भोपाळ : मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेत राज्यपाल लालजी टंडन यांनी सोमवारी म्हणजे आज कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे
भोपाळ : मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेत राज्यपाल लालजी टंडन यांनी सोमवारी म्हणजे आज कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. सकाळी ११ वाजता राज्यपालांचे अभिभाषण संपल्यावर लगेच बहुमताची प्रक्रिया सुरू करावी व हे मतदान बटन दाबून करावे असे निर्देश लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला दिले आहेत.
या संपूर्ण शक्तीपरीक्षेचे व्हीडिओ चित्रिकरण केले जाणार व सोमवारीच ही प्रक्रिया पूर्ण केली जावी, त्याला स्थगिती किंवा पुढे ढकलू नये, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले आहे.
पण विधानसभा अध्यक्षांनी कोरोना विषाणूमुळे जी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, तिच्याकडे डोळेझाक करता येत नाही, पहिले स्वास्थ महत्त्वाचे आहे, अशी वेगळी भूमिका घेतली आहे.
१६ बंडखोर काँग्रेस उमेदवारांनी पाठवलेले राजीनामे
सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले असतानाच रविवारी भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील १६ बंडखोर काँग्रेस आमदारांनी आपले राजीनामे पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले आहेत. राज्यातली कायदा व सुव्यवस्था परिस्थिती योग्य नसल्याने आम्हाला व्यक्तिगत पातळीवर तुमची भेट घेता येणार नाही त्यामुळे सहा मंत्र्यांचे जसे राजीनामे स्वीकारले गेले तसे आमचेही स्वीकारले जावेत अशी विनंती या १६ आमदारांनी केली आहे.
या १६ आमदारांची नावे अशी आहेत : जजपाल सिंह जज्जी, बृजेंद्र सिंह यादव, रणवीर सिंह जाटव, कमलेश जाटव, गिर्राज दंडोतिया, मनोज चौधरी, आरपीएस भदौरिया, रक्षा सरौनिया, सुरेश धाकड़, राज्यवर्धन सिंह प्रेम सिंह, बिसाहूलाल सिंह, हरदीप सिंह डंग, जसमंत सिंह जाटव, मुन्नालाल गोयल, रघुराज सिंह कंषाना व ऐदल सिंह कंषाना.
काँग्रेस- भाजपकडून आमदारांना व्हीप जारी
प्रदेश काँग्रेस कार्यकारणीने शनिवारी उशीरा रात्रीच आपल्या आमदारांना व्हीप काढून १६ मार्च रोजी सभागृहात उपस्थित व सरकारच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले आहे.
तर दुसरीकडे प्रदेश भाजपनेही आपल्या सर्व आमदारांनी विधानसभेत उपस्थित राहून सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा व्हीप जारी केला आहे.
भोपाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार दाखल
जयपूरमध्ये हॉटेल ठेवलेल्या म. प्रदेश काँग्रेसच्या आमदारांना रविवारी भोपाळमध्ये आणण्यात आले. तर ज्या ६ काँग्रेस मंत्र्यांनी राजीनामे दिले त्यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केले.
काँग्रेसची परीक्षा
२१ आमदारांच्या राजीनाम्यामुळे म. प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ ९९ झाले असून बहुमताला १०४ आमदारांची गरज आहे. तर भाजपकडे १०७ संख्याबळ आहे. पण विरोधक सरकार पडेल असा कितीही दावा करत असले तरी विधानसभेत काँग्रेसच आपले बहुमत सिद्ध करेल व हे सरकार ५ वर्षे चालेल असा दावा काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते हरीश कुमार रावत यांनी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या ‘ताब्यात’ असलेल्या काँग्रेस आमदारांची सुटका अशी विनंती केली आहे.
मूळ बातमी
COMMENTS