जेएनयूत गुंडांचा ४ तास धुडगूस, विद्यार्थ्यांना जबर मारहाण

जेएनयूत गुंडांचा ४ तास धुडगूस, विद्यार्थ्यांना जबर मारहाण

नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास सुमारे ५०-६० जणांचा जमाव घुसला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. या जमावाने आपले चेहरे झाकले होते. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, काठ्या, हॉकीच्या स्टीक, क्रिकेटची बॅट, दगड होते. हा जमाव विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये घुसला आणि त्यांनी दिसेल त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर, शरीरावर जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आयशी घोष व प्राध्यापक सुचरिता सेन यांच्या डोक्यावर जबर मार बसला असून त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले. या मारहाणीत काही शिक्षकही जखमी झाले असून २० जखमी विद्यार्थ्यांवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. जेएनयूत घुसलेले गुंड हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) विद्यार्थी होते असा जेएनयू विद्यार्थी संघटना व विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. तर काही प्रत्यक्षदर्शींनी गुंड हे वंदे मातरम, भारत माता अशा घोषणा देत विद्यार्थ्यांना मारत होते असे सांगितले.

विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी द वायरला सांगितले की मारहाण करणारे गुंड फी वाढीच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधत होते व त्यांना मारत होते. या गुंडांनी विद्यापीठातील काही कारच्या काचाही फोडल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, जेएनयूत झालेल्या गुंडाच्या मारहाणीला विद्यार्थीच जबाबदार असल्याचा आरोप जेएनयूचे कुलगुरूंनी एक पत्रक काढून केला आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर शंका

गेली चार-पाच वर्षे जेएनयू धगधगत असताना रविवारी रात्री झालेला हल्ला हा अत्यंत भीषण व भयावह होता. या हल्ल्याच्या निमित्ताने जेएनयू प्रशासन, दिल्ली पोलिस व विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था यांच्या भूमिकेवर विविध थरातून संशय उपस्थित केला जात आहे. या विद्यापीठात भारतातील सर्वात हुशार समजले जाणारे सर्व थरातील विद्यार्थी शिकण्यास येत असतात. अशा या विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासन, पोलिस संरक्षण देऊ शकत नाही हे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटली.

जेएनयू विद्यापीठाची परिसर मोठा असल्याने तेथे सुमारे ३००-४०० सुरक्षा रक्षक तैनात असतात. हे सुरक्षा रक्षक विद्यापीठ प्रशासनाचे असतात. या विद्यापीठात प्रवेशद्वाराजवळच प्रत्येकाची तपासणी केली जाते, त्यांची नावे मस्टरवर लिहून घेतली जातात, विद्यापीठात कोणाला भेटायचे आहे याचा तपशीलही घेतला जातो. एवढे नियम असतानाही सुमारे ५०-६० जणांच्या जमावाला ज्यात काही मुलीही दिसत होत्या, हातात काठ्या, बॅट, हॉकी स्टिक घेऊन प्रवेश कसा देण्यात आला हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यात जामिया मिलियात तणाव असल्याने जेएनयूच्या परिसरातही दिल्ली पोलिस तैनात असतात. एवढी सुरक्षा यंत्रणा असताना जमाव विद्यापीठात घुसून सुमारे तीन चार तास धुडगूस घालत राहतो आणि हे गुंड हिंसाचार करून सहजपणे प्रवेशद्वारातून बाहेर निघून जातात तरी त्यांना पोलिस, विद्यापीठातील सुरक्षा यंत्रणा पकडू शकत नाही हा आणखी एक चिंतेजनक प्रश्न आहे.

अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

जेएनयूत गुंड घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याची घटना समजताच अनेक सामाजिक चळवळींचे कार्यकर्ते, डाव्या पक्षांच्या नेत्यांना विद्यापीठाच्या बाहेर जमू लागले व त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता दिल्ली पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारत होते. विद्यापीठात सुरू असलेला गुंडांचा नंगा नाच पोलिस थांबवू शकत नाहीत पण आम्हाला गेटपाशी मात्र ते रोखत आहे, असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला. जेएनयूच्या इतिहासात अशी गुंडगिरी कुणी पाहिली नव्हती असे ते उद्वेगाने म्हणाले.

दरम्यान जखमी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, माकपचे नेते सीताराम येचुरी, डी. राजा, भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी एम्समध्ये गेल्या होत्या. पण एम्सच्या बाहेर अभाविपचे अनेक विद्यार्थी जमा झाले होते. त्यांनी प्रियंका गांधी पोहचताच त्यांच्याविरोधात नारेबाजी सुरू केली. त्यांना धक्का मारण्याचाही प्रयत्न केला. सीताराम येचुरी व अन्य डाव्या नेत्यांनाही अभाविपच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. पण मीनाक्षी लेखींना त्यांनी कोणताही विरोध केला नाही.

COMMENTS