किरण नगरकर : कथनाच्या नव्या वाटा रूढ करणारा लेखक

किरण नगरकर : कथनाच्या नव्या वाटा रूढ करणारा लेखक

ऎन्द्रिय संवेदन, हिंसा, प्रेम, अमूर्त भय, अबस्ट्रॅक्ट भावना, मानवी जीवनव्यवहार व्यापून उरलेली संभोगेच्छा, समलिंगी आकर्षण कशाचंही वावडं नसणारी नगरकरांची कथाशैली अनुभवणं म्हणजे खऱ्या अर्थाने आधुनिक साहित्य वाचण्यासारखं आहे. त्यांचं जाणं मराठी आणि भारतीय साहित्याला खिळखिळं करून गेलं आहे.

बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी : नितीश कुमार यांचा राजीनामा
राज्यात खरीपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण
अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

आईला तिचे बडोद्यातले दिवस आठवले. “मॅट्रिक पास झाली आणि तिचं लग्न करून दिलं घरच्या लोकांनी. आमंत्रण दिलं नाही. जायच्या अगोदर दोन मिनिटं भेटायला आली. वर्षाला एक कार्ड, कुठं जिवंत आहे कळवीन तुला. सप्टेंबर पाचला. तिचं पत्र ज्या वर्षी येणार नाही त्या वर्षी ती खतम.’

किरण नगरकर यांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ कादंबरीतील या ओळी आहेत. प्रत्येक वर्षी पाच सप्टेंबरला आईच्या मैत्रिणींचं नेमानं येणारं पत्र. ज्या वर्षी ते येणार नाही, तेव्हा समजायचं मैत्रीण आता या जगात नाही.  कुठल्याशा अतर्क्य योगायोगाने किरण नगरकर नेमके पाच सप्टेंबरला गेले.

पण आपल्याला त्यांचं पत्र याआधी आलेलं नाही. इथून पुढेही येणार नाही. त्यांची पुस्तकं मात्र काही वर्षांच्या अंतराने नेमाने यायची. आपण त्यांची वाट पाहायचो. नगरकरांचं अखेरचं पुस्तक नुकतंच दोन महिन्यांपूर्वी आलं. ‘The Arsonist’. त्यात कबीराचं जीवन नगरकरांनी समकालीन अवकाशात पडताळून पाहिलं. ‘God’s little soldier’ मध्ये या कबीराचं जीवन मुख्य निवेदनाच्या मध्येमध्ये डोकावत होतंच. पण लेखकाला ते पुरेसं वाटलं नाही. मुळात कबीराचं जीवन कादंबरीतील उपकथन म्हणून शोभणारं नव्हतंच. किरण नगरकरांनी त्यावर स्वतंत्र कादंबरी लिहिली. ‘The Arsonist’ हीच ती कादंबरी. या वर्षीच्या जून महिन्यात प्रकाशित झाली. त्यानंतर पाच सप्टेंबरचा दिवस आला. किरण नगरकरांची पुढील कादंबरी आता येणार नाही. भारतीय वाचकांसाठी ही वेदनादायी गोष्ट आहे.

वस्तुतः किरण नगरकर मराठी होते, तेव्हा शेवटची ओळ ‘मराठी वाचकांसाठी वेदनादायी गोष्ट आहे’, अशी असायला हवी होती. पण ती तशी लिहावीशी वाटली नाही. मराठी साहित्य व्यवहाराने नगरकरांना दीर्घकाळ उपेक्षित ठेवले. नगरकरांनी त्यांची पहिली कादंबरी मराठीतून लिहिली. ७४ साली त्यांची ‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही कादंबरी मराठीतून प्रकाशित झाली. तिची दुसरी आवृत्ती निघायला जवळपास तीन दशकं जावी लागली. या तीन दशकांत अनेक सुमार आणि तद्दन कादंबऱ्यांच्या आवृत्यांवर आवृत्या निघत होत्या. नगरकर अगदीच दुर्लक्षित राहिले असंही नाही. थोर लेखक-समीक्षकांनी ‘सात सक्कं त्रेचाळीस’ची अभूतपूर्व कादंबरी म्हणून गौरव केला. तिला खऱ्या अर्थाने आधुनिक कादंबरी म्हटलं. साठोत्तरी कालखंडातील महत्त्वाच्या लेखकांत त्यांची गणना केली गेली. पण एवढंच. कादंबरीची विक्री झाली नाही. मराठी वाचकांना त्यांच्या लिखाणाचं मोठेपण समजलं नाही. त्यांच्या लेखनातली आधुनिकता रुचली नाही किंवा तिचं अजिबात आकलन करून घेता आलं नाही.

