विवेकी समाजासाठी सिटीझन सायंटिस्टची गरज

विवेकी समाजासाठी सिटीझन सायंटिस्टची गरज

इतिहासाच्या सुरुवातीपासूनच नैसर्गिक घटनांतील किंवा जीवनातील साध्या साध्या प्रसंगामागील कारणांचा उलगडा न झाल्यामुळे आणि कुतूहल चाळवल्यामुळे मानवी इतिहा

‘१९८४’ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही – दिल्ली हायकोर्ट
दंतेवाडातील ग्रामस्थांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या याचिकाकर्त्याला ५ लाखांचा दंड
डॉ. गेल ऑमव्हेट: नव्या युगाची दिशा

इतिहासाच्या सुरुवातीपासूनच नैसर्गिक घटनांतील किंवा जीवनातील साध्या साध्या प्रसंगामागील कारणांचा उलगडा न झाल्यामुळे आणि कुतूहल चाळवल्यामुळे मानवी इतिहासामध्ये प्रयोग संस्कृतीने मूळ धरले असावे. पुढे याला तर्कनिष्ठ, उत्सुक आणि वैज्ञानिक प्रयोग करणाऱ्या व्यक्तींच्या जिद्दीने साथ दिली. त्याबरोबरच जीवनात सतत समोर येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सामूहिक उर्मीतून तपास-फेरतपास करताना सकस झालेला वास्तववादी- विवेकी दृष्टिकोन यातून वाढीला लागला. या सर्व विज्ञानवादी तत्त्वांनी-पद्धतींनी संपन्न झालेली संस्कृतीची पहाट आणि त्यातून निर्माण झालेली जीवनशैली इतिहासामध्ये पुनर्जागरण (रेनेसान्स), प्रबोधन (एनलायटनमेंट) म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणूनच विविध संकल्पनांचा आणि त्याबद्दलच्या निरीक्षणांचा धांडोळा घेताना आलेल्या अपयशानंतर केलेल्या ज्ञाननिर्मितीला अतिशय महत्त्व आहे.

अनेक शतके तत्त्वज्ञानातील, तत्कालीन ज्ञानव्यवस्थेतील बंडखोर हे “पारंपरिक शहाणपण” (Conventional Wisdom) कसोटी, पुरावा यांच्या आधारे तपासून, खोदून काढत आणि त्यात सुधारित ज्ञानाची भर घालीत आधुनिक क्रांतीच्या विज्ञानयुगाची पायाभरणी करत होते.  यातील अनेक बंडखोर शोधकर्त्यानी वैयक्तिक प्रतिभा आणि जबाबदारीच्या जोरावर धार्मिक संस्थेने दिलेल्या शिक्षेला तसेच सामाजिक उपेक्षेला दुर्लक्ष करून आणि प्रसंगी मृत्यूचा धैर्याने सामना करत विज्ञानातील पायाभूत शोध लावले, ते सिद्ध केले आणि त्याची सैद्धांतिक मांडणी केली. तेच काही प्रमाणात तंत्रज्ञानाचा (technology) विकास करणाऱ्या आणि उपयोजित विज्ञान (applied science) बद्दल काम करणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा म्हणता येईल.

परंतु अलीकडे विसाव्या शतकामध्ये एक काळ असा होता की वैज्ञानिक संशोधन हे महाकाय सरकारी प्रयोगशाळा, प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल्या खाजगी कंपन्यांनी पुरस्कृत संशोधन विकास प्रकल्पांमध्ये किंवा या दोन्हीतील भागीदारीच्या माध्यमातून प्रामुख्याने होत होते. विसाव्या शतकात जगातील महत्त्वाचे शोध या प्रकारच्या सहकार्यातून किंवा सामंजस्य भागीदारीतून लागलेले दिसतात. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध दरम्यानच्या काळामध्ये देशादेशांतील तीव्र स्पर्धेमुळे विजयाची हमी देणारी शस्त्रास्त्रस्पर्धा जिंकण्याची गरज पूर्ण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान वळवले गेले. त्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये, सर्वाधिक संहार घडवून आणणारी क्षेपणास्त्रे -रासायनिक आणि पुढे आण्विक अस्त्रे, शत्रूच्या हालचालींवर देखरेख करणारी टेहळणी यंत्रणा आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेऊ शकणारी यंत्रणा, यांचा विकास आणि वापर यासाठी वैज्ञानिकांचे प्रचंड मोठे समूह काम करू लागले. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्धाच्या काळात ज्या ज्या वैज्ञानिकांना विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले त्यातीळ बहुतांशी लोकांना त्यांच्या वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील वैयक्तिक योगदानासाठी ते पारितोषिक मिळाले होते परंतु त्यातील अनेक जण युद्धाच्या धामधूमीमध्ये (आणि खुमखुमीमध्ये) चालू असलेल्या अनेक संशोधन प्रकल्पाचे सदस्य होते. यामध्ये रासायनिक अस्त्रे, आण्विक शस्त्रे, रॉकेट-रणगाडे आणि इतर अतिसंहारक यंत्रे तसेच उच्च क्षमतेची संवाद-टेहळणी यंत्रणा यांचा समावेश होतो.

याच काळात सन १९३० मध्ये एका भारतीयाला भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक मिळाले. त्या व्यक्तीला मात्र युरोप, अमेरिका खंडातील वैज्ञानिकांना जशा सुविधा मिळाल्या तशा सुविधा आणि प्रचंड संख्येने मनुष्यबळ मूलभूत संशोधनातील अद्द्ययवत प्रयोगशाळा उभ्या करण्यासाठी उपलब्ध नव्हत्या. तरीपण या व्यक्तीने आपल्या एकट्याच्या दमावर ‘रामन इफेक्ट्स’ चा शोध लावून जगात वाहवा मिळवली. रामन स्कॅटरिंगचा (विकिरण) शोध त्यांना एका सागरी सफरीमध्ये “आकाश आणि समुद्राचे पाणी निळे का दिसते” या प्रश्नावर चिंतन करून केलेल्या प्रयोगातून मिळाले अशी एक लोकप्रिय आठवण आजही बऱ्याच ठिकाणी सांगितली जाते. विशेष म्हणजे सी. व्ही. रामन यांचा हा बोटीवरचा प्रवास ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक संशोधन निबंध सादर करायला जाताना झाला.

सी. व्ही. रामन यांना खऱ्या अर्थाने आज आपण सिटीझन सायंटिस्ट म्हणू शकतो. त्यांनी केलेले मूलभूत संशोधन हे खूपच तुटपुंज्या संसाधनांतून उभे केले होते. नंतरच्या आयुष्यात ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि संशोधक होते हे खरंच आहे. काही वेळ त्यांनी कलकत्ता येथील इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (IACS) मध्ये काम केले होते. नंतर त्यांनी चार वर्षे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स(IISc)चे संचालक म्हणून सुद्धा काम पहिले. हे सर्व असून सुद्धा ज्या मूल्यांची सी. व्ही रामन यांनी आयुष्यभर जोपासना केली आणि जे सद्गुण त्यांनी सार्वजनिकरित्या साजरे केले त्यामध्ये दैनंदिन निरीक्षणे आणि अनुभवांबद्दल अनंत कुतूहल, साध्या-सोप्या प्रयोगांतून मूलभूत विज्ञानाचा घेतलेला वेध आणि स्वतःच्या प्रयोगातून आलेल्या निरीक्षणांवर आणि निष्कर्षांवर एक कमालीचा नम्र ( अंध नव्हे) आत्मविश्वास हे सांगता येईल. त्यामुळे २८ फेब्रुवारी १९२८ ला त्यांनी के. एस. कृष्णन यांच्याबरोबर केलेल्या प्रयोगातून जेव्हा रामन परिणामचा शोध लावला तेव्हा त्याच वर्षीचे नोबेल पारितोषिक मिळेल असं त्यांना वाटत होतं. हे पारितोषिक १९२८ आणि १९२९ मध्ये सुद्धा रामन यांना मिळाले नाही. १९३० च्या जूनमध्ये त्यांना अचानक वाटले की यावर्षी नोबेल समितीला भौतिकशास्त्र मधील हे पारितोषिक त्यांच्या शोधाला दिल्याशिवाय तरणोपाय नाही म्हणून प्रवासाची तिकिटे खरेदी करून त्यांनी जुलै मध्ये युरोपच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. १९३० मधेच त्यांना हे पारितोषिक मिळाले. सी.व्ही रामन हे अशा महान परंपरेचे पाईक आहेत ज्यामध्ये वैयक्तिक कर्तबगारीवर भविष्यातील सर्व विद्याशाखांवर प्रचंड मोठा परिणाम साधणारे मूलभूत वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या जगातील अनेक लोकांचा समावेश होतो. या संदर्भातील भारतातील अनेक वैज्ञानिकांचा, शास्त्रज्ञांचा उल्लेख करता येईल.

