महाराष्ट्राच्या राजकारणात बिनचेहर्‍यांची सद्दी

महाराष्ट्राच्या राजकारणात बिनचेहर्‍यांची सद्दी

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विचारसरणीपेक्षा चेहऱ्यांना महत्त्व आले असून, येनकेन प्रकारेण सत्ता हस्तगत करणे, हे अनेकांचे ध्येय झाले आहे. सत्ता आणि त्यातून मिळणारी संपत्ती आणि त्यातून पुन्हा सत्ता, असे धनचक्र सुरुच राहिले आहे.

‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या’
अजित पवार म्हणतात, मी राष्ट्रवादीतच
नियमांची कडक अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

सुजय विखे पाटील आज अहमद नगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे वडील राज्याचे विरोधी पक्षनेते आता कोणाचा प्रचार करणार? अर्थातच मुलाचा! पण काँग्रेसने त्यांना आपले स्टार प्रचारक म्हणून नियुक्त केले आहे. विखे पाटील आत्ता नेमके कोणत्या पक्षात आहेत, कोणत्या होते आणि कोणत्या पक्षात जाणार? बहुतेक त्यांनामाहित आहे, पण मतदारांना नाही. हे स्वतः युतीच्या मंत्रीमंडळात मंत्री होते आणि त्यांचे वडील ज्यांना लोक पक्के काँग्रेसी म्हणून ओळखत होते, ते शिवसेनेतर्फे केंद्रात अर्थ राज्यमंत्री होते. नक्की चेहरा कोणता, भाजप की काँग्रेस? विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी भाजपवर जी टीका केली, ती खरी होती, की खोटी?

विखेंच्या विरोधात, अहमद नगर शहराचे आमदार असणारे संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राहुरी येथील आमदार शिवाजी कर्डीले यांचे ते जावई आहेत. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेंव्हा कर्डिले व्यापिठावर उपस्थित होते. संग्राम यांचे वडील अरूण जगताप हे विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. संग्राम जगताप २००९ आणि २०१४ अशा दोन वेळेस अहमद नगरचे महापौर झाले आहेत. महापौर पदावर असतानाच त्यांनी २०१४ मध्ये अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. त्यांची पत्नी शितल जगताप दोनदा नगरसेवक झाल्या असून, विद्यमान नगरसेविका आहेत. संग्राम जगताप यांचे बंधू, सचिन जगताप हे श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गटाचे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. भावजय सुवर्णा सचिन जगताप या मांडवगण गटातून अहमदनगर जिल्हा परिषेदेच्या विद्यमान सदस्या आहेत.२००९ साली शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीकडून याच मतदारसंघात निवडणूक लढवली होती. गेल्या वर्षी अहमदनगर महापालिकेत शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भाजपने जगताप यांच्याशी हातमिळवणी करुन, भाजपचा महापौर बसवला होता. म्हणजे कोण भाजपमध्ये आणि कोण राष्ट्रवादीमध्ये आहे? पक्ष कोणताही असो, सत्ता घरातच आहे. नुकतीच त्यांचे दोन्ही पुतण्यांनी रोहिदास आणि देविदास कर्डिले यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
रणजितसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, माजी खासदार आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे युवा नेतृत्त्व, गेल्या आठवड्यात चक्क भाजपमध्ये गेले. शंकरराव मोहिते पाटील यांचे अकलूज येथील मोठे तालेवार घराणे. त्यांचा सोलापूर, पंढरपूर येथेही प्रभाव. कारखाने, सहकार, लावणी महोत्सव, असा मोहिते पाटलांचा दबदबा. हे सगळे आयुष्यभर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होते. शंकरराव यांचे पुत्र, विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. आत्ता मावळत असलेल्या लोकसभेसाठी ते माढ्यातून राष्ट्रवादीचे  खासदार होते. त्यांचा मुलगा रणजीत सिंह आणि विजयदादा दोघेही २१ मार्चला भाजपमध्ये गेले.

