चेहरा झाकलेली मुलगी अभाविपची कार्यकर्ती : दिल्ली पोलिस

चेहरा झाकलेली मुलगी अभाविपची कार्यकर्ती : दिल्ली पोलिस

नवी दिल्ली : ५ जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार व विद्यार्थ्यांसह काही प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्या गुंडांच्या जमावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची

अभाविपने व्हॉटसअपवरून हल्ल्याचे नियोजन कसे केले?
गुंड मोकाट, रक्तबंबाळ झालेल्या आयेशी घोषवर २ गुन्हे दाखल
हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध

नवी दिल्ली : ५ जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार व विद्यार्थ्यांसह काही प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्या गुंडांच्या जमावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती कोमल शर्मा असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. जेएनयूत तोंडावर रुमाल व कापड बांधून अनेक गुंड घुसले होते, त्यात एक महिलाही व्हिडिओमध्ये आढळली होती. ती महिला अभाविपची कार्यकर्ती कोमल शर्मा असल्याचे ‘द वायर’सह अन्य प्रसारमाध्यमांनी पूर्वीच सांगितले होते. हे वृत्त दिल्ली पोलिसांचे म्हणणे पाहता खरे ठरले आहे.

कोमल शर्मा ही दिल्लीतील दौलत राम कॉलेजची विद्यार्थीनी असून ती आरएसएसप्रणित अभाविप संघटनेसाठी काम करते. जेएनयूतल्या हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले त्यापैकी एका व्हिडिओत साबरमती हॉस्टेलमध्ये कोमल शर्मा काही गुंडांसमवेत विद्यार्थींनीना दम देताना दिसून आली होती.  कोमलने आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर फिकट निळ्या रंगाचा स्कार्फ बांधला होता व तिच्या हातात एक काठी होती. तिच्यासोबत दोन पुरुषही होते. या सर्वांनी आपले चेहरे कापडाने बांधले होते व त्यांच्या हातात काठ्या होत्या.

पोलिसांनी कोमल शर्माची ओळख पटल्यानंतर तिला आणि अक्षत अवस्थी व रोहीत शहा अशा अन्य दोघांना आयपीसी १६० कलमअंतर्गत एक नोटीस पाठवली आहे. पण या तिघांचा ठावठिकाणा अद्याप पोलिसांना कळालेला नाही. त्यांचे मोबाइल फोनही बंद असून ‘इंडिया टुडे’ने केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये अवस्थी व शहा या दोघांनी जेएनयूच्या हिंसाचारात आपण सहभागी होतो अशी कबुली दिल्याचे आढळून आले होते.

दरम्यान अभाविपचे दिल्ली शाखेचे सरचिटणीस सिद्धार्थ यादव यांनीही कोमल शर्मा आमच्या संघटनेची सदस्य असल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. आमचा कोणाचाही कोमलशी संपर्क होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जेएनयूतल्या दोन विद्यार्थ्यांची चौकशी

मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सुचेता तालुकदार व प्रिया रंजन या दोन विद्यार्थ्यांनीची सुमारे दोन तास चौकशी केली. सुचेता तालुकदार ही ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशच्या ‘जेएनयूएसयू’ची कौन्सिलर आहे. तर प्रिया रंजन जेएनयूच्या भाषा, साहित्य व संस्कृती विभागात बीए शिकत आहे.

सुचेताने सुमारे दीड पानाचे एक पत्र एसआयटीकडे दिले तर प्रिया रंजनने एक पानी आपले म्हणणे पोलिसांना दिले आहे. ५ जानेवारी रोजी आपण नेमके कुठे होतो याची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्याचे समजते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0