अहमदाबाद व नरेंद्र मोदी – प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न

अहमदाबाद व नरेंद्र मोदी – प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न

मोदींनी गुजरात ही जशी हिंदुत्वाची प्रयोगशाळा केली गेली तसे ते अहमदाबाद शहराची प्रतिमा एक विकासाचे मॉडेल व गुजराती अस्मितांचे प्रतीक या दृष्टिकोनातून करताना दिसतात.

२५ वर्षे समाजासाठी खस्ता, मते फक्त १,२२४ मते?
२००२ मधील गुजरात दंगलींचा निवडणुकांशी संबंध?
‘नमस्ते ट्रम्प’चे आयोजक कोण?

२०१४मध्ये देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद हे भारताच्या राजनयिक संबंधांचे एक केंद्रस्थान बनले आहे. भारताच्या दौऱ्यावर जे काही बडे नेते आले आहेत त्यांना घेऊन मोदी अहमदाबादला येतात. आजपर्यंत मोदींनी त्यांच्यासोबत अहमदाबादमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, जपानचे पंतप्रधान शिंझो अबे व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना आणले आहे. जे विदेशी पंतप्रधान वा अध्यक्ष मोदींच्या राजकीय सोयींचे वाटतात त्यांना ते अहमदाबादमध्ये घेऊन येतात. कॅनडाच्या पंतप्रधानांची राजकीय भूमिका मोदींपेक्षा भिन्न असल्याने त्यांच्यासोबत येण्याचे मोदींनी टाळले होते. त्यामुळे जस्टीन टुर्ड्यू हे एकटेच अहमदाबादला, साबरमतीला आले होते. आता अमेरिकेचे अध्यक्ष अहमदाबादेत सपत्नीक येत आहेत. त्यांच्या या भेटीवर गुजरातच्या एकूण अर्थसंकल्पातील १.५ टक्के खर्च केला जाणार आहे.

मोदींनी गुजरात ही जशी हिंदुत्वाची प्रयोगशाळा केली गेली तसे ते अहमदाबाद शहराची प्रतिमा एक विकासाचे मॉडेल व गुजराती अस्मितांचे प्रतीक या दृष्टिकोनातून करताना दिसतात. याच शहरात हिंदू बहुसंख्याकवाद उभा करण्यात आला आणि तो राष्ट्रवादामध्ये रुपांतरीत करून तो गुजराती धनाढ्य, गर्भश्रीमंत, सधन वर्गात पसरवला गेला. याच शहरात मुस्लिम विरोध व गरीब विरोधाचे विकास मॉडेल पद्धतशीरपणे उभे केले गेले. उदाहरण द्यायचे झाल्यास अहमदाबादेतल्या अनेक भागात सरकारच्या परवानगी शिवाय हिंदू-मुस्लिम एकमेकांना आपली घरे, मालमत्ता विकू शकत नाहीत.

देखाव्याचे राजकारण

अहमदाबादेतून जाणाऱ्या साबरमती नदीचे विस्तारीकरण व तिचे सुशोभीकरण हे मोदींच्या विकासाचे एक प्रारुप आहे. २०१४मध्ये एका भव्य सोहळ्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना साबरमती नदीवरील झोपाळ्यात बसवण्यात आले होते व त्यांना नदीच्या पुढील विकसित भाग दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही गांधीनगर ते अहमदाबाद असा रोड शो करणार आहेत. ते साबरमती आश्रमालाही भेट देणार आहेत.

साबरमती नदी ही गुजरात व देशाच्या राजकारणात एक विशिष्ट प्रतिमा घेऊन येणारे स्थान आहे. साबरमतीच्या किनारी अहमद शहा पहिला याने अहमदाबाद हे शहर वसवले. त्याच्या समोर हे शहर वसवण्यामागे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक कारणे होती. १७ व्या शतकात हे शहर जगातील लोकसंख्येने जास्त असलेल्या पहिल्या १० शहरांमध्ये होते. नंतर हे शहर व साबरमती म. गांधी यांच्या आंदोलनामुळे भारतीय राजकारणात एक महत्वाचे केंद्र बनले. म. गांधी यांनी त्यांच्या आयुष्यातील १३ वर्षे साबरमती आश्रमात व्यतित केली होती.

