पश्चिम बंगालची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी यांना यंदा भाजपने कडवे आव्हान दिले आहे. ‘शत प्रतिशत भाजप’चा अजेंडा राबवत ‘के टू के’ म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी फक्त भाजप असा चौखूर उधळलेला हा अश्वमेध पूर्वेकडील राज्यात रोखून धरण्याचे मोठे आव्हान सध्या ममता दीदी यांच्या समोर आहे. दीदी हे आव्हान पेलणार की पश्चिम बंगालच्या रॉयटर्स बिल्डिंगवरही कमळ फुलणार?
काश्मीर ते कन्याकुमारी सर्वत्र केवळ आपलीच सत्ता अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन रणांगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने आपली सर्व ताकद आणि प्रतिष्ठा पश्चिम बंगाल मध्ये एप्रिल – मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पणाला लावली आहे. तर ममता बॅनर्जी यांनीही भाजपचे हे आव्हान परतवून लावण्यासाठी कंबर कसली आहे.
भाजपच्या दृष्टीने हे राज्य अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी ईबार बांग्ला, पार्ले श्यामला…. ( इस बार बंगाल, रोख सके तो रोक लो..) अशी घोषणा देऊन थेट ममता दीदीना ललकारले आहे. या निवडणुकीसाठो दस्तुरखुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत दोन वेळा पश्चिम बंगालचा दौरा केला आहे. या दौऱ्यात असताना त्यांनी ममता यांच्या गडामध्ये म्हणजे नंदीग्राममध्ये विशेष लक्ष घालून तिथे रोड शो केला. नंदीग्रामचे महत्त्व या निवडणुकीत अनन्य साधारण असे आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीत ‘नंदीग्राम’ हे गेमचेंचर ठरले आहे. त्यामुळे मग ममता यांनीही अमित शाह यांना चोख प्रत्युत्तर देताना आपण नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. एकीकडे भाजपने साम, दाम , भेद आणि दंड अशी नीती वापरून सत्ता हस्तगत करण्यासाठी फासे फेकण्यास सुरुवात केली असून या डावात तृणमूलचे अनेक बडे नेते अडकले आहेत.
या निवडणुकीत भाजपचे केंद्रीय मंत्री, अनेक ज्येष्ठ नेते तसेच खासदार व पदाधिकारी असे तब्बल २९४ नेते मंडळी राज्यातील २९४ विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी उतरणार आहेत.
२०११मध्ये डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता उलटवून ममता यांनी सत्ता हस्तगत केली. २०१६ मध्ये देशभर सर्वत्र भाजपची हवा असतानाही विधानसभा निवडणुकीत ममता यांनी लखलखीत यश मिळविले. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपचा अश्वमेध रोखून धरला होता. पश्चिम बंगालची वाघीण अशी ममता यांची ओळख आहे. स्पष्ट तसेच फटकळ स्वभाव यामुळे त्या ओळखल्या जातात. त्यामुळे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर असलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना खडे बोल सुनावत भाषण करण्यास नकार दिला. ममता यांचा हा रोखठोक स्वभाव कधी कधी तरी त्यांना अडचणींचा ठरला असला तरी राज्यातील सर्वसामान्य लोकांना हा स्वभाव विलक्षण भावतो. सर्वसामान्य जनतेच्या दीदी असलेल्या ममता या त्यांना नेहमीच तारणहार ठरलेल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील ४२ पैकी १८ लोकसभा मतदार संघात विजय मिळविला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आकर्षण आणि हिंदुत्व अशी दुहेरी मात्रा असतानाही ममता यांनी भाजपची घोडदौड रोखली होती. आज देशात किमान दीड डझन राज्यात भाजप स्वबळावर अथवा मित्र पक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत असताना पश्चिम बंगाल सारखे पूर्वेकडील महत्त्वाचे राज्य आपल्या ताब्यात असावे यासाठी भाजपने आणखी एक घोषणा आणली आहे ती म्हणजे. ‘२०१९ मे आधा, २०२१ मे सफाया’ म्हणजेच …. ‘उनीशेइ हाफ, इकुशे साफ…’
खरे तर पश्चिम बंगाल मध्ये भाजपचा प्रवेश हा सोपा नाही. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला राज्यात १२५ मतदारसंघात आघाडी मिळाली असली तरी ममता यांचा आणि कम्युनिस्ट पक्षाचा मतदार हा वर्षोनुवर्षे बांधील आहे. त्यामुळे अन्य आणि कुंपणावर असलेल्या मतदारांवर भाजपने लक्ष केंद्रित केले असून सोबतीला हिंदुत्वाचा अजेंडा मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. मोदी त्यांच्या भाषणात नेहमी सांगतात की ‘दो सीट और दो कमरो में से, देश के हर कोने में’ पक्षाचा विस्तार झाला आहे.