समोर आलेल्या जीवनाची थेट आणि कुठल्याही प्रकारच्या सुशोभीकरणाला नकार देणारी त्यांची शैली आपलीशी करता आली नाही. नगरकरांना निश्चितच हे सारं निराशाजनक वाटलं असणार. शंकाच नाही. मराठीत लिहिणंही थांबवलंच त्यांनी. त्यानंतर आजपर्यंतचं सारं लिखाण त्यांनी इंग्रजीतून केलं. एक श्रेष्ठ मराठी लेखक चार दशकांपूर्वीच आपण मारून टाकला. थोर इंग्रजी लेखक किरण नगरकर पाच सप्टेंबरला गेले म्हणून आपण अतोनात हळहळलो.

मराठी वाचकांनी नगरकरांना उपेक्षित ठेवलं असलं तरी ‘सात सक्कं त्रेचाळीस’मधून नगरकरांनी आपलं लेखक म्हणून श्रेष्ठत्व नक्कीच सिद्ध केलं आहे. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली त्याच काळात मागेपुढे त्यांच्या इंग्रजी कादंबऱ्यांची मराठी भाषांतरे येत होती. ‘ककल्ड’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मराठी वाचकांनीही त्यांच्या कादंबऱ्यांकडे डोळसपणे पाहायला सुरवात केली. ‘सात सक्कं त्रेचाळीस’संबंधी पुन्हा नव्याने चर्चा होऊ लागली. ‘सात सक्कं…’ नंतरचं सारं लिखाण नगरकरांनी इंग्रजीतून केलं असलं आणि देश-विदेशात त्यांच्या कादंबऱ्या महत्त्वाच्या गणल्या गेल्या असल्या, तरी जाणकार वाचक, समीक्षक (मराठीतले) आजही ‘सात सक्कं त्रेचाळीस’ला किरण नगरकरांची सर्वोच्च कृती म्हणून मान्यता देताना दिसतात.

‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही एक वेगळ्याच धाटणीची कादंबरी आहे. कादंबरीला सलग असे कथानक नाही. जे आहे त्याला कथानक म्हणावे की नाही तेही स्पष्ट नाही. ज्याबद्दल सर्वाधिक चर्चा झाली असं सिनेतंत्राला पोषक असणारं फ्लॅशबॅक तंत्राच्या साहाय्याने पुढे नेता येईल अशी मांडणी नाही. इथे घटितांचे केवळ तुकडे आहेत. त्यांची मांडणीही संगतवार केलेली नाही. वस्तुतः कथनाच्या कुठल्याच पारंपरिक संकेतांना शरण जाणारी ही कादंबरी नाही. ज्या जीवनानुभवाविषयी लिहायचे तेच मुळातच संगतवार नाही, तर त्याची मांडणी तरी संगतवार कशी करायची? तसं करणं म्हणजे जटिल वास्तवाचं सुलभीकरण करण्यासारखं होईल. या पेचाला नगरकर येथे सामोरे गेले आहेत. वास्तवाची जटीलता, अनुभवाची व्यामिश्रता पुरेशा सामर्थ्याने फिक्शनमध्ये प्रक्षेपित करायची तर त्यासाठी रुळलेल्या वाटा सोडून नव्या वाटा शोधाव्या लागतील याचं त्यांना भान आहे. ‘सात सक्कं त्रेचाळीस’मध्ये नगरकरांनी आपली निराळी वाट नक्कीच शोधली आहे.