डावीकडून संग्राम जगताप, पार्थ पवार, सुजय विखे आणि श्रीरंग बारणे

डावीकडून संग्राम जगताप, पार्थ पवार, सुजय विखे आणि श्रीरंग बारणे.

मावळ मतदार संघामध्ये शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवीत आहे. पार्थ हे राष्ट्रवादी पक्षात कधी आले माहीत नाही. त्यांनी यापूर्वी कोणत्या पदांवर काम केले आहे, तेही माहित नाही. मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडे दुसरा कोणी कार्यकर्ता नव्हता का? की पवार घराण्याचा चेहरा महत्त्वाचा वाटला? पार्थसाठी अजित पवार यांनी आझम पानसरे यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. पानसरे, सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. त्यांच्या मुलाने निहाल यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पानसरे काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्याबरोबरच आले होते. ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा राष्ट्रवादीत आहे आणि भाजपमध्ये गेले. आता पुन्हा ते राष्ट्रवादीमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. ज्यांच्यासाठी अजित पवार यांनी अनेकांना दुखावले, ते आमदार लक्ष्मण जगताप आज भाजपमध्ये आहेत. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेकडून मावळमधून लोकसभा निवडणूक लढवीत आहेत. ते राष्ट्रवादीतून काँग्रेस आणि शिवसेनेत आले. स्थायी समितीच्या निवडणुकीत वितुष्ट आल्याने त्यांचे आणि पानसरे यांचे अजिबातच जमत नव्हते. मात्र २०१४च्या निवडणुकीत खासदार झाल्यावर पानसरे यांना पेढा भरवतानाचे बारणे यांचे छायाचित्र, अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाले होते. आता अशी चर्चा आहे, की बारणे आणि जगताप एकत्र येणार आहेत.
पुणे लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसने अखेर जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला, मोहन जोशी यांना उमेदवारी दिली. भाजपचे सहयोगी सदस्य असणारे संजय काकडे यांचेच नाव काँग्रेसतर्फे आघाडीवर होते. शेवटी प्रवीण गायकवाड यांचे नाव पुढे आले. गायकवाड कोणत्या पक्षात होते? ते कालपर्यंत शेकाप या पक्षामध्ये होते. आता ते काँग्रेसमध्ये आले आहेत. अशी अनेक उदाहरणे असून, अजून सांगली, ओरंगाबाद इथले किस्से पुढे यायचे बाकी आहेत.
२०१४ साली बहुमत नसलेल्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला, राष्ट्रवादीच्या मूक पाठींब्यानेच तर तारले होते. सतत चार वर्षे सत्तेत राहून सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेने पुन्हा भाजपबरोबर आघाडी केलीच आहे. मग राष्ट्रवादी कोणत्या बाजूला आहे? की इतिहास पाहता, पुन्हा भाजपबरोबर सत्तेचा खेळ रंगणार नाही कशावरून?
जात आणि धर्म या मुद्द्यांवर प्रागतिक विचार सांगणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारे रामदास आठवले आज केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री असून, भाजपच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यानाही डॉ. आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा सत्ता महत्त्वाची वाटते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार केला, तर यामध्ये धर्मनिरपेक्षता, काळ्या पैशाविरुद्धची लढाई, भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई, असे परस्परांविरोधी सोडलेले बाण कुठे गेले? कोण कोणाविरुद्ध नेमके काय बोलत होते हेच सामान्य माणसाला आता कळेनासे झाले आहे. कोणते चेहरे आहेत आणि कोणते मुखवटे आहेत, कोण कोणत्या पक्षात आहे… हे विश्लेषकांना आणि त्या त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही समजत नाही. मतदारांचा संभ्रम अजूनच गंभीर आहे. प्रत्येकाला प्रश्न आहे, नेमके कोणाला मत द्यायचे – पक्षाला की उमेदवाराला?