अलीकडे पुण्याजवळील देहू रोड परिसरात २५ डिसेंबर २०१९ रोजी अंधश्रद्धा निर्मूलन परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उदघाटन करताना मुक्ता दाभोलकर यांनी गॅलिलिओ बद्दल एक रंजक कथा सांगितली. सोळाव्या शतकात खगोलीय निरीक्षणे करताना लावलेल्या शोधांमुळे सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं जगाचा दृष्टिकोन बदलवून टाकणारे सत्य सांगितले, त्यामागची ती कथा होती. गॅलिलिओला दुर्बीण आणि खगोलशास्त्रचा आधुनिक युगातील जनक म्हणलं जातं. पण हॉलंड मधील चष्मे बनवणारा कारागीर हान्स लिपरशे याने १६०८ मध्ये दुर्बिणीचा (टेलिस्कोप) चा शोध लावला असं आता पुढे आले आहे. बरीच दशके याचे श्रेय गॅलिलिओला दिलं गेलं. गॅलिलिओने निश्चितच टेलिस्कोप बनवण्याच्या पद्धती आणि विश्व समजून घेण्याच्या वैज्ञानिक संशोधन पद्धती विकसित करताना टेलिस्कोप अधिक आधुनिक केला. परंतु मुक्ता दाभोलकर यांचा रोख होता तो जन्माने किंवा कामाने विद्वान किंवा शास्त्रज्ञ नसलेल्या कारागिराने केवळ आपल्या निरीक्षणाच्या आणि अनुभवाच्या साहाय्याने लावलेला शोध, याकडे होता. माणसाने अग्नीचा शोध लावला, दगडी व धातूच्या हत्यारांचा शोध लावला आणि शेतीचा शोध लावला. कदाचित त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक असणारा हा दुर्बिणीचा शोध हा आधुनिक जगातील अनेक अशा सिटीझन सायंटिस्ट शोधांपैकी एक आहे असं आपण निश्चितच म्हणू शकतो.

जगाच्या इतिहासात सिटीझन सायंटिस्ट कुणाला म्हणायचे याची काही निश्चित अशी व्याख्या नाही. परंतु शेकडो वर्षांपासून आकाशनिरीक्षणाच्या साहाय्याने अभ्यास करणारे खगोलप्रेमी, पक्षांच्या स्थलांतराचा वेध घेणारे निसर्गप्रेमी यासारखी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील सेनानी जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन आणि बेंजामिन फ्रँकलिन (हे तिघेही नंतर अध्यक्ष झाले) यांनी अमेरिकेतील विविध भागातील हवामानाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला होता त्यामुळे त्यांना सुद्धा सिटीझन सायंटिस्टच्या गौरवशाली यादीमध्ये मानाचे स्थान आहे. १९व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत ऑडबन नावाचा असाच एक निसर्गप्रेमी होता त्याने पक्षांचे निरिक्षण करण्याच्या त्याच्या आवडीतून “बर्ड्स ऑफ अमेरिका” हे संग्राह्य पुस्तक तयार केले. असेच उदाहरण १८८१ मध्ये विलियम हर्शेल यांनी लावलेल्या शोधाबद्दल सुद्धा सांगता येईल. त्यांना ताऱ्यांचे निरीक्षण करण्याचा भन्नाट नाद होता. त्यातूनच टेलिस्कोप तयार करण्याचा छंद त्यांना लागला. त्यातूनच त्यांनी युरेनस या सूर्यमालेतील सातव्या ग्रहाचा शोध लागला आणि मानवी इतिहासामध्ये टेलिस्कोपने शोध लागलेला हा पहिला ग्रह होता. तर विज्ञानाचे वेड हे कुणालाही लागू शकते आणि रूढ अर्थाने वैज्ञानिक नसलेले लोक सुद्धा ऐतिहासिक कामगिरी करू शकतात.

