कुलगुरुंनी राजीनामा द्यावा – आयेशी घोष

कुलगुरुंनी राजीनामा द्यावा – आयेशी घोष

जवाहरलाल नेहरू विद्यापीठा(जेएनयु)तील हिंसेला कुलगुरू एम जगदेशकुमार हेच जबाबदार असल्याचा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाची अध्यक्षा

जेएनयू साबरमती हॉस्टेलच्या वॉर्डनचा राजीनामा
चेहरा झाकलेली मुलगी अभाविपची कार्यकर्ती : दिल्ली पोलिस
पॉप गायिकेला पॉर्न स्टार म्हणत अभाविप कार्यकर्त्यांचा राडा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठा(जेएनयु)तील हिंसेला कुलगुरू एम जगदेशकुमार हेच जबाबदार असल्याचा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेशी घोष हिने केला आणि कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाने एक पत्रक प्रसिद्ध केले असून, त्यामध्येही कुलगुरु जगदेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

‘जेएनयू’ मध्ये रविवारी संध्याकाळी बुरखा घातलेल्या गुंडांनी हिंसेचे थैमान घातले. तीन तास संपूर्ण विद्यापीठामध्ये दहशतीचे वातावरण होते. पोलिसांना माहित असूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली, असाही आरोप करण्यात येत आहे. या हल्ल्यामध्ये आयेशी घोष गंभीररीत्या जखमी झाली. तिच्या डोक्याला जबर मार बसला असून, खूप रक्तस्त्राव झाला. त्यानंतर तिला तातडीने एम्स रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. सोमवारी तिला रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर दुपारी तिने पत्रकारपरिषदेत आपली मते मांडली.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत असलेले काही प्राध्यापक आमचे आंदोलन दडपण्यासाठी हिंसाचारास प्रोत्साहन देत होते. असे म्हणत आयेशी हिने अश्विनीकुमार महापात्रा यांचे नाव घेतले. ते विद्यार्थ्यांना सरळ सरळ पोलीस केस करण्याची धमकी देत आहेत, असा आरोप आयेशी हिने केला. जेएनयूचे सुरक्षा रक्षक व हल्लेखोरांचे संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. हा एक संघटीत हल्ला होता, ते एकेकाला बाहेर काढत होते व मारहाण करत होते, असे आयेषी म्हणाली. आम्ही दिल्ली पोलिसांना याची वारंवार माहिती दिली होती, तरीही हा हल्ला झाला आणि पोलिसांनी काहीच केले नाही, असेही ती म्हणाली.

आपल्याला एकटे गाठून २५ लोकांनी लोखंडी बारने कशी मारहाण केली, हेही तिने सांगितले. ती म्हणाली, “शिक्षकांचे शांततामय आंदोलन साबरमती ढाब्यासमोर सुरु होते. मी चहा पिऊन आमच्या होस्टेलकडे चालले होते. माझ्याबरोबर कालच मला भेटायला आलेली माझी बहिण आणि एक सहकारी होता. अचानकपणे ६०-७० जणांचा गुंडांचा घोळका आला आणि त्यांनी सगळ्याना मारायला सुरुवात केली. मला एकटीला गाठून २५ जणांनी मारायला सुरुवात केली. मी खाली पडल्यावर काहीजण तिथे आले आणि म्हणाले, अरे या लोकांना मारायचे नव्हते. चला आता इथून. मग काही विद्यार्थ्यांनी मला उचलून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0