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय रिपब्लिकन पक्ष, जनता दल, हे पक्ष वेगवेगळे का आहेत? यांची स्थापना काही विशिष्ठ तत्त्वावर झाली आहे. प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे. किंबहुना विचारसरणी वेगळी असल्यानेच हे पक्ष वेगवेगळे आहेत!
भाजपने उघडपणे धर्म राजकारणात आणला. जातीला परीघावर आणले. मुस्लिमांना उघडपणे दुषणे देत, बहुसंख्यांकांचे राजकारण, महाराष्ट्रात तर मराठा आंदोलांनाच्या ढालीआडून बहुजन समाजात फुटीचे राजकारण सुरू केले आहे. सर्वसमावेशकता, सर्वधर्मसमभाव, वैचारिक स्वातंत्र्य, समान नागरिकत्व, विवेकवादी विज्ञाननिष्ठता, लोककेंद्री अर्थकारण इ. मुद्द्यांवर काँग्रेस, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विचार, हे भाजपाच्या विचारांच्या अगदी विरोधी आहेत. तरीही भाजपच्या विरोधी पक्षात असणारे लोक इकडून तिकडे भाजपात अगदी लीलया जाताना दिसतात. आणि विरुद्धही घडताना दिसते.
विचार, तत्त्व, हे केवळ राज्यशास्त्राच्या पुस्तकातच मिटवून ठेवले आहेत. सभेमध्ये केल्या जाणाऱ्या तत्त्वांच्या वल्गनाही हवेत विरत आहेत. काल धर्मांध पक्षाच्या विरोधात बोलणारे, आज त्याच पक्षात बिनदिक्कतपणे जात आहेत. समीकरण समजायला सोपं आहे – विचार नव्हे, तर सत्ता महत्त्वाची आहे! जनकल्याण महत्वाचे नसून जिल्हा बँका, विविध कार्यकारी सोसायट्या, पतसंस्था आणि कारखाने हेच लक्ष्य असते. त्यातून उपभोगता येणारी सत्ता महत्त्वाची! सत्तेतून पैसा निर्माण करणे आणि तो परत सत्तेसाठी वापरत राहणे, हे धनचक्र  फिरतच रहावे लागते. भाजप सत्ता कायम ठेवणार असे वारे भाकीत करत अनेक पिढ्यांची निष्ठा सोडून त्या पक्षात जायला मंडळी उत्सुक असतात. आज तेच घडताना दिसत आहे.
बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, शिक्षण, पाणी, पर्यावरण, हे प्रश्न केवळ विद्यापीठीय संशोधक आणि शहरी सामाजिक कार्यकर्त्यांच्यासाठीच राहिले आहेत. त्याचा प्रचाराच्या रिंगणात मागमूस दिसत नाही. निवडणूक केवळ चेहऱ्यांभोवती फिरते आहे. कोण कोणाविरुद्ध कशासाठी लढत आहे, हे कळेपर्यंत दुसरी निवडणूक आलेली असेल. सगळ्यांचे चेहरे एकसमान झाल्यासारखे वाटत आहेत. सत्ता हेच अंतिम ध्येय झाल्याने तत्वहीन, कणाहीन बिनचेहर्‍यांची  (prototypes) सद्दी सुरु झाली आहे.
१९४९ मध्येच १९८४ नावाची कादंबरी लिहिणाऱ्या दृष्ट्या जॉर्ज ऑरवेला, रशियाच्या पार्श्वभूमीने  ‘अॅनिमल फार्म’ कादंबरी लिहायला प्रेरित केले होते. एका फार्महाउसवरचे प्राणी माणसांविरुद्ध उठाव करतात आणि नंतर ते माणसांसारखेच वागायला लागतात; बंडखोर नेत्यांचे आणि माणसांचे चेहरे समान दिसू लागतात. ‘सर्वजण समान आहेत, पण काहीजण अतीसमान आहेत’, ही दर्पोक्ती त्यातून पुढे आली. बिहारमध्ये जन्मलेल्या जॉर्ज ऑरवेलला   महाराष्ट्रातील सद्यस्थिती बघून केवढी प्रेरणा मिळाली असती? इतके प्रचंड कथाबीज दुसरे कुठे सापडणार?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: