‘द बंगलोर रिव्ह्यू’ (The Bangalore Review) मधला आशुतोष पोतदारच्या साहित्यिक वाटचालीवर आधारित मुलाखत वजा दीर्घ लेख (https://bangalorereview.com/2021/06
‘द बंगलोर रिव्ह्यू’ (The Bangalore Review) मधला आशुतोष पोतदारच्या साहित्यिक वाटचालीवर आधारित मुलाखत वजा दीर्घ लेख (https://bangalorereview.com/2021/06/the-threshold-perspective/), विशेषतः त्यातला कवितांवरचा मजकूर मी आवडीने वाचला. इतरांनी केलेल्या परीक्षणांइतकीच कवी किंवा लेखकांनी मांडलेली स्वतःच्या लेखनाविषयीची निरीक्षणं मला आकर्षक वाटतात. मुलाखतीत आशुतोष पोतदारने म्हणलंय, “कविता हा माझा स्वतःशी साधलेला संवाद आहे.” ते प्रमाण मानलं तर ‘खेळ खेळत राहतो उंबरा’ (यापुढे नुसतं ‘उंबरा’) या कवितासंग्रहातल्या काही कवितांमधून हा संवाद कवीच्या अंतर्मुखतेत नाही, तर कवितेत टिपलेल्या प्रकट हालचाली आणि हकिकतींच्या बाह्यतेत प्रतीत होतो.
भालचंद्र नेमाडे यांनी एका कादंबरीत, “तो खिडकीतून बाहेर डोकावून पाहतो तेव्हा तिथे त्याला तो स्वतः दिसत नाही”, अशा अर्थाचं काही लिहिलंय. जणू स्व बाहेर नसतो, स्व आत असतो किंवा आतलं अबोल अप्रकट अस्तित्व म्हणजेच स्व. हेही प्रमाण मानलं तर एकीकडे ‘स्व’ची अदृश्य अंतस्थता आणि दुसरीकडे बहिःर्लक्षी दृश्यरूपांमध्ये परिणाम पावणारा कवीचा कवीशी संवाद या अनन्य अवकाशांना ‘उंबरा’ मधली कविता छेद देते. म्हणून संग्रहाला ‘खेळ खेळत राहतो उंबरा’ म्हटलंय की काय !?
उदाहरणार्थ संग्रहातल्या पहिल्या एकदोन कविता पाहू.
वाड्यावरल्या पुराण पुरषाचा आचका
(आजोबांच्या अखेरच्या क्षणांसाठी)
वाळणवेळेला
रेडिओवरल्या बातम्यांचे आवाज
स्मशानवेगाने घुमत गेले
घोंगडे सरकले
टक्का आचकला
मोसंबीचा रस
डोळ्यात चरकला
खांबावरचे वसे
जिभेच्या ताकदीने पिचकले
अंगणात पसरलेले जोंधळे
कोनाड्यात शिरले
आवळलेले पोत्याचे मुंडके बिथरले
वैकुंठीच्या विमानाला बघून
मोकलली पालखी
हे पंढरीराया …
कटीवर हात
वाद स्थिर, बिजागिरी किर्र
मोकलली पालखी, कोकलला मेळा
अठरा धान्याचे पीठ अंगणात
टाळ-मृदंग, ज्ञानबा-तुकाराम.
मामी आजी – १
खाली वर वर खाली इकडे तिकडे दिवसभर
वर वर भर भर उरका उरकी अजब काम
सतत सतत मर मर जग भर मायाळू आय
हशा हुश्श साय सुट्ट नाय काय गाणारी गाय
पदर मोड जीव तोड गिरण गाव बोलावे काय
दळण कांडण भात भरण गाव जेवण भरली माय
घरात घडलेल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचं सावट आणि त्याला धैर्याने सामोरं जाताना केलेल्या अपरिहार्य व्यवहारांचं वर्णन इथे केवळ दृक्-श्राव्य-गती वाचक प्रतिमांच्या रूपात कसं नेमकं केलेलं आहे. वर उर्ध्रुत केलेल्या आणि ‘उंबरा’ मधल्या इतर काही कविता वाचताना राहूनराहून फार फार पूर्वी पाहिलेला रॉबर्ट ब्रेसॉंचा ‘पिकपॉकेट’ डोळ्यासमोर तरळला ज्यात प्रामुख्याने चेहेरे किंवा चेहेऱ्यांवरचे हावभाव नाही तर हातांच्या हालचाली, विशेषतः त्यातल्या पात्रांनी केलेली हातसफाई टिपलेली आठवते. चेहेरे टिपले तरी चेहेऱ्याला अनाठायी प्राधान्य न देता, इतर अवयवांसारखा हा आणखी एक अवयव अशा बेताने टिपले आहेत. ब्रेसॉं त्याच्या अभिनेत्यांना अभिनयातून भावना, शैली किंवा नाट्यमय परिणाम साधण्यासाठी केलेली आवाजातल्या चढउतारांची कसरत इत्यादी सगळं वगळायला सांगत असे, असं कळलंय. त्यांच्या हालचाली फ़ॅशन शो मधली मॉडेल्स करतात तशा स्वतःतून नाही, तर बाहेरून संचालित होणं त्याला अपेक्षित असे. ‘पिकपॉकेट’ मधल्या रुपेरी चंदेरी आवर्त-चिन्हांसारख्या हावभावविरहित हालचालींमधून ‘उंबरा’ मधल्या कवितांचा आशय आकाराला येतो. आतून बाहेर नाही. बाहेरून आत.
