भाषिक अंतराचे काय ?

भाषिक अंतराचे काय ?

भाषिक मानखंडना टाळण्यासाठी आपल्या ‘वर्गखोल्यांचे लोकशाहीकरण’ करणे अतिशय निकडीचे आहे. परस्परांबद्दल आदर भाव त्यांच्या मूल्य, संस्कृती आणि भाषिक सहअस्तित्वाची हमी देणारे लोकशाही वातावरण, तशा प्रकारची अध्यापन पद्धती, शिक्षणशात्र आणि अभ्यासक्रम पाहिजेत.

‘डीकलोनियल थिअरी’चा पेपर शिकताना ‘एन्गुगी वो थियोंगो’ यांच्या ‘Decolonizing the mind’ या ग्रंथाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला ‘तुमचाही इंग्रजी शिकण्याचा अनुभव लिहून काढा’, असा गृहपाठ देण्यात आला होता. लिहिताना मला इंग्रजीपेक्षा मराठी भाषा शिकतानाचे अनुभव लिहून काढावेत, कारण ते तुलनेने अधिक काही उलगडणारे असेल असे वाटले. आपल्याकडे बहुभाषिकतेचा जितका गौरव केला जातो, त्याच सोबत त्यातील बहुस्तररचनेचे, शोषणाचे संदर्भ आणि मानखंडना यांचाही विचार त्याच गांभीर्याने व्हावा, यासाठी माझे काही निरीक्षण आणि अनुभव ‘मराठी भाषा गौरव’ दिनानिमित्त प्रासंगिक ठरतील.

ड्रॉपआऊट नव्हे एक्सक्लूजन

तांड्यावरच्या मुला-मुलींचा पहिलाच संघर्ष हा मराठी शिकण्यासोबतचा असतो. तो अगदी कुठल्या शब्दाचा अर्थ काय होतो इथपासून असतो. उदाहरणार्थ, चाफा हे कुठल्यातरी फुलाचे नाव आहे. परंतु ते नेमके कसे असते, काय असते, हे आता-आतापर्यंत मला माहित नव्हते. त्याचप्रकारे फुलपाखरू म्हणजे काय हे सुद्धा पाचवी सहावीपर्यंत नेमके काय असते, हे अवगत नव्हते. तांड्यावरच्या मुला-मुलींचे प्राथमिक शिक्षण घेत असतानाच शिक्षणातून हद्दपारीकरण होते. त्याला लहानपणीच ऊसतोडीला किंवा मजुरीला जाण्यासोबातच भाषिक अंतरामुळे आलेली विचित्र अशी परात्मताही तितकीच कारणीभूत ठरते. पाचवीत असेपर्यंत मला ‘आत येऊ का’? याचा अर्थ काय होतो हे माहित नव्हते. आत येऊ का हा जसा पासवर्ड असतो वर्गात येण्याचा तशीच भाषा हे ‘इंटलेक्चुल पासवर्ड’ असते, ज्ञान ग्रहण करण्याची. हे पासवर्ड न उमगलेले बहुसंख्य विद्यार्थी ड्रॉपआऊट होतात. ते खरे तर ड्रॉपआऊट नसून त्यांचे एक्सक्लूजनच असते. अर्थातच या प्रक्रियेला आपली ‘अभ्यासक्रम’, ‘शिक्षणशास्त्र’, ‘अध्यापन पद्धती’ तितकेच कारणीभूत आहेत. कारण या सगळ्या बाबी संस्कृती किंवा मुल्यनिरपेक्ष नाहीत आणि या पद्धतीसुद्धा ‘परात्मिकरणात’ भर घालतात.

भाषिक मानखंडना

तांड्यावरील बहुतांश मुलांचे तथाकथित मराठी उच्चार अशुद्ध (?) असतात. त्यामुळे शिक्षकांपासून ते वर्गमित्रांपर्यंत ते उच्चारणे म्हणजे रोजच्या अखंड चेष्टेचा विषय असायचे. आमचे बहुतांश शिक्षक तांड्यावरच्या मुला-मुलींना याडी-कोंडा म्हणून हिणवायचे. (याडी म्हणजे आई आणि कोंडा हा शब्द इतरेजनांसाठी वापरला जाणारा शब्द होय). ‘डिजिटल एज’मध्येही अशाप्रकारची भाषिक मानखंडना तांड्यावरच्या मुला-मुलींच्या वाट्याला येते. याडी-कोंडा म्हणून अजूनही हिणवले जाते. ही लोकं नुसतेच बोकडं कापतात, होळीला सोंगं करतात, अशा प्रकारची लोकप्रिय छबी आणि त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या अपधारणांमुळे सततची वेगळेपणाची भावना आणि परात्मीकरण तांड्यावरच्या प्रत्येकाच्या वाट्याला वर्गात बसताना, वाचताना, शाळेत वावरतांना यायचे.

