कर्नाटकात राजकीय अनिश्चितता

कर्नाटकात राजकीय अनिश्चितता

कर्नाटकात आमदारांचे जे राजीनामा नाट्य घडले त्यामागे सिद्धरामय्या यांची खेळी असल्याचे बोलले जाते. सिद्धरामय्या यांना सत्ताआघाडीत महत्त्व हवे असल्याने ते पडद्याआडून गेम खेळतात असा आरोप त्यांच्यावर होत आहे.

ज्योतिरादित्य गटातील आमदारांचे काय होणार?
नरसिंहानंदकडून ‘हर घर तिरंगा’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
पक्षांतर आणि सामान्य मतदार

कर्नाटकात सत्तेवरून जे काही नाट्य सुरू आहे त्याने राजकीय पंडितांना अनेक दिशांनी विचार करायला भाग पाडले आहे.

गेले १४ महिने कर्नाटकातले जेडीएस-काँग्रेस सरकार पडावे म्हणून भाजप आटोकाट प्रयत्न करत आहे. दोन पक्षांच्या आमदारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे त्यांचे प्रयत्न तर सतत सुरू आहेत. भाजपला काहीही करून विधानसभेत बहुमताचा १०६ चा आकडा हवा आहे.

गेल्या आठवड्यात काँग्रेस व जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामे दिले तर सोमवारी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामे देऊन सरकारपुढे पेचप्रसंग उभा केला. सोमवारी सकाळीच एक अपक्ष उमेदवार एच. नागेश यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर एच. नागेश भाजपचे एक नेते एच. संतोष यांच्यासोबत एका चार्टर्ड विमानाने जाताना दिसले. एच. संतोष हे कर्नाटक भाजपच्या अध्यक्षांचे अत्यंत निकटचे समजले जातात.

भाजपचे आणखी एक ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा मुंबईत आहेत असे समजते. मुंबईत १० बंडखोर आमदार एका हॉटेलमध्ये आहेत त्यांच्या सोबत येडियुरप्पा असल्याचे बोलले जात होते. पण आता हे सर्व आमदार गोव्यात गेल्याचे बातम्यांवरून कळते.

सध्याचे एकूण वातावरण पाहता भाजपच्या टप्प्यात सत्ता दिसत आहे. त्यांच्याकडे पर्याप्त आमदार संख्या आहे असेही दिसत आहे. पण ज्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे अद्याप मंजूर करण्यात आलेले नाहीत. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांपर्यंत अजून गेलेले नाही पण अध्यक्षच रजेवर गेलेले आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी एका कार्यक्रमासाठी अमेरिकेस गेले असताना काँग्रेस व जेडीएसच्या १४ आमदारांनी राजीनामे दिले होते. या १४ आमदारांची यादी पाहिल्यास काही आश्चर्यकारक गोष्टी पाहावयास मिळतात.

या यादीत रामलिंग रेड्‌डी व त्यांची मुलगी सौम्या रेड्‌डी आहेत. हे दोघेही काँग्रेसचे आमदार आहेत. सौम्या रेड्‌डी यांनी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत आपण उपस्थित राहणार असल्याचेही कळवले आहे.

स्थिर सरकारसाठी राजीनामे

बंगळुरुत हे सत्तानाट्य घडत असताना जेडीएसचे प्रमुख देवेगौडा यांचे जवळचे नेते विश्वनाथ यांनी राजीनामा दिला. विश्वनाथ यांनी आपला राजीनामा राज्यात स्थिर सरकार राहावे म्हणून दिल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. बहुसंख्य आमदारांनी मुंबईत रवाना होण्याअगोदर अशाप्रकारचे मत व्यक्त केले आहे. हे सर्व आमदार भाजपच्या जवळ गेल्याचे स्पष्ट दिसत असताना भाजपचे नेते मात्र आमचा या राजीनामा सत्राशी काही देणेघेणे नसल्याचा दावा करताना दिसतात.

