कोरोनासाठी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको

कोरोनासाठी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको

भारतातील व्हॉट्सअॅपवर सध्या क्लोरोक्विन नावाच्या एका औषधाची चर्चा आहे दिल्लीतील सगळ्या केमिस्ट्सकडील हे औषध संपून गेले आहे.या मेसेजेससोबत अमेरिकेचे अध

कोरोना आणि अवनतीकडे जाणारा समाज  
कोरोना संकटातून सामाजिक परिवर्तन शक्य आहे का?
२० हजार कोटी खर्च : नव्या संसदेसाठी सरकारची अधिसूचना

भारतातील व्हॉट्सअॅपवर सध्या क्लोरोक्विन नावाच्या एका औषधाची चर्चा आहे दिल्लीतील सगळ्या केमिस्ट्सकडील हे औषध संपून गेले आहे.या मेसेजेससोबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओही पाठवला जात आहे. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) कोविड-१९वर उपचार करण्यासाठी क्लोरोक्विनला मंजुरी देण्याची प्रक्रिया जलद केली आहे, असे ट्रम्प यात सांगत आहेत. अर्थात असा कोणताही दावा आपण करत नाही, असे एफडीएने लगेचच स्पष्ट केले आहे.

हे स्पष्टीकरण गरजेचे होते, कारण, नवीन कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना क्लोरोक्विन देण्याबाबतचा कोणताही सबळ अभ्यास आजपर्यंत पूर्णत्वास गेलेला नाही. यासाठी चाचण्या सुरू आहेत पण कोणतेही संशोधन पूर्णत्वास गेलेले नाही किंवा त्याचे परीक्षण प्रसिद्ध झालेले नाही. फ्रान्समध्ये एक छोटासा निरीक्षणात्मक अभ्यास झाला आहे. त्याआधारे कोविड-१९साठी क्लोरोक्विन हे “कदाचित विचार करण्याजोगे औषध” ठरू शकेल अशा आशयाचे ट्विट स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क यांनी केले. क्लोरोक्विन १९४०च्या दशकापासून मलेरियावरील उपचारांसाठी वापरले जात आहे.  या औषधाचे आधुनिक प्रारूप हे सिंकोना वनस्पतीपासून तयार केले जाते. ही वनस्पती पेरूतील स्थानिक लोक अनेक शतकांपूर्वी ताप दूर करण्यासाठी वापरत होते.

ट्रम्प यांनी क्लोरोक्विनबद्दलचे विधान ज्या फ्रेंच अभ्यासावरून केले होते, तो अभ्यास कोविड-१९ची लागण झालेल्या केवळ २० रुग्णांच्या निरीक्षणांतून करण्यात आला आहे. या रुग्णांचे सरासरी वय ४५ वर्षे होते आणि यात १२ वर्षांखालील मुलाचा अंतर्भाव नव्हता. अभ्यासाच्या सुरुवातीला २६ रुग्णांचे निरीक्षण केले जात होते पण त्यातील एकाचा मृत्यू झाला, तिघांना पुढील उपचारांसाठी आयसीयूमध्ये हलवण्यात आले, तर दोघांनी औषधोपचारच नाकारले. गटातील सहा जणांमध्ये (१७ टक्के) कोणतीही लक्षणे नव्हती (असिम्प्टोमॅटिक), बहुसंख्य म्हणजेच ६१ टक्क्यांना रेस्पिरेटरी आजार झालेला होता आणि केवळ २२ टक्क्यांना न्युमोनिया किंवा ब्राँकायटिस झाला होता. बाहेरील रुग्णालयांमधील १६ रुग्ण नियंत्रण गटात होते, त्यांना क्लोरोक्विन दिले गेले नाही. करोना विषाणूचे अस्तित्व तपासण्यासाठी दररोज त्यांचा नेजोफारिंजियल स्वॅब घेतला जात होता.

