माणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’

माणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’

फाळणीने केवळ धर्मांमध्ये उभी फूट पाडली नाही, तर रक्ताच्या नात्यांची ताटातूट घडवून आणली. ती वेदना उरी घेऊन आयुष्यभर अश्रू ढाळणाऱ्या दफियानामक एका वयोवृद्ध स्त्रीस तिच्या बिकानेरमधल्या मुळांपर्यंत पोहोचण्यासाठी भारत-पाकिस्तानातल्या अनोळखी सहृदांनी पुढाकार घ्यावा, ही एकच घटना, आजच्या विखंडित काळात माणुसकीवरचा विश्वास दृढ करणारी ठरावी...

राज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार
श्रीमंतांकडून कर वसूल करण्याबाबत पंतप्रधानांना आवाहन
बेगानी शादीमे…….!

जुने हिशेब चुकते करण्यासाठी पेटलेल्या वर्गाने यंत्रणा हाताशी धरून दुसऱ्या वर्गावर दरदिवशी सूड उगवावा आणि ‘बरा धडा शिकवला’, असे म्हणत, बहुसंख्यांनी एकमेकांना टाळ्या द्याव्यात, असा हा सुबुद्धांचा कोंडमारा घडवून आणणारा आजचा माहोल आहे.

संशय, शंका, घृणा, तिरस्कार या भावनांनी असंख्यांच्या मनाचा ताबा घेतलेला आहे. हिंदू बहुसंख्यांनी राज्यकर्त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा द्याव्यात आणि दुसरीकडे या ना त्या निमित्ताने अल्पसंख्य मुस्लिमांभोवतीचे फास घट्ट अधिक घट्टपणे आवळले जावेत, हे नित्याचेच चित्र समोर येत असताना, घरच्या, मातीच्या नि रक्ताच्या नात्यांच्या आठवणीत झुरणाऱ्या वयाच्या नव्वदीकडे झुकलेल्या पाकिस्तानातल्या एका स्त्रीस बिकानेरमधल्या तिच्या मुळांपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन्ही देशातल्या दरियादिल माणसांनी प्रयत्नांची शिकस्त करावी, हाच मोठा दिलासा ठरावा, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

फाळणीच्या आसपास घडलेल्या घटनांनी कित्येक पिढ्यांच्या मनावर खोलवर आघात केले. कधीही न भरून निघणाऱ्या जखमा दिल्या. पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातल्या माइलसी गावातली दफियाबाई नावाची स्त्री अशीच एक भळाळती जखम उरी बाळगत जगत राहिली. या काळात अलसू, छोटू, मीरा या ताटातूट झालेल्या भावंडांची आणि ज्या मातीत जन्म झाला, त्या राजस्थान-बिकानेरमधल्या मोरांचे अस्तित्व असलेल्या मोरखाना गावाचे नाव तिच्या ओठी सतत येत राहिले. नाचऱ्या मोरांच्या आठवणींनी ती भावूक होत राहिली. लहानपणी गाठी बांधलेल्या मामूच्या लग्नाच्या आठवणी तिला अस्वस्थ करत राहिल्या.

फाळणीच्या काळात सीमेच्या दोन्ही बाजूंना जी धुमश्चक्री माजली, त्यात मेघवाल जमातीतल्या १३ वर्षांच्या दफियाला पाकिस्तानात पळवून नेले गेले. मग कुणा बक्शिंदा खानने बैलाच्या मोबदल्यात तिला अहमद बख्श नावाच्या इसमास विकले. त्याने तिचे धर्मांतर घडवून आणले. तिचे आयेशा बीबी असे नाव ठेवले. दफियाचे याच अहमद बख्श याच्याशी लग्न लावले गेले. पुढे तिला सात मुले झाली. काळाच्या ओघात आयुष्य पुढे सरकले, पण दफियाला भूतकाळाचा विसर पडला नाही. किंबहुना, बिकानेरमधल्या दुरावलेल्या कुटुंबियांना भेटण्याची तिची आस इतकी तीव्र राहिली की, मरणाआधी एकदा तरी त्यांच्यापर्यंत पोहोचता यावे म्हणून तिने ओळखीतल्या लोकांना पैसे, कधी गावठी तूप असे काय काय देऊ केले.

मधल्या काळात, तिचा नातू तिला बहावलपूर जिल्ह्यातल्या यझमन गावात वस्ती करून असलेल्या मेघवाल जमातीच्या कुटुंबांकडे घेऊन गेला. तिची ती ही धडपड पाहून जमातीतले वृद्ध लोकही भारावून गेले. त्यांनी तिला आपली बहीण मानले.

मग नातवाच्या मदतीने पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी स्थानिक ऊर्दू दैनिकात जाहिरातीच्या स्वरुपात दफियाबाईची कहाणी छापून आली. पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. कोणालाही तिचा भूतकाळ तिला मिळवून देता आला नाही.

