अभाविपने व्हॉटसअपवरून हल्ल्याचे नियोजन कसे केले?

अभाविपने व्हॉटसअपवरून हल्ल्याचे नियोजन कसे केले?

नियोजन करणाऱ्या एका WhatsApp ग्रुपचे स्क्रीनशॉट आणि क्रमांक समाज माध्यमांवर लीक झाल्यानंतर, ट्रूकॉलरवर या क्रमांकांशी निगडित असलेली नावे बदलून त्यांच्यापुढे ‘काँग्रेस’ किंवा ‘लेफ्ट’ असे जोडण्यात आले आहे. काही जणांनी नावच संपूर्ण बदलून मुस्लिम वाटणारी नावे घेतली आहेत.

हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध
निधी देशविरोधी कारवायांसाठी वापरला; मेधा पाटकर व अन्य ११ जणांवर फिर्याद
चेहरा झाकलेली मुलगी अभाविपची कार्यकर्ती : दिल्ली पोलिस

मुंबई : अनेक बुरखे पांघरलेल्या लोकांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या, जेएनयूच्या परिसरात हिंसेचे थैमान घातल्यानंतर WhatsApp या संदेशवहन सेवेवरील एका ग्रुपची लिंक मोठ्या प्रमाणात शेअर केली जात होती आणि लोकांना “एकदाच काय ते संपवून टाकू” असे आवाहन केले जात होते. या ग्रुपचे नाव साडेसात वाजेपर्यंत “Unity Against Left” असे होते.

जेव्हा या ग्रुपची लिंक अपेक्षित विद्यार्थ्यांच्या वर्तुळाच्या बाहेर फिरवली जाऊ लागली, आणि अधिकाधिक पत्रकार, वकील आणि डावे विद्यार्थी ग्रुपमध्ये सामील झाले तेव्हा ग्रुपची गुणवैशिष्ट्ये बदलली. बहुतांश उजवे लोक त्यानंतर त्यातून बाहेर पडले आहेत आणि आता तो ग्रुप बराचसा ट्रोल ग्रुप आहे.

५ जानेवारीला संध्याकाळी ५:३० वाजल्यापासून ते ९:३० वाजेपर्यंत या ग्रुपवर काय संदेश पाठवले जात होते ते खाली दिले आहेत. द वायरने या ग्रुपवर हिंसक संदेश पाठवणाऱ्या लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या वेळेपासून हे बरेचसे क्रमांक बंद करण्यात आलेले आहेत, वापरकर्त्यांची फेसबुक अकांऊंटही डिलीट करण्यात आली आहेत. ट्रूकॉलरवरची नावेही बदलण्यात आली आहेत. बहुतांश हिंदू वाटणारी नावे बदलून मुस्लिम वाटणारी नावे घेण्यात आली आहेत.

WhatsApp वर संदेशांची काय देवाणघेवाण झाली ते मोठ्या प्रमाणात स्क्रीनशॉट्सच्या माध्यमातून प्रसारित केले जात आहे. त्यामध्ये जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विद्यार्थी संघटनेच्या अनेक लोकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे.

सुरुवातीचे काही संदेश एका तरुणाने पाठवले आहेत, जो त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर स्वतःची ओळख जेएनयूचा एक विद्यार्थी अशी देतो. त्याचे नाव ट्रूकॉलरवर “योगेंद्र शौर्य भारद्वाज” असे येते. ५:३० वाजता भारद्वाजने लोकांना “for unity against Left terror” या ग्रुपमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. “अब पकडके इन लोगों को मार लगनी चाहिये. बस एक ही दवा है,” असे त्याने संध्याकाळी ५:३३ वाजता लिहिले आहे.

या तरुणाच्या समाजमाध्यमावरील अकाऊंटमध्ये तो अभाविप जेएनयूचा २०१७-१८ पासून संयुक्त सचिव असल्याचे आणि विद्यापीठातील पीएचडी अभ्यासक असल्याचेही सांगितले आहे. द वायरने त्याच्या क्रमांकावर कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा क्रमांक समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर त्याने तो स्विच ऑफ केलेला दिसतो.

ग्रुपवरील त्याच्या संदेशांना लगेच उत्तर देणारा दुसरा विद्यार्थी समाजमाध्यमांवर ‘अभाविप जेएनयू उपाध्यक्ष (२०१५-१६)’ अशी ओळख सांगतो. ट्रूकॉलरद्वारे त्याची ओळख ओंकार श्रीवास्तव अशी आहे. तो दिल्ली विद्यापीठाच्यालोकांना “खजान सिंग स्विमिंग साईड”ने प्रवेश करण्यास सांगतो. “डीयू के लोगोंकी एन्ट्री आप खजान सिंग स्विमिंग साईड से करवाइये. हम लोग यहाँ २५-३० लोग है,”असे संदेशात म्हटले आहे. खजान सिंग स्विमिंग ऍकॅडमी जेएनयू कँपसमध्ये आहे.