अपक्ष उमेदवार नागेश यांनी राजीनामा देणे ही एक सत्तानाट्यातील एक कलाटणी देणारी घटना होती. पण नागेश हे काँग्रेसचे संकटमोचक व राज्याचे जलसंसाधनमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अत्यंत जवळचे आहेत. नागेश यांनी यापूर्वीही असाच एकदा राजीनामा दिला होता.

नागेश यांच्यानंतर मग उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा, गृहमंत्री एम. बी. पाटील, जमीर अहमद, कृष्णा बायर गौडा व अन्य काहींनी राजीनामे दिले. या राजीनाम्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक ट्विट केले. त्यात ते म्हणतात, मंत्रिमंडळाची फेररचना करण्यासाठी आमच्या मंत्र्यांनी राजीनामे स्वयंस्फूर्तीने दिले आहेत.

सोमवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेवरून परत आले व त्यांनी परिस्थिती समाजावून घेतली. आता सभापती रमेश कुमार यांच्या हातात सूत्रे गेली असून त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी राज्यपालांकडे काही वेळ मागितला आहे.

पक्षांतरबंदी कायदा

या सत्तानाट्यात काँग्रेस व जेडीएसला बंडखोर आमदारांशी चर्चा करण्यास वेळ हवा आहे आणि तसे प्रयत्नही चालले आहेत. पण या बंडखोर आमदारांवरही पक्षांतरबंदी कायद्याची टांगती तलवार आहे.

घटनातज्ज्ञ अशोक हरनहल्ली यांच्या मते, या घडीला हा कायदा लागू करण्याची शक्यता कमी दिसते. कारण हे आमदार त्यांच्या पक्षात अजून आहेत त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला नाही.

कायद्याच्या लढाईत एखादा आमदार पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरला तरी त्यावर शिक्कामोर्तब होण्यास एक वर्षांहून अधिक वेळ जाईल. तोपर्यंत बऱ्याच राजकीय घडामोडी घडून येतील.

सिद्धरामय्या यांचा गेमप्लॅन?

कर्नाटकात आमदारांचे जे राजीनामा नाट्य घडले त्यामागे सिद्धरामय्या यांची खेळी असल्याचे बोलले जाते. सिद्धरामय्या यांना सत्ताआघाडीत महत्त्व हवे असल्याने ते पडद्याआडून गेम खेळतात असा आरोप त्यांच्यावर होत आहे.

काही महिन्यांपूर्वी देवेगौडा व कुमारस्वामी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांनी सिद्धरामय्या यांच्या पडद्यामागून सुरू असलेल्या कारवायांची राहुल गांधी यांना माहिती दिली. सिद्धरामय्या यांना राज्यात त्यांचे अल्पसंख्याक व मागास जातींचे ‘अहिंदा’ समीकरण अधिक मजबूत करायचे आहे. त्यामुळे ते सत्तेला आव्हान देत असतात असे जेडीएसचे म्हणणे आहे.

सिद्धरामय्या हे पूर्वाश्रमीचे जेडीएसचे नेते होते. पण देवेगौडांशी त्यांचे पटत नसल्याने ते पक्षातून बाहेर पडले. आता देवेगौडांवर राजकीय मात करायची या ईर्षेने सिद्धरामय्या पेटलेले आहेत.

दक्षिणेतील राज्यात अल्पसंख्याक जातींचे राजकारण हाताळण्याचे कसब सिद्धरामय्यांकडे आहे आणि तशी काँग्रेसला गरजही आहे. म्हणून काँग्रेसचे मुस्लीम आमदार जमीर अहमद यांनी आपला घोडेबाजार होऊ नये याची दक्षता घेत अज्ञातस्थळी राहणे पसंद केले आहे.

या सगळ्या राजकीय नाट्यात भाजपच्या गळाला आमदार लागले तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून येडियुरप्पा यांच्या गळ्यात माळ घालण्यासाठी भाजपने तयारी केलेली नाही. संघपरिवारातील एक नेते बी. एल. संतोष हे येडियुरप्पा यांना आव्हान देऊ शकतात.

एकूणात कर्नाटकात सिद्धरामय्या सरस ठरतात की अमित शहा हे काही दिवसांतच कळेल.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0