वर सांगितल्याप्रमाणे कादंबरीला सलग असे कथानक नाही; तर घटितांचे अनेक तुकडे आहेत. नगरकरांनी त्या तुकड्यांची कलावंताच्या कौशल्याने मांडणी केली आहे. निवेदनाचा ओघ, नायकाचं स्वगत, लेखकाचा सुप्त स्वर आणि हुकुमी भाषा यांच्या गारूड करणाऱ्या मिश्रणातून एका समोर दुसरे असे हे तुकडे न ठेवता पिकासोच्या क्युबिजम शैलीतल्या चित्रांसारखी त्यांची मांडणी केली आहे. त्यात घटिताचा आरंभ, तिची अखेर आणि मध्य सारे चित्रातल्या दृश्यासारखे एकसमायावच्छेदेकरून  दिसू लागतात. ऐन्द्रिय संवेदनांची एक लाटच वाचकाच्या जाणिवेवर चालून येते. साध्यासुध्या घटनांमधील असंबद्ध कंगोरे विलक्षण स्पष्ट होऊन दिसू लागतात. ‘तुम्ही स्वीकारलं काय आणि लाथाडलं काय, आपल्याला भागवावं लागतं ते याच जगाशी’ या कटू सत्याची आठवण करून देतात.

या कादंबरीत किरण नगरकरांनी कथनाच्या लवचिक सीमांना त्यांच्या कमाल मर्यादेपर्यंत ताणलं आहे. इतकं की, त्यांच्या नंतरच्या इंग्रजीतून लिहिलेल्या कादंबऱ्यांतही त्यांना त्या सीमा ओलांडता आल्या नाहीत. भाषेने जणू त्यांच्या लेखणी समोर शरणागती पत्करली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांची सरमिसळ झाली आहे. असंबद्ध प्रकट करताना तर  भाषांनी आपली ठरवून दिलेली हद्द सोडून दुसऱ्या भाषेच्या हद्दीत अतिक्रमण केलं आहे. “कुशंक सॉरू नकोस. एकतर पाहिले तीन प्रहर मुडायचं आणि मग दुसरे तीन प्रहर सॉरायचं. सगळं हसण्यावारी घेऊ नको, कुशंक.’  ‘सॉरायचं’, ‘मुडायचं’ हे शब्द लेखकाने नक्कीच योजून पेरलेले नाहीत. निवेदनाच्या ओघात त्यांची तशी मोडतोड झाली आहे. भाषेला दुर्बोध करण्याची निकड नगरकरांना ठिकठिकाणी जाणवली आहे, ती केवळ विषयामध्ये गती नाही म्हणून नव्हे; तर विषयाची व्यामिश्रता नेमकी मांडण्यासाठी.

‘सात सक्कं त्रेचाळीस’मध्ये नगरकरांनी केवळ प्रयोगासाठी म्हणून प्रयोग केले नाहीत तर त्यांना अभिप्रेत आशय व्यक्त करायला केवळ हाच मार्ग असू शकतो हे जाणवल्यामुळे केले आहेत. अनेक अर्थांनी ‘सात सक्कं त्रेचाळीस’ मराठीतील महत्त्वाची कादंबरी आहे.

नगरकर स्वतः सांगतात तसे, त्यांचा मूळ पिंड गोष्टी सांगणाऱ्याचा आहे. हा पिंड त्यांनी किती उत्तमरित्या जोपासला आहे हे त्यांच्या इंग्रजी कादंबऱ्या वाचताना ध्यानात येतं. ‘Cuckold’ (प्रतिस्पर्धी) या कादंबरीत त्यांनी मीरेचा पती भोजराजची सांगितलेली, वाचकाला अखेपर्यंत गुंतवून ठेवणारी गोष्ट याची साक्ष आहे. ऐतिहासिक कथानक. पण येथेही नगरकरांनी ऐतिहासिक कथनाचा रूढ मार्ग पत्करला नाही. समकालीन भाषेत, समकालीन जाणीवा घेऊन, आजची मूल्ये गतकाळच्या कथनाला लावून ती पुराणी कथा सांगितली. “कादंबरीचं स्वरूप अरेबियन नाईट्सचं असलं, तरी तिच्या लिखाणाची शैली बेकेटच्या जवळ जाणारी आहे.’ अशा शब्दांत समीक्षकांनी तिचा गौरव केला.

ऎन्द्रिय संवेदन, हिंसा, प्रेम, अमूर्त भय, अबस्ट्रॅक्ट भावना, मानवी जीवनव्यवहार व्यापून उरलेली संभोगेच्छा, समलिंगी आकर्षण कशाचंही वावडं नसणारी नगरकरांची कथाशैली अनुभवणं म्हणजे खऱ्या अर्थाने आधुनिक साहित्य वाचण्यासारखं आहे. त्यांचं जाणं मराठी आणि भारतीय साहित्याला खिळखिळं करून गेलं आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0