील प्रत्येक घटकाचा हक्क आहे.

आपण स्वतंत्र झालो, संविधान स्वीकारले देखील, पण ते आपल्या जगण्यात कधीच उतरू शकलं नाही. संविधानाने जरी हे सांगितलं असलं, की न्याय, समानता, स्वातंत्र्य ही मूल्यं जात,धर्म,वर्ण, लिंग निरपेक्ष आहेत. तरी प्रत्यक्षात भारतीय समाज या बेड्या आजही तोडू शकलेला नाही. कोणत्या तरी देवाने, कोणत्यातरी धर्मग्रंथाने तयार केलेली ही व्यवस्था आहे अशी अंधश्रद्धा बाळगून, तसेच व्यक्तिगत, व्यावसायिक, सामाजिक स्वार्थ बाळगून माणूसच माणसाचं शोषण करत आहे. चित्रपट पाहताना हे दिसून येतं, की प्रत्येक उच्च स्थानावरील व्यक्ती आपल्या खालच्या व्यक्तीचे स्वतःच्या गरजेनुसार शोषण करू पाहत आहे आणि ती प्रत्येक दुसरी व्यक्ती जी शोषित बनत जात आहे, ती न्याय आणि समानता शोधत आहे.

चित्रपटातील नायकाचे पात्र ‘चंद्रू’ हे ‘जस्टिस के चंद्रू ‘ यांच्यावर आधारित आहे, जे मार्क्स- आंबेडकर- पेरियार यांच्या विचारांचे वाहक आहेत. ही भूमिका कलाकार सुर्या याने फार ताकदीने निभावली आहे. चित्रपटात दाखवलेली घटना १९९३ सालच्या ‘जस्टिस के चंद्रू’ यांनी लढलेल्या खटल्याची आहे. एक वकील आणि न्याय पालिकेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या माणसाने किती तार्किक, तथ्यपूर्ण आणि सोबतच समाजातील प्रत्येक घटकासाठी संवेदनशील असणं गरजेचे आहे हे चंद्रूच्या भूमिकेतून दिसून येतं. न्याय आणि त्यातून मिळणार समानता ही सोपी गोष्ट नाही, समाज प्रवाहात जगताना उपेक्षित समाजाला ते स्थान मिळवून देण्यासाठी जे जे संविधानाच्या चौकटीत राहून करणं गरजेचे आहे, ते चंद्रू करताना दिसतो. खऱ्या जीवनात देखील न्यायाधीश  झाल्यानंतर आपल्या संपूर्ण कार्यकाळात के चंद्रू यांनी ९० हजाराहून जास्त अत्याचाराच्या संवदेनशील केसेस हाताळल्या आहेत आणि न्यायचे पारडे जड केले.

यातील ‘प्रकाशराज’ यांनी साकारलेलं ‘आय.जी. पेरूमलसामी’ हे पोलिस अधिकाऱ्याचे पात्र मार्मिक आहे. पोलिस हे चेतना जागृत ठेवून कसं काम करू शकतात आणि समाजव्यवस्थेत जेव्हा अन्याय होत असतो व पीडित जेव्हा न्याय याचना घेऊन पोलिसांकडे येतो तेव्हा कोणत्या विवेकाने आणि चेतनेने पोलिसांनी वागलं पाहिजे याचे हे उत्तम उदाहरण आहे. शेवटी न्यायव्यवस्थेत न्यायाची सुरुवात ‘पोलीस’ या पहिल्या पायरीवरच होते, पण तिथेच जर कायद्याची पायमल्ली झाली तर अनेक राजकन्नु न्याय मिळण्यापासून वंचित राहतात.

ही कहाणी जरी जाती व्यवस्थेने उपेक्षित ठेवलेल्या एका ठराविक समाजाची असली, तरी चौफेर बघताना ती त्या प्रत्येक व्यक्तीची आहे, जी संविधान जगू पहात आहे, जी न्याय आणि समानतेची पुरस्कर्ती आहे.

शिक्षणाचा अभाव, दुर्लक्षित समाज, संविधानाचे न जागृत झालेले समाजभान, न्याय आणि प्रशासन व्यवस्थेत संविधानाचा वापर करून तेच संविधान डावलणारी माणसं, या सर्व गोष्टींमुळे न्याय, स्वातंत्र्य आणि समानता ही मूल्यं रसातळाला जाऊन रुतलेली दिसतात. पण त्या मूल्यांना वर आणण्याचा मार्गही संविधानातून जातो हे चित्रपटात पुढे आणतो.