ज्या रुग्णांवर उपचार सुरू होते त्यांना १० दिवस दररोज तीनदा २०० मिलीग्रॅम हायड्रोक्झिक्लोरोक्विन सल्फेटच्या टॅब्लेट्स दिल्या गेल्या. विषाणू सहा दिवसांत नष्ट होणे हा प्राथमिक पूर्णत्वबिंदू ठरला. हायड्रोक्झिक्लोरोक्विनचे उपचार दिल्या गेलेल्या ७० टक्के रुग्णांमध्ये विषाणू नष्ट झाला, तर नियंत्रण गटात हे प्रमाण १३ टक्के होते. नियंत्रण गटातील रुग्णांना प्लॅसेबो (केवळ रुग्णाची चिंता कमी करण्याच्या उद्देशाने दिले जाणारे औषध) देण्यात आले होते. हायड्रोक्झिक्लोरोक्विन गटातील सहा रुग्णांना सुपरअॅडेड स्वरूपाच्या प्रादुर्भावासाठी अॅझिथ्रोमायसिनही देण्यात आले. या सहाही रुग्णांच्या शरीरातील विषाणू सहा दिवसांनंतर नाहीसा झालेला होता.

अर्थात या अभ्यासासाठी निरीक्षण केल्या गेलेल्या रुग्णांची संख्या फार कमी होती, असे अभ्यासकांनीच मान्य केले. हा केवळ निरीक्षणात्मक अभ्यास होता आणि अभ्यास संपल्यानंतर रुग्णांशी संपर्क कायम राखला नाही, असेही त्यांनी नमूद केले. आयसीयूंमध्ये हलवण्यात आलेल्या तीन रुग्णांबद्दलही काहीही माहिती नाही. अभ्यासाच्या ३ऱ्या दिवशी मृत्यू झालेल्या रुग्णाला कोविड-१९ची लागण झालेली नव्हती, असा निष्कर्ष २ऱ्या दिवशी केलेल्या चाचणीतून आला. मात्र,  या रुग्णाच्या मृत्यूचे कारण किंवा तो कशा प्रकारे झाला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

केवळ २० रुग्णांसोबत केलेला निरीक्षणात्मक अभ्यास हा प्रायोगिक तत्त्वावरील अभ्यास समजला जाऊ शकतो. या अभ्यासातील निष्कर्ष अधिक मोठ्या, रँडम पद्धतीने घेतलेल्या नियंत्रित चाचण्यांच्या माध्यमातून निश्चित करून मग त्यांना संशोधनांचे स्वरूप देता येईल. जागतिक आरोग्य संघटनेनेही अद्याप या चाचणीला मान्यता दिलेली नाही.

कोविड-१९वर उपचार करण्यासाठी क्लोरोक्विनची परिणामकारता व सुरक्षितता तपासणाऱ्या चाचण्या संशोधकांनी सुरू केल्या आहेत. नवीन कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर क्लोरोक्विनचा काय परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी मिनेसोटा युनिव्हर्सिटीमध्ये चाचण्या सुरू झाल्या आहेत आणि त्यांचे निकाल काही आठवड्यांत प्रसिद्ध होतील. तोपर्यंत क्लोरोक्विन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकत घेऊ नये. याचा वापर केवळ रुग्णालयात अर्हताप्राप्त डॉक्टर्सद्वारेच झाला पाहिजे.

दिल्लीत आणि कदाचित उर्वरित भारतातही याच्या नेमके उलट घडत आहे. लोक फार्मसीजमध्ये गर्दी करून उपलब्ध असेल तेवढे क्लोरोक्विन विकत घेत सुटले आहेत. क्लोरोक्विन परिणामकारक आणि सुरक्षित आहे असा निष्कर्ष रँडम पद्धतीने झालेल्या चाचण्यांतून निघाला तर ते खूपच उत्तम ठरेल. हे एक जेनेरिक औषध असून, त्याची किंमत प्रत्येक डोससाठी काही रुपये एवढी कमी आहे. भारतीय औषध कंपन्या अल्पावधीत या औषधाचे प्रचंड उत्पादन करू शकतील. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटाने कोविड-१९च्या रुग्णांसाठी लोसार्टन नावाच्या एका औषधाच्याही दोन चाचण्या घेतल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचे निदान झालेल्या रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करणाऱ्या औषधाच्या एका कॉम्बिनेशनबद्दल माध्यमे फारसे बोलत नाही आहेत.

चीनमधील एका संशोधन पथकाने कोविड-१९चा संसर्ग झालेल्या १९९ रुग्णांच्या मदतीने काही चाचण्या घेतल्या आहेत; त्यांनी अभ्यासलेल्या औषधांच्या कॉम्बिनेशनमुळे मृत्यूदर २५ टक्के ते १७ टक्क्यांनी कमी झाला आहे. या अभ्यासाचा अहवाल न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनमध्ये १८ मार्च, २०२० रोजी प्रसिद्ध झाला आहे.