परंतु, ऑगस्ट २०१९ मध्ये पाकिस्तानातला मुहम्मद आलमगिर नावाचा उत्साही यूट्यूबर मात्र देवदूत बनून तिच्या मदतीला आला. त्याने दफियाबाईचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात लहानपणीची तिची कहाणी कथन केली. माहेरच्या लोकांपर्यंत कुणी तिला पोहोचवेल का, अशी भावूक साद घातली. बऱ्याच दिवसांनी अगदी योगायोगाने दिल्लीच्या झैद मोहम्मद खान नावाच्या एका तरुणाचे या व्हिडिओने लक्ष वेधून घेतले. फाळणीच्या कहाण्यांमध्ये रस असल्याने झैद दफियाबाईची व्यथा ऐकून आतून हेलावून गेला. मेघवाल… मोरवाना…बिकानेर… राजस्थान… या शब्दांचा माग काढत त्याने ही कहाणी आपल्या फेसबूक अकाऊंटवरून बिकानेरमधल्या ओळखीच्या ग्रुपवर शेअर केली. याचबरोबर दफियाबाईने उल्लेखलेल्या नावांचा शोध घेण्यासाठी महसूल खात्यातल्या ऑनलाइन उपलब्ध असलेल्या नोंदी तपासल्या.

हे सगळे करताना, झैद खानने मोरखानामधल्या भरतसिंग नावाच्या तरुण दुकानदाराला फोनवरून गाठले. थोडा कसून शोध घेतल्यानंतर भरतसिंगची गावातल्या एका मेघवाल कुटुंबाशी गाठ पडली. योगायोग म्हणजे, या कुटुंबाच्या कहाणीचे एक टोक पाकिस्तानातल्या दफियाबाईच्या कहाणीशी जुळले.

मग, यथावकाश सारे काही जुळून आले. एक दिवस पाकिस्तानातून अपेक्षित फोन आला. फोन मोरखानामधल्या दफियाबाईच्या भावाच्या एका नातवाला आला होता. त्याच्याभोवती कुटुंबातले वीसेक लोक मोठ्या कुतूहलाने गोळा झाले होते. आधी नुसताच फोन झाला. मग अलसूरामच्या नातवाने सरळ व्हॉट्स अॅप कॉल जोडला. तिकडे पाकिस्तानातल्या माइलसी गावात नासिर खान नावाच्या नातवाने दफियाबाईला कानाला इअरफोन लावून तयार ठेवले होते. जसे दोन्ही कडच्यांनी एकमेकांना पाहिले. भावनेचे बांध फुटले. अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सीमेपलीकडच्या पुतण्या-नातवांना पाहून दफियाबाई तर इतकी भावूक झाली, तिने आवेगाने स्क्रीनचे पटापट मुके घेतले. आवाजात तिच्या उत्साह संचारला आणि डोळे पाण्याने डबडबले. दफियाबाई तिच्या स्थानिक सराईकी भाषेत बोलू लागली. पलीकडून मारवाडी भाषेचा वापर झाला. पण, त्याने जराही अडचण झाली नाही. कारण, नजरेच्या भाषेनेच पुढचा सारा संवाद झाला. अंतर्बाह्य मने उजळवणारी आठवणींची वरात सहज परतून आली. तिच्या संगतीने सारेच वेडेपिसे झाले.

दफियाबाईची जन्माची व्यथा ओळखून कुणातरी आलमगिरचे हृद्य द्रवले. त्याच्या हृदयाची हाक दिल्लीत बसलेल्या झैद खानने ऐकली. त्याच्या हाकेला बिकानेरमधल्या भरतसिंगने ओ दिली. काय यांच्यात नाते होते, काय यांचे हितसंबंध होते? हा सारा माणसाने माणसासाठी केलेला सायास होता. इथे धर्म-पंथाचा संबंध नव्हता. जातीचा प्रश्न नव्हता. धडा शिकवण्याची खुमखुमी नव्हती की, सूड उगवण्याचा उघड-छुपा इरादाही नव्हता. होता, फक्त माणसाने माणुसकीचा केलेला सन्मान.

अर्थात, अशा कहाण्या काय आजवर कानी आल्या नाहीत का ? ढिगाने आल्या. फाळणीच्या वेळच्या भावूक कथांना तर दोन्ही देशात कधीच तोटा राहिला नाही. तरीही दफियाबाईला आयुष्य कृतकृत्य ठरल्याची भावना देणाऱ्या सीमे अलीकडच्या-पलीकडच्या या कथेचे मोल अनन्यसाधारण आहे. दोन्ही देशातले धर्माची अफू चढलेले बहुसंख्य राज्यसत्तेच्या आशीर्वादाने अल्पसंख्यांना वेगवेगळ्या निमित्ताने, ‘निवडून निवडून’ लक्ष्य करत असल्याचे खुलेआम दिसत असताना, ते तरी वेगळे कशाला सांगायला हवे ?

छायाचित्रसाभार ‘द इंडियन एक्सप्रेस’

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0