एक पुष्पहाराचा प्रसंग येतो, ज्यात एका फलकावर लिहिलेलं असतं, “No one is God Here, no need For Garlands”. हा प्रसंग, रोजच्या जीवनात किती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून विवेकाने आपण जगत आहात हे ठसवून सांगतो. न्यायपुर्ण वागण्यासाठी विवेकी आणि तथ्यावर आधारित आयुष्य जगणं किती गरजेचे आहे हे यात दिसून येते. असे अनेक पुरोगामी लोक असतात समाजात, ज्यांना सर्व बाबतीतील समानता ही हवी असते, पण समाजाने आपला देवत्वाच्या नजरेतुन उदो उदो करावा ही सुप्त इच्छा सतत त्यांच्या मनात तेवत असते. पण नेमकी हीच देवत्वाची भावना न्यायपूर्ण वागण्यापासून या पुरोगामी वर्गाला परावृत्त करत राहते, मग त्यातून सुरू होतो बोलण्या आणि जगण्यातल्या फरक. हा फरकही चित्रपटात उठून दिसतो.

या जगात दुसऱ्याचे कष्ट वापरून लोक मोठे होतात, पण त्या कष्टाला न्याय देणं, माणूस म्हणून समानतेची वागणूक देणं, त्याच्याशी कृतज्ञ रहाणं सर्वांना जमत नाही. न्याय हा उपभोग घेणाऱ्यासाठी स्वार्थ सापेक्ष असतो आणि त्या स्वार्थामुळे स्वतःची जी सोय तो न्याय ती व्यक्ती/ व्यवस्था इतरांसाठी करत असते. अर्थात तो न्याय नसून दुसऱ्याच्या वापरलेल्या श्रमाशी केलेली कृतघ्नता असते. न्याय आणि समानता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे अधोरेखित होत राहते.

दिग्दर्शकाने चित्रपटात दाखवलेली पात्रांची विचारशैली आणि त्यातून झळकणारी प्रतीकं नेमकेपणानं येतात. अनेक ठिकाणी तमिळ भाषा येत नसताना देखील ही प्रतीकं आपल्या समोर सिनेमाची गोष्ट उलगडत नेतात. ही प्रतीकं आपली समाजचेतना किती जागृत आहे हे ही तपासत जातात.

कायदा कसा समाज उपयोगी आहे आणि जर तो योग्य पद्धतीने वापरला गेला तर किती फायदेशीर आहे याचीही उत्तम मांडणी केली आहे. संविधानाने प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून कायदा तयार केला. त्याचे उदाहरण आहे, ‘हेबियस कॉर्पस रिट’. त्यातील तांत्रिक बाजू जरी आपल्याला माहिती नसली, तरी हे रिट अटक झालेल्या व्यक्तीतर्फे कुणीही दाखल करू शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कायद्याचे योग्य पालन न करता मनमानी पद्धतीने अटक केली जाते आणि त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या हक्काचे उल्लंघन होते तेव्हा त्याच्या हक्काचे संरक्षण करणे ही जबाबदारी न्यायपालिकेची आहे हेही दिग्दर्शक इथे सांगू इच्छितो.

चित्रपटातील पात्रं सतत हेही सांगताना दिसतात की, संविधानासमोर तुम्ही आधी माणूस आहात आणि मग तुमचा हुद्दा. त्यामुळेच संविधानातून आलेल्या मूल्यांची चेतना कायम जागृत ठेवणं हे गरजेचे आहे.

शिक्षणातून येणारा आत्मविश्वास, विवेक, चेतना आणि समाजभान याला जगात कुठेच तोड नाही. मानवी मूल्यं, मानवी हक्क, अधिकार, कर्तव्ये यांचा विवेक हा संविधानाच्या शिक्षणातूनच जागृत होणार आहे. चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या संविधानाच्या शिल्पकाराचा उल्लेख एकदाच आला आहे, पण हा संपूर्ण चित्रपट त्यांनी साकारलेल्या संविधानाच्या मूल्यांनी व्यापलेला आहे आणि कितीही नाही म्हंटल तरी आपलं रोजचं जगणंही संविधानाच्या पायावरच उभं आहे, हे चित्रपट संगत राहतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0