हा क्रमांक सोमवारी रात्रीपर्यंत चालू होता, पण आता बंद करण्यात आला आहे. ट्रूकॉलरवरील मगशॉट अजूनही जेएनयूचा अभाविप कार्यकर्ता श्रीवास्तवच्याच नावावर आहे आणि त्याचे फेसबुक प्रोफाईल अजून सक्रिय आहे. त्याचे समाज माध्यमावरील प्रोफाईल दाखवते, की तो अभाविपच्या दिल्ली राज्य कार्यकारी समितीचा सक्रिय सदस्य आहे आणि मूळचा पश्चिम चंपारण्य, बिहार मधील बगाहाचा आहे.

हे लोक प्रत्यक्षात विद्यार्थी आणि शिक्षकांवरच्या हल्ल्यांच्या वेळी तिथे उपस्थित होते की नाही हे स्पष्ट नाही. हे क्रमांक आता स्विच ऑफ केलेले आहेत किंवा त्यांची सेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे द वायरला या व्यक्तींना संपर्क करून त्यांची बाजू ऐकून घेणे शक्य झालेले नाही.

अनेक संदेश “युद्धाची” मागणी करणारे आणि “कॉमीज”ना (डाव्या विचारांचे लोक) मारण्याची मागणी करणारे आहेत. या बहुतांश क्रमांकांचे तपशील ५ जानेवारीच्या रात्रीपासून ट्रूकॉलरवर अनेकदा बदलण्यात आले आहेत. काही नावांच्या मागे “INC activist” (काँग्रेस कार्यकर्ता), “Left Wing JNU” असे जोडण्यात आले आहे तर काही पूर्ण बदलून मुस्लिम समुदायात असतात तशी नावे घेण्यात आली आहेत.

उदाहरणार्थ, अभाविप दिल्लीमधील एक महत्त्वाचा पदाधिकारी असणारा एकजण या ग्रुपवरील सक्रिय सहभागी आहे. ट्रूकॉलरने त्याची ओळख हितेश जैन अशी दिली. पण ६ जानेवारीपासून त्या क्रमांकावर ‘रईस’ असे नाव येते आणि तो ‘बिझिनेस नंबर’ असल्याचे दिसते. त्यानंतर द वायरने या क्रमांकावर संपर्क केला आणि कालपर्यंत ट्रूकॉलर ज्याचे नाव दाखवत होते, त्या व्यक्तीबद्दल माहिती विचारली. तेव्हा फोनवरील व्यक्तीने तो ‘राँग नंबर’ असल्याचे सांगितले.

ही व्यक्ती फेसबुकवरील सक्रिय व्यक्ती असून तिचे ११,००० पेक्षा जास्त फॉलोअर आहेत. ती अनेक भाजपच्या व सुब्रमण्यम स्वामींसारख्या इतर उजव्या विचारवंतांबरोबर सक्रिय संपर्कात असल्याचे दिसते. अनेक बॉलिवुड अभिनेते आणि चित्रपटकारांबरोबर, तसेच राजस्थानातील विविध भाजप पदाधिकाऱ्यांबरोबरही या व्यक्तीची छायाचित्रे आहेत.

आणखी एक व्यक्ती या ग्रुपवर सक्रिय दिसते, व ती लोकांना त्यांचा ठावठिकाणा विचारत आहे. या व्यक्तीलाही द वायरने कॉल केला. मात्र या तरुणाच्या दाव्याप्रमाणे तो ‘नियोजित हिंसाचारा’बद्दल अधिक माहिती घेण्याच्या प्रयत्नात होता. ‘माझ्यासारखे इतरही अनेक या ग्रुपमध्ये सामील झाले होते आणि आम्ही अभाविपचे कार्यकर्ते असल्याचे दाखवत होतो. आम्हाला त्यांचे काय काय नियोजन आहे ते जाणून घ्यायचे होते,” असे त्याने द वायरला सांगितले. त्याने द वायरला आपले नाव घोषित न करण्याची विनंती केली. “मी जेएनयू कँपसवरच राहतो आणि माझी ओळख जाहीर झाली तर ते लोक (अभाविप कार्यकर्ते) माझ्या मागे लागतील,” असे त्याचे म्हणणे होते.

५ जानेवारीला ९:३० वाजल्यानंतर, हा ग्रुप उजव्या लोकांव्यतिरिक्त इतर सर्वांना खुला करण्यात आला आणि त्याचे वर्णनही बदलण्यात आले. त्यानंतर डाव्या आणि आंबेडकरी गटांमधले अनेक लोक त्यात सामील झालेले दिसतात, त्यामुळेच अभाविपने स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन या डाव्या गटांनीच हा हिंसाचार घडवून आणला असे एक वळण देण्याचा प्रयत्न केला.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0