‘भारत हल्ला करेल या भीतीने पाक लष्करप्रमुख घाबरले’

‘भारत हल्ला करेल या भीतीने पाक लष्करप्रमुख घाबरले’

नवी दिल्लीः बालाकोट हल्ल्यादरम्यान पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात गेलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका न केल्यास भारत ९ वाजे

झुंडशाही : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काय झाले?
भारतीय ठाण्यानजीक चीनचे शस्त्रसज्ज सैन्य तैनात
‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी

नवी दिल्लीः बालाकोट हल्ल्यादरम्यान पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात गेलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका न केल्यास भारत ९ वाजेपर्यंत पाकिस्तानवर हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांना घाम फुटला होता व त्यांचे पाय थरथरत होते, असे विधान पाकिस्तानमधील विरोधी पक्ष पीएमएल-एन या पक्षाचे नेते व खासदार सरदार अय्याज सादिक यांनी पाकिस्तानच्या संसदेत बुधवारी केले.

पीएमएल-एन पक्ष हा पाकिस्तानातील एक प्रमुख विरोधी पक्ष असून  या पक्षाचे सरकार असताना सादिक हे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सभापतीही होते.

दरम्यान सादिक यांच्या विधानानंतर इम्रान खान सरकारमधील एक मंत्री फवाद चौधरी यांनी आपल्या सरकारला वाचवण्याच्या दृष्टीने पुलवामा हल्ला इम्रान खान सरकारनेच केला होता. आम्ही हिंदुस्तानात घुसलो व इम्रान खान सरकारच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या जनतेचे हे यश होते. आम्ही सर्व या यशात सहभागी होतो, असे विधान नॅशनल असेंब्लीत केल्याने खळबळ उडाली. या विधानानंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीत येईल हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या विधानात दुरुस्ती करत पुलवामा घटनेनंतर आम्ही भारतात घुसून त्यांना मारले असे विधान केले.

सरकारवर आरोप करताना सादिक यांनी पाकिस्तानचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी हा प्रसंग संसदीय सदस्यांच्या एका बैठकीत कथन केल्याचे सांगत या बैठकीत पाकिस्तान पीपल्स पार्टी, पीएमएल-एनचे सदस्य व लष्करप्रमुख बाजवा हेही उपस्थित होते, असे स्पष्ट केले. सादिक यांनी ही घटना नेमकी केव्हा घडली याची तारीख मात्र सांगितलेली नाही. मात्र १ मार्च २०१९ रोजी रात्री अभिनंदन यांची पाकिस्तानने सुटका झाली होती.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील बालाकोट येथील २६ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यादरम्यान भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ विमान पाकिस्तानने पाडले व त्यांना ताब्यात घेतले. पण या चकमकीत अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमानही पाडले होते.

नंतर अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी व तत्कालिन परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत अभिनंदन यांची सुटका न केल्यास भारत हल्ला करेल अशी भीती व्यक्त झाल्यानंतर बाजवा यांचे पाय थरथरू लागले व त्यांना घाम येऊ लागला होता, असे सादिक यांचे म्हणणे आहे.

दरम्यान सादिक यांच्या या विधानाचा पाकिस्तानचे दळणवळणमंत्री मुराद सईद यांनी निषेध करत सादिक हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या पाकिस्तानविरोधी प्रचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0