२००१ ते २०१४ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी अहमदाबाद विकासाची जबाबदारी शहर रचनाकार विमल पटेल यांच्याकडे सोपवली. त्यांनी साबरमती नदी किनाऱ्याच्या पर्यावरणाचे अपरिमित नुकसान करून मोठ्या प्रमाणात भराव टाकून विस्तारीकरण, रुंदीकरण केले. या भागात कृत्रिम तळे उभे केले. साबरमती सुशोभीकरणासाठी सरकारने कोणताही मुलाहिजा न ठेवता सुमारे १० हजार लोकवस्तीच्या झोपड्या तोडल्या. या झोपड्यात हिंदू-मुस्लिम राहात होते. त्यांच्या हक्कासाठी काही संघटनांनानी जोर लावल्यामुळे काहींचे पुनर्वसन झाले. पण हे पुनर्वसन करताना हिंदू-मुस्लिम असा धार्मिक भेदभाव करण्यात आला. अशा भेदभावामुळे अनेक दशके असलेला हिंदू-मुस्लिम एकोपा कायमचा कडवट झाला.

सध्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर अनेक पार्क उभे आहेत. तेथे सायकल ट्रॅक आहे, काही ठिकाणी झुम्बा नृत्यासाठी राखीव भाग ठेवण्यात आला आहे. नदी किनाऱ्यावर अनेक ठिकाणी भराव टाकून तेथे श्रीमंतासाठी हॉटेल उभी करण्यात आली आहेत. महागड्या वस्तूंची दुकाने आहेत.

डिसेंबर २०१७मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांच्या काळात साबरमती नदीत मोदींनी सीप्लेन उतरवले होते. आपण केलेला विकास जगाने पाहावा हा त्यामागचा उद्देश होता.

आता अहमदाबादेत देशातील सर्वाधिक प्रेक्षक बसणारे मोटेरा स्टेडियम विकसित करण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या कार्यक्रमात ट्रम्प उपस्थित राहणार म्हणून अहमदाबाद शहरातील झोपडपट्‌ट्या दिसू नये म्हणून भिंती बांधण्यात आल्या आहेत. स्टेडियमच्या परिसरातल्या पानपट्‌टीवाल्यांचे ठेले, काही झोपड्याही रिकाम्या केल्या आहेत.

हे मोटेरा स्टेडियम एकेवेळी राजकीय आखाडा बनला होता. मोदींचे विरोधक नरहरी अमिन यांच्या ताब्यातून हे स्टेडियम सध्याचे गृहमंत्री अमित शहा व त्यांचे सुपुत्र जय शहा यांच्याकडे आले आहे.

म. गांधी व आश्रमाचा राजकीय वापर

दुसऱ्या देशाच्या अध्यक्ष, पंतप्रधानांना अहमदाबादमध्ये आणून हे आपण केलेल्या विकासाचे मॉडेल दाखवण्याचा मोदींचा एक प्रयत्न असतो. या प्रयत्नातून ते आपली एक विश्वव्यापी प्रतिमा निर्माण करत असतात.

२००२मध्ये गुजरात दंगलीच्या काळात मोदींनी स्वत:ची हिंदू हृदयसम्राट अशी प्रतिमा विकसित केली होती. या प्रतिमेच्या जोरावर त्यांनी पहिले गुजरात व नंतर देशाच्या राजकारणात एक कट्‌टर राष्ट्रवादी म्हणून राजकारण खेळले. याच मोदींनी कट्‌टर राष्ट्रवादी प्रतिमेच्या सोबत स्वत:ची विकासपुरुष अशीही प्रतिमा केली होती. त्यासाठी त्यांनी साबरमती सुशोभीकरण, कंकरिया सरोवर, गिफ्ट सिटी, व्हायब्रंट गुजरात परिषदा, एसईझेड मेळावे यातून विकासाचे राजकारण देशात होऊ शकते असा समज जनतेमध्ये निर्माण केला होता.

