हिंदू-मुस्लीम संवाद - मुस्लिम शासकांकडून युद्धात जिंकलेल्या सैनिकांना आणि त्या प्रदेशातील लोकांना पुढे अस्तित्व टिकवण्यासाठी धर्मांतर करण्याची अट घातली जाई. नसता जिवाला मुकाल. अशी अध्याहृत धमकी असे. असे करायला नाकारणाऱ्या लोकांना एक तर ठार मारले जाई किंवा तत्कालीन रिवाजाप्रमाणे गुलाम म्हणून विक्री आणि स्त्रियांना भोगवस्तू म्हणून वापरणे असे प्रकार असत.
धर्म आणि राजकीय व्यवस्था या जगातील दोन अशा व्यवस्था आहेत की त्यांच्या संघटित स्वरुपात त्यांचा जागतिक इतिहास हा बराचसा समांतर आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दोघांचीही सत्ता आणि माणसांचे वर्गीकरण करणे ही उद्दिष्टे समान असतात. कधी कधी आपल्याला या दोघांमध्ये संघर्ष आढळतो. कधी कधी एक व्यवस्था दुसऱ्या व्यवस्थेहून बळकट असलेली दिसते. तर बऱ्याच वेळा या दोन्ही व्यवस्था एकमेकींच्या हातात हात घालून सहकार्य करताना आढळतात. भारतीय उपखंडातील आजच्या मुसलमान लोकसंख्येचा विचार अनेक तऱ्हांनी करून झालेला आहे.
इसवीसनाच्या ११व्या शतकाआधी सद्य पाकिस्तानातील पश्चिमेकडील काही प्रांत वगळता भारताच्या मुख्य भूमीवर इस्लाम हा धर्म म्हणून ज्ञात होता असे म्हणता येत नाही. येणारे मुस्लिम आक्रमक हे सातत्याने लढाया करीत होते आणि विजयामागे विजय मिळवीत होते. धर्मसत्ता आणि राजकीय सत्ता अशा दोन्ही सत्तांचा विस्तार करणे ही उद्दिष्टे आणि भारतासारखा सर्वथैव संपन्न देशात शक्य होते. त्यामुळे युद्धात जिंकलेल्या सैनिकांना आणि त्या प्रदेशातील लोकांना पुढे अस्तित्व टिकवण्यासाठी धर्मांतर करण्याची अट घातली जाई. नसता जिवाला मुकाल. अशी अध्याहृत धमकी असे. असे करायला नाकारणाऱ्या लोकांना एक तर ठार मारले जाई किंवा तत्कालीन रिवाजाप्रमाणे गुलाम म्हणून विक्री आणि स्त्रियांना भोगवस्तू म्हणून वापरणे असे प्रकार असत.
भारतात अगदी सुरुवातीला झालेली धर्मांतरे ही अशाच स्वरूपाची होती. परंतु जसजसे आक्रमक मुसलमान भारतात पुढे सरकू लागले तसतसे त्यांचे स्वतःचे व त्यांनी जिंकलेल्या प्रजेचे सर्व तऱ्हेचे प्रश्न जटिल होऊ लागले. भारतात झालेल्या मुसलमान धर्मांतरांविषयी अनेक तऱ्हांची मते इतिहासकारांनी मांडलेली आहेत. इतिहास लिहीत असताना ज्या तत्कालीन उपलब्ध नोंदी आहेत त्यांचे प्रामुख्याने दोन स्रोत आहेत. एक जेत्यांचा मुस्लिम स्रोत आणि दुसरा जितांचा हिंदू स्रोत.
उत्तरकालीन इतिहासकारांपैकी फार थोड्यांना स्वतःची मते, स्वतःचे सामाजिक स्थान आणि स्वतः ज्या समाजात वावरतो त्या समाजाची आणि स्वतःची मूल्ये बाजूला ठेवून या धर्मांतरांचा निरपेक्ष विचार करता आला आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे अशा इतिहासकारांच्याही आता दहा बारा पिढ्या भारतात होऊन गेल्या आहेत. त्यामुळे ब्रिटिश इतिहासकारांच्या पहिल्या एक दोन पिढ्यांनंतर भारतीय इतिहासकारही आता साताठ पिढ्यांपासून या मुसलमान धर्मांतरांचा विचार करीत आहेत.
मुसलमान धर्मांतरांविषयी ज्या निरनिराळ्या थिअरीज् मांडल्या जातात त्यांचा आधी आढावा घेऊ.
१) मुसलमान धर्मानुसार आणि प्रस्थापित, प्रचलित शरियानुसार जिंकलेले युद्धकैदी, त्यांची कुटुंबे आणि इतर प्रजाजन यांचा निर्णय केला जाई. जे धर्मांतर करण्यास राजी असतील त्यांना माफक दंड करून त्यांचा जीव आणि मालमत्ता असे दोन्ही बहाल केले जाई. असे न करणाऱ्या पुरुष सक्षम कैद्यांना सरसकट सार्वजनिकपणे ठार मारले जाई. तरुण आणि सुंदर स्त्रिया गोळा करून त्यांची वाटणी युद्धसंपत्ती म्हणून केली जाई. काही जणींना त्यांच्या सामाजिक स्थानानुसार सत्ताधाऱ्यांच्या जनानखान्यात जागा मिळे. लहान मुले आणि मुली ताब्यात घेऊन त्यांची प्रचलित शरिया कायद्यानुसार व्यवस्था लावली जाई.