भाषिक न्यूनगंडाची भावना इतकी शिगेला गेलेली असायची, की काही काहींना आपले नाव हे हास्यास्पद आहे असे वाटायचे. अर्थात ती ‘जाणीव’ सामुहिकरित्या करून दिली जायची, नावाबद्दलचे गिल्ट शाळेत सामूहिकरीत्या दिले जातात. (उदाहरणार्थ आमच्या वर्गातील जोतीराम, तोळाराम, जोतीबाई इत्यादी). काहींना वडिलांचे नाव वर्गात जाहीरपणे घेण्यात तर फारच लाज वाटायची कारण तांड्यावर जुन्या पिढीचे नाव ठेवण्याचे ‘तथाकथित संस्कृतीकरण’ आणि ‘शुद्धीकरण’ झालेले नव्हते. म्हणून परंपरागत चालत आलेली नावे असायची. उदाहरणार्थ सोमा, भोमा, मक्खू, भंगी, गबरू, उखा, पेमा इत्यादी इत्यादी. राजू नावाच्या माझ्या एका मित्राने ‘माझी शाळा’ या विषयावर इयत्ता १० वीच्या सत्र परीक्षेत लिहिलेल्या निबंधाचे आमच्या शिक्षकानी वर्गात जाहीररीत्या वाचन करून त्याच्या अशुद्ध (?) भाषेवरून त्याची मानखंडना केल्याचे मला आठवते. भाषेचा या न्यूनगंडाचे कालांतराने ‘आत्मसातीकरण’ होते. याच प्रक्रियेसोबत आपली भाषा ‘दुय्यम’, ‘रानटी’ आणि ‘हीन’ आहे. ही भावना आपोआपच दृढमूल होते. सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे बहुभाषिकतेला शोषणाचे आणि बहुस्तरसत्तेचे संदर्भ असतात. तांड्यावरची लोकं सुद्धा ‘पावरा’ या आदिवासी जमातीच्या लोकांना आणि त्यांच्या भाषेला कमीअधिक याच तुच्छतेने बघतात हे इथे जाणीवपूर्वक नमूद केले पाहिजे.

हे टाळण्यासाठी…

भाषिक मानखंडना टाळण्यासाठी आपल्या ‘वर्गखोल्यांचे लोकशाहीकरण’ करणे अतिशय निकडीचे आहे. परस्परांबद्दल आदर भाव त्यांच्या मूल्य, संस्कृती आणि भाषिक सहअस्तित्वाची हमी देणारे लोकशाही वातावरण, तशा प्रकारची अध्यापन पद्धती, शिक्षणशात्र आणि अभ्यासक्रम पाहिजेत. भाषिक अंतराची वजाबाकी तेव्हांच होईल, जेव्हा वेगवेगळ्या भाषांमधील  ज्ञानाची देवाणघेवाण होईल, तेव्हांच सर्जनाचा अवकाश विस्तारला जाईल. साहित्यामध्ये बहुआयामी अनुभवविश्वाची भर भाषांना अधिक व्यापक आणि समावेशक बनवू शकते. कथित अभिजन आणि प्रमाण भाषांच्या ‘दुराग्रहा’मुळे बोलीभाषांच्या वाट्याला जी अप्रतिष्ठा येते, ती टाळण्यासाठी भाषिक न्यूनगंड आणि मानखंडनेविषयी सामजिक साक्षरता वाढवावी लागेल. Emancipatory project चे क्षितिज हे सतत विस्तारणारे असते म्हणून समग्रतेने सगळ्याच प्रकारच्या विषमतेची चर्चा व्हावी आणि त्यावर सामूहिक उपचार शोधला जावा.

सागर नाईक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये इतिहास विभागात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत.

COMMENTS