ममता या गेली १० वर्षे सत्तेत आहेत त्यामुळे त्यांना ‘अँटी इन्कबसी’चा फटका बसू शकतो. पण भाजपकडे राज्यात लढवय्या नेतृत्व नाही. ममता या रस्त्यावरील नेत्या आहेत. त्या नेहमी जनतेत बिनधास्त मिसळून जातात. भाजपकडे अद्यापही मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा नाही. त्यामुळे मोदी यांच्या नावावर आणि त्यांच्या फोटोवर भाजपला मते मागावी लागणार आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते बंगालमध्ये तळ ठोकून असले तरी ममता यांना शह देणे एवढे सोपे नाही. त्यामुळे मोदी आणि हिंदुत्व या सूत्रावर त्यांना अवलंबून राहावे लागेल.
इकडे ममता यांनीही कंबर कसली आहे. सर्वसामान्य जनतेला खुष करण्यासाठी ममता यांनी ‘माँ कॅन्टीन’ची घोषणा केली आहे. ५ रुपयात पोटभर जेवण अशी ही योजना आहे. इंदिरा आणि अम्मा कॅन्टीननंतर ममता यांचे हे कॅन्टीन किती यशदायी ठरते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ममता यांचे अनेक जुने सहकारी पक्ष सोडून भाजपमध्ये जात असले तरी सर्वसामान्य जनता हाच एकमेव आधार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कोलकात्याच्या रायटर्स बिल्डिंगवर कमळ फुलविणार अशी भीष्म प्रतिज्ञा केल्यावर ममता यांनी त्यांना आपल्या खास शैलीत फटकरताना ‘नड्डा, गड्डा, फड्डा, चद्दा, अड्डा नही चलेगा’ असे सांगत ‘बंगाल पे सिर्फ बंगाल ही हुकूमत करेगा, गुजरात नही’ अशी गर्जना केली आहे. इथल्या माँ आणि मातृभूमीवर बाहेरून कोणी आक्रमण केलेले येथील जनता कदापि सहन करणार नाही, असं सांगत प्रादेशिक आणि स्थानिक भावनेला हात घातला आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडे बोलताना कोरोनानंतर पश्चिम बंगालमध्ये ‘सीएए’ म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात येईल असे सांगताच ममता यांनी त्याचा समाचार घेताना ‘काका, छिछि’ असे उत्तर दिले तर अनेक जण पक्ष सोडून भाजपमध्ये जात असले तरी मला कसलाही धोका नाही असे सांगत आपल्या खास शैलीत भाजपची खिल्ली उडविताना
‘हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा’ असे वक्तव्य करून धमाल उडवून दिली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प. बंगालमध्ये केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. तर तृणमूलने २११ तर काँग्रेसला ४४ आणि डाव्या पक्षाला ३२ जागा मिळाल्या आहेत. या मतांची टक्केवारी पाहता तृणमूलला ४५ टक्के , डाव्या पक्षांना २५ तर काँग्रेसला १२ टक्के मते मिळाली आहेत. भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही १० इतकी आहे. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र पालटले. लोकसभेच्या ४२ जागांपैकी तृणमूलला २२ तर भाजपला १८ जागा मिळाल्या. काँग्रेसला केवळ २ जागी विजय मिळाला. मतांची टक्केवारी ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कधीच सारखी राहत नाही. त्यामुळे यावेळी भाजपला जागा वाढतील की नाही याबाबत राजकीय तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे. यावेळी भाजपने ‘अब की बार 200 पार’ असे सांगितले असले तरी ममता दीदी यांनी भाजपला ३५ ते ४० पर्यंत रोखू असा विश्वास व्यक्त केला आहे.
ममतादीदी या गेली १० वर्षे मुख्यमंत्री पदावर आहेत. त्या तिसऱ्यावेळी सत्ता राखण्यात यशस्वी होणार की भाजप रॉयटर्स बिल्डिंगवर कमळ फडकविणार हा कळीचा मुद्दा आहे.
अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.
COMMENTS