घासून गुळगुळीत झालेल्या, कंगोरे आणि मुद्रा मिटलेल्या नाण्याच्या धातूचं ऐतिहासिक, प्रादेशिक चलनी मूल्य नाहीसं होऊन त्याचं अंगभूत सर्वकालीन सार्वत्रिक मूल्य नव्यानं सिद्ध व्हावं, तसं ‘उंबरा’ मधल्या बिनचेहेऱ्याच्या शाब्दिक रेखाचित्रांना सार्वत्रिक परिणाम प्राप्त होतो. प्रत्येक वाचकाला आपल्या खास ठेवणीतल्या, आठवणीतल्या मुद्रा आणि मूल्यं त्यात भरून, ओळी आपल्याशा करून, वाचता येतील अशा या कविता आहेत. आणि एकदा हावभाव आणि हातवारे यांना छाट दिल्यावर, माणूस काय, घरदार काय किंवा शहर काय? पक्षी काय आणि आठवणी काय? साऱ्यांचंच सूत्रसंचालन शब्दांच्या, अक्षरांच्या भौतिक मितीतून होतं. ‘माय कर्ली बॉय’ या चार ओळींच्या सुरेख कवितेत ते कसं नेमकं उमटलं आहे.
माय कर्ली बॉय
तू लिहितोस अक्षरे तेव्हा
समुद्रमंथनाची चाहूल लागते
तू पुसतोस अक्षरे तेव्हा
भूमिगत सीता रामायण रिवाईंड करते.
या कवितेत ‘अक्षरां’ना बहाल केलेल्या अदिम अस्तित्वाची झलक संग्रहातल्या शेवटच्या ‘उच्चार तू हा शब्द’ ह्या कवितेत प्रकर्षाने आणि अधल्या मधल्या कवितांमध्ये सुधा वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येते.
थिएटरची अविर्भावी भाषा डावलून सिनेमातल्या हलत्या झुलत्या वाहत्या प्रतिमांची भाषा अंगिकारणाऱ्या ब्रेसॉंप्रमाणे; एरवी सादरीकरणात खरीखुरी किंवा अंतीम परिपूर्ती पावणाऱ्या नाट्यसंहिता लिहिणारा आशुतोष ‘उंबरा’ मधल्या कवितांच्या उंबरठ्यावरून नाटकाच्या जगाबाहेरचं जग किंवा नाट्यानुभवाच्या बाहेरचं अनुभवविश्व जोखू पाहतो. नाट्यमय सादरीकरणाशी तो घेऊ पहात असलेली तात्पुरती किंवा कवितेपुरती फारकत सिनेमातल्यासारखं झूम इन आणि झूम आऊट करणाऱ्या ‘नक्षत्र’ या कवितेत कशी ठळक दिसते.
नक्षत्र
घर, घराभोवती गवत
गवत, गावता भोवती डोंगर
डोंगर, डोंगराभोवती आकाश
आकाश, आकाशाभोवती प्रकाश
रखरखता प्रकाश
प्रकाश, प्रकाशातलं वाळकं गवत
गवत, गवताखालचा वैराण डोंगर
डोंगर, डोंगराखालचे घर
घर, घरातले ओघळत चाललेले नक्षत्र.
घर, घराभोवती गवत.
………
खेळ खेळत राहतो उंबरा
आशुतोष पोतदार
कॉपर कॉईन पब्लिशिंग
किंमत: १९९ रुपये.
COMMENTS