२) अशा प्रदेशातून परत जात असताना मागे जो अधिकारी नेमला जात असे त्याला मदत करण्याची जबाबदारी बहुतांश वेळी स्थानिक धर्मांतरित आणि पूर्वीच्या सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठित असणाऱ्या इसमांकडे दिली जात असे. आजूबाजूच्या प्रदेशातील लोकांना घडणाऱ्या घटना समजावून सांगण्यासाठी धर्मप्रसारक माणसे नेमली जात असत.
३) प्रत्येक आक्रमक फौजेबरोबर काही धार्मिक आणि सूफी विचारसरणीच्या धर्मपंडितांना आमंत्रित केले जाई. यांचे प्रमुख काम हे आजूबाजूच्या माणसांना प्रेमाने इस्लामी धर्माची मूलतत्त्वे समजावून सांगणे हा असे. आक्रमक माणूस आणि हे सूफी सज्जन यांच्या जगण्यामध्ये आणि दैनंदिन वावरामध्ये इतका जमीन आसमानाचा फरक असे की, अगदी साधी मुसलमान नसणारी माणसे अशा वृत्तीने संत असणाऱ्या लोकांकडे तात्काळ आकर्षित होत असत.
३) भारतातील ब्राह्मणी धर्माचा प्रभाव इतका वाढला होता आणि जातीय व्यवस्थेतील शोषण एवढे वाढले होते की अस्पृश्य जातीतील लोकांसाठी इस्लाम हा खरोखरच मुक्तीचा एक मार्ग बनला होता. त्यामुळे भारतात झालेली धर्मांतरे ही प्रामुख्याने अशी इस्लामच्या जातीअंताच्या धोरणांमुळेच घडून आली होती! अशा हीन, कनिष्ठ जातींमधील लोकांसाठी प्रेषितप्रणित इस्लाम हा एक मुक्तीधर्म बनला होता.
५) हनफी आणि मालिकी या दोन प्रकारच्या शरिया पद्धतींनी भारतातील सेमिटिक नसणाऱ्या बहुईश्वरवादी हिंदूंना ज़िम्मी (dhimmi) स्थान मान्य करून त्यांचे प्रजा म्हणून सहअस्तित्व मान्य केले. मूळ शरियानुसार मुसलमान नसणाऱ्या लोकांना मुसलमान राज्यात राहण्यासाठी जिझिया नावाचा कर भरावा लागे. बाह्यात्कारी एकदा मुसलमान धर्म स्वीकारला की, अशा सर्व तऱ्हांच्या अन्याय्य करांपासून श्रीमंतांना आणि इतर सर्वांना मुक्ती मिळत असे. त्यामुळे अतिरिक्त कारभार वाचवणे आणि सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने उत्तम प्रजाजन असणे या साठीच भारतातली धर्मांतरे झाली. हनफी आणि मालिकी शरिया पद्धतींनी जर हिंदूंना ज़िम्मी स्थान दिले नसते तर भारतात सतत युद्धजन्य परिस्थिती राहिली असती.
६) भारतात धर्ममतांच्या वादविवादामध्ये मुस्लिम धर्ममत सर्वपरीने जिंकले. मुसलमान जीवनसरणी इथल्या सामान्य गोरगरीब माणसाला इतकी आवडली की अशी माणसे आपणहून मुसलमान होण्यासाठी धडपडू लागली.
वर दिलेले महत्त्वाचे काही मुद्दे नुसते वर वर जरी तपासले तर असे लक्षात येईल की भारतात झालेले मुसलमान धर्मांतर हे वास्तविक वरील सर्व कारणांच्या प्रभावामुळे घडून आलेले आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व धर्मांतरे पहिली सुमारे पाचशे वर्षे टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारतात घडून येत होती. यातल्या बळजबरीने धर्मांतर या सिद्धांताला पुष्टी देण्यासाठी एका अर्थशास्त्रीय ऐतिहासिक अभ्यास करणाऱ्या संशोधकाने असा निष्कर्ष काढला आहे की, भारतातली लोकसंख्या इसवीसनाचे ११वे शतक ते १५वे शतक या दरम्यान ३० दशलक्ष म्हणजे तीन कोटी एवढी कमी झाली. तर या निष्कर्षाचा तीव्र विरोध करताना दुसऱ्या तेवढ्याच तगड्या संशोधकाने ही लोकसंख्या याच कालावधीत साडेतीन कोटीने वाढल्याचा निष्कर्ष काढला आहे. दोन्ही निष्कर्ष उपलब्ध विदा जनगणनेसाठी आवश्यक पुरेशी विदा उपलब्ध नसल्याचे सांगून बाकी अभ्यासकांनी नाकारले आहेत.
मागली दोनशे वर्षे जी ऐतिहासिक साधने उपलब्ध झाली आणि जी अजूनही उपलब्ध होत आहेत त्यांचा स्वतःचे सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून जर विचार केला तर अशा निष्कर्षांला यावे लागते की वरीलप्रमाणे कुठल्या तरी एकाच मुद्द्यामुळे भारतात धर्मांतरे घडली म्हणणे हे वास्तवापासून दूर जाणारे असेल. इथून पुढे क्रमाने वर दिलेल्या काही मुद्द्यांचा विचार करून भारतातल्या मुसलमान धर्मांतरांमधले वास्तव समजावून घेण्याचा प्रयत्न करू.
राजन साने, हे हिंदू-मुस्लीम संवादाचे अभ्यासक आहेत.
COMMENTS