डिसेंबर २०१९ मध्ये चेन्नईत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या एका सॉफ्टवेयर अभियंत्याची अमेरिकेची प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासा (NASA)ने दखल घेतली होती. काय केलं होतं या युवकाने? खगोलशास्त्र किंवा अवकाश अभियांत्रिकी यातील कोणतेही औपचारिक शिक्षण किंवा प्रशिक्षण न घेतलेला हा युवक इस्रोच्या चांद्रयान-२ ने चंद्राच्या पृष्ठभागावर सोडलेल्या विक्रम लॅण्डरचा माग काढत होता. विक्रम लॅण्डरचे ज्या ठिकाणी हार्ड लँडिंग झाले (क्रॅश) त्या ठिकाणांची छायाचित्रे मिळवण्याचा सुद्धा त्याचा प्रयत्न होता. त्याने छायाचित्रे शोधून विकसित तर केलीच त्याशिवाय ‘नासा’ने त्याचे अभिनंदन केले. षन्मुगा सुब्रमानियन (शान) या कम्प्युटर प्रोग्रॅमरने विक्रमच्या नेमक्या ठावठिकाणा असलेल्या छायाचित्रांचा शोध लावला होता. यासाठी त्याने ‘नासा’ने प्रसिद्ध केलेल्या प्रतिमांचा वापर केला होता. अशी कितीतरी उदाहरणे आहेत, ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी वैज्ञानिक संशोधनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्यामुळे सिटीझन सायंटिस्ट ही कल्पना अधिक व्यापक स्तरावर उचलून धरली गेली पाहिजे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे येथे औपचारिक वैज्ञानिक पदव्यांपेक्षा सर्व विद्याशाखांतील लोक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सिटीझन सायंटिस्ट कसे बनू शकतील हे आपण मिळून सर्वानी पाहूया. सिटीझन सायंटिस्ट हे केवळ औपचारिक प्रशिक्षणाने घडवता येणार नाहीत, त्यासाठी आपल्याला एक अनौपचारिक संस्कृतीची जोपासना करावी लागेल. आपल्या आजूबाजूला. ही कृती फक्त शैक्षणिक संस्थांच्या वातावरणापुरती निश्चितच नाही. वैज्ञानिकाच्या तोडीचे, त्या दिशेने जाणारे खोल कुतूहल, प्रश्न विचारण्याची वृत्ती, प्रयोग करण्याचे वेड, अपयशाला न भिण्याची बिनधास्त वृत्ती आणि मर्यादित यशाने हुरळून न जाणारा कामातील नम्रपणा हे स्वभाव-गुण आपल्या सध्याच्या तरी शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप कमी प्रमाणावर रुजतात. बऱ्याच वेळा माध्यमिक शाळांतील मुलांना प्राथमिक शाळेतील आणि उच्च माध्यमिक शाळेतील मुलांना माध्यमिक शाळेतील उतारे वाचता येत नाहीत, गणित-आकडेमोड येत नाही किंवा त्या वयात असावे तेवढे सभोवतालच्या परिसराचे भान नसते. तसेच बऱ्याच मोठ्या संख्येने मुलांमध्ये आणि मुलींमध्ये कार्यात्मक (functional) कौशल्यांचा अभाव असतो. (हा निष्कर्ष ‘प्रथम’ या शिक्षणावर काम करणाऱ्या संस्थेने तयार केलेल्या आणि अलीकडेच त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या वार्षिक ASER २०१९ सर्वेक्षणामध्ये सुद्धा ठळकपणे समोर आला आहे.) या सर्व कारणांमुळे एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेमधील ज्ञानाशी तल्लीन होऊन त्यावर चिंतन, अभ्यास आणि संशोधन करण्याची संस्कृती आपल्याकडे विकसित होत नाही. त्यामुळे केवळ औपचारिक वैज्ञानिक शिक्षण न घेता जर विज्ञान शिक्षण घेऊ इच्छिणारी सगळ्या मुला-मुलींसाठी जर सिटीझन सायंटिस्ट कट्टा, सिटीझन सायंटिस्ट फिरती प्रयोगशाळा, सिटीझन सायंटिस्ट खेळ आणि सिटीझन सायंटिस्ट पार्क आपण विकसित केले पाहिजे आणि त्यातूनच भविष्यातील भारताचे सी.व्ही रामन घडतील जे अगदी कमी संसाधनांमधून सुद्धा दूरगामी परिणाम करणारे आणि केवळ विज्ञानच नाही तर तंत्रज्ञान, नवनिर्मिती, नव्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योगधंदे या क्षेत्रावर आपली छाप सोडणारे संशोधन करतील.

दरवर्षी येणारा २८ फेब्रुवारी हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ भारतरत्न डॉ. सी. व्ही रामन यांनी लावलेल्या शोधासाठी प्रसिद्ध आहे. शोधाच्या जन्मदिवशीच हा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. त्यामुळे सर्व भारतीयांना सी. व्ही. रामन यांनी आपल्या सर्वाना दाखवलेल्या स्वप्नाच्या दिशेने जाण्यासाठीची ती एक दिशा आहे. ‘आकाश आणि समुद्राचे पाणी निळे का दिसते’, या साध्या प्रश्नातून उत्तुंग दर्जाचे संशोधन करण्याही ही दिशा सर्व संभाव्य सिटीझन सायंटिस्ट साठीच आहे.

राहुल माने, विज्ञान-तंत्रज्ञान विषयावर लिहिणारे पत्रकार असून, ‘इंडियन अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’चे ‘एस. रामशेषन विज्ञान लेखन’ फेलो आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0