यातील एक पूर्वअट म्हणजे रुग्णाला तीव्र स्वरूपाचा कोविड-१९ प्रादुर्भाव झालेला असणे आवश्यक आहे. यात रुग्णांचे दोन गट करण्यात आले- एका गटाला उपचार देण्यात आले आणि त्यांची नियमित काळजीही (स्टॅण्डर्ड केअर) घेण्यात आली.  तर दुसऱ्या गटातील रुग्णांची केवळ नियमित काळजी घेण्यात आली. उपचार गटाला लोपिनॅव्हिर आणि रिटोनॅव्हिर (अनुक्रमे ४०० मिलीग्रॅम  आणि १०० ग्रॅम) दिवसातून दोनदा १४ दिवस देण्यात आले. क्लिनिकल सुधारणा हा प्राथमिक पूर्णत्वबिंदू होता. सुधारणा कालावधी दोन्ही गटांमध्ये सारखाच होता. उपचार गटामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल साइड-इफेक्ट्स मोठ्या प्रमाणात होते. मात्र, नियमित गटात अधिक तीव्र स्वरूपाचे साइड-इफेक्ट्स दिसून आले. तीव्र स्वरूपाच्या कोविड-१०मुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना लोपिनॅव्हिर-रिटोनॅव्हिर कॉम्बिनेशनचा फायदा मिळाला नाही, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला. याबाबत अधिक चाचण्या झाल्यास कॉम्बिनेशनची परिणामकारता स्पष्ट होऊ शकेल.

मात्र, या अभ्यासाची दुय्यम निष्पत्ती लक्षवेधी ठरली आहे. हे उपचार मिळालेल्यांपैकी फार थोडे कोविड-१९मुळे दगावले. या कॉम्बोमुळे मृत्यूदर ८.३ टक्के कमी झालेला दिसला. शिवाय, हा कॉम्बो मिळालेल्या रुग्णांना तुलनेने कमी दिवस (६ दिवस) आयसीयूमध्ये ठेवावे लागले. तिसरा मुद्दा, हे कॉम्बिनेशन दिल्या गेलेल्यांपैकी ४५ टक्के रुग्णांच्या स्थितीत नियमित गटातील रुग्णांच्या तुलनेत अधिक सुधारणा झाली. चौथा मुद्दा म्हणजे हे कॉम्बिनेशन न दिलेल्या गटामध्ये श्वसनविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि दुय्यम प्रादुर्भावांचे प्रमाण अधिक होते.

फ्रान्समध्ये झालेल्या छोट्या चाचणीत सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांमध्ये कोविड-१९ची सौम्य लक्षणे होती किंवा लक्षणेच नव्हती. चीनमधील चाचणी अधिक तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांच्या सहभागाने झाली. चीमधील चाचण्यांच्या संशोधकांना लोपिनॅव्हिर-रिटोनॅव्हिरचा उपचार कोणावर केले जात आहेत आणि कोणावर केले जात नाही आहेत याची पूर्ण माहिती होती. त्यामुळे पूर्वग्रहाची शक्यता अधिक होती. शिवाय, ३४ टक्के रुग्णांना कोर्टिकोस्टेरॉइड्स, तर ११ टक्के रुग्णांना इंटरफेरॉन्सही दिली गेली होती.

अभ्यासाची प्राथमिक निष्पत्ती सुधारण्यात ही औषधे का उपयुक्त ठरली नाहीत, अशा प्रश्न न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे. याची दोन स्पष्टीकरणे आहेत. चीनमधील संशोधकांनी आधीच गंभीर आजारी असलेल्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे नियमित गटातील मृत्यूदर अधिक आहे. (पुढील टप्प्यावर पोहोचलेला न्युमोनिया सर्वोत्त प्रतिजैवके देऊनही बरा करणे कठीण असते). दुसरे स्पष्टीकरण म्हणजे, लोपिनॅव्हिर आणि रिटोनॅव्हिरच्या सीरम पातळी परिणामकारतेसाठी आवश्यक असतात त्याहून कमी असू शकतील.

दीपक नटराजन, हे दिल्लीस्थित कार्डिओलॉजिस्ट आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0