रुडयार्ड किपलिंगच्या या गोष्टी या ना त्या रुपात माझ्या कपाटात कित्येक वर्षांपासून आहेत. पण ‘दि व्हाइट सील’ आणि ‘क्विकर्न’ या गोष्टी पहिल्यांदाच वाचल्या. आणि मग पुन्हा किपलिंग खरंच 'ब्रिटिश साम्राज्यवादाचा भाट' होता का या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागलो.
कोरोना विषाणूने घरी बसवलं होतं… भीतीने घरी बसवलं होतं, आणि मी माझ्या लाडक्या ‘जंगल बुक’मध्ये पुन्हा एकदा शिरलो होतो. रुडयार्ड किपलिंगच्या या गोष्टी या ना त्या रुपात माझ्या कपाटात कित्येक वर्षांपासून आहेत. पण ‘दि व्हाइट सील’ आणि ‘क्विकर्न’ या गोष्टी पहिल्यांदाच वाचल्या. आणि मग पुन्हा किपलिंग खरंच ‘ब्रिटिश साम्राज्यवादाचा भाट’ होता का या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागलो. कारण असा माणूस ‘क्विकर्न’ मधल्या गीतात अगदी उत्तरेकडील एस्किमो लोक गोऱ्यांच्या संपर्कात न आल्याने अजून ‘माणसं’ म्हणून टिकून आहेत हे त्याच्या सुंदर शैलीत लिहू शकला नसता.
अर्थात ज्या कवितेमुळे त्याला युद्धखोर आणि साम्राज्यवादी म्हटलं जातं तीच ‘दि व्हाइट मॅनस् बर्डन’ कविता मी माझ्या कोळ्यांवरील एका लेखात अगदी उलट अर्थाने वापरली आहे. कारण ती कविता म्हणजे किपलिंगने साम्राज्यवादी वृत्तीवर ओढलेले उपहासात्मक कोरडे आहेत असं मला वाटतं. खरं खोटं तोच जाणे! आणि या संदर्भात बरंच वाचूनही तो असा होता की तसा होता म्हणण्यापेक्षा तो किती चांगला लेखक होता एवढंच मी म्हणू शकतो. आणि मला वाटतं तेवढं पुरेसं आहे. कोणतंही
ठिकाण आणि तिथला परिसर, तिथले लोक, त्यांच्या बोलीसह जिवंत उभे करण्याचं त्याचं कसब खरं तर अतुलनीय आहे. पण या बाबतीत माझ्या अल्प वाचनातून मराठीतले गोनिदा मला त्याच्या बरोबरीचे वाटतात.
तर असा गुंत्यातून मोकळा झालो आणि आणखी एक न वाचलेली कविता मला या पुस्तकात मिळाली: ‘मोगलीज साँग अगेंस्ट दि पीपल’
आणि झर्रकन मी आजच्या जगात आलो. त्याला, त्याच्या मायेच्या माणसांना, त्याच्या जंगलाला त्रास देणाऱ्या गावाविरुद्ध मोगली अक्षरशः युद्ध छेडतो आणि गाव होत्याचं नव्हतं करून टाकतो… तिथं जंगल पुन्हा प्रस्थापित होतं. त्यासाठी तो जंगलातील प्राणी, वनस्पती साऱ्यांची सेना उभी करतो. हा कोरोना विषाणू अशाच एखाद्या सेनेतला एक सैनिक तर नव्हे? आणि तथाकथित सूत्रांनी सांगितल्यानुसार चीन हा मोगली तर नव्हे? की मोगली कुणी ‘दुसराच’ आहे? – आपण छळलेला, आपण दुखावलेला? करा विचार…
आणि वाचा त्या अनाम मोगलीचे युद्धगीत-
सोडीन मी तुमच्यावर, वेलींचे तुफान घोडदळ
नामोनिशाणी पुसेल तुमची, माझं जंगली वादळ!
कौलं जातील उडून
वासे पडतील मोडून
कारलं, हो, कडू कारलंच
पसरेल त्यांच्या मधून!
वेशींवर घुमेल माझ्या दोस्तांची कोल्हेकुई
पोखरलेल्या कोठारांतून वटवाघळांची घाई
थंड चुली, राखेचे ढीग
आणि भुजंग राखणदार
आता कारलीच फुलतील जिथे
झोपायचा तुम्ही गपगार!
दिसणार नाही सेना माझी, पहाल बावचळून
येतील काळोखात आणि जातील वसूल घेऊन
लांडगा पाठीवर तुमच्या
गपगुमान बिलगून बसा
आता कारलंच फळेल जिथे
फळफळला तुमचा वसा
पीक कापतील माझे शिपाई, मरू दे तुमची सुगी
रडाल भेकाल त्यांच्या मागे, अहा! उगी… उगी…
शेतं पडतील ओस
आणि हरणं चरतील तिथं
कारण फोफावेल कारलं
तुम्ही खेळलात जिथं जिथं
सोडल्या पहा तुम्हावर मी त्वेषभरल्या वेली
निशाणी पुसायला वादळ मी बोलावलं जंगली
झाडं चढलीत उरावर
आता वासे पडतील मोडून
आणि कारलं, हो, कडू कारलंच
पसरेल तुमच्या मधून!
COMMENTS