पक्ष्यांच्या मृत्यूकरिता दूषित पाणी कारणीभूत असल्याचा संशय आहे. सरकारी अधिकारी व्हिसेरा चाचणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
सांभर (राजस्थान): देशातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या जयपूरजवळच्या सांभर तलावामध्ये दहा प्रजातींचे हजारो स्थलांतरित पक्षी मृत अवस्थेत आढळल्याने स्थानिकांना तसेच सरकारी अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
अधिकाऱ्यांच्या मते दूषित पाणी हे मृत्यूसाठीचे एक कारण असल्याचा त्यांना संशय आहे, मात्र ते व्हिसेरा चाचणीच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. अधिकृत आकडा १,५०० असला तरी स्थानिकांच्या मते हा आकडा ५,००० इतका मोठा असू शकतो.
“आम्ही कधीच अशा प्रकारचे काही पाहिले नाही. ५,००० पक्षी गूढरित्या सर्वत्र मरून पडले आहेत,” स्थानिक पक्षी निरीक्षक अभिनव वैष्णवने पीटीआयला सांगितले.
रविवारी सकाळी वैष्णव तलावाच्या काठावर फिरायला गेला असताना गडद रंगाचे शेकडो छोटे ढीग त्याला दिसले. ते बहुधा गायीच्या शेणाचे असावे असे त्याला वाटले. मात्र तो आणि त्याच्याबरोबरचे पक्षी निरीक्षक किशन मीणा आणि पवन मोदी यांनी जवळ जाऊन पाहिले असता ते ढीग म्हणजे हजारो निर्जीव स्थलांतरित पक्ष्यांचे असल्याचे त्यांना समजले.
प्लोवर्स, कॉमन कूट, ब्लॅक विंग्ड स्टिल्ट, नॉर्दर्न शोवेलर्स, रूडी शेलडक, आणि पाइड एवोसेट प्रजातींच्या पक्ष्यांसह अनेक पक्षी तलावाच्या १२-१३ किलोमीटर क्षेत्रात पसरले होते. त्यांची संभाव्य संख्या ५,००० असावी असे ते म्हणाले.
वन रक्षक राजेंद्र जाखड म्हणाले, काही दिवसांपूर्वी मोठा गारांचा पाऊस झाला होता, तेही यामागचे संभाव्य कारण असू शकते.
“आमच्या अंदाजानुसार १० प्रजातींचे सुमारे १,५०० पक्षी मेले आहेत. पाण्यातील विषारीपणा, जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य संसर्ग यासारख्या इतर शक्यतांचाही आम्ही विचार करत आहोत,” असे ते म्हणाले.
जयपूरच्या एका वैद्यकीय पथकाने काही मृत शरीरे आणि पाण्याचे नमुने घेतले आहेत, जे पुढे परीक्षण करण्यासाठी भोपाळला पाठवले जातील.
पशुवैद्य आणि वैद्यकीय पथकाचे भाग असलेले अशोक राव यांनी मृत्यूचे नेमके कारण निश्चित नसल्याचे सांगितले असले तरीही बर्ड फ्लूची शक्यता त्यांनी फेटाळली आहे.
“प्रारंभिक तपासणीमध्ये आम्हाला पक्ष्यांच्या तोंडातून कसलाही स्त्राव दिसून आला नाही, जे बर्ड फ्लूच्या बाबतीत एक चिन्ह असते,” ते म्हणाले.
आर जी उज्ज्वल यांनी या गूढ संकटामागच्या संभाव्य शक्यतांबद्दल सांगितले.
“पाण्यामध्ये काही प्रदूषण असू शकते. पाण्याच्या खारेपणामध्ये वाढ होणे हे एक कारण असू शकते, त्याच्यामुळे रक्तातील क्षारांचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्त प्रवाह मंद होतो आणि मेंदूसारख्या शरिरातील अवयवांचे काम थांबते,” उज्ज्वल म्हणाले.
हा तलाव फ्लेमिंगो, स्टिल्ट, स्टिंट,गारगॅनी, गल्स आणि पक्ष्यांच्या अशा इतर अनेक प्रजातींच्या आवडीचा आहे.
जाखड यांनी सांगितले की तलावात दर वर्षी अंदाजे २-३ लाख पक्षी येतात, ज्यामध्ये सुमारे ५०,००० फ्लेमिंगो आणि १,००,००० वॅडर असतात.
या विचित्र घटनेमुळे गावकरी आणि वन विभागाचे लोक गोंधळात पडले आहेत, कारण यामागचे कारण समजत नाही.
“मी माझ्या ४० वर्षांच्या वनविभागाच्या नोकरीत असं काहीही पाहिलेलं नाही. आधी मला वाटलं ते गारांच्या पावसामुळे असेल, पण तो तर दरवर्षी येतो. या पाण्यात कोणतीही टाकाऊ रसायनेही सोडली जात नाहीत,” वन विभागात काम करणारे रमेश चंद्र दरोगा म्हणाले.
राज्याच्या डिसीज डायग्नोस्टिक सेंटरचे संयुक्त संचालक अशोक शर्मा यांनी सांगितले, कारण निश्चित झाल्यानंतर पुढची पावले उचलली जातील.
“हा संसर्ग असेल असे आम्हाला वाटत नाही, मात्र तसे असेल तर तो आणखी पसरणार नाही हे निश्चित करण्यासाठी आम्ही पुढची पावले उचलू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान मृत शरीरांना ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये गोळा करून खड्ड्यात पुरण्यात आले. एकूण ६६९ मृत पक्ष्यांना पुरण्यात आले. मात्र घसरड्या चिखलाच्या भागात जाणे धोक्याचे असल्यामुळे बाकी अनेक पक्षी अजूनही तिथेच पडलेले आहेत.
राज्यात एकाच आठवड्यात अशी दुसरी घटना आहे. मागच्या गुरुवारी जोधपूरच्या खिनचान भागात ३७ डीमोसेल क्रेन मृत आढळले होते. त्यांचाही व्हिसेरा परीक्षणासाठी पाठवण्यात आला होता आणि अहवाल अजून आलेला नाही.
मूळ बातमी
COMMENTS