पण देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहचल्यानंतर मोदी स्वत:ची प्रतिमा संताहून अधिक उच्च अशी करताना दिसतात. त्यासाठी ते म. गांधींसोबत आपली निष्ठा सातत्याने व्यक्त करताना दिसतात. ही निष्ठा ते बोलताना दाखवतात, प्रत्यक्षात कधीच आचरणात ते आणताना दिसले नाहीत. पण गांधीजींचा सार्वजनिक स्वच्छतेचा आग्रह ते करताना दिसतात. हा आग्रह करताना ते गांधींजींनी सांगितलेला हिंदू-मुस्लिम सलोखा, आर्थिक स्वयंपूर्णता यांना मात्र पूर्णपणे फाटा देतात.

२०१४मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारत भेटीवर आले होते तेव्हा मोदी त्यांना घेऊन साबरमती आश्रमात आले होते. साबरमती किनाऱ्यावर दोघांनी झोपाळ्यावरून झोकेही घेतले होते. नंतर जपानचे पंतप्रधान शिंझो अबे, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी साबरमतीला भेट दिली होती. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प साबरमतीला भेट देणार आहेत. पण कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुर्ड्यू यांच्यासोबत मात्र मोदींनी येथे येण्याचे टाळले. त्याचे कारण असे की टुर्ड्यू यांची राजकीय भूमिका ही मध्यवर्ती स्वरुपाची आहे ती मोदींच्या राजकीय भूमिकेला छेद देणारी आहे. बाकी शिंझो अबे वगळता नेत्यांची भूमिका ही हुकुमशाही प्रवृत्तीची, राष्ट्रवादाला सतत चिथावणी देणारी आहे. जी मोदी सोयीस्करपणे वापरून घेतात.

गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी मोदींनी साबरमती आश्रमाला भेट देऊन या आश्रमाच्या नूतनीकरणासाठी २८७ कोटी रु.ची मदत जाहीर केली. हे नूतनीकरणाचे काम बिमल पटेल यांनाच देण्यात आले आहे. या बिमल पटेलांनी साबरमतीचा आश्रम पूर्वीच्या स्थितीत असेल व तो पर्यटकांसाठी असेल अशी कल्पना मांडलेली आहे.

बिमल पटेल यांच्या अशा कल्पनेमुळे जे आश्रमात राहणारे आहेत त्यांच्या मनात या आश्रमातून आपल्याला कायमचे निघावे लागेल ही भीती आहे. अशी भीती साबरमती नदीच्या विस्तारीकरणावेळी राहणाऱ्या झोपडपट्‌टीवासियांमध्ये होती.

जर साबरमती आश्रमाचे नूतनीकरण वेगाने झाले तर त्याने मोदींची प्रतिमा ही गांधीवादाचा पुरस्कर्ता करणारा नेता अशी होईल आणि जगभरातले नेते येथे यावेत म्हणून प्रयत्न केले जातील.

अहमदाबादेला भेट देणाऱ्या आजपर्यंतच्या विदेशी प्रमुखांना हे शहर आर्थिक राजधानी म्हणून कसे उदयास आले आहे, या शहरातील जीवनमान किती उंचावलेले आहे, लोक किती समृद्धतेत जगत आहेत, हे मोदींना दाखवायचे आहे. प्रत्यक्षात या शहरातील अनेक भाग उच्च-मध्यमवर्गीय व उच्चभ्रूंसाठी राखीव आहे. गरीबांची घरे दिसू नयेत म्हणून भिंती बांधल्या जात आहेत. मुस्लिमांना त्यांच्याच वस्तीमध्ये ढकलले जात आहे. ऐतिहासिक वास्तूंची माहिती दडपली जात आहे किंवा त्यांना वेगळा ऐतिहासिक संदर्भ दिला जात आहे. धर्मांध राजकारणाला जे सोयीचे आहे ते केले जात आहे.

शरीक लालीवाल, या गुजरातचे राजकारण व इतिहास यावर संशोधक असून नवी दिल्लीस्थित सेंटर फॉर इक्विटी स्टडीज व सोनपूरस्थित अशोक विद्यापीठाशी त्या निगडीत आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0